जेव्हा अमेरिका रशियावर एका अस्वलामुळे अणूबॉम्ब टाकायला निघाली होती...

    • Author, झारिया गॉरवेट
    • Role, बीबीसी फ्यूचर

कधी प्राणी घुसले म्हणून किंवा कधी एका डॉलरहून कमी किंमतीची कम्प्युटर चिप खराब झाली म्हणून जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे प्रसंग येऊन गेले आहेत.

हे अविश्वसनीय वाटलं तरी काही वेळा क्षुल्लक चुकांमुळे अणुयुद्ध भडकण्याचं संकट निर्माण झालेलं होतं.

25 ऑक्टोबर 1962, रात्रीची वेळ: विस्कॉन्सिनमध्ये विमान थांबवण्यासाठी एक ट्रक धावपट्टीवरून वेगाने चालला होता. उड्डाण थांबवायला काहीच क्षण हातात होते.

यानंतर काहीच मिनिटांनी दुलूथ सेक्टर डायरेक्शन सेंटरच्या एका सुरक्षारक्षकाने केंद्राच्या कुंपणावरून चढणारी एक छायाकृती पाहिली आणि त्या दिशेने गोळी झाडली. त्याच क्षणी सर्वत्र धोक्याचा इशारा देण्यात आला. सोव्हिएत संघ आणि क्युबा यांनी संयुक्तरित्या क्षेपणास्त्र हल्ला केला असावा, अशी भीती त्या सुरक्षारक्षकाला वाटत होती.

हल्ला झाल्यासारखंच सर्वांना वाटलं. त्या भागातील सगळ्या विमानतळांवर अलार्म वाजू लागला. लोक वेगाने सतर्क झाले. जवळच्या वोल्क फिल्ड एअरबेस विमानतळावर कोणीतरी चुकीचं बटण दाबलं, त्यामुळे सुरक्षाविषयक प्रमाणित इशाऱ्याऐवजी वैमानिकांना आपात्कालीन सायरनचा आवाज ऐकू गेला. ही एका अर्थी त्यांना युद्धासाठी सज्ज व्हायची सूचना होती. पापणी लवते न लवते इतक्या वेळात ते आपापल्या विमानांमध्ये गेले आणि अण्वास्त्रांनी भरलेली विमानं हवेत उडवण्यासाठी तयार झाले.

या काळात सगळेच जण सावध होते. अकराच दिवसांपूर्वी हेरगिरी करणाऱ्या एका विमानाने क्यूबात गुप्तरित्या ठेवण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांची, लाँचिंग उपकरणांची आणि ट्रकची छायाचित्रं काढली होती. सोव्हिएत संघ अमेरिकेवर हल्ल्याची तयारी करतो आहे, अशी शंका त्यातून निर्माण झाली. दोघा देशांमध्ये एखाद्या गोळीची देवाणघेवाण झाली तरी परिस्थिती बिघडू शकते, हे जगभरातील देशांना माहीत होतं.

परंतु, दुलूथ केंद्रावरच्या सुरक्षारक्षकाला दिसलेली आकृती माणसाची नव्हती. ते एक मोठं काळं अस्वल होतं. सुरक्षारक्षकाला ते ओळखता आलं नाही. परंतु, वोल्क फिल्डमधल्या पथकाला अजून ही वस्तुस्थिती कळली नव्हती. आत्ता सरावाची कवायत सुरू नाहीये, तर खरोखरच तिसरं महायुद्ध सुरू झालेलं आहे, असा या पथकातील सैनिकांचा समज झाला होता.

दरम्यान, तळावरील अधिकाऱ्याला नक्की काय झालंय हे कळून चुकलं. त्यामुळे एका अधिकाऱ्याने चपळाई दाखवत धावपट्टीवरून ट्रक नेला आणि उड्डाणासाठी तयार असलेली, इंजिन सुरू केलेली विमानं थांबवली.

