You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना रनौत: 'मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, मग इथं पर्यटनाला आला होता का?'
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखं भासत असल्याचं वक्तव्य अभिनेत्री कंगना रानावतनं केलं. कंगनाच्या या टीकेला काँग्रेस नेते आणि राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राऊत यांनी ट्वीट करत म्हटलं, "कंगना रानावत म्हणते, मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते. अभिनयाच्या क्षेत्रात 'रन-आउट' होण्यापूर्वी इथेच नशीब काढायला आला होतात ना बाईसाहेब? की पर्यटनाला?"
भाजप नेते राम कदम यांनी मात्र कंगना रानावत ही झांशीची राणी असून ती महाविकास आघाडीला घाबरणार नाही, असं म्हटलं आहे.
कदम यांनी ट्वीट केलं आहे, महाविकास आघाडी सरकारनं मुंबई पोलिसांवर दबावतंत्राचा अवलंब करत आहे आणि यामुळे सुशांतला न्याय मिळत नाहीये. बॉलीवूडमधल्या ड्रग माफिया साखळीला त्यांना वाचवायचं आहे, पण, अशा पोकळ धमक्यांमुळे कंगना रानावतसारखी झांशीची राणी घाबरणार नाही.
काय म्हणाली होती कंगना?
मला मुंबईबाहेर जायला सांगून पुन्हा परत येऊ नका अशी खुली धमकी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली आहे. हे पाहाता आणि मुंबईतले आझादीच्या ग्राफिटी पाहाता मुंबई पाकव्याप्त काश्मीर झाल्यासारखी का वाटत आहे? असा प्रश्न कंगना यांनी ट्वीटरवर विचारला आहे. कंगनाच्या या ट्वीटवर आता आमची मुंबई असा ट्रेंड सुरू झाला असून ट्विटरवर मुंबईच्या बाजूने ट्वीट्स केले जात आहेत. मुंबई किती सुरक्षित आहे हे ट्वीट्समधून कंगनाला सांगितलं जात आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तराला हे प्रत्युत्तर म्हणून कंगनाने ट्वीट केले आहे.
मला मुव्ही माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं ट्वीट करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
'पोलीस यंत्रणेवर अविश्वास दाखवताय. कोणाला इतर राज्याची सुरक्षा हवी असेल कर त्यांनी आपलं चंबूगबाळं आवरावं आणि आपल्या राज्यात जावं,' असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते, असं अभिनेत्री कंगना राणावतने म्हटलं होतं. "अभिनेत्री कंगना रनौत बॉलिवूड आणि ड्रग्ज माफियांविषयी माहिती देण्यास तयार आहे. मात्र, यासाठी तिला सुरक्षा देणं जरुरीचं आहे. दुर्देव म्हणजे महाराष्ट्र सरकारने अजूनही तिला सुरक्षा दिलेली नाही", असं राम कदम ट्विटरवर म्हणाले.
राम कदम यांच्या या ट्विटला कंगनाने उत्तर दिलं. "माझ्या काळजीसाठी धन्यवाद, बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी" असं कंगनाने म्हटलं होतं
या सर्व वादानंतर आता आमची मुंबई नावाचा ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला आहे. अभिनेत्री स्वरा भास्कर हिने काम करण्यासाठी मुंबई सर्वात जास्त सुरक्षित शहर असल्याचं म्हटलं आहे.
कंगनाच्या ट्वीटवर भाजपा नेते राम कदम यांनी अशा पोकळ धमक्यांना 'झाशीची राणी' कंगना घाबरणार नाही असं लिहिलं आहे.
काँग्रेसचे मुंबई प्रदेश सरचिटणीस भूषण पाटील यांनीही कंगनाचा ट्वीटरवर निषेध केला आहे. मुंबई स्वप्ननगरी असल्याचं त्यांनी कंगनाला सांगितलं आहे. पाकव्याप्त हा शब्द वापरल्याबद्दल त्यांनी कंगनाचा निषेध केला आहे.
यापूर्वी एका मुलाखतीत संजय राऊत यांच्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला अशी चर्चा सुरू झाली होती.
"कोरोना काळात डॉक्टर देवदूतासारखं काम करत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झालेला नाही," असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
जागतिक आरोग्य संघटना आता राजकीय संघटना झाली असल्याची टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात असं म्हणत संजय राऊत यांनी टीकाकारांना उत्तर दिलं आहे.
