रशियाचे युक्रेनची राजधानी कीव्हवर ‘आत्मघातकी ड्रोन’ हल्ले, दुसऱ्या महायुद्धाशी थेट संबंध

    • Author, पॉल अॅडम्स कीव्हमधून आणि मर्लिन थॉमस लंडनहून
    • Role, बीबीसी न्यूज

युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये किमान चार स्फोट झाले आहेत. यासाठी रशियानं पाठवलेले कॅमिकॅझे ड्रोन कारणीभूत असल्याचं युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागारांनी म्हटलं आहे.

यातून रशियाची हतबलता दिसून येते, असं युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांचे स्टाफ प्रमुख अँद्रे येमार्क यांनी म्हटलं आहे.

बंदराचं शहर असलेल्या मायकोलेव्हमध्ये सूर्यफूल तेलाच्या टाक्यांना अशाच ड्रोननं आग लावली, असं शहराचे महापौर म्हणाले आहेत.

एका आठवड्यापूर्वी या ठिकाणी रशियन क्षेपणास्त्रांनी हल्ला केला होता आणि त्यात 19 जणांचा मृत्यू झाला होता.

युक्रेनच्या हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, इराणी बनावटीचे सर्व ड्रोन्सनं दक्षिणेकडून देशात उड्डाण केलं होतं.

ऑलेक्सेंडर सेंकेविच म्हणाले की, कीव्हमधील हल्ल्याच्या काही तास आधी रविवारी संध्याकाळी उशिरा युक्रेनच्या सर्वांत मोठ्या बंदरांपैकी एक असलेल्या मायकोलेव्ह येथे तीन टाक्या ड्रोनने पेटवल्या.

यानंतर सोमवारी सकाळी अशाचप्रकारचे हल्ले कीव्हमध्ये करण्यात आले होते. महापौर विटाली क्लिट्स्को यांनी सांगितलं की, मध्य शेवचेंकिवस्की भागातील निवासी इमारतींचं नुकसान झालं आहे

अँटी एअरक्राफ्ट बॅटरींचा वापर करून ड्रोन्सना खाली पाडण्याचा प्रयत्न केल्याने शहर बंदुकीच्या गोळीबारानं दुमदुमलं होतं.

दोन स्फोट हे शहराच्या केंद्रस्थानाजवळ झाले यामुळे संपूर्ण परिसरात सायरन आणि कारचे अलार्म ऐकू येत होते.

"शत्रू आमच्या शहरांवर हल्ला करू शकतो, पण तो आम्हाला तोडू शकणार नाही," असं राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले आहेत. हे म्हणजे नागरिकांना घाबरण्यासाठी केलेले हल्ले आहेत, असं त्यांनी या हल्ल्यांचं वर्णन केलं आहे.

नेमकं काय टार्गेट केलं जात आहे ते ठरवणं कठीण आहे. पण, निवासी आणि अनिवासी इमारतींना फटका बसल्याचं महापौर कार्यालयाचं म्हणणं आहे. कीव्हच्या मुख्य स्थानकाजवळ स्फोट झाल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

रॉयटर्सच्या एका पत्रकारानं हल्ल्यात वापरलेल्या ड्रोनचे तुकडे पाहिल्याचं वृत्त आहे, ज्यात 'हे बेल्गोरॅाडसाठी आहे' असे शब्द वापरण्यात आले आहेत.

युक्रेनने बेल्गोरॅाड शहरावर क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा आरोप क्रेमलिनने केला आहे. युक्रेनने याचा इन्कार केला आहे.

युक्रेनमध्ये लढण्यासाठी स्वेच्छेनं उतरलेल्या दोन बंदूकधाऱ्यांनी युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या रशियाच्या बेल्गोरॅाड प्रदेशातील रशियन लष्करी प्रशिक्षण शिबिरात शनिवारी 11 जणांना ठार केलं.

दरम्यान, अलीकडील हल्ल्यांनी युक्रेनच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य केलं आहे.

टेलिग्रामवर लिहिताना क्लिट्स्को म्हणाले की, रहिवाशांनी पाच ते सहा स्फोट ऐकले असले तरी कीव्हमध्ये चार स्फोट झाले आहेत. लोकांना सुरक्षितस्थळी थांबण्यास सांगितलं आहे.

येमार्क यांनी कॅमिकॅझे हल्ल्यांचे वर्णन रशियानं घातलेलं 'मृत्यूचे थैमान' असं केलं आहे आणि युक्रेनला शक्य तितक्या लवकर अधिक हवाई संरक्षण प्रणालीची आवश्यकता असल्याचं म्हटलं आहे.

कॅमिकॅझे ड्रोन काय आहेत?

  • हे ड्रोन लहान हवाई शस्त्रं असताता ज्यांना लोइटरिंग म्युनिशन्स असंही म्हणतात. जे लक्ष्यावर हल्ला केल्यानंतर नष्ट होतात.
  • इतर ड्रोन क्षेपणास्त्र सोडल्यानंतर माघारी येतात, त्याच्या विपरीत हे कॅमिकॅझे ड्रोन डिस्पोजेबल असतात.
  • दुसर्‍या महायुद्धात आत्मघाती मोहिमांमध्ये विमानं क्रॅश करण्यास स्वेच्छेनं जीव देणाऱ्या जपानी वैमानिकावरून हे नाव पडलं आहे.
  • झेलेन्स्की यांनी यापूर्वी रशियावर इराणी बनावटीचे ड्रोन वापरल्याचा आरोप केला आहे. पण, इराणनं त्यांचा पुरवठा केल्याचं नाकारलं आहे, तर रशियाने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)