You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत : 'पठाण चित्रपटाचं यश म्हणजे निर्लज्जपणाच...'
शाहरूख खानचा पठाण सिनेमा एकीकडे कोटींची उड्डाणं घेत असल्याच्या बातम्या येत असतानाच दुसरीकडे पठाण सिनेमाला विरोध मात्र कायम दिसतोय.
बॉलिवूडमधून यात कंगना राणावत यांनी ट्विटरवर पठाण सिनेमा विरोधात उघड भूमिका घेतल्याचं दिसून येतंय. कंगना राणावत आता ट्विटरवर परतली असून तिचं ट्विटर अकाऊंट ट्विटरनेच यापूर्वी बंद केलं होतं.
मात्र, आता ट्विटरवर परतल्यावर कंगना राणावतने पठाण सिनेमाबद्दल तिची मतं मांडण्यास सुरुवात केली आहे.
अभिनेता शाहरूख खान, अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता जॉन अब्राहम यांच्या प्रमुख भूमिका असलेला पठाण हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झालाय. काही दिवसांपूर्वी या सिनेमातलं बेशरम रंग हे गाणं रिलीज झालं आणि त्यावर सोशल मीडियावर टीकेची झोड उठली होती.
या गाण्यात अभिनेत्री दिपिका पदुकोण हिने भगव्या रंगाची बिकीनी परिधान करून बेशरम रंग गाण्यावर सादरीकरण करत होती. यावरूनच हा वाद सुरू झाला. सोशल मीडियासह देशभरात अनेकांनी यावरून शाहरूख खान आणि दीपिका पदुकोणला ट्रोल केलं होतं.
भगव्या रंगाचा संबंध हिंदू धर्माशी असून त्या रंगाचा यात अपमान झाल्याचं ट्रोलर्सचं म्हणणं होतं. अखेर यातला वादग्रस्त भाग हटवण्याचे निर्देश सेन्सर बोर्डाने दिले होते. "सोशल मीडिया अनेकदा विशिष्ट संकुचित दृष्टिकोनातून वापरला जातो. तो मानवी स्वभावाला त्याच्या स्वार्थापुरता मर्यादित ठेवतो," असं अभिनेता शाहरूख खान याने यावर म्हटलं होतं.
मात्र, तेव्हापासून सुरू झालेला वाद अजूनही सुरू असून पठाण सिनेमा रिलीज झाल्यावर भाजपसह काहींनी या सिनेमाला विरोध सुरुच ठेवलाय.
या सगळ्या वादावर अभिनेत्री कंनगा राणावत हिने उडी काही ट्वीट्स केली आहेत.
यातल्या एका ट्विटमध्ये ती म्हणते, "पठाण सिनेमाचं यश हे जर खुलेपणाने किंवा निर्लज्जपणाने म्हणा जर डाव्या विचारसरणीच्या राजकारणाशी त्यातही काँग्रेससारख्या पक्षाशी जोडलं असेल. तर याला उजव्या विचारसरणीच्या लोकांनी विरोध केला तर कुठे बिघडलं?"
तर, या आधी केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते की, "पठाण सिनेमाचं यश हे लोक जर विखारी मनोवृत्तीवर विरुद्ध प्रेम याच्याशी जोडत असतील तर कुणाचं प्रेम? आणि कुणाची विखारी मनोवृत्ती? हे आधी ठरवा.
कोण लोक आहेत जे या सिनेमाची तिकीटं घेऊन सिनेमाला यशस्वी करतायत हे जाहीर करा. हे भारतातल्या लोकांचं प्रेम समजा. ज्या देशात 80% हिंदू असूनही पठाण सिनेमा ज्यात भारताचा विरोधी पाकिस्तानची आयएसआय ही संघटना चांगल्या अवस्थेत असल्याचं दाखवलं गेलंय. हे इंडियाचं स्पिरीट आहे. ज्याने द्वेष आणि शत्रूंच्या क्षुद्र राजकारणावर विजय मिळवला आहे."
आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडीवरही साधला होता निशाणा
वादग्रस्त वक्तव्यांमुळे काही दिवसांपूर्वी कंगना राणावतचं ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं होतं.
त्यानंतर तिने तिची मतं आता इन्स्टाग्रामवर मांडायला सुरुवात केली होती. इन्स्टाग्रामवरुन तिने बॉलीवूडमधील घराणेशाही आणि सिनेमांच्या यशाबद्दल भाष्य करत तोफ डागली.
कंगना राणावतने यावेळेस आलिया भटच्या गंगूबाई काठियावाडी सिनेमावरुन बॉलीवूडमधील घराणेशाहीला टोमणे मारले होते. यावर दोन्हीकडच्या चाहत्यांनी आपापली मतं मांडून या नव्या वादामध्ये प्रवेश केल्याचं दिसून आलं.
याआधीही कंगनाने अनेक अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शकांवर टीका केली आहे. त्यावेळेस वादही निर्माण झाले. जावेद अख्तर, संजय राऊत, हृतिक रोशन अशा अनेक व्यक्तींवर तिने भाष्य केलं होतं.
आलिया भटचा गंगूबाई सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच कंगनाने त्या सिनेमाचं भविष्य वर्तवले होतं. त्यात ती म्हणाली होती,
"या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर 200 कोटी रुपये जळून खाक होतील. पापाकी परी (जी ब्रिटिश पासपोर्ट बाळगते) चे पापा (जे मूव्ही माफिया डॅडी आहेत) आपली रॉमकॉम बिम्बो अभिनय करू शकते यासाठी हे सगळं करतील. चुकीचे पात्रसंयोजन हा या सिनेमातला मोठा दोष आहे. हे लोक सुधारणार नाहीत. सिनेमागृहांत दाक्षिणात्य सिनेमे काही उगाच दाखवले जात नाहीयेत. माफियांकडे जोवर सर्व शक्ती असेल तोवर बॉलीवूडमध्ये हेच चालणार."
अशाप्रकारे आलिया भट, महेश भट आणि तिचा गंगूबाई काठियावाडी सिनेमाचं नाव न घेता कंगनाने टीका केली आहे. आपल्यावर या घराणेशाहीने नेहमी अन्याय केला आहे, असं कंगना गेली काही वर्षं म्हणत आहेत. तोच धागा पकडून तिने ही टीका केली आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या गंगूबाई काठियावाडी या सिनेमाने पहिल्या आठवड्यात 38.5 कोटी रुपयांचा गल्ला गोळा केला आहे. त्यावर तिची बहीण रंगोली चंडेल हिने एक इन्स्टाग्राम स्टोरी प्रसिद्ध केली.
"ऊरी, बाळासाहेब ठाकरे सिनेमांसारखे 200 कोटीचे भव्य बजेट नसताना, कोणताही मोठा दिग्दर्शक नसताना, कोणताही मोठा अभिनेता नसताना, कोणतंही पीआर माफिया रॅकेट नसताना कंगना राणावतच्या मणिकर्णिका सिनेमाने एका आठवड्यात 42.55 कोटी रुपये मिळवले होते," असा त्या स्टोरीचा आशय आहे.
या स्टोरीला टॅग करत कंगनाने आपली स्टोरी प्रसिद्ध केली आहे. त्यात ती म्हणते, "सिनेसृष्टीतील माफियांच्या गणितानुसार 75 कोटी रुपयांच्या चित्रपटाने 3 दिवसांत 43 कोटी मिळवले तर मोठी आपत्ती ठरते आणि 160 कोटी रुपयांच्या सिनेमाने 35 कोटी मिळवले तर मात्र तो सुपरहिट ठरतो," याबरोबरच तिने हसण्याचा आणि टाळ्या वाजवण्याचा इमोजी शेअर केला आहे.
