उद्धव ठाकरे : शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्कचं नातं काय आहे?

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

शिवसेनेची अनेक वर्षांची दसरा मेळाव्याची परंपरा आहे. दरवर्षी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात काय होणार याची उत्सुकता शिवसैनिकांना असते. यासाठीच हजारो शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर दाखल होतात.

30 ऑक्टोबर 1966 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे एक समीकरण बनलं. त्याला आता 55 वर्षे पूर्ण होतील.

इतकी वर्षं शिवाजी पार्कवर हा दसरा मेळावा घेण्यात येतो. अनेक राजकीय पक्षांकडून दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात येतं. पण एक पक्ष, एक नेता आणि एक मैदान हे शिवसेनेतच बघायला मिळत असल्याचं अनेक राजकीय विश्लेषक सांगतात.

बाळासाहेबांचं शिवाजी पार्कवर प्रचंड प्रेम होतं. बाळासाहेब ठाकरे आणि शिवाजी पार्क या दोघांचा जन्म एकाचवेळी झाल्याच खूप कमी जणांना माहिती असल्याचं 'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात. "शिवाजी पार्कला पूर्वी माइन पार्क असं संबोधलं जात होतं. 1927 साली या मैदानाचं नावं शिवाजी पार्क देण्यात आलं. याच साली बाळासाहेब ठाकरे यांचा जन्म झाला होता."

2005 मध्ये शिवाजी पार्कवरच्या सभांवर मर्यादा

2005 मध्ये मुंबई उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली आणि त्यावर सुनावणी होताना शिवाजी पार्क मैदान हे शांतता क्षेत्रात येत असल्यामुळे राजकीय सभांना परवानगी देऊ नये, असा युक्तिवाद करण्यात आला. या सभांमुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होत असल्याचही बोललं गेलं.

त्यानंतर शिवसेनेच्या या राजकीय दसरा मेळाव्याला सांस्कृतिक कार्यक्रमाचं स्वरूप देण्यात आलं. 60 डेसीबलपेक्षा अधिक आवाजावर मर्यादा घातल्या गेल्या.

दसरा मेळाव्याची परंपरा

पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी शिवाजी पार्क मैदानावर हजारो शिवसैनिकांची गर्दी होत असे. त्या दिवशी आधी शस्त्रपूजन करून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात व्हायची. सर्वात शेवटी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण व्हायचं. शिवसेना या पक्षात भविष्यातली रूपरेखा दसरा मेळाव्यात जाहीर केली जात असे.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर सांगतात, "शिवसेनेने 1989 मध्ये 'सामना' हे वर्तमानपत्र सुरू केलं. शिवसेनेची भूमिका ही दसरा मेळाव्यात स्पष्ट केली जात असे. याचं उदाहरण म्हणजे, 1991 सालच्या दसरा मेळाव्यात भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना मुंबईत होऊ देणार नाही, असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. तेव्हा तो कसा होऊ देणार नाही याचं कोणतंही नियोजन नव्हतं. तेव्हा शिवसेनेचे नेते शिशिर शिंदे आणि प्रभाकर शिंदे यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन मैदानावर 'पिच' उखडून टाकलं होत. त्यामुळे हा क्रिकेट सामना रद्द करावा लागला होता."

दसरा मेळाव्यात पक्षाच्या भूमिकेला रुपरेखा देण्याची ही परंपरा उध्दव ठाकरे यांच्या काळतही कायम आहे.

ऐतिहासिक घटनांचे साक्षीदार

शिनसेनेमधल्या अनेक महत्त्वाच्या घटना दसरा मेळाव्यात घडल्या आहेत म्हणून शिवसेनेत दसरा मेळाव्याला विशेष महत्त्व आहे.

'ठाकरे विरुद्ध ठाकरे' पुस्तकाचे लेखक आणि पत्रकार धवल कुलकर्णी सांगतात, "1996 साली राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवउद्योग सुरू करण्यात आला. त्याची घोषणा दसरा मेळाव्यात केली गेली.

1982 साली गिरणी कामगारांच्या संप या संदर्भाने बाळासाहेब ठाकरे यांनी भाषण केलं. त्यावेळी दसरा मेळाव्याला त्यावेळी कॉंग्रेसमध्ये असणार्‍या शरद पवार आणि जॉर्ज फर्नाडिस यांना आमंत्रित केलं होतं. 2010 साली बाळासाहेब ठाकरे यांनी नातू आणि विद्यमान मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हातात तलवार देऊन राजकारणातलं 'लॉंचिग' दसरा मेळाव्यात केलं होतं."

त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पक्षाचं पूर्णपणे नेतृत्व हातात घेतलं होतं.

बाळासाहेब ठाकरे यांना वयानुसार सभांना जाणं शक्य होत नव्हतं. 24 ऑक्टोबर 2012 साली झालेल्या दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे यांना तब्येतीच्या कारणामुळे उपस्थित राहता आलं नव्हतं. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलं होतं. दसरा मेळाव्याच्या त्या 'भाषणात' कडक शब्दात टीका करणारे बाळासाहेब हळवे झालेले महाराष्ट्राने पाहीले.

ते म्हणाले होते "तुम्ही मला इतके वर्ष सांभाळलं. आता उद्धवला आणि आदित्यला सांभाळून घ्या आणि महाराष्ट्रात उत्कर्ष घडवा". बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 मधल्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांसाठी असलेलं ते शेवटचं भाषण ठरलं.

'त्या' वेळी रद्द झाला होता दसरा मेळावा

शिवसेनेच्या इतिहासात आतापर्यंत दोनवेळा दसरा मेळावा रद्द करण्यात आला आहे. 2006 साली मुंबईत जोरदार पाऊस पडत होता. शिवाजी पार्कवर चिखल झाला होता काही ठिकाणी पाणी साचलं होतं. यामुळे दसरा मेळावा रद्द करावा लागला होता. 2009 साली विधानसभा निवडणुका लागल्या होत्या. आचारसंहितेच्या काळात दसरा मेळावा घेणं शक्य नव्हतं तेव्हा तो पुढे ढकलण्यात आला होता.

तर कोरोनाच्या काळात 2 वेळा दसरा मेळावा बंदिस्त सभागृहात घेण्यात आला होता.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)