You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आदित्य ठाकरेंवर भाजप नेते आणि कंगना राणावत सतत आरोप का करत आहेत?
- Author, दीपाली जगताप
- Role, बीबीसी मराठी
सुशांतसिंह राजपूत प्रकणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यावर टीका केली.
उद्धव ठाकरेंना उत्तर म्हणून नारायण राणेंनी पत्रकार परिषद आयोजित केली. त्यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केला.
राणे यांनी म्हटलं, "सुशांत सिंह राजपूत प्रकरणी आदित्य ठाकरे कोठडीत जाईल, सत्तेचा दुरुपयोग करून स्वत:च्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न आहे. सुशांतच्या प्रकरणात त्याला मारलं, कशानं मारलं सर्व बाहेर येईल. दिशा सालियनवर बलात्कार कुणी केली, तिला वरून कुणी टाकलं, हे सर्व समोर येईल."
25 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांना बेडूक आणि त्यांचा मुलांना बेडकाची पिल्लं म्हटलं होतं.
यापूर्वी सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतने आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते.
"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मूळ अडचण ही आहे की, मी अशा लोकांचे पितळ उघडे करते जे मुव्ही माफिया आहेत, सुशांत सिंहचे खूनी आहेत आणि ड्रग रॅकेटशी संबंधित आहेत. ज्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांचे प्रिय पुत्र आदित्य ठाकरे फिरतात," असं कंगनानं म्हटलं होतं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्यावर सध्या कंगनाने आरोप केले .
सुशांत सिंह प्रकरणाशी आपला कसलाही संबंध नाही असं पत्रक आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीलाच प्रसिद्ध केलं होतं.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरण राज्याच्या एका युवा नेत्यामुळे दाबले गेले असा आरोप भाजप नेत्यांकडून अनेकदा करण्यात आला. तो युवा नेता कोण हे मात्र भाजपने अद्याप स्पष्ट केलेले नाही.
या प्रकरणी प्रत्यक्षात मात्र एकही पुरावा किंवा अधिकृत तक्रार कुणाकडूनही दाखल झालेली नाही.
मग पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे नाव या सर्व प्रकरणांमध्ये सातत्याने चर्चेत का येत आहे? यामागे राजकारण आहे की दुसरे काही? ठाकरे कुटुंबाला बदनाम केले जात आहे का? अशा आरोपांमुळे विरोधी पक्ष भाजपला फायदा होतोय का ?
आदित्य ठाकरेंची चर्चा का होतेय?
- 14 जूनला अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाल्याचे समोर आले. काही मोजक्या दिवसात सुशांतचे फॅन्स आणि राजकीय नेत्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली.
- 27 जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली.
- 31 जुलैला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी महाविकास आघाडीतील एका तरुण मंत्र्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप केला.
- 4 ऑगस्टला शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचं विधान केलं. सुशांत प्रकरणी ठाकरे कुटुंबाला बदनाम करण्याचा डाव असल्याचं परब यांनी म्हंटलं होतं.
- 9 ऑगस्टला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनामध्ये या प्रकरणाचा स्क्रिन-प्ले आधीच लिहिण्यात आला होता, असं वाटतंय असं विधान केलं होतं.
- 16 ऑगस्टला भाजपचे खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सुशांत सिंह प्रकरणात शिवसेनेवर टीका केली. आदित्य ठाकरेंचा याच्याशी संबंध नाही मग संजय राऊत प्रतिक्रिया का देत आहेत ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे आणि बॉलिवुडचे संबंध
खरं तर अगदी प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून ठाकरे कुटुंबाचे बॉलिवूडशी संबंध आहेत. याला आता युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेही अपवाद नाहीत.
अभिनेता सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये बाहेरून येणाऱ्या कलाकरांचे कसे हाल केले जातात यावरुन बॉलिवूडमध्ये घराणेशाही असल्याबाबत पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रेंड सुरू झाले.
कंगानाकडून याआधीच दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरवर मुव्ही माफिया आणि बॉलीवूडमध्ये घराणेशाहीला तो जबाबदार आरोप करण्यात आला होता.
