You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेन : रशियाची युद्धनौका काळ्या समुद्रात बुडाली
बुधवारी, 13 एप्रिलला झालेल्या स्फोटात रशियन युद्धनौका बुडाली असल्याची माहिती रशियन संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन क्रूझर फ्लिट मॉस्क्वाला काळ्या समुद्रातून बंदरात आणले जात असताना जहाजावरील नियंत्रण सुटलं. समुद्रात वादळी परिस्थितीमुळे जहाज नंतर बुडालं.
510 क्रू-मिसाईल क्रूझर रशियाच्या लष्करी सामर्थ्याचे प्रतीक होती.
रशियन युद्धनौकेवर आपल्या क्षेपणास्त्रांनी हल्ला केल्याचा दावा युक्रेननं केलाय, तर रशियाच्या मते, मॉस्क्वा युद्धनौकेवर कुणीही हल्ला केला नसून, तिचं आगीमुळे नुकसान झालं.
"या आगीमुळे युद्धनौकेवर असणाऱ्या दारुगोळ्याचा स्फोट झाला. काळ्या समुद्रात असणाऱ्या क्रूला जहाज सोडण्यास सांगून इतर रशियन जहाजांवर हलवण्यात आलं," असंही रशियानं म्हटलं.
सुरुवातीला युद्धनौका तरंगत असल्याचं जाहीर केल्यानंतर, गुरुवारी (14 एप्रिल) उशिरा रशियन संरक्षण मंत्रालयाने मॉस्क्वा हरवल्याचं जाहीर केलं.
12 हजार 490 टन वजनाचं हे जहाज दुसऱ्या महायुद्धानंतर बुडालेली सर्वात मोठी रशियन युद्धनौका आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, क्रूझर मॉस्क्वाला नियोजित बंदरात घेऊन जात असताना दारूगोळ्याचा स्फोट झाला आणि आग लागली. ज्यामुळे जहाजावरील नियंत्रण सुटलं आणि जहाज नंतर बुडालं.
मात्र, युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार, "नेपच्यून अँटी-शिप क्षेपणास्त्रांसह रशियन युद्धनौका मॉस्क्वा नष्ट केली. काळ्या समुद्रातील युक्रेनच्या नौदलाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे युक्रेनने हे क्षेपणास्त्र 2014 मध्ये रशियाने क्रिमियाचं विलनीकरण केल्यानंतर तयार केलं."
जहाज बुडल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने 'मोठा धक्का' असं या घटनेचं वर्णन केलंय. मात्र, युक्रेनची नेपच्युन क्षेपणास्त्रे या हल्ल्याला जबाबदार आहेत का? याविषयी अमेरिकन अधिकारी अनभिज्ञ आहेत.
पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी हे सीएनएनशी संवाद साधताना म्हणाले की, "युक्रेनच्या नेपच्युन क्षेपणास्त्राने किंवा इतर कोणत्याही मार्गाने का होईना हे शक्य झालंय आणि हे निश्चितच प्रशंसनीय आहे."
युक्रेनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, मॉस्क्वा जहाजावर अंदाजे 510 कर्मचारी असतील.
24 फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या पाहिल्याचं दिवशी ही युद्धनौका चर्चेत आली. युक्रेनियन सीमेनजिक असलेल्या काळ्या समुद्रातील स्नेक आयलंडचे रक्षण करणार्या युक्रेनच्या सैन्याच्या छोट्या चौकीला आत्मसमर्पण करण्याचे आवाहन या युद्धनौकेने केलं होतं.
सोव्हिएत संघ अस्तित्वात असताना ही मॉस्क्वा युद्धनौका बांधली गेली. पुढे 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला ती सेवेत दाखल ही झाली. ही युद्धनौका युक्रेनच्या दक्षिणेकडील मायकोलायव्ह शहरात ठेवण्यात आली होती. या शहरावर अलीकडच्या काही दिवसांत रशियाने बॉम्बफेक केली होती.
ही क्षेपणास्त्राने सुसज्ज अशी युद्धनौका मॉस्कोने सीरियाच्या युद्धात तैनात केली होती. या युद्धनौकेने रशियन सैन्याला नौदल संरक्षण पुरवले होते.
या युद्धनौकेत 16 वल्कन अँटीशीप मिसाईल्स आणि पाणबुडीविरोधी आणि माइन-टॉर्पेडो शस्त्रे होती.
गुप्तचर विभागाचे जाणकार जस्टिन क्रंप यांनी बीबीसी रेडिओला सांगितलं की, रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटमधील इतर जहाजांना हवाई संरक्षण पुरवणं ही मॉस्क्वाची मुख्य भूमिका होती.
क्रंप पुढे सांगतात की, "या युद्धनौकेचा फायदा म्हणजे लांब पल्ल्याची अँटी-एअर वेपन सिस्टीम, लांब पल्ल्याची अँटी-सर्फेस शिप वेपन सिस्टीम या युद्धनौकेवर तैनात आहेत. ही सिस्टीम किनाऱ्यावर स्ट्राइक करत नाही."
माजी फर्स्ट सी लॉर्ड आणि नौदल प्रमुख असलेले अॅडमिरल लॉर्ड वेस्ट म्हणतात की, ही लष्करी कारवाई असल्याने जहाजाचे नुकसान होणं ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे.
"याचा मोठा प्रभाव पडेल" असंही लॉर्ड वेस्ट म्हणाले. मॉस्कवा बुडल्याची माहिती मिळण्यापूर्वी बीबीसी रेडिओशी त्यांनी संवाद साधला होता.
"पुतिन यांना नौदलाविषयी प्रेम आहे. जेव्हा ते सत्तेवर आले, तेव्हा त्यांनी पहिले प्रयत्न नौदलासाठी केले होते. नौदलाविषयी पुतीन यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर होता."
युद्ध सुरू झाल्यापासून रशियाने गमावलेलं हे दुसरं मोठं जहाज आहे. मार्चमध्ये, युक्रेनने बर्द्यान्स्क बंदरात हल्ला केल्यावर सेराटोव्ह लँडिंग जहाज नष्ट झालं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)