आता लोकांना 1960 च्या दशकातील या अणुयुद्धाच्या टांगत्या तलवारीचा जवळपास विसर पडला आहे. पण आता पुन्हा एकदा अणुयुद्धाचा धोका निर्माण झाला आहे.

आता अण्वास्त्रांचा साठा काही मोजक्याच देशांकडे आहे आणि हवामानबदलासारख्या गंभीर समस्या माणसासमोर उभ्या राहिल्या आहेत. परंतु, रणनीतीची भाग म्हणून अण्वास्त्रं सज्ज ठेवल्याचं विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलं आणि अणुयुद्धासंबंधीची चिंता वाढू लागली.

अटीतटीचा प्रसंग

जगभरात एकूण 14 हजार अण्वास्त्रं आहेत आणि पृथ्वीवरील जवळपास तीन अब्ज लोकांचं जीवन संपवण्याइतकी ताकद त्यांमध्ये आहे, याचा आपल्याला सहज विसर पडलेला असतो. अशा स्थितीत अणुयुद्ध झालं, तर संपूर्ण मानवी प्रजाती नष्ट होऊ शकते.

कोणी नेता जाणीवपूर्वक अणुहल्ला करण्याची शक्यता जवळपास नाहीच, हे आपल्याला माहीत असतं. पण अणुयुद्ध अपघातानेही सुरू होऊ शकतं, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

आत्तापर्यंत इतिहासात किमान 22 वेळा जगात अण्वास्त्रांचा वापर होता होता राहिला आहे. उडणारे हंस, चंद्र, कम्प्युटरशी संबंधित लहानमोठ्या समस्या आणि अंतराळातील बदललेलं वातावरण, अशा घटनांमुळे जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपल्याच्या घटना घडल्या आहेत.

1957 साली एका विमानाने चुकून एका घरामागच्या बागेत अणुबॉम्ब टाकला होता. या अपघातात कोणाचा मृत्यू झाला नाही, पण त्या घरातल्यांच्या कोंबड्या मरण पावल्या. असाच एक अपघात २०१० साली झाला होता. त्या वेळी अमेरिकी हवाई दलाचा सुमारे 50 आण्विक क्षेपणास्त्रांशी असलेला संपर्क तात्पुरता ठप्पा झाला होता. म्हणजे त्या वेळी एखादं क्षेपणास्त्र स्वतःहून डागलं गेलं असतं, तर ते अमेरिकी हवाई दलाला कळलं नसतं आणि त्यांना ते क्षेपणास्त्र थांबवताही आलं नसतं.

अचंबित व्हावं इतक्या संख्येने आधुनिक अण्वास्त्रं राखणारा आणि तांत्रिकदृष्ट्या वरचढ असणारा अमेरिकेसारखा देश 2019 ते 2028 या काळात आण्विक उपकरणं अधिक प्रगत करण्यासाठी 497अब्ज डॉलर खर्च करतो आहे. याचा अर्थ असा की, येत्या काळात मानवी चुकांमुळे किंवा इतर वन्यजीवांच्या कृत्यांमुळेसुद्धा आण्विक अपघात होऊ शकतात.

येल्तसिन यांची चूक

25 जानेवारी 1995 रोजी तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष बोरीस येल्तसिन हे 'आण्विक ब्रीफकेस' सुरू करणारे जगातील पहिले नेते ठरले. अणुहल्ला करण्याशी संबंधित सूचना आणि तांत्रिक तजवीज या 'आण्विक ब्रीफकेस'मध्ये असते.

नॉर्वेच्या किनाऱ्यावरून एक रॉकेट प्रक्षेपित करण्यात आल्याचं येल्तसिन यांच्या रडार ऑपरेटरांनी पाहिलं. त्यांना हे रॉकेट आकाशाच्या दिशेने जाताना दिसलं. त्या रॉकेटची दिशा त्यांच्या लक्षात आली नाही.

