You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
रशिया-युक्रेन युद्ध: 'पुतिनमुळे मी माझा नवरा आणि मुलगा गमावला...'
- Author, ओर्ला ग्युरिन
- Role, बीबीसी न्यूज, युक्रेन
"मी जसं स्वप्न पाहिलं होतं, तसाच तो होता. एखाद्या पुरुषानं कसं असावं, याचं उत्तम उदाहरण तो होता. आमच्या गळ्यातील ताईत होता तो. एखाद्या तटबंदीसारखा कुटुंबाला सांभाळायचा. माझी अनेक स्वप्नं त्यानं सत्यात उतरवली."
मरिना भावुक होत बोलत होत्या. मरिना यांचे पती मिहेलो यांचा रशियन सैन्यानं 6 मार्चला युक्रेनमधल्या इर्पिन शहरावर केलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. मिहेलो हे 54 वर्षांचे होते.
मरिना यांच्या कुटुंबावर तर दु:खाचं डोंगरच कोसळलंय. पती मिहेलो (वय 54 वर्षे) आणि मुलगा सेर्हिय (वय 32 वर्षे) या दोघांनी रशियन सैन्याच्या हल्ल्यात जीव गमावलाय.
रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला आता तीन आठवडे उलटलेत. युक्रेनमधील शेकडो कुटुंबं रशियाच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झाली. मरिना यांचं कुटुंबही त्यातलंच एक.
आम्ही (बीबीसी) व्हीडिओ कॉलच्या माध्यमातून मरिना यांच्याशी बातचित केली. मरिना सध्या पश्चिम युक्रेनमध्ये दूरच्या नातेवाईकाच्या घरी राहतायेत. मुलगी यान्ना आणि नातू असे आणखी दोघेजण त्यांच्यासोबत आता आहेत. या नातवाचं नाव आजोबांच्या नावावरूनच ठेवलंय, मिहेला.
मरिना माझ्या स्क्रीनवर दिसल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एकाचवेळी दु:ख आणि संताप दिसत होता.
त्या म्हणाल्या, "एखाद्या व्यक्तीची हत्या होते, तेव्हा पोलीस मारेकऱ्याचा शोध घेतात, त्याच्यावर न्यायालयीन खटला चालतो आणि मारेकऱ्याला शिक्षा होते. आता इथे मात्र एक व्यक्ती नाहीय, इथे अनेक आहेत. संपूर्ण देशाला मारलं जातंय. पूर्ण जगानं हे पाहावं की हे कोण करतंय. पुतिननं केवळ माझ्या कुटुंबाला संपवलं नाहीय, तर संपूर्ण देशाला संपवलंय."
रशियानं जेव्हा युक्रेनमधील इर्पिन शहरावर हल्ला करण्यास सुरुवात केली, तेव्हा मरिना या पती आणि मुलासह मुलीच्या घरात राहायला गेल्या. सातत्यानं होणाऱ्या गोळीबारामुळे त्यांच्या कुटुंबानं अंडरग्राऊंड कार पार्किंमध्ये आश्रय घेतला.
गोळीबार थोडा कमी झाल्याचा अंदाज आल्यावर जेवण आणि नातवाला अंघोळ घालण्यासाठी अपार्टमेंटमधील 15 व्या मजल्यावरील घरात ते सगळेजण परतले.
"आम्ही सगळं पटापट आवरलं. तेवढ्यात आम्ही ढगांच्या गडगडाटासारखा आवाज ऐकला. मिहेलो आणि सेर्हियने आम्हाला - मी, मुलगी आणि नातू - मागे खेचलं. आम्ही तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झालो, मात्र त्यांना दोघांना ते शक्य झालं नाही. मला शिट्टी वाजल्यासारखा आवाज आला आणि अंगावर कुठल्यातरी उष्ण गोष्टीचा स्पर्श झाल्यासारखं वाटलं. मला नेमकं कळलं नही, काय झालं ते. पण मी जिवंत आहे, एवढं मला कळलं."
आमच्या फ्लॅटच्या बेडरूमवर गोळीबार झाल्याचं कळलं. बेडरूम पार उद्ध्वस्त झालं होतं.