सुशांतच्या निमित्ताने पुन्हा एकदा कंगनाने हा वाद उकरून काढला आणि सुशांत सिंहने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाल्याचा दावा केला. यात सुशांतची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवरही विविध आरोप करण्यात येत आहेत.
या घडामोडी घडत असताना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे आणि अभिनेत्री दिशा पाटणी एकत्र असलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला.
हा फोटो पुन्हा चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे ट्विटरवर एका अकाऊंटकडून या फोटोमध्ये आदित्य ठाकरेसोबत असलेली दिशा पाटणी ही रिया चक्रवर्ती आहे असे सांगण्यात आले.
अल्ट न्यूज या वेबसाईटकडून या व्हायरल फोटोचे फॅक्ट चेक करण्यात आले. तेव्हा आदित्य ठाकरेसोबत असणारी अभिनेत्री रिया चक्रवर्ती नसून ती दिशा पाटणी आहे हे स्पष्ट केले गेले.
अभिनेत्री दिशा पाटणी आणि आदित्य ठाकरे यांची मैत्री जगजाहीर आहे. दोघांनाही अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे.
एका पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंना दिशा पाटणीबद्दल विचारण्यात आले तेव्हा ती आपली मैत्रीण आहे असे आदित्यने स्पष्ट केले होते.
केवळ दिशा पाटणीच नाही तर आदित्य ठाकरे बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रीटींसोबत एकत्र दिसतात.
अभिनेता अक्षय कुमार यांच्यासोबत आदित्याने मुलींना सेल्फ डिफेंसचे प्रशिक्षण देण्याची मोहीम सुरू केली होती. तसेच बॉलीवूडच्या अनेक कलाकारांसोबत आदित्य ठाकरे यांचे संबंध आहेत.
'मी आदित्य ठाकरेंना भेटले नाही'
सुशांत सिंह प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आलेल्या रिया चक्रवर्तीने आदित्य ठाकरेंविषयी स्पष्टीकरण दिले होते.
वकिलांमार्फत रिया चक्रवर्तीचे विधान प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानुसार, "मी आदित्य ठाकरेंना ओळखत नसून माझा त्यांच्याशी कोणताही संबंध नाही. मी त्यांना कधीही भेटलेले नाही." असे रियाने स्पष्ट केले.
आदित्य ठाकरें यांना बदनाम करण्याचा डाव ?
ठाकरे कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेणारे आदित्य ठाकरे अवघ्या 30 व्या वर्षी मंत्री बनले.
ठाकरे कुटुंबीयातून प्रत्यक्ष निवडणूक लढवणारे ते पहिलेच उमेदवार होते. मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत ते जिंकून ते आमदार झाले.
आता महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पर्यटनमंत्री आहेत आणि शिवसेनेची विद्यार्थी संघटना युवा सेनेचे ते अध्यक्ष आहेत.
शिवसेनेचे भविष्यातील नेतृत्व म्हणून सध्यातरी आदित्य ठाकरे यांच्याकडे पाहिलं जातं.
मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळात आदित्य ठाकरेंसहीत शिवसनेचे मंत्री आहेत ही शिवसेनेची सर्वात मोठी ताकद आहे. हा गड पाडण्याचा प्रयत्न आता विरोधी पक्षाकडून केला जात आहे.
शिवसेनेने मुख्यमंत्री पदासाठी भाजपसोबत युती तोडली आणि विचारधारेशी तडजोड करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली.
हेच मुख्यमंत्री पद आणि मंत्रीपद जबाबदारी आणि उत्तरदायित्व घेऊन येतं याची जाणीव आदित्य ठाकरेंना करून देण्याचा प्रयत्न होतोय.
याविषयी बोलताना राजकीय विश्लेषक आणि 'मिड डे'चे सिटी एडिटर संजीव शिवडेकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितले, "ही राजकीय व्यूहरचना असू शकते. आदित्य ठाकरेंची प्रतिमा खराब करणं म्हणजे शिवसेनेची प्रतिमा आणि प्रतिष्ठा दोन्हीला धक्का पोहोचवणं. यामुळे पक्षाला मिळत असलेली उभारी आपोआप खाली येते आणि आत्मविश्वासही कमी होतो."
