You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन-रशिया युद्ध : 'या' तीन परिस्थितीत नाटो संघर्षात उतरू शकते
- Author, फ्रँक गार्डनर
- Role, बीबीसी संरक्षण प्रतिनिधी
ब्रुसेल्समध्ये गेल्या आठवड्यात नाटोच्या संरक्षण मंत्र्यांची बैठक झाली. त्यात नाटोने युक्रेनला किती मर्यादेपर्यंत मदत करावी याविषयी निर्णय घेण्यात येत आहे.
रशियाविरुद्ध संघर्ष करत असलेल्या युक्रेनला प्रत्यक्ष युद्धात भाग न घेता शस्त्राचा पुरवठा करणं हे नाटोसमोर एक मोठं आव्हान आहे. त्याचबरोबर आपली पत सांभाळणं हेही एक आव्हान त्यांच्यासमोर आहे.
दरम्यान, युक्रेन सरकार नाटोला खुलेपणाने लष्कर मदत मागत आहे.
युक्रेनच्या मते पूर्व डोबनास भागात रशियाचे हल्ले रोखण्यासाठी पाश्चिमात्य देशांकडून शस्त्रांची गरज आहे. युक्रेनच्या मते त्यांना तातडीनं जेवलिन NLAW (Next generation anti weapon) आणि स्टारस्ट्रीक अँटी टँक आणि अँटी एअरक्राफ्टची गरज आहे. युक्रेनचं सैन्य आधीपासूनच पाश्चिमात्य देशात तयार झालेल्या शस्त्रांचा वापर करत आहे.
युक्रेनला आतापर्यंत शस्त्रास्त्रं मिळताहेत, मात्र त्यांना आणखी शस्त्रांची गरज आहे.
युक्रेनला टँक हवेत, लढाऊ विमानं हवेत आणि आधुनिक एअर डिफेंस मिसाईल डिफेंस सिस्टिमची गरज आहे जेणेकरून ते वाढत्या हवाई हल्ल्यांना आणि दूर अंतरावरून हल्ल्यांना तोंड देऊ शकतील. रशियाच्या हल्ल्यामुळे युक्रेनच्या इंधन साठ्यांचं आणि शस्त्रागाराचं प्रचंड नुकसान होत आहे.
नाटोसमोर नेमक्या काय अडचणी आहेत?
युद्ध तीव्र होण्याची भीती हे या प्रश्नाचं एकमेव उत्तर आहे.
पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांना रशिया युक्रेनमध्ये आण्विक शस्त्रांचा वापर तर करणार नाही ना ही भीती आहे. अशा परिस्थितीत अनेक अडचणी येण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला काय काय दिलं आहे?
- आतापर्यंत तीस पेक्षा अधिक पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला मदत केली आहे. त्यात युरोपियन युनियन ने एक अरब युरो आणि अमेरिकेच्या 1.7 अरब डॉलरच्या मदतीचा समावेश आहे.
- आतापर्यंत ही मदत फक्त शस्त्रास्त्रांपर्यंत मर्यादित आहे.
- यात खांद्यावर ठेवून हल्ला करणाऱ्या जेवलिन मिसाईलचा समावेश आहे. हे मिसाईल उष्णता ओळखून रॉकेट हल्ला करतात.
- युक्रेनला स्टिंगर मिसाईल मिळाले आहेत. सैनिकांना हाताळण्यासाठी हे अतिशय सोपं शस्त्र आहे. अफगाणिस्तान- सोवियत युद्धात या मिसाईलचा वापर सोवियतची विमानं पाडण्यासाठी झाला होता.
- स्टारस्ट्रीक पोर्टेबल एअर डिफेंस सिस्टिम- ब्रिटनमध्ये तयार झालेलं हे हत्यार सहज नेता येतं. युक्रेनला शस्त्रं दिली तरी नाटोचा युद्धात सहभाग आहे असा आरोप होण्याची भीती नाटोला आहे.
- असं असुनही झेक प्रजासत्ताकने युक्रेनला टी-72 मिसाईल टँक पाठवलं आहे.
रशिया युक्रेन युद्धाच्या सुरुवातीलाच पुतिन यांनी इशारा दिला होता की रशिया एक अण्वस्त्रसंपन्न देश आहे.
अमेरिकेने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. रशियाने त्यांची अण्वस्त्रं अजून बाहेर काढलेली नाही, असा अमेरिकेचा अंदाज आहे. वास्तविक पुतिन यांना सांगायचं होतं की, आमच्याकडे अण्वस्त्रं आहेत त्यामुळे आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका.
रशियन सैन्याचा अण्वस्त्रांचा थेट वापर करण्यावर जास्त भर आहे. पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्रांचा तिटकारा आहे याची रशियाला कल्पना आहे. गेल्या 77 वर्षांत अण्वस्त्रांचा वापर झालेला नाही.