मरिना जोरजोरात ओरडू लागली. तिला मुलगी आणि नातू सापडले. ते दोघेही घाबरले होते. मात्र, त्यांना दुखापत झाली नव्हती.
त्या दिवसाबद्दल सांगताना मरिना म्हणतात, "मी माझे पती आणि मुलाच्या नावानं हाका मारत होते. सेर्हिय, मिशा अशा मी हाका मारत होते. माझ्या मुलानं प्रतिसाद दिला. मी त्याच्या आवाजाच्या दिशेनं गेले आणि तो फ्लॅटमध्येच पडला होता. माझे पती पुढच्या पायऱ्यांवर पडले होते. ते फ्लॅटच्या आणखी थोडे बाहेर पडले असते, तर ते वाचू शकले असते. काँक्रिटची पूर्ण भिंत त्यांच्यावर पडली होती.
"माझा मुलगा सेर्हिय जिवंत होता. तो ओरडत होता, आई इकडे येऊ नकोस. इथून जा, इथून जा... यान्ना आणि बाळाला दूर घेऊन जा. मला लक्षात आलं, त्याला हलताही येत नाहीये. मी त्याला म्हणाले, थांब, मी पुन्हा येते."
मरिया, यान्ना आणि मिहेलो धूळ आणि धूर यांच्यातून वाट काढत पायऱ्या उतरू लागले. खाली पोहोचल्यावर त्यांनी शेजाऱ्यांकडे मदतीची याचना केली.
त्या पुढे म्हणाल्या, "शेजाऱ्यांनी तातडीनं प्रतिसाद दिला, ते धावतच फ्लॅटमध्ये गेले. तिथून परतल्यावर ते म्हणाले, कुणीतरी जिवंत आहे. मात्र, आम्ही काहीच करू शकलो नाही. मी चादर आणि बँडेज मागितलं आणि म्हटलं, मी स्वत: तिथं परत जाईन.
"एक महिला डॉक्टर माझ्यासोबत आली. आम्हाला माझा मुलगा दिसला, तो तोवर पूर्णपणे शुद्धीत होता. त्याच्या पायाला जबर दुखापत झाली होती. तो म्हणाला, 'आई, मी उभाही राहू शकत नाही. मला आताच मारून टाका.' माझ्या मुलानं माझ्या कुशीत जीव सोडला. त्यानं दुसरं काहीच मागितलं नाही, त्यानं फक्त पुतिनबाबत संताप व्यक्त केला.
"सेर्हियचे स्वप्नंही त्याच्यासोबत संपले. आपलं एक कुटुंबं असावं, हे त्याचं स्वप्न त्याला पूर्ण करता आलं नाही. माझ्या नातवांना आता मी पाहू शकत नाही. पुतिननं केवळ माझ्या मुलाला मारलं नाहीय, तर माझ्या पतीलाही मारलंय. त्यानं माझ्या कुटुंबालाच मारलंय."
मरिना म्हणतात की, रशियाचं हे 'स्पेशल मिलिट्री ऑपरेशन' नसून, 'स्पेशल शेलिंग ऑपरेशन' आहे. त्यांनी एखाद्या घरावर गोळीबार केला नसून, शेकडो घरांवर केलाय. रशियानं इर्पिनला भयंकररित्या निशाणा बनवलाय.
चांगलं दृश्य मिळण्यासाठी टँक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत असल्याचं त्यांनी मला सांगितलं.
युक्रेनस्थित रशियन भाषिकांना वाचवण्यासाठी हे ऑपरेशन असल्याचा पुतिन यांचा दावा मरिना फेटाळतात. त्या म्हणतात, "त्यांनी मला वाचवावं, अशी कधीच गरज भासली नाही. मी आयुष्यभर रशियन भाषा बोलतेय. मी प्रवास करू शकले. मला हवी असलेली भाषा बोलू शकले. आंदोलनाचा भाग म्हणून मी आता युक्रेनी भाषा बोलण्यास सुरुवात केलीय. पुतिननं मला माझ्या देशावर अधिक प्रेम करायला लावलंय."