येल्तसिन यांनी आण्विक ब्रीफकेस सोबत घेऊन त्यांच्या उच्चपदस्थ सहकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली आणि प्रत्युत्तरादाखल हल्ला सुरू करायचा का, यावर ते बोलले. त्यांचा निर्णय व्हायला काहीच मिनिटं उरलेली असताना ते रॉकेट समुद्राच्या दिशेने जात असल्याचं ऑपरेटरांच्या लक्षात आलं आणि त्यापासून काही धोका नसल्याचं स्पष्ट झालं.

मुळात तो अणुहल्ला नव्हता, तर वैज्ञानिक चाचणी सुरू होती. धृवीय प्रकाशाच्या तपासासाठी ते रॉकेट पाठवलं जात होतं. यावरून इतका गोंधळ कसा काय निर्माण झाला, याबद्दल नॉर्वेचे अधिकारीही बुचकळ्यात पडले. एकाच महिन्यापूर्वी त्यांनी हे रॉकेट सोडण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा केली होती.

परतीचा मार्ग नाही

अणुहल्ला चुकून झाला की वास्तवातील एखाद्या धोक्यामुळे झाला, याने काही फरक पडत नाही. कारण, एकदा का क्षेपणास्त्रं डागलं की ते परत आणण्याचा काही मार्ग नाही.

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या प्रशासनात संरक्षण मंत्री राहिलेले आणि जिमी कार्टर यांच्या सरकारमध्ये उप-संरक्षण मंत्री राहिलेले विल्यम पेरी म्हणतात, "कोणा राष्ट्राध्यक्षाने चुकीच्या धोक्याच्या इशाऱ्यावर प्रतिसाद दिला, तरी त्यातून शेवटी अणुयुद्धच सुरू होणार आहे. कारण, एकदा निर्णय घेतल्यावर त्यांना त्यातून माघार घेता येणार नाही. क्षेपणास्त्राच्या परतीचा काही मार्ग नाही, किंवा ते क्षेपणास्त्र नष्टही करता येत नाही."

तर, आत्तापर्यंत जग कधी-कधी अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलं होतं आणि भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी काय करता येईल, हे जाणून घेणं आवश्यक आहे.

अणुहल्ले कसे होतात?

शीतयुद्धाच्या काळात आरंभिक इशारा देणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आणि त्यातून अण्वास्त्रांशी संबंधित गफलती होण्याची शक्यता वाढली.

वास्तविक आण्विक क्षेपणास्त्रांनी आपल्या लक्ष्यावर हल्ला केला की युद्ध सुरू झाल्याचा पुरावाच मिळतो. पण आता हल्ला होण्यापूर्वीच क्षेपणास्त्राची माहिती मिळेल आणि आपल्याला आधीच प्रत्युत्तरादाखल हल्ला करता येईल, असं तंत्रज्ञान उपलब्ध आहे.

प्रत्युत्तरादाखल लवकरात लवकर हल्ला करण्याच्या प्रयत्नात चुका होण्याची शक्यता वाढते. मुळात असं प्रत्युत्तर देता यावं यासाठी माहिती गोळा करत राहावी लागते.

अमेरिकेकडे सध्या असे अनेक उपग्रह आहेत जे आत्तासुद्धा गुप्त पद्धतीने जगभरातील घटनांवर लक्ष ठेवून आहेत. खुद्द अनेक अमेरिकी लोकांनाही या उपग्रहांविषयी माहिती नसते. यातील चार उपग्रह पृथ्वीपासून 35,400 किलोमीटर लांब आहेत. 'जिओसिंक्रोनस ऑर्बिट'मधील हे उपग्रह एका स्थानी स्थिर आहेत. पृथ्वीच्या संदर्भातील त्यांचं स्थान कधीही बदलत नाही.

म्हणजे एका प्रदेशात सतत देखरेख ठेवण्याची क्षमता या उपग्रहांमध्ये आहे, त्यामुळे संभाव्य आण्विक धोका त्यांना लगेचच कळतो. आठवड्याचे सात दिवस आणि दिवसाचे चोवीस तास हे उपग्रह त्या-त्या ठिकाणी लक्ष ठेवून असतात.

