रासायनिक शस्त्रं काय असतात? ज्यांची रशिया युक्रेन युद्धात चर्चा सुरू आहे

    • Author, फ्रॅक गार्डनर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

युक्रेनवर रासायनिक शस्त्र विकसित केल्याचा आरोप केल्यानंतर रशियानं या मुद्द्यावर चर्चेसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलावली.

हा रशियाच्या फॉल्स फ्लॅग मोहिमेचा भाग असल्याचे म्हणत युक्रेननं रशियाचा दावा फेटाळलाय.

युक्रेनमधील शहरांवरील संभाव्य रासायनिक हल्ल्यांना बरोबर ठरवण्यासाठी रशियानं हे दावे केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय.

युक्रेनच्या सरकारच्या म्हणण्यानुसार, आमच्या देशात अशा प्रयोगशाळा आहेत, जिथं शास्त्रज्ञांनी लोकांना कोव्हिड-19 सारख्या आजारांपासून वाचण्यासाठीच्या लशी तयार करण्याचं काम केलं आणि तेही कायदेशीररित्या.

मात्र, आता युक्रेनमध्ये युद्ध सुरू असल्यानं, जागतिक आरोग्य संघटनेनं युक्रेनला सांगितलंय की, प्रयोगशाळांमधील कुठल्याही प्रकारचं धोकादायक पॅथोजन नष्ट करा.

या सर्व गोष्टींवरून एका मुद्द्याची चर्चा सुरू झाली आहे, ती म्हणजे रासायनिक शस्त्रांची. पण मुळात रासायनिक अस्त्रं काय असतात आणि जैविक शस्त्रांपेक्षा वेगळी असतात का?

रासायनिक शस्त्रं काय असतात?

रासायनिक शस्त्रं या शब्दातच खरंतर त्याचा अर्थ कळून येतो. ज्या शस्त्रांमधून माणसांच्या शरीरात विषारी आणि रासायनिक घटक सोडले जातात, ते रासायनिक शस्त्र, असा साधा-सरळ अर्थ सांगता येईल.

मात्र, रासायनिक शस्त्रांचे अनेक प्रकार आहेत. काही रासायनिक शस्त्र असे आहेत, ज्यात माणसांची श्वासकोंडी करणारे वायू असतात. उदाहरणादाखल फोजजीनचं नाव सांगता येईल. हे फोजजीन फुफ्फुसं आणि श्वसन यंत्रणेवरच हल्ला करतं आणि त्यामुळे पीडित व्यक्तीला श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो आणि अंतिमत: मृत्यूला कवटाळावं लागतं.

मस्टर्ड गॅससारख्या रासायनिक शस्त्रांनी माणसाची त्वचा जळते किंवा या गॅसमुळे दृष्टीहिनतेची भीती निर्माण होते.

सर्वांत घातक रासायनिक शस्त्र म्हणजे नर्व्ह एजंट्स. हे शस्त्र पीडित व्यक्तीच्या मेंदू आणि त्याच्या शरीरारच्या आतील भागात गंभीर इजा पोहोचवतं.

या रासायनिक शस्त्राचा एखादा छोटासा कण, थेंब किंवा वायूचा छोटाचा भागसुद्धा घातक ठरू शकतो. नर्व्ह एजंट्स व्हीएक्सच्या 0.5 मिलिग्रॅममुळेही एखादी व्यक्ती मृत्यूच्या दाढेपर्यंत पोहोचू शकते, इतकं हे घातक असतं.

युद्धादरम्यान या सर्व तथाकथित रासायनिक एजंट्सचा आर्टिलरी शेल, बॉम्ब आणि मिसाईल्सच्या माध्यमातून वापर केला जाऊ शकतो.

मात्र, केमिकल वेपन्स कन्व्हेन्शन 1997 च्या या शस्त्रांचा प्रयोग करण्यास बंदी आहे. रशियासह जगातील अनेक देशांनी या कन्व्हेंशनवर स्वाक्षरी केलीय.

जगातभरात या शस्त्रांच्या वापरावर आणि प्रसार रोखण्यासाठी काम करणारी संस्था म्हणजे 'ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स.' या संस्थेचं कार्यालय नेदरलँडमधील हेगमध्ये आहे.

याआधी या शस्त्रांचा वापर पहिलं महायुद्ध आणि ऐंशीच्या दशकात इराण-इराक युद्धात, तर गेल्या काही वर्षात सीरियन सरकारनं बंडखोरांविरोधात केल्याचं दिसून येतं.

रशियाच्या मते, 2017 साली त्यांनी त्यांच्याकडील उरलेले रासायनिक शस्त्रं नष्ट केले. मात्र, त्यानंतर दोनवेळा रासायनिक शस्त्रांद्वारे हल्ले केल्याचा आरोप रशियावर करण्यात आला होता.

जेव्हा लक्ष्मणरेषा ओलांडली गेली...

यातली पहिली घटना 2018 मध्ये घडली. केजीबीचे माजी अधिकारी सर्गेई स्क्रीपल आणि त्यांच्या मुलीवर नर्व्ह एंजट्स नोव्हिचॉकनं हल्ला करण्यात आला होता. रशियानं या हल्ल्याची जबाबदारी घेण्यास नकार दिला. त्याचसोबत, रशियानं 20 वेगवेगळ्या पद्धतीनं सांगितलं की, हा हल्ला कोण करू शकतो.

