कंगना राणावतचं स्वातंत्र्याच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, म्हणाली...

खरं स्वातंत्र्य 1947मध्ये नाही, तर 2014 मध्ये मिळालं, असं मत अभिनेत्री कंगना राणावतनं एका मुलाखतीवेळी व्यक्त केलं होतं. त्यानंतर कंगनावर टीकेचा भडिमार होत होता. आता याविषयी कंगनानं स्पष्टीकरण दिलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेयर केलेल्या फोटोत तिनं म्हटलंय, "या मुलाखतीत स्पष्टपणे सांगण्यात आले की स्वातंत्र्यासाठी पहिले संघटित युद्ध हे 1857 मध्ये लढले गेले. मला 1857 ची माहिती आहे पण 1947 मध्ये कोणती लढाई झाली हे मला माहित नाही. जर कोणी या प्रकरणावर मला माहिती दिली तर मी माझा पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन, कृपया मला मदत करा."

कंगनानं पुढे लिहिलंय, "मी शहीद राणी लक्ष्मीबाई सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 1857 च्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यावर बरंच संशोधन झालं आहे. राष्ट्रवादासोबत दक्षिणपंथाचा उदय झाला पण ते अचानक नष्ट कसं झालं? आणि गांधींनी भगत सिंग यांना का मरू दिलं?

"नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या का झाली आणि त्यांना गांधीजींचा पाठिंबा कधीच मिळाला नाही. इंग्रजांनी विभाजन का केले? भारतीय स्वातंत्र्याचा आनंद साजरा करण्याऐवजी एकमेकांना मारत होते. मला काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत ज्यासाठी मला मदत हवी आहे.

"त्या संपूर्ण मुलाखतीत मी कोणत्या शहीदाचा किंवा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान केला आहे, हे जरी दाखवलं तरी मी माझा पद्मश्री परत करेन. मुलाखतीतल्या छोट्या छोट्या क्लिप व्हायरल करण्यात काही अर्थ नाही. संपूर्ण वाक्य दाखवा आणि पुढे येऊ सगळं सत्य सांगा. मी सगळे परिणाम भोगण्यासाठी तयार आहे."

प्रकरण काय?

9 नोव्हेंबरला टाइम्स नाऊ या खासगी वृत्त वाहिनीनं एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमाचं नाव 'सेलिब्रेटिंग इंडिया @75' असं होतं. त्या कार्यक्रमात कंगनालाही आमंत्रित करण्यात आलं होतं.

'बॉलिवूडचा जागतिक (ग्लोबल) परिणाम' या मुद्द्यावर चर्चेसाठी कंगनाला बोलावण्यात आलं होतं.

त्यावेळी वीर सावरकरांबाबत एक प्रश्न विचारण्यात आला. त्या प्रश्नाचं कंगनानं फार मोठं उत्तर दिलं. त्या उत्तरात स्वातंत्र्य लढ्यापासून ते अनेक स्वातंत्र्यवीरांचाही उल्लेख होता.

हा संपूर्ण प्रश्न आणि त्याचं उत्तर टाईम्स नाऊ हिंदीच्या ट्विटर हँडलवर उपब्ध आहे. जवळपास साडे सात मिनिटांचं ते आहे.

कंगनाच्या वक्तव्यापैकी 24 सेकंदाची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर प्रचंड शेअर केली जात आहे. त्यात तिनं '1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य' ही आपल्याला मिळालेली 'भीक' असल्याचं वक्तव्य केलं आहे.

"1947 ला जे मिळालं, ते स्वातंत्र्य नव्हतं तर भीक होती आणि जे स्वातंत्र्य मिळालं आहे, ते 2014 मध्ये मिळालं आहे," असं टाइम्स नाऊच्या संपादक नाविका कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं म्हटलं होतं.

सोशल मीडियावरील प्रतिक्रिया

कंगणाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या.

