पुतिन यांच्या दोन मुलींवर अमेरिकेचे निर्बंध

अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या मुलींसहित त्यांच्या जवळच्या लोकांवर आर्थिक निर्बंध लावण्याची घोषणा केली आहे.

अमेरिकेने घोषणा केलेल्या या यादीत परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोफ यांच्या कुटुंबासहित रशियातील बड्या बँकांच्या नावाचा समावेश आहे.

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये क्रौर्याची पातळी ओलांडलेले फोटो समोर आल्यावर अमेरिकेने ही घोषणा केली. मात्र यावर रशियाचं म्हणणं आहे की, हे फोटो युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी बनावट पद्धतीने बनवले आहेत.

रशियाने आपल्या दाव्याच्या समर्थनामध्ये कोणतेही पुरावे सादर केलेले नाहीत. नव्या निर्बंधांच्या घोषणेमध्ये राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मुलींकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.

आजवर पुतिन यांनी त्यांच्या कुटुंबाबद्दल फारच कमी माहिती बाहेर येऊ दिली आहे.

2015 मध्ये एका पत्रकार परिषदेत पुतिन यांच्या एका मुलीबद्दल विचारलेला प्रश्न त्यांनी टाळला होता.

ते म्हणाले, "माझ्या मुली रशियात राहतात आणि त्यांनी रशियात शिक्षण घेतलं आहे. मला त्यांचा अभिमान आहे. त्या तीन आंतरराष्ट्रीय भाषा अस्खलित बोलतात. मी माझ्या कुटुंबाबद्दल जास्त काही बोलत नाही. प्रत्येक व्यक्तीला आपापलं भविष्य ठरवण्याचा अधिकार आहे. त्या त्यांचं आयुष्य सन्मानाने जगतायत.

पुतिन आपल्या मुलींच नाव घेणं भलेही टाळत असतील पण बाकीच्यांना याविषयी हरकत नाही.

अमेरिकेच्या नव्या निर्बंधांमध्ये 36 वर्षीय मारिया वोरोंतसोवा आणि 35 वर्षीय कॅटेरिना तिखोनोवा यांच्या नावांचा समावेश आहे.

अमेरिकेतील एक अधिकारी सांगतात, आमच्या म्हणण्यानुसार पुतिन यांची बरीच संपत्ती कुटुंबातील एका सदस्याच्या नावावर आहे आणि त्यामुळेच आम्ही त्यांना लक्ष्य करत आहोत."

पुतिन यांच्या या दोन मुलींबद्दल अधिकृत माहिती उपलब्ध नसली तरीही, मीडिया रिपोर्ट्स आणि जाहीररीत्या केलेल्या वक्तव्यांमुळे या दोघींविषयी पुरेशी माहिती उपलब्ध होते.

कॅटरिना आणि मारिया या पुतिन आणि त्यांची पूर्वाश्रमीच्या पत्नी ल्युडमिला यांच्या मुली आहेत. ल्युडमिला आणि पुतिन यांचं लग्न 1983 मध्ये झालं होतं. त्या वेळी ल्युडमिला फ्लाइट अटेंडंट होत्या आणि पुतिन केजीबी (सोव्हिएत युनियनची गुप्तचर संस्था) चे अधिकारी होते.

हे लग्न 30 वर्षे टिकलं. यादरम्यान, रशियाच्या राजकीय व्यवस्थेत पुतीन शिखरावर पोहोचले आणि आपली पकड मजबूत केली.

पुतिन आणि ल्यूडमिला वेगळे झाले.

2013 मध्ये हे जोडपं विभक्त झालं. विभक्त होण्याबाबत पुतिन म्हणतात, "हा आमचा दोघांचा निर्णय होता. आम्ही महत्प्रयासाने एकमेकांना भेटतो. आम्हा दोघांचं आयुष्य वेगळं आहे."

ल्युडमिला सांगतात, की त्या त्यांच्या कामात पूर्णपणे गढून गेलेल्या असतात.

पुतिन आणि ल्युडमिला यांची मोठी मुलगी मारिया हीचा जन्म 1985 मध्ये झाला होता. मारियाने सेंट पीटर्सबर्ग विद्यापीठात जीवशास्त्राचा अभ्यास केला. त्यानंतर तिने मॉस्को स्टेट युनिव्हर्सिटीमधून डॉक्टरेटची पदवीही मिळवली.

मारिया आता शिकवण्यात आणि लेखनात व्यस्त असते. ती एंडोक्राइन सिस्टीममध्ये तज्ज्ञ आहे.

मारिया एक बिझनेसवूमन देखील आहे. बीबीसी रशियाच्या म्हणण्यानुसार, तिच्याकडे एका कंपनीची मालकी देखील आहे. ती सध्या एक मोठ मेडिकल सेंटर निर्माण करण्याची योजना आखत आहे.

मारिया वोरोंटसोवाचं लग्न नेदरलँड्समधील एक व्यापारी जोर्रिट जूस्ट फासेन याच्याशी झालं आहे. फासेनने यापूर्वी रशियन गॅस कंपनी गॅझप्रॉमसाठी काम केलं होतं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)