You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावतनं खरंच शेतकऱ्यांना 'दहशतवादी' म्हटलं का? - सोशल
केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी विधेयकांमुळे हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोष दिसून येत आहे.
सोशल मीडियावरही शेतकरी आणि या विधेयकांच्या समर्थनार्थ तसंच विरोधामध्ये प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या वादात सोमवारी (21 सप्टेंबर) अभिनेत्री कंगना राणावतनंही उडी घेतली.
कंगना राणावत हिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ट्वीट रिट्वीट केलं.
या विधेयकांचा MSP वर परिणाम होणार नाही, याचं आश्वासन देणारं ट्वीट पंतप्रधानांनी केलं होतं. कंगनानं तेच ट्वीट रिट्वीट केलं.
त्याचबरोबर तिने सोशल मीडियावर जे काही लिहिलं त्यावरून तिला टीकेला सामारं जावं लागलं.
कंगनानं म्हटलं, "पंतप्रधानजी, जर कोणी झोपला असेल, तर त्याला जागं करता येतं. पण ज्यानं झोपेचं सोंग घेतलंय. जाणूनबुजून काही न समजल्याचं दाखवत असेल तर आपण समजावून सांगून काही होणार नाही. हे तेच आतंकवादी आहेत, ज्यांनी CAA मध्ये एकाचंही नागरिकत्व नाही गेलं तरीही रक्ताचे पाट वाहवले होते."
कंगनाच्या या ट्वीटनंतर #Arrest_Castiest_Kangna हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. इतरही अनेक हॅशटॅग ट्रेंड होऊ लागले. कंगना राणावतला अटक करण्याची मागणीही होऊ लागली.
कंगनानं शेतकऱ्यांना 'दहशतवादी' म्हटलं अशी टीका सोशल मीडियावर होऊ लागली.
कंगनाचं काय म्हणणं आहे?
सोशल मीडियावर सोमवारी (21 सप्टेंबर) ट्रोल झाल्यानंतर कंगनानं टाइम्स ऑफ इंडियानं वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली एक बातमी रिट्वीट करत आपली बाजू मांडली.
कंगननं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं, "CAA बद्दल जे लोक चुकीची माहिती आणि अफवा पसरवत होते, ज्यांच्यामुळे हिंसाचार झाला, तेच लोक आता कृषी विधेयकावर चुकीची माहिती पसरवत आहेत आणि देशात दहशत निर्माण करत आहेत. तेच लोक दहशतवादी आहे. मी काय म्हटलं हे तुम्हाला माहितीये. पण तरीही चुकीची माहिती पसरवत आहेत."
कंगनानं अजून एक ट्वीट करून म्हटलं, की जर मी शेतकऱ्यांना 'दहशतवादी' म्हटल्याचं सिद्ध करावं, तसं असेल तर मी ट्वीटर सोडेन.
कंगनानं पहिल्या ट्वीटनंतर आपले दोन ट्वीट केले. पण तिने मूळ ट्वीट डिलीट नाही केलं.
कंगना तिच्या ट्वीटवर ठाम आहे. 'आपण कृषी विधेयकाबद्दल गैरसमज पसरवणाऱ्यांना दहशतवादी म्हटलं, शेतकऱ्यांना नाही,' हीच तिची भूमिका आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)