You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतला संजय राऊत यांचं प्रत्युत्तर 'मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच'
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यातील वाद थांबताना दिसत नाहीय. संजय राऊत यांनी टीका केल्यावर कंगनाने पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांच्यावर टीका करताना कंगना राणावतने मुंबई शहराची तुलना 'पाकव्याप्त काश्मीर'शी केली होती. त्यानंतर गुरुवारी (3 सप्टेंबर) दिवसभर कंगनावर सोशल मीडियावरून टीका झाली.
'आमची मुंबई' या हॅशटॅगद्वारे कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. राजकारणासह सिनेसृष्टीतील दिग्गजांनीही कंगनाच्या या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर कंगनानं शुक्रवारी ( 4 सप्टेंबर) पुन्हा संजय राऊत यांना डिवचलं. पश्चिम दिल्लीचे भाजप खासदार परवेश साहीब सिंग यांच ट्वीट रिट्वीट करत कंगनानं आव्हान दिलं की, "मुंबईत न येण्यासाठी मला धमक्या दिल्या जात आहेत. पण आता मी ठरवलंय की, पुढच्याच आठवड्यात म्हणजे 9 स्पेटंबरला मुंबईत यायचं. मुंबई विमानतळावर पोहोचण्याची वेळही मी इथे पोस्ट करेन. कुणाच्या बापात हिंमत असेल, तर मला थांबवून दाखवावं."
कंगनाच्या या आव्हानाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जशास तसं उत्तर दिलंय.
"मुंबई ही मराठी माणसाच्या बापाचीच आहे. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही," अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनाला उत्तर दिलंय.
तर राऊत यांच्या टीकेला कंगनानं पुन्हा एकदा ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. मी छ. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट केले आहेत. महाराष्ट्राच्या ठेकेदारांनी काय केलं? असा प्रश्न तिनं शिवसेनेला विचारला आहे.
राष्टवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी कंगना रणावतला अटक करण्याची मागणी केली आहे. कंगनानं माय मुंबईची माफी मागावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.
कंगना भाजपची कठपुतली असल्याचा आरोप विद्या चव्हाण यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कंगनाला उत्तर दिलं. ते म्हणाले, "कंगनाने मुंबई पोलिसांची बदनामी केलीय. त्यामुळे कंगनाला महाराष्ट्रासह मुंबईत राहण्याचा अधिकार नाही."
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे कंगनावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत.
"कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक आणि सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे," असं ट्वीट प्रताप सरनाईक यांनी केलंय.
कंगना आणि शिवसेना यांच्यातील वाद आता प्रत्येक वक्तव्यानिहाय वाढत जाताना दिसतोय.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)