You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत म्हणते, उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न चित्रपटांची अभिनेत्री
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून सुरू झालेला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आता रोज याविषयी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टोलेबाजी होताना दिसत आहे. यामध्ये कंगना राणावत संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी आहे.
करण जोहर, बॉलीवूड माफिया, संजय राऊत, शिवसेना, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे तसंच जया बच्चन यांच्याविरुद्ध पंगा घेतल्यानंतर कंगना राणावतने आता अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिच्यावर निशाणा साधला आहे.
"उर्मिला मातोंडकर कोण आहे, ती सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, हे ऐकायला बरं वाटत नाही. पण ती आपल्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती सॉफ्ट पॉर्नसाठीच ओळखली जाते, हो ना?" असं वक्तव्य कंगना राणावतने केलं. टाईम्स नाऊ या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान एका प्रश्नाचं उत्तर देताना कंगना बोलत होती.
कंगनाच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत असल्याचं दिसून येत आहे.
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना राणावतने अतिशय आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. या प्रकरणावरून ती सातत्याने बॉलीवूडमधील दिग्गजांना आव्हान देत आहे. शिवाय तिच्याबाबत प्रतिक्रिया देणाऱ्या प्रत्येकाला ती आक्षेपार्ह भाषेत प्रत्युत्तर देत आहे.
असाच प्रकार संजय राऊत, शिवसेना आणि जया बच्चनच्या वेळी दिसून आला. आता उर्मिला मातोंडकरचा या यादीत समावेश झाला आहे.
कंगना आणि उर्मिला मातोंडकर यांच्या वादाची सुरुवात उर्मिला मातोंडकरच्या मुलाखतींनी झाली. गेल्या दोन-चार दिवसांपासून उर्मिला मातोंडकरने अनेक माध्यमांना मुलाखती दिल्या होत्या.
यामध्ये तिने कंगनावर निशाणा साधला होता. कंगना राणावतला भाजपचं तिकीट हवं असल्यामुळे तिने असा प्रकार सुरू केल्याचा आरोप उर्मिला मातोंडकरने केला.
त्यानंतर कंगना राणावतने आता उर्मिला मातोंडकरला प्रत्युत्तर दिलं आहे.
"उर्मिला मातोंडकरची एक अपमानजनक मुलाखत पाहिली, यामध्ये ती माझ्याबद्दल बोलताना दिसत आहे. याची चीड येत आहे. त्यांनी माझ्या संघर्षाची थट्टा केली. मला भाजपकडून तिकीट हवं आहे, म्हणून मी असं करत असल्याचं ती म्हणते. मला असं करण्याची काही गरज नाही. उर्मिला मातोंडकर कोण आहे, ती सॉफ्ट पॉर्न स्टार आहे, हे ऐकायला बरं वाटत नाही. पण ती आपल्या अभिनयासाठी नक्कीच ओळखली जात नाही. ती सॉफ्ट पॉर्नसाठीच ओळखली जाते, हो ना?," असं कंगना म्हणाली.
कंगनाची ही मुलाखत बुधवारी (16 सप्टेंबर) संध्याकाळी ही मुलाखत टीव्हीवर दाखवण्यात आली होती.
उर्मिला मातोंडकरने या प्रकरणी अद्याप कोणतीच थेट प्रतिक्रिया दिलेली नाही. पण तिने रात्री उशीरा ट्वीटरवर शिवाजी महाराजांचा एक फोटो पोस्ट केला.
"बदल्याची भावना मानवाला जळवते. संयम हाच बदल्याच्या भावनेवर नियंत्रण आणण्यासाठीचा उपाय आहे. शिवाजी महाराज अमर रहे," असं वाक्य फोटोसोबत लिहिलेलं आहे.
दरम्यान, रकूल प्रीत सिंहने दिल्ली उच्च न्यायालयाकडे धाव घेतली आहे.
रकूल प्रीत सिंहची मीडियाविरोधात तक्रार
रकूल प्रीत सिंह या अभिनेत्रीने दिल्ली हायकोर्टाकडे मीडियाविरोधात धाव घेतली. या संदर्भात हायकोर्टाने माहिती आणि प्रसारण मंत्रालय, प्रसार भारती, न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशन, प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाला नोटीस बजावली आहे.
रकूल प्रीत सिंहने मीडिया ट्रायलविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल हायकोर्टाने घेतली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)