You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कंगना राणावत वादामुळे शिवसेनेला 'हे' 4 फायदे होणार?
- Author, नामदेव अंजना
- Role, बीबीसी मराठी
अभिनेत्री कंगना राणावत आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाद आता राजकीय वळणावर येऊन ठेपलाय.
3 सप्टेंबर 2020 पासून कंगना आणि संजय राऊत (शिवसेना) यांच्याकडून एकमेकांना आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जात आहेत. दोन्ही बाजू नमतं घेताना दिसत नाहीत. त्यामुळे या वादाचे आता राजकीय कंगोरे शोधणं अनिवार्य बनलं आहे.
कंगनानं शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका करताना मुंबई शहराला 'पाकव्याप्त काश्मीर'ची उपमा दिली. कंगनाचं हे वक्तव्य गेल्या आठवड्याभरातील वादाला मोठी फोडणी देणारं ठरलं. त्यानंतर दोन्हीकडून म्हणजे कंगना आणि शिवसेना यांच्याकडून एकमेकांवर सातत्यानं टीका होत राहिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे शिवसेनेचे सत्तेतील भागीदार असल्याने अर्थातच सेनेच्या मागे उभे राहिले. मात्र, महाराष्ट्र भाजपनं पहिल्या दिवशी कंगनाचं समर्थन केलं, पण कंगनाच्या 'पाकव्याप्त काश्मीर'च्या टीकेनंतर महाराष्ट्र भाजप बॅकफूटवर गेली.
राम कदम यांच्याकडून कंगनाचं सुरू असलेलं समर्थनही अचानक थांबलं. महाराष्ट्राबाहेरील भाजप नेते मात्र अजूनही कंगनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियाच्या मैदानात उतरले आहेत. पण त्याबाबत राज्य भाजप चिडीचूप आहे.
या वादाच्या अनुषंगाने एक गोष्ट सगळ्यांनाच आश्चर्यचकित करते, ती म्हणजे, कंगना राणावतच्या वक्तव्यांना गेल्या आठवडाभर शिवसेनेनं इतकं महत्त्वं का दिलं?
या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना कंगनाच्या वक्तव्यांचा शिवसेनेला होणाऱ्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अशा चार फायद्यांकडे लक्ष जातं. आपण ते चारही मुद्दे क्रमानं विस्तृतपणे पाहूया.
1) महाराष्ट्र भाजपची नकारात्मक प्रतिमा होतेय?
'न्यू इंडियन एक्स्प्रेस'मधील बातमी ट्विटरवर शेअर करून 3 सप्टेंबर रोजी ज्यावेळी कंगनानं संजय राऊत यांच्यावर टीका केली आणि मुंबईची 'पाकव्याप्त काश्मीर'शी तुलना केली, तेव्हा भाजपचे मुंबईतील आमदार राम कदम, प्रवक्ते राहिलेले अवधूत वाघ अशी मंडळी कंगनाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर उतरली होती.
मात्र त्यानंतर 'आमची मुंबई' हे शब्द ट्विटरवर ट्रेंड करण्यात आले. राजकीय, मनोरंजन अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला आणि मुंबईप्रती भावना व्यक्त केल्या.
भाजपच्या राम कदम यांच्यासारख्या आमदारांनी कंगनाचं समर्थन करून तिला थेट 'झांशीची राणी'ची उपमा दिल्यानं भाजपविरोधातही जनमत जाऊ लागलं.
त्यानंतर भाजपचे नेते आणि माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी तातडीनं पत्रकार परिषद घेतली आणि कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नसल्याचं जाहीर केलं.
मात्र, भाजपचे महाराष्ट्राबाहेरील नेते, मग त्यात पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश सिंह साहीब असो किंवा इतर नेते, हे कंगनाचं वारंवार समर्थन करताना दिसत आहेत. या गोष्टींमुळे महाराष्ट्र भाजपची प्रतिमा महाराष्ट्रात नकारात्मक रंगतेय.
मुंबईत भाजपची प्रतिमा नकारात्मक रंगणं हे शिवसेनेच्या फायद्याचंच आहे. याचं कारण मुंबई महानगरपालिका निवडणुका आता फार दूर नाहीत. त्यामुळे भाजपची प्रतिमा नकारात्मक होत असेल, तर त्याचा फायदा शिवसेनेला होईल, असं अनेक राजकीय विश्लेषकांना वाटतं.
संजय राऊत यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा या मुद्द्याच्या अनुषंगानं भाष्य केलं.
"भारतीय जनता पक्ष समर्थन करतोय. का करतोय? खरंतर महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मागे कुठल्याच राजकीय नेत्यांने राहू नये. भाजपनं समजून घेतलं पाहिजे. तेही कालचे राज्यकर्ते होते. इथे जर भाजपचं राज्य असतं, तर चित्र वेगळं दिसलं असतं. एखाद्या चॅनेलवर नरेंद्र मोदी साहेबांवर, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत एकेरी उल्लेखात कुणी काही बोलले असते, तर तुरुंगात गेले असते. इतर राज्यात तसं झालंय. उत्तर प्रदेशात बघा. योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात कुणी कार्टून काढलं, कुणी लिहिलं, तर तुरुंगात गेलेत," असं राऊत म्हणाले.