ठाकरे पिता-पुत्र सत्तेत आहेत. मंत्रिमंडळात त्यांचे स्थान आहे. याचा फायदा संघटन मजबूत करण्यासाठी होत असतो.
"पण मुख्यमंत्री पदाचा मुकूट काटेरी आहे हे विरोधी पक्ष भाजपकडून वारंवार भासवले जात आहे," असं पत्रकार आणि लेखक धवल कुलकर्णी सांगतात.
राजकारणात अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे प्रतिमेला धक्का पोहचवण्यात विरोधी पक्षाला यश आले आणि मंत्र्यांना राजिनामा द्यावा लागला.
यामध्ये माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील, तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे, छगन भूजबळ, आर आर पाटील अशा अनेक राजकीय नेत्यांना टोकाचे आरोप झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागला होता.
केंद्रात भाजप सरकारने जे राहुल गांधींसोबत केले तेच महाराष्ट्रात आदित्य ठाकरेंसोबत होत आहे असाही एक मतप्रवाह आहे.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी सांगितलं होतं, "आदित्य ठाकरेंचा या प्रकरणात रोल अजूनही समोर आलेला नाही. पण, येत्या काळात त्यांनाही सीबीआय चौकशीसाठी तयार रहावं लागेल. बॉलिवूडच्या लोकांची चांगले संबंध हा काही गुन्हा नाही. पण, सुशांतच्या मुद्यावर भाजप उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल असा संशय मला आहे."
बाजू मांडण्यात शिवसेना कमी पडते आहे?
सुशांत सिंह प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यास विरोध केल्याने ठाकरे सरकावर प्रचंड टीका करण्यात आली.
मुंबई पोलीसांनी चौकशी सुरू केली तरी प्रत्यक्षात गुन्हा नोंदवला गेला नाही आणि सर्वोच्च न्यायालयाने तपास सीबीआयकडे सोपवला. यामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना टीकेचा धनी व्हावे लागले.
सीबीआय मुंबईत आल्यानंतर अधिकाऱ्याला क्वारंटाईन करणं असेल किंवा कंगना राणावतच्या घराचे बांधकाम पाडणं असेल या घटनांमुळेही शिवसेनेच्या भूमिकांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले.
संजिव शिवडेकर सांगतात, "शिवसेना बाजू मांडण्यात कमी पडत आहे. केवळ सामनामध्ये लिहून लोकांचे समाधन होत नाही. तुमच्यावर जे आरोप केले जात आहेत ते समोर येऊन खोडून काढावे लागतात."
"पार्टीमध्ये आदित्य ठाकरे होते का? असा प्रश्न वारंवार विचारला जातो. मग शिवसेना समोर येऊन हे स्पष्ट का करत नाही? आदित्य ठाकरे पार्टीला होते की नव्हते याचा खुलासा का केला जात नाही?" असाही प्रश्न शिवडेकर यांनी उपस्थित केला.
आदित्य ठाकरे यांनी 4 ऑगस्टला ट्विटरवरुन सविस्तर स्पष्टीकरण दिले. ज्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण कथित पार्टी प्रकरणाचा उल्लेख त्यांनी केला नाही.
पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "किणी प्रकरणात राज ठाकरेंवर आरोप करण्यात आले होते त्याचा राजकीय करिअरमध्ये त्यांना मोठा फटका बसला. त्याच पद्धतीने आदित्य ठाकरे यांच्यावर आता आरोप करण्यात येत आहेत."
आदित्य ठाकरेंवर थेट कुणीही नाव घेऊन आरोप केले नव्हते. पण सुरुवातीलाच शिवसेनेचे नेते अनिल परब आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी समोर येऊन आदित्य ठाकरेंचा संबंध नसल्याचे स्पष्टीकरण दिले. त्यामुळे स्वत:हून शिवसेनेने स्पष्टीकरण का दिले असाही प्रश्न उपस्थित होतो.