संजय राऊत यांनी एबीपी माझावरील कार्यक्रमात बोलताना मी कधीही डॉक्टरकडून औषध घेत नाही कंपाऊंडरकडून घेतो, त्याला जास्त कळतं असं विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली जात आहे. संजय राऊत यांनी सामना कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
"कोरोनाच्या काळात शिवसेनेच्या अनेक लोकांनी डॉक्टरांविरोधात आंदोलन केलं. तेव्हा त्यांची मी समजूत काढली. अनेकदा मी डॉक्टरांच्या बाजूने उभं राहिलो आहे. मार्डच्या अनेक संप आणि मागण्यांबाबत मी भक्कमपणे बाजू मांडली आहे. काही विशिष्ट पक्षांची लोक डॉक्टरांना हाती घेऊन मोहीम चालवत आहेत. माझ्याकडून डॉक्टरांचा अपमान झाला नाही. माझी ती भावनाही नव्हती. अपमान आणि कोट्यांमधला फरक समजून घेतला पाहिजे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"कंपाऊंडर काही टाकाऊ नसतात. उलट माझं कौतुक केलं पाहिजे. डॉक्टरांनी आपला कंपाऊंडरही ताकदीचा निर्माण केला आहे हे कौतुकास्पद आहे. हे जगात कुठे नाही तर भारतातच आहे. कंपाऊंडरचा सन्मान केला म्हणून इतकी टोकाची भूमिका घेण्याची गरज नाही," असं संजय राऊत यांनी सांगितलं.
"जागतिक आरोग्य संघटना ही राजकीय संघटना झाली आहे. हे माझंच नाही तर अनेक देशांचं म्हणणं आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी जाहीरपणे त्यांना फटकारलं आहे. संबंधही तोडले आहेत. कारण तिथे डॉक्टर कमी आणि राजकारणी जास्त झाले आहेत. कोरोनाचा फैलाव होण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना जबाबदार असल्याचं अनेक देशांनी म्हटलं आहे. येथील डॉक्टरांना ते विधान गांभीर्याचं घेण्याची गरज नाही," असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे.
"रशियानेसुद्धा जागतिक आरोग्य संघटनेविरोधात विधानं केली आहेत. पण मग तुम्ही ट्रंप आणि रशियाचाही निषेध करणार का? ट्रंप यांच्या वक्तव्यामुळे अमेरिकेतील डॉक्टर संपावर गेलेत का? पुतिन यांनी जागतिक आरोग्य संघटनेला न विचारता लस बाजारात आणली म्हणून तेथील डॉक्टर आंदोलन करत आहेत का? आज प्रत्येक देश आणि राज्य आपापली परिस्थिती हाताळत आहे," असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
"जर कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करावा. मी त्यांच्याशी बोलायला तयार आहे. माफी मागण्याआधी मी काय बोललो ते समजून घ्या. मी अपमानच केलेला नाही. माझी भूमिका जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रश्नावर होती. बोलण्याच्या ओघात एक शब्द येतो आणि त्यावर अशा पद्धतीने राजकारण होत आहे. हे होऊ नये असं मला वाटतं," असं संजय राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान डॉक्टरपेक्षा कंपाऊंडरला जास्त कळतं या संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेल्या मार्डनं थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
"एकीकडे डॉक्टरांना करोना योद्धे म्हणायचं आणि दुसरीकडं आपल्याच सहकाऱ्यांनी अशी वक्तव्यं करायची याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा? अनेक दिवसांपासून घरी न जाता, आईवडिलांचे तोंडही न पाहता जीवाची बाजी लावून अनेक डॉक्टर काम करत आहेत. डॉक्टरांनी अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणलं ते हे ऐकण्यासाठीच का? डॉक्टरांना काही कळत नसेल तर सरकारने डॉक्टरांचे कृती दल कशासाठी तयार केले," अशी विचारणा 'मार्ड'ने पत्रातून केली आहे.
"राऊत यांनी केलेलं वक्तव्य तरुण डॉक्टरांचं खच्चीकरण करणारं आहे. आपली सुद्धा अशीच अधिकृत भूमिका आहे का," असा प्रश्न 'मार्ड'नं केला आहे. तसं नसेल तर संजय राऊत यांनी दिलगिरी व्यक्त करावी. अन्यथा, त्यांनी मांडलेली भूमिका हीच आपली अधिकृत भूमिका आहे हे गृहित धरून डॉक्टर रस्त्यावर उतरतील,' असा इशाराही पत्रातून देण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)