कंगना राणावत खरंच भाजपच्या इशाऱ्यावर बोलत आहे का?

कंगना राणावतच्या पाली हिल येथील कार्यालयावर बीएमसीने (बुधवारी) आज कारवाई केली. ही कारवाई सूडबुद्धीने झाली आहे असा आरोप भाजपचे विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

शिवसेना आणि कंगना राणावत यांच्यात जुंपल्यानंतर राम कदम, प्रवीण दरेकर यांनी कंगनाची बाजू घेतली. कंगना राणावतने मुंबईवर केलेल्या विधानाचा निषेधच आहे पण त्यांना मुंबईत संरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली.

भाजपचेच नेते कंगना राणावतला पाठिंबा देत आहेत अशी भूमिका राज्यातल्या सत्ताधारी नेत्यांनी घेतली आहे.

सध्या सगळीकडेच अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील भांडणाची चर्चा सुरू आहे. अशातच काँग्रेस पक्षानं कंगना राणावतवर आरोप केले आहेत.

कंगना राणावतच्या वक्तव्यांविषयी बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं, "कंगना टीम हे दुसरं काही नसून कंगना अधिक भारतीय जनता पक्षाचा आयटी सेल आहे. याप्रकरणात पडद्यामागून भाजप काम करत आहे, यात काहीएक शंका नाही.

"ज्यापद्धतीचं वक्तव्य त्या करत आहे, निश्चितपणे ते भाजपच्या तोंडातून येत आहेत. ज्यापद्धतीनं मुंबई पोलीस, महाविकास आघाडी सरकार यांची बदनामी केली जात आहे, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केली जात आहे, त्याला भाजपचे प्रवक्ते राम कदम पाठिंबा देत आहे, तर या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेचा अपमान केला आहे."

कंगनाच्या या वक्तव्याला समर्थन देण्यासाठी भाजपचे मुंबईतील आमदार आणि प्रवक्ते राम कदम पुढे आले. त्यांनी तर कंगनाला 'झाशीची राणी' म्हणत पाठिंबा दिला.

नंतर त्यांनी ट्वीट करत म्हटलं, "काही बड्या लोकांना वाचवण्याच्या नादात शौर्याची परंपरा मुंबई पोलिसांची प्रतिमा मलीन करण्याचे दुस्साहस महाराष्ट्र सरकारने केले. कंगनाच्या कोणत्याही आक्षेपार्ह विधानाचे आम्ही समर्थन केले नाही, करणार नाही."

दरम्यान, भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत भाजपची भूमिका स्पष्ट केली.

त्यांनी म्हटलं, "कंगना रानावतनं मुंबई आणि महाराष्ट्राच्या विषयावर वक्तव्यं केली आहेत. तिनं आम्हाला या विषयावर शिकवण्याचा प्रयत्न करू नये. भाजप याविषयी असमहत आहे."

ते पुढे म्हणाले, "सुशांत सिंग राजपूत प्रकरणाच्या चौकशीविषयी जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्यासाठी कंगणा राणावतच्या आडून भाजपवर वार करण्याची आवश्यकता नाही."

असं असलं तरी सध्या कंगना रानावत यांच्या वक्तव्यावरून त्या भाजपच्या वाटेवर आहेत का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसातली कंगनाची वक्तव्यं आणि घटना पाहूयात.

केंद्राकडून कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा

कंगना रानावतला केंद्र सरकारनं Y दर्जाची सुरक्षा दिल्याचं ANIया वृत्तसंस्थेनं सूत्रांच्या हवाल्यानं म्हटलं आहे.

याविषयी ट्वीट करताना कंगनाने म्हटलं, "कोणत्याही देशभक्त व्यक्तीच्या आवाजाला सरंजामशाही मानसिकता दडपू शकत नाही. मी अमित शहा यांचे आभार मानते. खरं तर परिस्थिती पाहता त्यांवी मला काही दिवस मुंबईला जाऊ नको, असं म्हटलं असते. पण, त्यांनी भारताच्या एका मुलीच्या वचनाचा मान ठेवला. आमचा स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची लाज ठेवली."