परंतु, प्रक्षेपण झालेल्या क्षेपणास्त्रावर हे उपग्रहसुद्धा लक्ष ठेवू शकणार नाहीत, अशा वेळी क्षेपणास्त्रांचा अदमास घेण्यासाठी अमेरिकेकडे शेकडो रडार केंद्रं आहेत. क्षेपणास्त्राचं स्थान, त्याचा वेग आणि ते किती दूरवर जाऊन पडेल, या सगळ्याचा अंदाज बांधण्याचं काम या रडार केंद्रांवरून केलं जाऊ शकतं.

असा हल्ला होत असल्याचा संकेत मिळाल्यावर राष्ट्राध्यक्षांना तसा संदेश पाठवला जातो. विल्यम पेरी सांगतात, "क्षेपणास्त्र डागण्यात आल्यावर पाच ते दहा मिनिटांमध्ये राष्ट्राध्यक्षांना त्याबद्दल माहिती मिळते."

त्यानंतर अतिशय अवघड आमि महत्त्वाचा निर्णय घ्यायची प्रक्रिया सुरू होते. प्रत्युत्तरादाखल हल्ला करायचा की नाही, याबद्दलचा हा निर्णय असतो. पेरी म्हणतात, "ही प्रक्रिया अतिशय जटील असते, पण ती सतत कार्यरत असते. आपण ज्या गोष्टीबद्दल बोलतोय ती प्रत्यक्षात घडण्याची शक्यता खूप कमी असली, तरी तसं काही घडलं तर त्याचे परिणाम अतिशय गंभीर असतील."

हे अर्थातच खरं आहे. निव्वळ एकदा असा हल्ला झाला तरी जग नष्ट होऊ शकतं.

तंत्रज्ञानाविषयीचे प्रश्न

या संदर्भात दोन चुकीच्या गोष्टींमुळे धोक्याचा इशारा गफलतीने दिला जाऊ शकतो- एक चूक तंत्रज्ञानाशी संबंधित आहे, तर दुसरी मानवी पातळीवरची आहे. किंवा दुर्दैव असेल तर दोन्ही चुका एकाच वेळी होण्याचीही शक्यता असते.

याचं सर्वांत मोठं उदाहरण 1980 साली घडलं होतं. त्या वेळी विल्यम पेरी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जिमी कार्टर यांच्या सरकारमध्ये उप-संरक्षण मंत्री होते. पेरी सांगतात, "तो अर्थातच प्रचंड मोठा धक्का होता."

त्या दिवशी रात्री तीन वाजता पेरी यांना एक फोन आला. अमेरिकी हवाई दलाच्या देखरेख विभागाकडून त्यांना सांगण्यात आलं की, सोव्हिएत संघाची सुमारे 200 क्षेपणास्त्रं थेट अमेरिकेच्या दिशेने येत असल्याचं टेहळणी करणाऱ्या संगणकांनी हेरलं आहे. हा धोका वास्तवाशी सुसंगत नाही, कम्प्युटरमध्ये काही गडबड झाली असावी, हे तोवर पेरी यांच्या लक्षात आलं.

पेरी सांगतात, "त्या लोकांनी मला फोन करण्याआधी व्हाइट हाऊसला फोन केला होता. राष्ट्राध्यक्षांना त्यांनी ही माहिती दिली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांपर्यंत हा संदेश पोचवण्यात आला."

सुदैवाने जिमी कार्टर यांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी त्यांना उठवण्याला काही मिनिटं उशीर केला, दरम्यान त्यांना हा संदेश चुकीचा असल्याची माहिती मिळाली. सल्लागाराने काही मिनिटांची वाट न बघता तत्काळ राष्ट्राध्यक्षांना उठवलं असतं आणि हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचला असता, तर कदाचित त्या क्षणी जगात उलथापालथ झाली असती.