"शिवसेनेला हे हाताळण्यात यश आले नाही असे दिसते. आदित्य ठाकरे हा शिवसेनेचा कॉस्मो पॉलिटन चेहरा आहे. सध्याची शिवसेना ही आदित्य टीम चालवते असंही म्हटलं जातं. म्हणूनच आदित्य ठाकरे हे विरोधकांच्या निशाण्यावर असावेत."
दुसऱ्या बाजूला ठाकरे सरकारवर या प्रकरणी करण्यात येणारे आरोप आणि हे भाजप नेते किरिट सोमय्या, खासदार नारायण राणे यांच्याकडून होताना दिसतात. हे दोन्ही नेते असे आहेत ज्यांचे शिवसेनेशी संबंध फारसे चांगले नाहीत.
भाजपला फायदा?
राज्यात सत्तास्थापनेपासून शिवसेना आणि भाजप एकमेकांचे कट्टर विरोधक समजले जातात. ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर भाजपने सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नाही.
कोरोना आरोग्य संकटापासून ते चक्रिवादळ आणि पूर परिस्थितीमध्ये सरकारचा कारभार नियोजन शून्य असल्याची टीका भाजप नेत्यांकडून करण्यात आली.
सुशांत सिंह प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी यासाठी तर दिल्लीपासून महाराष्ट्रातल्या भाजप नेत्यांनी शिवसेनेला हैराण करून सोडलं.
कंगना आणि शिवसेनेच्या वादामुळे देशभरात हे प्रकरण गाजलं आणि ठाकरे सरकारवर टीका झाली.
2019 विधानसभा निवडणूकीत सर्वाधिक 105 जागांवर भाजपने विजय मिळवला पण तरीही सत्तेपासून भाजपला दूर रहावं लागलं. याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेनेने महाविकास आघाडीसोबत स्थापन केलेलं सरकार.
धवल कुलकर्णी सांगतात, "भाजप आणि शिवसेना दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. त्यात युती तुटल्यानंतर सर्वाधिक जागा असूनही सत्ता मिळवता आली नाही याची सल भाजपला आहे. हे सरकार पाडायचे असेल तर नेतृत्वाची प्रतिमा खराब करून सत्ताधाऱ्यांचा आत्मविश्वास कमी करण्यात विरोधकांना यश मिळू शकते."
निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंनी भाजपला सोडून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय. यामुळे भाजप नेते दुखावले होते.
ज्येष्ठ पत्रकार संजय जोग सांगतात, "राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत काही प्रमाणात असणारी गैर-मराठी वोटबॅंक हा सुद्धा मुद्दा आहे. शिवसेनेकडे ही वोटबॅंक नाही. त्यामुळे याचा फायदा भाजप नक्की उचलण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे भाजपचा संपूर्ण प्लॅन यापुढे ठाकरेंना टार्गेट करण्याचा असेल."
'मी बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो...'
सातत्याने होणाऱ्या आरोपांनंतर 4 ऑगस्टला पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट करून या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण दिले.
ते म्हणतात, " कोरोनाने देशभर हाहाकार माजवला आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाचा पराभव करण्यासाठी शर्थ करत आहे. महाराष्ट्र सरकारचे यश आणि लोकप्रियता ज्यांना खूपते त्यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही वैफल्यातून आलेली राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरील लोणी खाण्याचा हा प्रकार आहे."
"माझा या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. सिनेसृष्टी म्हणजे बॉलिवूड हे मुंबई शहराचे महत्त्वाचे अंग आहे. यावर हजारोंचा रोजगार अवलंबून आहे. यापैकी अनेकांशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. हा काही गुन्हा नाही," ठाकरे लिहितात.
पुढे ते लिहितात, "सुशांत सिंह राजपूत यांचा मृत्यू दुर्देवी तितकाच धक्कादायक आहे. पोलिस याचा तपास करत आहेत. मी बाळासाहेब ठाकरे यांचा नातू म्हणून सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या, शिवसेनेच्या आणि ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही. कुणाकडे काही विशेष माहिती असेल तर त्यांनी ती पोलिसांकडे द्यावी."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)