"मोदी सरकार आपल्या समर्थकांची, आपला अजेंडा चालवणाऱ्यांची अत्यंत काळजी घेत असते, हे वेळोवेळी स्पष्ट झालंय. म्हणूनच आता कंगना राणावत यांनी Y दर्जाची सुरक्षा दिली गेली, याबाबत आश्चर्य वाटण्याचं कारण नाही," असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

ड्रग माफिया कनेक्शन आणि बॉलीवूडच्या संदर्भात मोठी माहिती आहे, असं कंगना म्हणत होती. त्यामुळे त्यांनी ही माहिती NCBकडे द्यावी, अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती. पण, त्यानंतर काही व्हीडिओ समोर आले त्यात कंगना स्वत: ड्रग घ्यायची असं दिसून आल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलं.

सचिन सावंत यांनी पुढे म्हटलं, की दुसरीकडे राम कदम यांनी कंगना राणावतची तुलना झांशीच्या राणी यांच्याबरोबर केली होती. राणी लक्ष्मीबाई यांचा यापेक्षा मोठा अपमान कधी झाला नसेल. विधानाशी सहमत नाही, असं भाजपनं म्हटलं. पण, राम कदम यांच्यावर कोणतीही कारवाई केलेली नाही.

संजय राऊत विरुद्ध कंगना

कंगनाला ही सुरक्षा देण्यापाठीमागे कंगनाची वक्तव्यं आणि त्यातून निर्माण झालेला वाद कारणीभूत आहे. मला मुंबई पोलिसांची भीती वाटते, असं विधान कंगनानं केलं होतं. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्यांना मुंबईत सुरक्षित वाटत नाही, त्यांनी आपलं चंबूगबाळं आवरावं असं म्हटलं होतं.

कंगनाच्या या विधानावर अनेक उलट-सुलट प्रतिक्रियाही उमटल्या होत्या.

त्यानंतर कंगनानं 'मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 सप्टेंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं.'

कंगनाच्या या विधानानंतर संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं की, मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे...ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा.

हा वाद तेव्हा चिघळला जेव्हा कंगनानं 'मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे? असं ट्वीट केलं.

या ट्वीटनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही कंगनावर टीका केली.

मुंईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'सोबत केल्यानंतर कंगना राणावतवर टीका करताना संजय राऊतांनी तिचा उल्लेख 'हरामखोर मुलगी' असा केला. यावरुन सोशल मीडिया आणि विरोधी पक्षांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. सुशांत प्रकरणावरुन लक्ष हटवण्यासाठी हा प्रकार केला जात असल्याचं भाजपनं म्हटलं.

कंगनानंही यानंतर एक व्हीडिओ प्रसिद्ध केला. या व्हीडिओत कंगनानं म्हटलं आहे, की संजय राऊत, तुम्ही मला एक 'हरामखोर मुलगी' म्हटलं. तुम्ही सरकारमधील नेते आहात आणि दरदिवशी देशात किती महिलांवर अत्याचार, बलात्कार होतात, हे तुम्हाला माहिती असेलच. यासाठी तुम्ही ज्या मानसिकतेचं प्रदर्शन समाजासमोर केलं आहे, ती जबाबदार आहे.

मला या देशात भीती वाटतेय, असं आमिर खाननं म्हटलं होतं, तेव्हा त्यांना कुणी हरामखोर नाही म्हटलं. नसीरुद्दीन शहांनी असंच वक्तव्य केलं, तेव्हा त्यांनाही कुणी हरामखोर म्हटलं नाही, असंही कंगनानं म्हटलं.

हिंदुत्वाच्या इतिहासाचा संदर्भ

कंगनानं झाशीच्या राणीच्या जीवनावर आधारित मणिकर्णिका चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. त्याचाच संदर्भ घेत कंगनानं इतिहासावर आधारित चित्रपट किती जणांनी बनवले, असा प्रश्न कंगनानं विचारला होता.

"चित्रपटसृष्टीच्या 100 वर्षांत मराठा साम्राज्यावर एकही चित्रपट बनवण्याची यांची औकाद नाही. मी मुस्लीम वर्चस्व असलेल्या बॉलीवूडमध्ये माझी कारकीर्द पणाला लावून शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट केले आहेत. महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी काय केलं?"