पेरी सांगतात, "राष्ट्राध्यक्षांना थेट फोन केला गेला असता, तर प्रत्युत्तरादाखल कारवाईबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांच्याकडे जेमतेम पाच मिनिटांचा अवधी होता. अशा वेळी काय झालं असतं? अर्ध्या रात्री त्यांनी कोणाकडून याबद्दल सल्ला घेतला असता अशी शक्यता नाही."

हा प्रसंग घडल्यानंतर पेरी यांनी अणुयुद्धाची शक्यता केवळ तात्त्विक पातळीवरची मानली नाही, तर वास्तवातसुद्धा ही समस्या उद्भवू शकते हे त्यांना जाणवलं. "त्या दिवशी जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचलं होतं एवढंच मी सांगू शकतो," असं ते म्हणतात.

यानंतर झालेल्या चौकशीत स्पष्ट झालं की, धोक्याचा इशारा देणाऱ्या यंत्रणेतील कम्प्युटरमधील एक चिप खराब झाली होती, त्यामुळे हा गोंधळ झाला. मग अर्थातच ती खराब चिप बदलण्यात आली आणि नवीन चिपची किंमत होती निव्वळ एक डॉलर!

या प्रसंगाच्या एक वर्षं आधी पेरी यांनी आणखी एक अटीतटीचा प्रसंग अनुभवला होता. त्या वेळी एका तंत्रज्ञाने अजाणतेपणी प्रशिक्षणार्थींसाठीची एक टेप कम्प्युटरवर अपलोड केली. त्यामुळे गफलतीने क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची सविस्तर माहिती प्रमुख इशारा केंद्रांवर प्रसारीत झाली.

जगातील सर्व शहरं धुळीस मिळवण्याची ताकद असणाऱ्या या अस्त्रांचा वापर झाला तर काय होईल, इत्यादी सुरक्षेविषयीचे मुद्दे यानंतर उपस्थित होत राहिले. एखाद्या अजाण तंत्रज्ञाव्यतिरिक्त जगभरातील अण्वास्त्रांच्या वापरासंदर्भातील खरोखरचे अधिकार राखून असलेले जागतिक नेते हे आपल्या चिंतेचा मुख्य विषय आहेत.

सर्वांत मोठी जोखीम

विल्यम पेरी सांगतात, "अमेरिकी राष्ट्राध्यक्षांकडे अण्वास्त्रं वापरण्याचे संपूर्ण अधिकार आहेत. किंबहुना असा पूर्णाधिकार असलेले ते एकमेव व्यक्ती आहेत."

ही वस्तुस्थिती असली तरी ती हॅरी ट्रूमन अमेरिकी राष्ट्राध्यक्ष असताना त्यांना ती लागू नव्हती. शीतयुद्धादरम्यान याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार लष्करीधिकाऱ्यांकडे देण्यात आले होते. अण्वास्त्रं हे एक राजकीय शस्त्र आहे, त्यामुळे त्यावर राजकीय नेत्यांचं नियंत्रण असायला हवं, असं ट्रूमन यांचं मत होतं.

इतर अमेरिकी राष्ट्राध्यक्षांप्रमाणेच माजी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप जिथे-जिथे प्रवास करत तिथे त्यांच्यासोबत आण्विक फूटबॉल (आण्विक ब्रीफकेस) नेला जात असे. अमेरिकेतील सर्व अण्वास्त्रांच्या प्रक्षेपणासंबंधीचे कोड त्या ब्रीफकेसमध्ये असतात. अर्थातच विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासोबतसुद्धा ही ब्रीफकेस असतेच.

ते एखाद्या डोंगराळ भागात प्रवासाला गेलेले असोत, हेलिकॉप्टरमध्ये असोत, समुद्रातून जहाजामध्ये प्रवास करत असोत, कुठेही असले तरी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष अणुहल्ल्या घडवण्याची क्षमता राखून असतात. त्यांना केवळ एक आदेश द्यावा लागतो आणि काही प्रमाणात विध्वंसासाठी तयार राहावं लागतं, कारण असा हल्ला झाला तर हल्ला करणारा आणि हल्ला झेलणारा या दोन्ही बाजूंना थोड्याच मिनिटांमध्ये विध्वंस होणं निश्चित आहे.