त्यामुळे भलेही युक्रेनमधल्या मर्यादित भागात अण्वस्त्रांचा परिणाम होईल पण एकदा का अण्वस्त्र वापरण्याची भीती संपली की पाश्चिमात्य देशांमध्ये अणुयुद्धाला सुरुवात होईल, अशी भीती नाटोला वाटत आहे.
त्याबरोबरच रशियाने केलेल्या प्रत्येक अत्याचाराबरोबर नाटोचा संकल्प आणखी दृढ होत जातो. झेक रिपब्लिकने आधीच टँक पाठवले आहेत.मात्र युक्रेनला टँक पाठवणारा तो पहिला देश आहे. स्लोवाकियानेही त्यांन S300 हे शस्त्र पाठवलं आहे. जेव्हा युद्धाची सुरुवात झाली तेव्हा ही दोन्ही पावलं धोकादायक वाटत होती.
युक्रेनच्या संसदेच्या संरक्षण समितीचे मुख्य सदस्य टोबियास एलवूड यांना असं वाटतं की, रशिया जेव्हा अण्वस्त्रांची भीती घालतो तेव्हा ते फक्त तसा आभास निर्माण करतात आणि नाटोने युक्रेनला आणखी मदत करायला हवी.
ते म्हणतात, "ज्या लोकांना शस्त्रं देण्याची इच्छा आहे त्यांच्याबद्दल आम्ही अधिक सावधगिरी बाळगत आहोत. आम्हाला आणखी ठाम भूमिकेची गरज आहे. आम्ही युक्रेनच्या लोकांना जिवंत राहण्यासाठी शक्य तितकी मदत करत आहोत. मात्र हे युद्ध जिंकण्यासारखं नाही आणि ते बदलण्याची गरज आहे."
त्यामुळे हे युद्ध आता कोणतं वळण घेणार हा प्रश्न आहे आणि ते जर युरोपात पसरलं आणि नाटोला त्यात सामील व्हावं लागलं तर?
त्यामुळे अशी परिस्थिती उद्भवू शकते ज्यामुळे पाश्चिमात्य देशांच्या जीवाला घोर लागू शकतो.
अशा परिस्थितीत तीन गोष्टी होऊ शकतात
1. युक्रेन ओडेसा भागातून काळ्या समुद्रात रशियन युद्धनौकेवर हल्ला करू शकतो. त्यात कमीत कमी 100 नाविक आणि अनेक नौसैनिक मारले जाऊ शकतात. एकाच हल्ल्यात इतके लोक मारले गेले तर रशियावर सूड घेण्याचा दबाव वाढत जाईल.
2. स्लोव्हाकिया किंवा पोलंड या देशातून येणाऱ्या मदतीवर रशियाचे मिसाईल हल्ला करतात. अशा प्रकारे नाटोचे सैनिक मारले गेले तर नाटोच्या घटनेचं कलम 5 अंमलात येईल. असं झालं तर सर्व नाटो देशांना एकत्र येऊन या देशांच्या संरक्षणासाठी उभं रहावं लागेल.
3. डोनबास भागात एखाद्या भागावर हल्ला झाला तर तिथून रासायनिक वायू निघू शकतो. असं आतापर्यंत झालं आहे मात्र त्यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र सीरियाच्या घुटा भागात झालेल्या रासायनिक हल्ल्यासारखं युक्रेनमध्येही काही झालं तर हे रशियाने जाणुनबुजून केलं आहे हे लक्षात येईल आणि नाटोला त्याची दखल घ्यावीच लागेल.
वर उल्लेख केलेल्या तिन्ही गोष्टी होणारच नाही असंही होऊ शकतं.
एका बाजूला रशियाच्या हल्ल्याच्या विरोधात पाश्चिमात्य देशांनी एकजूट दाखवली आहे. नाटो देश फक्त प्रतिक्रिया देत आहेत आणि हे युद्ध कसं संपेल याबाबत कोणताही विचार करत नाहीत, असंही म्हटलं जात आहे.
ब्रिटनच्या सगळ्यात अनुभवी अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितलं, "सर्वांत मोठा प्रश्न असा आहे की आमचं सरकार संकट सोडवण्याच्या मागे आहे की त्यांच्याकडे काही ठोस पावलं नाहीत."
त्यांच्या मते या प्रश्नाचा विचार सर्वांत शेवटी करायला हवा.
"आपण युक्रेनला सर्वतोपरी मदत करायला हवी हे आम्ही सिद्ध करू पाहत आहोत. मात्र पुतिन हे मोठे खेळाडू आहे हे मात्र नक्की."
एलवूड या मताशी सहमत आहेत.
"रशियाला हे चांगलं जमतं. आम्ही इथे फसतोय, संघर्ष कमी करण्याची क्षमताच आम्ही गमावून बसलो आहोत." एलवूड म्हणतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)