रंगोली चंडेलने आलिया आणि कंगनाच्या सिनेमांनी किती दिवसांमध्ये किती रुपयांचा गल्ला गोळा केला होता याची यादीही प्रसिद्ध केली आहे. त्या स्टोरीशी आपण सहमत असल्याचं कंगनाने एका स्टोरीत म्हटलं आहे.
कंगनाने आलियावर याआधीही टीका केली आहे. डॅडीज एंजल, रॉमकॉम बिम्बो अशी विशेषणं तिनं वापरली होती.
आता या वादावर कंगना आणि आलियाच्या चाहत्यांनी आपापली मतं सोशल मीडियावर वापरायला सुरुवात केली आहे. त्यात मीम्स, लहान व्हीडिओ यांनीही स्थान मिळवलं आहे.
एका ट्विटर हँडलवर कंगनाच्या स्टोरीबद्दल आलियाला प्रश्न विचारल्याचा व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा सिनेमा चालणार नाही अशी जी स्टोरी कंगनाने टाकली आहे त्याबद्दल काय वाटतं, असा प्रश्न आलियाला त्यात विचारला आहे. या व्हीडिओत अशा गोष्टींकडे माझे कानच काय डोळेही जात नाही, अशा शब्दात आलियाने त्याला उत्तर दिलं आहे.
'पाकव्याप्त' प्रकरण
मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'सोबत केल्यानंतर कंगना राणावतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख 'हरामखोर मुलगी' असा केला होता.
यावरून सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांवर टीका केली होती. सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं भाजपनं म्हटलं होतं.
कंगनानंही यानंतर एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. या व्हीडिओत कंगनानं म्हटलं होतं, की संजय राऊत, तुम्ही मला एक 'हरामखोर मुलगी' म्हटलं. तुम्ही सरकारमधील नेते आहात आणि दरदिवशी देशात किती महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात, हे तुम्हाला माहिती असेलच. यासाठी तुम्ही ज्या मानसिकतेचं प्रदर्शन समाजासमोर केलं आहे, ती जबाबदार आहे.
मला या देशात भीती वाटतेय, असं आमिर खाननं म्हटलं होतं, तेव्हा त्यांना कुणी हरामखोर नाही म्हटलं. नसीरुद्दीन शहांनी असंच वक्तव्य केलं, तेव्हा त्यांनाही कुणी हरामखोर म्हटलं नाही, असंही कंगनानं म्हटलं होतं.
गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक वाद कंगनाने आतापर्यंत ओढवून घेतले आहेत.
2009 मधल्या तिचं एक वक्तव्य पाहू, यात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुली स्वतःला सेक्स ऑब्जेक्टच्या स्वरूपात सादर करतात. त्यांना अभिनयापेक्षा आपल्या दिसण्याची जास्त चिंता असते, असं वक्तव्य तिने केलं होतं.
त्यानंतर वेळोवेळी चालू विषयांवर कंगना व्यक्त झाली. दीपिका पदुकोनने जेव्हा जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेली होती तेव्हा बोचरी प्रतिक्रिया तिने दिली होती. त्यानंतर सैफ अली खानने भारत संकल्पनेबाबत केलेल्या वक्तव्याचा तिने समाचार घेतला होता. तसंच सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना माफ करण्याच्या वक्तव्यावरसुद्धा तिने तिखट प्रतिक्रिया दिली होती.
अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आंदोलनं सुरू झाली होती.
या विषयावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कंगना सेलिब्रिटींवर तुटून पडली होती. कंगनाच्या मते, "फेअरनेस क्रिमची जाहिरात करणारे सेलिब्रिटी आता कृष्णवर्णीय लोकांबाबत बनावट सहानुभूती दाखवत आहेत."
शिवाय पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, हा मुद्दाही तिने मांडला होता.
कंगनाने केलेल्या वक्तव्यांवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांचा खच पडलेला तुम्हाला नेहमी पाहायला मिळेल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)