इतक्या मोठ्या विध्वंसाची ताकद एका व्यक्तीच्या हातात असणं प्रचंड जोखमीचं आहे, असं मत अनेक संघटनांनी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केलेलं आहे.

दारू, अंमली पदार्थ आणि भावनिक अस्थिरता

विल्यम पेरी सांगतात, "अनेकदा अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना दारूचं व्यसन लागलेलं असतं किंवा त्यांना औषधं घ्यावी लागतात, किंवा ते एखाद्या मानसिक आजाराने ग्रासलेले असू शकतात. गतकाळामध्ये या गोष्टी घडलेल्या आहेत."

"याबद्दल जितका अधिक विचार करू तितकं डोकं भंडावून सोडणाऱ्या शक्यता समोर येत जातात. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रात्री झोपतात का, असाही प्रश्न कधीकधी समोर येतो. असा निर्णय काही मिनिटांमध्ये घ्यायचा असेल, तर झोपेतून उठल्यानंतर विचार करायला कितपत अवधी मिळेल? एखादा कप कॉफी पिऊन राष्ट्राध्यक्ष स्वतःला ताजंतवानं करण्याचा प्रयत्न करू शकतात, पण अशा अवेळी ते तल्लखपणे काम करू शकतील अशी शक्यता वाटत नाही."

ऑगस्ट 1974मध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन वॉटरगेट प्रकरणात अडकले होते आणि त्यांना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा लागण्याची वेळ आली होती. त्या वेळी त्यांना क्लिनिकल डिप्रेशनला सामोरं जावं लागलं होतं आणि त्यांचं वागणं अस्थिर झालेलं होतं.

त्यांना लवकर थकवा येत असे आणि ते नियमितपणे दारू पिऊ लागले होते, अनेकदा ते विचित्र वागायचे, इत्यादी अफवाही त्यावेळी पसरल्या होत्या. एकदा गुप्तचर विभागाच्या एका गुप्तहेराने निक्सन यांना कुत्र्यांसाठीची बिस्किटं खाताना पाहिलं होतं.

निक्सन अनेकदा जास्त चिडायचे, दारू प्यायचे आणि पौरुषत्व वाढवण्यासाठीची औषधंही ते घेत असत, असं म्हटलं जातं. पण यातील सर्वांत गंभीर बाब म्हणजे अशा परिस्थितीतसुद्धा अण्वास्त्रं वापरण्याचे अधिकार त्यांच्याकडे होते.

अमेरिकेतील आण्विक साठ्याचं रक्षण करणाऱ्या सैनिकी कर्मचाऱ्यांमधील व्यसनाधीनता हीसुद्धा एक समस्या आहे. 2016 साली क्षेपणास्त्र तळावर काम करणाऱ्या अनेक अमेरिकी सैनिकांनी कोकेन आणि एलएसडी अशा अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिली होती. त्या वेळी चार जणांवरील दोष सिद्धही झाले होते.

भीषण दुर्घटना कशी टाळायची?

या सर्व गोष्टी विचारात घेऊन पेरी यांनी अण्वास्त्र प्रसारबंदी संदर्भात काम करणाऱ्या प्लॉशेअर्स फंड या संस्थेचे धोरणविषयक संचालक टॉम कॉलिना यांच्यासह 'द बटन: द न्यू न्यूक्लिअर आर्म्स रेस अँड प्रेसिडेन्शिअल पॉवर फ्रॉम ट्रूमन टू ट्रम्प' हे पुस्तक लिहिलं.

या दोन्ही लेखकांनी आपल्यासमोरच्या आण्विक वर्तमानाचा उहापोह केला आहे. या संदर्भातील सुरक्षाविषयक अस्थिरता आणि त्यावरचे संभाव्य उपायही त्यांनी नोंदवले आहेत.

