युक्रेन : 'नवीन एस. ज्ञानगौडा जेवण आणायला गेला आणि परत आलाच नाही'

    • Author, इमरान कुरेशी
    • Role, बीबीसीसाठी

खारकीव्हमधल्या युद्धात भारतातून वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेला विद्यार्थी नवीन एस. ज्ञानगौडा याचा मृत्यू झालाय.

खारकीव्हच्या बेकिटोव्हामध्ये एका शेल्टरमध्ये नवीनने मित्रांसोबत आसरा घेतला होता. अन्न पदार्थ विकत घेण्यासाठी नवीन बाहेर पडला होता. त्यासाठी त्याने जवळच्या एका मित्राला पैसे ट्रान्स्फरही करायला सांगितले होते.

"त्याने मला युक्रेनमधल्या सकाळी 8 वाजताच्या सुमारास फोन केला. अन्न घेण्यासाठी पैसे कमी पडत असल्याने पैसे ट्रान्सफर करायला सांगितले. त्याला आमच्यासाठी आणखी खाद्यपदार्थ विकत घ्यायचे होते," खारकीव्हमध्ये चौथ्या वर्षात वैद्यकीय शिक्षण घेणारा विद्यार्थी श्रीकांत चेन्नेगौडाने बीबीसीशी बोलताना सांगितलं. सुरक्षेसाठी त्यांनी सध्या एका इमारतीच्या तळघरात आसरा घेतलाय.

कर्नाटकच्या हवेरी जिल्ह्यातल्या राणेबेन्नूर तालुक्यामधल्या चलागेरी गावचा नवीन गेली 4 वर्षं श्रीकांतसोबत खारकीव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होता.

खारकीव्हमध्ये लावण्यात आलेला दुपारी 3 ते सकाळी 6 वाजेपर्यंतचा कर्फ्यू उठल्यानंतर नवीन साडेसहा वाजताच्या सुमारास बाहेर पडला.

नवीन आणि श्रीकांत त्यांच्या मित्रांसोबत राहत असलेल्या घरापासून अवघ्या 50 मीटर अंतरावरच्या सुपरमार्केटमध्ये नवीनला जायचं होतं. या मित्रांनी त्यांच्या अपार्टमेंटखालीच असणाऱ्या बंकरमध्ये आश्रय घेतला होता.

"मी पैसे ट्रान्सफर केले आणि पाच दहा मिनिटांनी त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याने माझे कॉल्स घेतले नाहीत. मी अनेकवेळा कॉल केला. यानंतर मी त्याला स्थानिक नंबरवर कॉल करण्याचाही प्रयत्न केला. त्याने माझे ते कॉल्सही घेतले नाहीत. नंतर कोणीतरी दुसऱ्यानेच फोनला उत्तर दिलं. ती व्यक्ती युक्रेनियन भाषेत बोलत होती. ही भाषा मला समजत नाही," श्रीकांतने सांगितलं.

श्रीकांतने त्याच्याच शेल्टरमध्ये आसरा घेतलेल्या युक्रेनियन भाषा बोलू शकणाऱ्या व्यक्तीकडे फोन दिला. या व्यक्तीने फोनवरच्या माणसाशी बोलून श्रीकांतला सांगितलं, "तुझा मित्र आता या जगात नाही. माझा विश्वासच बसत नव्हता. मी सुपरमार्केटला गेलो तर तिथे स्फोट किंवा त्यासारखं काहीच नव्हतं," श्रीकांतने सांगितलं.

"कुठूनतरी झाडण्यात आलेली गोळी त्याला लागली. तिथे नक्की काय झालं आम्हाला माहिती नाही," श्रीकांतने सांगितलं.

"खारकीव्हमध्ये खूप बॉम्बस्फोट होतायत. बंकरमध्ये आम्ही 9 जण होतो. त्यातले पाच जण बाहेर पडले. पण आम्हाला धोका पत्करायचा नसल्याने आम्ही गेलो नाही. उद्या सकाळी बाहेर पडण्याचा आमचा विचार होता."

आपल्या मित्राबद्दल श्रीकांत सांगतो, "नवीन दयाळू होता, हुशार होता. थर्ड इयरला त्याला 95 टक्के मार्क मिळाले होते. तो अतिशय अभ्यासू आणि नम्र मुलगा होता."

नवीन आणि श्रीकांत दोघांचाही जन्म 2000 सालातला.

श्रीकांत कर्नाटकमधल्या मैसूरचा आहे. आपल्याशी दूतावासातल्या कोणीही अद्याप संपर्क साधला नसल्याचं त्याने सांगितलं. "दूतावासातल्या कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. नवीनचं पार्थिव कुठे आहे आम्हाला माहिती नाही."

परराष्ट्र मंत्रालयाने काय सांगितलं?

भारतीय परराष्ट्र सचिव रशिया आणि युक्रेनच्या राजदूतांसोबत बोलत असून खारकीव्ह आणि संघर्ष सुरू असलेल्या इतर भागांतून भारतीय नागरिकांना तिथून सुरक्षित बाहेर काढण्याच्या मागणीचा पुनरुच्चार करत असल्याचं अरिंदम बागची यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय. सोबतच युक्रेन आणि रशियातले भारताचे राजदूतही ही मागणी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

युक्रेनची राजधानी कीव्हमधून तातडीने बाहेर पडण्याचा सल्ला काही तासांपूर्वी भारताने नागरिकांना दिला होता. उपलब्ध असेल त्या मार्गाने कीव्हबाहेर पडावं, असं युक्रेनमधल्या भारतीय दूतावासाने ट्वीट करत भारतीय नागरिकांना सांगितलं होतं.

या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, "कीव्ह शहर आज ताबडतोब सोडावं असा विद्यार्थ्यांसोबतच सर्व भारतीयांना आमचा सल्ला आहे. जर ट्रेन्स उपलब्ध असतील तर ट्रेनने किंवा इतर कोणत्याही मार्गांनी बाहेर पडा."

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी साधला नवीनच्या कुटुंबियांशी संवाद

खारकीव्हमध्ये मारला गेलेला भारतीय विद्यार्थी कर्नाटकचा असल्याच्या बातमीला कर्नाटकच्या मुख्यमंत्री कार्यालयाने दुजोरा दिलाय. कर्नाटकचे मुख्यमंत्र बसवराज बोम्मई यांनी हावेरी जिल्ह्यात राहणाऱ्या नवीन शेखरप्पांच्या वडिलांची संवाद साधल्याचं ANI ने म्हटलंय.

नवीनचा मतदेह भारतात आणण्याचे सगळे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय.

नवीन शेखरप्पा हा चलागिरी गावचा राहणारा असल्याचं कर्नाटकचे आपत्ती व्यवस्थापन आयुक्त मनोज राजन यांनी सांगितलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही नवीनच्या कुटुंबाशी बोलले आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)