कंगनाची वादग्रस्त वक्तव्यं

"पालघर लिंचिंगमध्ये साधूंची हत्या होते आणि पोलीस काहीच करत नाही, नुसते चुपचाप उभे राहतात किंवा सुशांत सिंगचे असहाय्य वडिलांची FIR नोंदवत नाहीत, माझा जबाब घेत नाही. यामुळे मी मुंबई पोलिसांवर टीका केली, ते माझ्या अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आहे," असं कंगनानं म्हटलं होतं.

गेल्या वर्षी 7 जुलैला कंगना रनौतने आपल्या 'जजमेंटल है क्या' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एक पत्रकार परिषद घेतली होती.

प्रश्नोत्तरादरम्यान एका पत्रकाराने प्रश्न विचारण्यास सुरुवात केलीसुद्धा नव्हती इतक्यात कंगनाने त्याला थांबवलं, ती म्हणाली, "जस्टीन, तू तर आमचा शत्रू बनलास. बेकार गोष्टी लिहित आहेस. इतका वाईट विचार कसा करू शकतोस?"

हे आरोप ऐकून पत्रकाराने कंगनाला कोणत्या लेखाबाबत बोलत आहे, हे विचारलं. पण यावर कंगनाने स्पष्ट असं काही सांगितलं नाही. गोष्ट वाढत जाऊन वातावरण गढूळ बनलं. पण नंतर हा विषय थांबवण्यात आला.

यानंतर एंटरटेनमेंट जर्नलिस्ट गिल्ड ऑफ इंडियाने कंगनावर बंदी घातली होती. पुढे मुंबई प्रेस क्लब, प्रेस क्लब आणि प्रेस काऊन्सिल ऑफ इंडियानेही कंगनावर बंदी घातली. यानंतर कंगनाने ट्विटरवर दोन व्हीडिओ अपलोड करून मीडियावर निशाणा साधला आणि नोटीस पाठवली होती.

बीबीसीने एका मुलाखतीत कंगनाला याबाबत विचारल्यानंतर त्या पत्रकाराने 'मणिकर्णिका' चित्रपटाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता असं सांगितलं. चित्रपट जिंगोइस्टिक(अति-राष्ट्रवादी) असल्याचा प्रचार तो करत होता त्यामुळे आपण त्याच्यावर नाराज होतो असं तिने सांगितलं.

गेल्या काही वर्षांत अशा प्रकारचे अनेक वाद कंगनाने आतापर्यंत ओढवून घेतले आहेत.

2009 मधल्या तिचं एक वक्तव्य पाहू, यात फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या मुली स्वतःला सेक्स ऑब्जेक्टच्या स्वरूपात सादर करतात. त्यांना अभिनयापेक्षा आपल्या दिसण्याची जास्त चिंता असते, असं वक्तव्य तिने केलं होतं.

त्यानंतर वेळोवेळी चालू विषयांवर कंगना व्यक्त झाली. यावर्षीचंच उदाहरण घेतलं तर जानेवारी महिन्यात दीपिका पदुकोन जवाहरलाल नेहरू विद्यापीठात गेल्यानंतर बोचरी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर सैफ अली खानने भारत संकल्पनेबाबत केलेल्या वक्तव्याचा तिने समाचार घेतला. तसंच सुप्रीम कोर्टातील ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंह यांच्या निर्भया प्रकरणातील आरोपींना माफ करण्याच्या वक्तव्यावरसुद्धा तिने तिखट प्रतिक्रिया दिली होती.

अगदी ताजं उदाहरण म्हणजे, या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर आंदोलनं सुरू झाली होती.

या विषयावर बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कंगना सेलिब्रिटींवर तुटून पडते. कंगनाच्या मते, "फेअरनेस क्रिमची जाहिरात करणारे सेलिब्रिटी आता कृष्णवर्णीय लोकांबाबत बनावट सहानुभूती दाखवत आहेत."

शिवाय पालघरमध्ये दोन साधूंची हत्या झाल्यानंतर त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती, हा मुद्दाही ती मांडते.

कंगनाने केलेल्या वक्तव्यांवर तिच्या समर्थनार्थ आणि विरोधातील अशा दोन्ही बाजूंच्या प्रतिक्रियांचा खच पडलेला तुम्हाला पाहायला मिळेल.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)