मात्र, तपास यंत्रणा याच निकालापर्यंत पोहोचली की, रशियाच्या जीआरयू मिलिट्री इंटेलिजियन्सच्या दोन अधिकाऱ्यांनी हे काम केलं होतं आणि त्याचा परिणाम असा झाला की, अनेक देशांमधील 128 रशियन गुप्तहेर आणि डिप्लोमॅट्सना त्यांच्या पदांवरून हटवण्यात आलं होतं.

त्यानंतर 2020 मध्ये रशियाचे प्रमुख विरोधी पक्षनेते एलेक्सी नवाल्नींवर नोव्हिचोक नर्व्ह एजंट्सने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यातून ते अगदी मरता मरता वाचले, असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

या सर्व पार्श्वभूमीमुळे प्रश्न उपस्थित होतो की, रशिया युक्रेनमध्ये रासायनिक शस्त्रांचा वापर करू शकतं का?

जर रशियानं विषारी वायूसारख्या शस्त्राचा वापर केला, तर लक्ष्मणरेषा पार केल्याचं मानलं जाईल आणि पाश्चिमात्य देशांकडे याविरोधात कठोर पावलं उचलण्याची मागणी केली जाऊ शकते.

सीरियात मदतीसाठी गेलेल्या रशियानं बंडखोरांविरोधात या शस्त्रांचा वापर केल्याचे काही पुरावे नाहीत. मात्र, रशियानं सीरियाच्या बशीर अल-असद सरकारला मोठं सैन्य समर्थन दिलं होतं, ज्यात कथितरित्या आपल्याच नागरिकांवर डझनभर हल्ले केले होते.

आणि हे सत्यच आहे की, जर तुम्हाला युद्धातील हल्लेखोरांचं मनोबल तोडायचं असेल, तर रासायनिक शस्त्रांएवढं खात्रीशीर दुसरं काही नसतं. सीरियाने अलेप्पोमध्ये हेच म्हटलं होतं.

जैविक शस्त्रं काय असतात?

जैविक शस्त्रं हे रासायनिक शस्त्रांपेक्षा फार वेगळे असतात. जैविक शस्त्रांमुळे इबोलासारखे पॅथोजन किंवा विषाणू शस्त्र म्हणून वापरले जातात.

युक्रेननं रशियावर आतापर्यंत बरेच आरोप केलेत. मात्र, त्यातील एकाचाही पुरावा दिला नाहीय. मात्र, शुक्रवारी (11 मार्च) संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेची बैठक बोलाण्यात आली होती.

सोव्हिएत संघावेळी रशियाने एक व्यापक बायोलॉजिकल शस्त्र कार्यक्रम चालवलं होतं, ज्याला बायोप्रिपरेट नामक एजन्सी चालवत होती. या एजन्सीमध्ये 70 हजार लोक काम करत होते.

शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा शास्त्रज्ञ या कार्यक्रमाला थांबवण्यासाठी पोहोचले, तेव्हा त्यांना कळलं की, सेव्हियत संघानं एंथ्रॅक्स, स्मॉल पॉक्ससह इतर आजारांच्या पॅथोजनना व्यापक स्तरावर तयार केलंय. दक्षिण रशियाच्या एका बेटावर जीवित बंदरांवर या पॅथोजनची चाचणीही करण्यात आली होती.

एवढंच नव्हे, तर या एजन्सीने एंथ्रॅक्सच्या स्पोर्सला दूरचं अतंर कापणाऱ्या इंटर-कॉन्टिनेन्टल मिसाईलच्या वॉरहेडमध्ये लोड करण्यात आलं होतं. याचं लक्ष्य पाश्चिमात्य देश होते.

यात एक डर्टी बॉम्बचाही समावेश आहे. हा बॉम्ब इतर बॉम्बसारखाच असला, तरी त्याच्यातून रेडिओयुक्त घटक असतात. याला आरडीडी म्हणजे रिडिओलॉजिकल डिस्पर्सल डिव्हाईस या नावानं ओळखलं जातं. यात रेडिओयुक्त आयसोटोपसारखे केसियम 60 आणि स्ट्रोनटियम 90 असू शकतात.

सुरुवातीला या बॉम्बमुळे तेवढ्याच लोकांचा मृत्यू होऊ शकतो, जेवढी इतर बॉम्बमुळे होतो. मात्र, लंडनसारख्या एखाद्या शहरात या बॉम्बचा वापर झाल्यास असं शहर पुन्हा राहण्यालायक राहू शकत नाहीत. जोवर संक्रमण पूर्णपणे नाहिसे होत नाही, तोवर ते राहण्यालायक राहत नाही.

डर्टी बॉम्ब हा मानसशास्त्रीय शस्त्र आहे, जे एखाद्या समूहात दहशत पसरवण्यासाठी किंवा मनोबल तोडण्यासाठी बनवला जातो. या शस्त्राचा आतापर्यंतच्या युद्धांमध्ये फारसा वापर झालेला दिसला नाहीय. कारण याच्या परिणामांना सांभाळणं कठीण असू शकतं आणि बॉम्बचा वापर करणाऱ्यांनाही त्यामुळे नुकसान होऊ शकतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)