अण्वास्त्रवापराचे संपूर्ण अधिकार एकाच व्यक्तीकडे असू नयेत, असं ते पहिल्यांदा नमूद करतात. व्यापक जनसंहार घडवू शकणाऱ्या या अस्त्रांच्या वापरासंबंधीचा निर्णय लोकशाही पद्धतीने व्हायला हवा आणि अशा निर्णयावर कोणाच्या मानसिक दुर्बलतेचा परिणाम कमीतकमी व्हायला हवा, असं ते म्हणतात. म्हणजे अमेरिकेत या संबंधीचा निर्णय काँग्रेसमधील मतदानाद्वारे केला जावा, अशी त्यांची मागणी आहे.

पेरी म्हणतात, "अशामुळे क्षेपणास्त्र डागण्यासंबंधीची निर्णयप्रक्रिया संथ होईल."

सर्वसाधारणतः अणुहल्ल्याबाबतची प्रतिक्रिया तत्काळ यायला हवी, असं मानलं जातं. असं केल्याने प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्याची ताकद कमी होणार नाही, असं मानलं जातं.

परंतु, अमेरिकेच्या बाबतीत अनेक शहरांमधील आणि भूपृष्ठावर असणाऱ्या क्षेपणास्त्रांवर आण्विक हल्ला झाला आणि ही क्षेपणास्त्रं नष्ट झाली, तरीसुद्धा सरकारकडे सैनिकी पाणबुड्यांवरील आण्विक क्षेपणास्त्रं वापरण्याचा पर्याय उरतोच.

कोलिना सांगतात, "आपल्यावर हल्ला होतोय हे कळलं तरच प्रत्युत्तरादाखल हल्ला करावा. गफलतीने आलेल्या धोक्याच्या इशाऱ्यावर आपण कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नको. एखाद्या इमारतीला किंवा शहराला लक्ष्य करण्यात आल्यानंतरच हल्ला खरोखर झालाय की नाही, याची ठोस माहिती मिळते."

अशा बाबतीत धोक्याच्या इशाऱ्यांवरील कार्यवाही संथ गतीने झाली, तर परस्परांचा विध्वंस टाळता येऊ शकतो. अणुयुद्धाबाबत धोक्याच्या इशाऱ्यात गफलत होण्याची शक्यता खूप जास्त नसते, पण सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे अस्वल पाहून एखाद्या सुरक्षारक्षकाचा गैरसमज झाला तरीसुद्धा अशी परिस्थिती उद्भवू शकते.

स्वतःहून वापर नाही

अण्वास्त्रसज्ज देशांनी त्यांच्याकडील अस्त्रांचा वापर केवळ प्रत्युत्तरादाखल करावा, स्वतःहून असा वापर करू नये, असं आवाहन विल्यम पेरी आणि कोलिना संबंधित देशांना करतात.

कोलिना म्हणतात, "चीन हे या संदर्भातील एक मोठं उदाहरण आहे. त्यांनी स्वतःहून अण्वास्त्रांचा वापर न करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. संकट उद्भवलं तरी आपण पहिल्यांदा अण्वास्त्रांचा वापर करणार नाही, अशी घोषणा चीनने केली आहे. चीनची ही घोषणा काही अंशी विश्वसनीय वाटते, कारण त्यांनी अण्वास्त्रांना क्षेपणास्त्र पुरवठा व्यवस्थेपासून वेगळं ठेवलं आहे."

म्हणजे चीनला अणुहल्ला करण्यापूर्वी अण्वास्त्रं आणि क्षेपणास्त्रं एका ठिकाणी आणावी लागतील. आकाशातून इतके उपग्रह सतत लक्ष ठेवून असताना अशी हालचाल कोणाच्या ना कोणाच्या दृष्टीस पडणारच.