वरिष्ठ पत्रकार दीपक भातुसे यांच्या मते, "पहिल्या दिवशी 'पाकव्याप्त काश्मीर'शी मुंबईची तुलना आणि त्यानंतर राम कदम यांचं कंगनाला समर्थन या गोष्टी दिसल्या. पण नंतर सोशल मीडियावरील ट्रेंड आपल्या विरोधात जात असल्याचं भाजपच्या लक्षात आलं आणि लगेच आशिष शेलारांनी पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट केली. मात्र, आता शिवसेना कंगनाला उत्तरं देऊन आणखी महत्त्वं वाढवताना दिसतेय."
इतर राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांनाही यामुळे भाजपची 'महाराष्ट्रविरोधी' प्रतिमा तयार होत असल्याचं वाटतंय.
'द हिंदू' वृत्तपत्राचे पत्रकारे अलोक देशपांडे म्हणतात, "कंगनाच्या वक्तव्यानंतर मुंबई-ठाण्यात ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरले. त्यांनी आंदोलनं केली. कालपर्यंत शिवसेना शांत होती, पण आज कंगनावर सर्व उलटल्यानंतर शिवसेना तातडीने पुढे आली. हा राजकीय फायदा शिवसेनेला होतोच आहे."
ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई सुद्धा या मताशी सहमत होतात. "राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यावर टीका होऊ शकते. अशा वेळेत कंगनामुळे विषयांतर होण्यास मदत होतेय, हा फायदा सेनेला आहेच."
शिवाय, "कंगनाला भाजपमधील जेवेढे नेते समर्थन करतील, विशेषत: मुंबईची तुलना 'पाकव्याप्त काश्मीरशी' तुलना केल्यानंतर, तेवढं शिवसेनेला फायद्याचं असेल, कारण यातून भाजपची 'महाराष्ट्रविरोधी' प्रतिमा तयार होईल," असंही हेमतं देसाई म्हणतात.
2) मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण दृढ होतंय?
कंगना राणावतने शिवसेना, संजय राऊत यांच्यावर टीका करताना, मुंबई शहरालाही नावं ठेवण्यास सुरुवात केली. कधी 'पाकव्याप्त काश्मीर', तर कधी थेट 'पाकिस्तान' म्हटलं.
त्यामुळे मुंबईच्या अस्मितेचा प्रश्न उभा राहिलो, जे शिवसेनेला कायमच फायदेशीर ठरला आहे. किंबहुना, शिवसेना या पक्षाचा पायाच या अस्मितेवर आधारलेला आहे.
मुंबईला कुणी नावं ठेवत असेल, तर त्यांना महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असं राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखही म्हणाले.
गृहमंत्र्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी बीबीसी मराठीच्या मुलाखतीत पाठिंबा दिला. त्याआधीही शिवसेनेच्या मुंबईतील कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत मुंबईला नावं ठेवणाऱ्या कंगनाविरोधात आंदोलनं केली.
'मुंबई म्हणजे शिवसेना' हे समीकरण गेली कित्येक वर्षं लोकांच्या मनात उतरवलं गेलंय. आगामी मुंबई महापालिका निवडणूक किंवा शिवसेनेला पक्ष म्हणूनही हे समीकरण फायद्याचंच असल्याचं दिसून येतं.
कंगना प्रकरणामुळे शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्यानं मुंबई म्हणजे शिवसेना हे समीकरण आणखी दृढ होण्यास मदत होताना दिसतेय.
संजय राऊत यांनी याच मुद्द्याला धरून बीबीसी मराठीच्या मुलाखतीतही म्हटलं, "मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते? त्यामुळे त्यांनी मुंबईचे ऋण मान्य केले पाहिजे. सगळ्यांनीच, अगदी आमच्यासारख्यांनी सुद्धा."
"मुंबई महाराष्ट्राकडे आहे, ती आपल्या लोकांनी मिळवली. त्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे लाखो मराठी लोकांना इथे राहता येतं, रोजगार मिळतोय, विविध प्रकारचे उद्योग आम्ही करतो. कुणी उठायचं आणि मुंबईवर थुंकायचं आणि तेही इथलंच खाऊन, तर त्यासंदर्भात आम्ही बोललो," असं संजय राऊत म्हणाले.
3) भाषिक आणि प्रांतिक अस्मितेचा मुद्दा शिवसेनेच्या पथ्यावर पडतोय?
"महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाहीय, महाराष्ट्र त्यांचाच आहे, ज्यांनी महाराष्ट्राच्या गौरवाला प्रतिष्ठा मिळवून दिली," असं म्हणणाऱ्या कंगनाला संजय राऊत यांनी ट्विटरवरून उत्तर दिलं.
"मुंबई मराठी माणसाच्या बापाचीच. ज्यांना हे मान्य नसेल त्यांनी त्यांचा बाप दाखवावा. शिवसेना अशा महाराष्ट्र दुष्मनांचे श्राद्ध घातल्या शिवाय राहाणार नाही."