याआधी 2014 साली जेव्हा पुतिन यांच्या रशियन फौजांनी दोनेत्समध्ये आक्रमण केलं होतं, तेव्हा मरिना आणि त्यांचं कुटुंब दोनेत्समध्येच राहत होते. मात्र, त्यावेळी त्यांनी इर्पिनमध्ये स्थलांतर केलं आणि आता रशियानं पूर्ण युक्रेनभरच आक्रमण केल्यानं आता इर्पिनमध्येही त्या सुरक्षित नाहीत.
अनके युक्रेनी नागरिक एका शहरातून दुसऱ्या शहरात सुरक्षित आश्रयासाठी स्थलांतर करतायेत. मात्र, ते कुठेच सुरक्षित राहत नाहीत. कारण रशियाकडून सातत्यानं सर्वत्र हल्ले होतायेत.
मरिना म्हणतात, "आता प्रत्येक दिवस कठीण होत चाललाय. जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता आणि ज्या व्यक्तीला सर्वांत आधी 'गुड मॉर्निंग' म्हणता, ती व्यक्ती तुमच्यासोबत नसते. तुम्ही चांगल्या मूडमध्ये नसाल, तर तुम्हाला येऊन सरळ मिठी मारणारी व्यक्ती तुमच्यासोबत नसते."
मिहेलो मेकॅनिकल इंजिनिअर होते आणि कुटुंबातल्या सर्वांचं त्यांच्यावर प्रेम होतं. "मिहेलो उत्तम वडील होते. मुलावर प्रेम करत, नातवाचे लाड करत. नातवाचा जन्म झाला, तेव्हा ते अगदी त्या चिमुकल्यासारखे राहत. त्यांनी नातवाला बऱ्याच गोष्टी शिकवल्या."
आम्ही खूप स्वप्न पाहायचो, भविष्याचं नियोजन करायचो, आता स्वप्नांची जागा काळजीनं घेतलीय, असं त्या सांगतात.
"माझ्या नातवाला हेही माहित नाहीय की, त्याचे आजोबा आणि मामा आता या जगात नाहीत. तो मोठ्या आवाजानं घाबरतो. तो जेव्हा जेव्हा आवाज ऐकतो, तेव्हा म्हणतो, हे वाईट लोक गोळीबार करतायेत का? मला माझ्या मुलीला वाचवायला हवं आणि या युद्धापासून त्यांना दूर न्यायला हवं."
थोड्या काळासाठी असं वाटलं की, लविव्ह शहराच्या जवळ गेल्यानं त्यांनी धोक्याला टाळलंय. पण आता तिथेही हल्ले सुरू झालेत आणि तेही मिसाईलनं. लष्करी प्रशिक्षण तळावरील 35 जणांचा जीव या हल्ल्यानं घेतलाय.
युक्रेनमध्ये आता काहीच सुरक्षित नाही, असं म्हणायला आता काहीच हरकत नाही, अशी स्थिती आहे.
पती आणि मुलाला गमावल्यानंतर मरिना पाश्चिमात्य देशांना विनवणी करतात की, "नो-फ्लाय-झोन लागू करा. युक्रेनवरील आकाशाला सुरक्षित करा. आमच्यावर गोळीबार होऊ देऊ नका. युक्रेन संपूर्ण युरोपचं संरक्षण करतंय आणि आम्ही हे एकटंच करतोय."
दहा दिवस झाले, इर्पिन अजूनही जळतोय आणि आतापर्यंत इर्पिनमधले 60 हजारहून अधिक नागरिक स्थलांतरित झालेत. मिहेलो आणि सेर्हिय यांचे मृतदेह अजूनही फ्लॅटमध्ये पडून आहेत, त्यांच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कारही झाले नाहीत.
"माझे पती आणि मुलगा अजूनही त्या फ्लॅटमध्ये आहे. मी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करू शकले नाही. इथं अंत्यसंस्कारासाठी कुठलीच सोय नाहीय. आशा आहे की, त्यांच्यावर अंत्यसंस्कार तरी करता येईल, तिथं क्रॉस असेल आणि तिथं मी कायम जात राहीन."
रशियाच्या आक्रमणामुळे आपलं कुटुंबाचे दोन खंदे आधारस्तंभ गमावलेल्या मरिना भावुक होत हे सर्व बोलत होत्या.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)