रशिया आणि अमेरिका यांचं असं काही धोरण नाही. अण्वास्त्रांचा वापर कधी आणि कसा करायचा, याचा अधिकार त्यांच्याकडे आहे; ते पारंपरिक युद्धातसुद्धा या अस्त्रांचा वापर करू शकतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओबामा सरकारने अण्वास्त्रांचा वापर स्वतःहून पहिल्यांदा न करण्याच्या धोरणाबाबत विचार केला होता, पण याबाबत त्यांचा काही निर्णय झाला नाही.

भूपृष्ठावरील आंतरखंडीय दृतगती क्षेपणास्त्रं पूर्णतः नष्ट करून टाकावीत, असं पेरी आणि कोलिना म्हणतात. कोणताही अणुहल्ला झाला, तरी ही क्षेपणास्त्रं नष्ट होतीलच. शिवाय, कोणी असा हल्ला करायचा ठरवला, तरी तो याच क्षेपणास्त्रांद्वारे केला जाईल.

आण्विक क्षेपणास्त्रं रद्द करणं

अण्वास्त्रसज्ज क्षेपणास्त्रं रद्द करता येतील का? एखाद्या वेळी धोक्याचा इशारा देण्यात आल्यावर हल्ला केला, तर मधेच क्षेपणास्त्रं डागण्याची प्रक्रिया रद्द करता येईल का?

कोलिना म्हणतात, "आपण क्षेपणास्त्रांची चाचणी करतो तेव्हा असं केलं जातं. क्षेपणास्त्रांचा मार्ग बदलला तर ती स्वतःच नष्ट होऊ शकतात. पण सक्रिय झालेल्या क्षेपणास्त्रांबाबत असं केलं जात नाही, कारण कोणा शत्रूने रिमोट कंट्रोल मिळवले तर तो क्षेपणास्त्रं निष्क्रिय करेल असा धोका असतो."

एखाद्या देशाच्या तंत्रज्ञानाचा वापर त्याच्याच विरोधात करण्याचे इतरही काही मार्ग आहेत.

आपण अत्याधुनिक कम्प्युटरांवर अधिकाधिक विसंबून राहू लागलो आहोत, त्यामुळे हॅकर, व्हायरल, कृत्रिम प्रज्ञेच्या संदर्भातील बॉट, इत्यादींद्वारे अणुयुद्ध सुरू होण्याचीही शक्यता निर्माण झाली आहे. कोलिना म्हणतात, "सायबर हल्ल्यांच्या वाढत्या धोक्यामुळे खोट्या इशाऱ्यांची शक्यताही वाढली आहे, असं दिसतं."

क्षेपणास्त्र आपल्या दिशेने येत आहे, असं एखाद्या नियंत्रण व्यवस्थेसमोर भासवणं शक्य आहे. अशा वेळी राष्ट्राध्यक्षांना प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्यासाठी फसवलं जाऊ शकतं. सध्या तरी संबंधित देशांना त्यांच्याकडील अण्वास्त्रं कमीतकमी वेळेत प्रतिक्रिया देण्यासाठी सक्षम असावीत असं वाटतं, ही मोठी समस्या आहे. म्हणजे एक बटन दाबलं की अण्वास्त्रांचा वापर करता यावा, असे त्यांचे प्रयत्न आहेत, असं कोलिना म्हणतात.

त्यामुळे स्वाभाविकपणे अण्वास्त्रांच्या वापरावरील नियंत्रण अवघड होतं.

शीतयुद्ध संपल्यानंतर बराच काळ लोटला आहे, पण आपण आजही अकारण हल्ल्याची तयारी करत असतो. वास्तविक आताचं जग वेगळं आहे, असं कोलिना म्हणतात.

एकीकडे मानवी सुरक्षिततेच्या नावाखाली निर्माण झालेली क्षेपणास्त्र प्रक्षेपणाची यंत्रणाच मानव प्रजातीसमोरचा सर्वांत मोठा धोका म्हणून उभी आहे, हा यातला मोठाच विरोधाभास म्हणावा लागेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)