त्याचसोबत, कंगनानं मुंबईची तुलना सातत्यानं पाकव्याप्त काश्मीर, पाकिस्तान, बाबर, तालिबान अशा गोष्टींशी केली.
महाराष्ट्रात आधीपासूनच भाषिक आणि प्रांतिक अस्मित संवेदनशील मुद्दा राहिला आहे. अशावेळी कंगनानं 'महाराष्ट्र कुणाचा'पासून 'मुंबई पाकव्याप्त काश्मीर'पर्यंत वक्तव्य केल्यानं या मुद्द्याला हात घातला आणि शिवसेनेनं त्यावर आक्रमक भूमिका घेतली.
वरिष्ठ पत्रकार संजय जोग म्हणतात, मुंबई आणि महाराष्ट्राबद्दलची पक्षाची आधीपासूनच असलेली भूमिका आणखी घट्ट करण्याचा आणि लोकांपर्यंत आक्रमकरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून नक्कीच होताना दिसतो.
दुसरीकडे, कंगनाच्या मागे कुणी बोलविता धनी आहे, असं वाटतं का, या बीबीसी मराठीच्या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊतही जे म्हणाले, ते भाष्य प्रांतिक अस्मितेच्या मुद्द्याला दुजोरा देणारं आहे.
संजय राऊत म्हणाले, "राजकीय पाठबळाशिवाय कुणी एवढी हिंमत करत नाही. महाराष्ट्राच्या विरोधात ही जी चिवचिव, कावकाव, चमचेगिरी चालतेय, त्याला कायमच दिल्लीचा पाठिंबा आहे. दिल्लीमध्ये मुंबईविषयी सुप्त राग आहे, द्वेष आहे की, मुंबई आम्हाला मिळाली नाही, स्वतंत्र झाली नाही. मुंबईतल्या पैशावर डोळा आहे, उद्योग बंद करणे वगैरे. आता हेच पाहा ना, मुंबईतले उद्योग कसे 'एका' राज्यात जातायेत. मुंबईचं महत्त्वं कमी करायचं."
4) कोरोना किंवा इतर मुद्द्यांवरील चर्चेचं विषयांतर करण्यात यश?
शेवटचा, पण अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, महाराष्ट्रात सध्या कोरोना, शिक्षण, रोजगार, विदर्भातील पूरपरिस्थिती, कोकणातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान इत्यादी अनेक मुद्द्ये महत्त्वाचे आहेत.
मात्र, प्रादेशिक तसंच राष्ट्रीय माध्यमांमध्ये केवळ कंगना आणि शिवसेना यांच्यातील वादाचा विषय केंद्रस्थानी आहे. तसा तो मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात शिवसेनेला फायदा आहे का, हा सहाजिक प्रश्न उद्भवतो.
महाराष्ट्रात 7 आणि 8 सप्टेंबर या दोन दिवशी झालेल्य पावसाळी अधिवेशनातही कोरोना किंवा इतर मुद्दयांपेक्षा कंगना राणावत, अर्णब गोस्वामी यांचेच मुद्दे गाजले आणि त्यावरच वादळी चर्चा झाली.
मुंबईनंतर आता पुण्यात कोरोनाची स्थिती वाढत आहे. त्यावर गांभिर्यानं चर्चा अपेक्षित असताना कंगना राणावतवरून विधिमंडळात चर्चा झाली. इतर मुद्द्यांवरून शिवसेनेवर विरोधकांकडून टीका झाली असती हे स्पष्ट आहे. याचे कारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या रुपानं शिवसेनेचाच मुख्यमंत्री आहे.
पण या मुद्द्यावर ज्यावेळी बीबीसी मराठीनं संजय राऊत यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले, "आमच्यावर हे (कंगनाच्या वक्तव्यांचा वाद) लादलं गेलंय. महाराष्ट्राच्या अपमानाच्या प्रश्नी विरोधी पक्ष सरकारसोबत असायला हवा होता, मग हे प्रकरण दहा मिनिटात पुढे गेलं असतं. महाराष्ट्राचा ज्यावेळी अपमान होतो, तेव्हा विरोधी पक्ष आणि इतर पक्ष वेगळे असू शकत नाहीत. आम्ही सगळे या मातीची लेकरं आहोत, दुर्दैवानं विरोधी पक्ष वेगळी भूमिका घेतोय, जी महाराष्ट्राच्या हिताची नाही."
मात्र, वरिष्ठ पत्रकार दीपक भातुसे म्हणतात, "कोरोना किंवा इतर मुद्द्यांवरून बाहेर दुर्लक्ष करता येईल की नाही, हे एवढ्यात सांगता येणार नाही, मात्र अधिवेशनातून या मुद्द्यापासून पळ काढण्यासाठी कंगना राणावत किंवा अर्णब गोस्वमी यांचे मुद्दे वापरले, हे निश्चित. विरोधक वारंवार सांगत होते की, आम्हाला मुद्दे मांडायचे आहे. मात्र, कंगना किंवा अर्णब यांच्या मुद्द्यांवरूनच सभागृह तहकूब होत होतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)