उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस, भगतसिंह कोश्यारी यांच्याबरोबर इतर कोणावर साधला निशाणा?

    • Author, प्रतिनिधी
    • Role, बीबीसी मराठी

"सरकार स्थापन झाल्यापासून मी ऐकतोय सरकार पडेल, सरकार पडेल. आजही मी म्हणतो, हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा," असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बोलायला सुरुवात केली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी हिंदुत्वापासून विरोधकांच्या राजकारणाबद्दल सर्व गोष्टींवर भाष्य केलं आहे. मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क काढून आज बोलणार आहे. जर एखादा शब्द इकडे-तिकडे गेला तर मुख्यमंत्र्यांना असं बोलणं शोभतं का, असं विचारलं जाईल. पण तरीही मला संयमाचं महत्त्व माहीत आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांवर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी यावेळी थेट कोणाचं नाव घेतलं नसलं, तरी आपला रोख कोणाकडे आहे, हेदेखील लपवलं नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात पार पडलेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नेमकी कोणाकोणावर टीका केली? त्यांनी नेमकं काय म्हटलं?

1. देवेंद्र फडणवीस

"मी सत्तेत आल्यापासून अनेक जण म्हणतात की, हे सरकार पडणार. पण, मी सतत म्हणत आलोय आणि आताही आवाहन करतोय की, हिम्मत असेल तर सरकार पाडून दाखवा. आम्ही तुमच्यासारखे गुळाच्या ढेपेला चिकटणारे मुंगळे नाहीये. पण जर का वाटेला जाल, तर मुंगळा कसा डसतो हे कळेल," असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत भाजपच्या इतर नेत्यांवरही टीका केली.

मुख्यमंत्री बाहेर पडत नाहीत या आक्षेपाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, उद्धव ठाकरे काय काम करतो हे तुम्हाला गरगर फिरून चालणार नाही. त्या फिरण्याला काही अर्थ नाही. जे काम झालं ते पुढच्या महिन्यात समोर ठेवणार.

2. नरेंद्र मोदी

भाजपचं सरकार म्हणजे अहंकारी राजा आणि कळसूत्री बाहुल्या आहेत. महाराष्ट्राने हा खेळ बंद पाडला आहे, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे मोदींच्या नेतृत्वावर टीका केली

कोरोना आल्यानंतर घंटा बडवा. थाळ्या बडवा. हेच तुमचं हिंदुत्व. आमचं हिंदूत्व असं नाही, असं म्हणत त्यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आग्रही असलेल्या भाजपला टोला लगावला. ही थेट पंतप्रधानांवर टीका नसली तरी 'थाळ्या-टाळ्या' हा टोमणा त्यांना उद्देशून होता.

जीएसटी करप्रणालीवरही त्यांनी भाष्य केलं.

जीएसटी पद्धत चुकली असेल तर पंतप्रधान मोदींनी प्रामाणिकपणे आपली चूक मान्य करावी. मी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आवाहन करतो की आपण सगळ्यांनी जीएसटी या करप्रणालीविषयी चर्चा करायला हवी, असं उद्धव यांनी म्हटलं.

बिहार निवडणुकीत मोफत लस देण्याच्या आश्वासनावरही ते बोलले.

'बिहारला फुकट लस देत आहे आणि महाराष्ट्राचे 38 हजार कोटी रुपये थकवले आहेत. आम्हाला कर्ज काढायला सांगत आहे. पण, का म्हणून आम्ही कर्ज काढायला हवं?' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

3. भगतसिंग कोश्यारी

राज्यातील धार्मिक स्थळं उघडण्याच्या मुद्द्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी तुम्ही 'सेक्युलर' झाला आहात का, असा प्रश्न उद्धव ठाकरेंना विचारला होता.

याचाच आधार घेत उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाष्य केलं आणि थेट नाव न घेता कोश्यारी यांच्यावर टीका केली.

"मंदिर का उघडत नाही म्हणून हिंदुत्वाबद्दल आम्हाला प्रश्न विचारलं जात आहे. कोण विचारतंय? ज्यावेळी बाबरी पाडली गेली, त्यावेळी आता जे हिंदुत्वाबद्दल प्रश्न विचारत आहेत. ते त्यावेळेला शेपट्या घालून कोणत्या बिळात बसले होते काय माहिती? यांना त्याकाळी घराच्या बाहेर कुणीही न ओळखणारे आम्हाला हिंदुत्वाबद्दल विचारत आहेत," असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

"एकमेकांना नुसत्या टोप्या घालू नका. काळ्या टोपी खाली डोकं असेल त्यात मेंदू असेल तर सरसंघचालक मोहन भागवत यांना हिंदुत्वाचा अर्थ विचारा."

उद्धव ठाकरेंनी म्हटलं, की मोहन भागवत जे म्हणाले ते त्यांच्या राजकीय संघटनेनं पाळायला हवं. राजकारण म्हणजे शत्रूमधील युद्ध नव्हे. विवेक पाळा, असं मोहन भागवतांनी म्हटलं आहे.

4. कंगना राणावत, अर्णब गोस्वामी

अभिनेत्री कंगना राणावत तसंच पत्रकार अर्णब गोस्वामींवरही उद्धव यांनी निशाणा साधला. सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी जे राजकारण झालं, त्याचाही संदर्भ त्यांच्या वक्तव्यांना होता.

दहा तोंडानी रावण बोलतोय, असं म्हणत मुंबईविरोधात बोलणाऱ्यांना त्यांनी रावणाची उपमा दिली.

"मुंबईला 'पाकव्याप्त काश्मीर' म्हटलं गेलं. घरी खायला येत नाही म्हणून मुंबईला यायचं आणि महाराष्ट्राची बदनामी करायची. ही अशी रावणी औलाद. कोरोनाचं संकट असतानाही महाराष्ट्र पुढे जातोय म्हणून महाराष्ट्राची बदनामी केली जातेय," असं उद्धव यांनी म्हटलं.

"मुंबई पाकव्याप्त काश्मीर, मुंबई पोलीस निकम्मे, महाराष्ट्रात सगळीकडे गांज्याची शेती आहे, अशी बदनामी करण्यात आली. पण, मला मुंबईला पोलिसांबद्दल अभिमान आहे. छातीवर गोळ्या झेलून अतिरेक्यांना जिवंत पकडणारे जगातील एकमेव पोलीस दल मुंबईचं आहे."

सुशांतनं आत्महत्या केली तर तो बिहारचा पुत्र. असेलही. बिहारचा पुत्र म्हणून महाराष्ट्राच्या पुत्रावर चिखलफेक करायला लागले, असं म्हणत आदित्य ठाकरेंचं नाव कसं या प्रकरणात आणलं याचाही उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला.

5. नारायण राणे

सध्या एक बेडूक आणि त्यांची दोन पिलं या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजप नेते नारायण राणे तसंच त्यांचे पुत्र नीलेश आणि नितेश राणेंना टोला लगावला.

बेडकानं बैल पाहिला असं एक गाणं होतं. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला आणि वाघाची डरकाळी ऐकून बाबांना सांगितलं, असंही त्यांनी म्हटलं.

6. रावसाहेब दानवे

केंद्राकडून मदत मागण्याच्या मुद्द्यावरून रावसाहेब दानवेंनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली होती.

दानवे यांच्या लग्न तुम्ही केलं आणि पैसे मात्र बापाकडे मागत आहात, या वक्तव्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की, दानवे जी, ते तुमचे बाप असतील, माझा बाप इथं माझ्यासोबत आहे. तुमचे भाडोत्री बाप तुम्हाला लखलाभ.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)