बार अँड बेंचनुसार आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्य प्रीती मेनन यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांत तक्रार दाखल करून एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

आश्चर्याची बाब म्हणजे हे वक्तव्य करताना, कंगनाला अशा तक्रारी होणार याची जाणीवही होती. "यानंतर आता माझ्या विरोधात आणखी दहा एफआयआर दाखल होतील," असं कंगनानं म्हटलं होतं.

कंगनाच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रियादेखील आल्या होत्या.

शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटलं, "प्रसिद्धीसाठी बेताल वक्तव्य करणाऱ्या कंगनाचा पद्म पुरस्कार रद्द करून तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा."

भाजप खासदार वरुण गांधी यांनी म्हणाले, "कधी महात्मा गांधींच्या त्याग आणि साधनेचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्यांचा गौरव आणि आता शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाबाबत द्वेष. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावं की देशद्रोह?" असं ट्विट वरुण गांधींनी केलं आहे.

वरुण गांधींच्या या प्रतिक्रियेला अनेकांनी रि-ट्विट केलं आहे. वरुण गांधी पिलिभीतचे खासदार आणि भाजपचे सदस्यही आहेत.

मात्र, गेल्या काही काळापासून ते पक्षातील केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधात प्रचंड आक्रमक असल्याचं दिसून आलं आहे.

यापूर्वी शेतकरी आंदोलनापासून ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीसारख्या अनेक मुद्द्यांवर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे स्वतःच्याच पक्षावर टीका केली आहे.

त्यानंतर नुकत्याच स्थापन झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीतही त्यांना स्थान मिळालं नाही.

वरुण गांधी यांच्याशिवाय यूथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बीवी श्रीनिवास यांनीही ट्विट करत कंगनाच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर देण्याची मागणी केली.

इतर ट्विटर यूझर्सदेखील या वक्तव्यावरून विविध प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी काय म्हणाली कंगना?

या मुलाखतीत कंगनानं तिच्या खासगी जीवनापासून ते सोशल मीडियावर बॅन आणि देशभक्ती, राजकारणासह अनेक मुद्द्यांवर थेट मतं मांडली.

टाईम्स नाऊ समिट 2021 मध्ये कंगनाला ट्विटरवर बॅन का करण्यात आलं आणि सोशल हँडलला मिस करते का? असं विचारण्यात आलं.

त्यावर बॅन केलं याचा आनंद झाला. बॅन शब्द अत्यंत आवडत असल्याचं कंगनानं म्हटलं.

पुढच्या 5 वर्षांत स्वतःला कुठं पाहते? यावर, पुढच्या पाच वर्षांमध्ये स्वतःला एक पत्नी आणि एका आईच्या रुपात पाहते, असं कंगना म्हणाली.

राजकारणात प्रवेश करणार का? याबाबत कंगनाला थेट प्रश्न विचारण्यात आला नाही. मात्र, तिनं चित्रपटांत काम करायला आवडतं असं स्पष्ट केलं. यात पैसे मिळतात, चांगले कपडे परिधान करता येतात आणि अफेयरही करता येतात, अशी कारणंही कंगनानं दिली.

वीर सावरकरांबाबत बोलताना, कंगनानं त्यांना योग्य सन्मान मिळाला नाही आणि त्यांच्यावर अन्याय झाला असं म्हटलं.

17 वर्षांची असताना 'गँगस्टर' सारख्या चित्रपटाने करिअरची सुरुवात करणाऱ्या कंगनानं 'क्वीन' आणि 'तनू वेड्स मनू' सारख्या चित्रपटांद्वारे बॉलिवूडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

तीन राष्ट्रीय पुरस्कारांसह व्यावसायिक चित्रपटांतही तिचं करिअर यशस्वी ठरलं आहे.

कंगना राणावत नेपोटिझम (घराणेशाही) पासून बॉलिवूड माफिया सारख्या विषयांवरही मोकळेपणानं बोलत असते.

कंगनानं गेल्या वर्षी एका ट्विटमध्ये मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर केली होती. त्यावरून प्रचंड गदारोळही झाला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विचारसरणीला कंगनानं कायम थेट पाठिंबा दिलेला आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)