You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोरोना: पुण्यात रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांचा जीव टांगणीला
- Author, राहुल गायकवाड
- Role, बीबीसी मराठीसाठी
पुण्यात कोव्हिडचा पहिला रुग्ण सापडल्याच्या घटनेला सहा महिने पूर्ण झाले. सहा महिन्यात परिस्थिती आटोक्यात येण्याऐवजी रुग्णांचा आकडा 2 लाखांच्या वर गेला. कोरोना व्हायरसचा प्रभाव पुण्यातून अजिबात कमी होताना दिसत नाही. त्यातच ऑक्सिजनचा तुटवडा असल्याच्या वारंवार तक्रारी येत आहेत.
कोव्हिड काळातही ऑक्सिजनचा पुरवठा हा इंडस्ट्रियल भागाला जास्त प्रमाणात केला जात असल्याचा आरोप काही खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांकडून तसेच व्यवस्थापनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ऑक्सिजन उत्पादकांसोबत बैठक घेऊन 80 टक्के ऑक्सिजनचा पुरवठा हा रुग्णालयांसाठी करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रत्यक्ष परिस्थिती
पुण्यात ऑक्सिजनचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसून त्यामुळे कोव्हिडचे रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याची भीती डॉक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. औंध भागात श्वास कोव्हिड केअर चालविणारे डॉ. आनंद यन्नावार याबाबत म्हणाले, ''गेल्या आठवड्यापासून कोव्हिडच्या रुग्णांसाठी लागणारे ऑक्सिजन सिलेंडर मिळविण्यास आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे."
- वाचा-कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती? त्याच्यापासून संरक्षण कसं करायचं?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं आढळली तर तुम्ही पुढे काय कराल?
- वाचा- मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?
- वाचा-कोरोना व्हायरसची लक्षणं टाळायची असतील तर मास्कचा असा होईल उपयोग
- वाचा- कोरोनाचं संकट कधी आणि कसं संपणार?
"आमच्याकडे दाखल असलेल्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना सध्या ऑक्सिजनची गरज आहे. आम्ही ऑक्सिजन सिलेंडर भाडेतत्त्वावर घेतो. आम्हाला जेवढ्या ऑक्सिजन सिलेंडरची गरज आहे, त्याच्या पन्नास टक्केच पुरवठा केला जात आहे. सात सप्टेंबरला ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवला. ऑक्सिजन सिलेंडरची ने आण करणाऱ्या गाड्या या ऑक्सिजन प्लॅन्टच्या बाहेर आठ तास उभ्या होत्या. परंतु त्यात सिलेंडर भरले गेले नाहीत,'' यन्नावार सांगतात.
''इंडस्ट्रियल भागाला ऑक्सिजनचा जास्त पुरवठा करण्यात येत असल्याने हॉस्पिटलसाठी ऑक्सिजनच्या तुटवडा भासत असल्याचे आम्हाला पुरवठा करणाऱ्या काही पुरवठा दारांकडून सांगण्यात आले. याबाबत खरी माहिती घेणे आवश्यक आहे. गेल्या आठवड्यापासून ऑक्सिजन न मिळण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. आम्हाला वेळेवर ऑक्सिजन मिळाला नसता तर आम्हाला आमच्या इकडे येथे दाखल असलेले रुग्ण दुसरीकडे पाठवावे लागले असते,'' यन्नावार सांगतात.
सात सप्टेंबर रोजी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ऑक्सिजन उत्पादकांसोबत बैठक घेतली. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ऑक्सिजन उत्पादकांनी एकूण उत्पादनाच्या 80 टक्के ऑक्सिजन वैद्यकीय उपचारासाठी तर 20 टक्के ऑक्सिजन औद्योगिक उत्पादनासाठी उपलब्ध करुन द्यावा, अशा सूचना त्यांनी ऑक्सिजन उत्पादकांना केल्या.
ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या उत्पादकांनी त्यांच्याकडे भरण्यात आलेले सिलेंडर केवळ वैद्यकीय उपचारासाठी वितरित करावेत. रुग्णालय व ऑक्सिजन सिलेंडर भरणाऱ्या छोट्या उत्पादकांपर्यंत टँकर जलदगतीने पोहोचवण्यासाठी द्रवरुपातील ऑक्सिजन टँकरच्या वाहतूक वितरणादरम्यानच्या त्रुटी उत्पादकांनी दूर कराव्यात व पुरवठा सुरळीत होण्यासाठी नियोजन करावे. असेही ते यावेळी म्हणाले.
या बैठकीमध्ये ऑक्सिजन उत्पादकांनी तसेच पुरवठादारांनी आपल्या अडचणी मांडल्या. तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्वासन देखील त्यांनी यावेळी दिले.
'तरी ऑक्सिजनचा तुटवडा आहेच'
या बैठकीच्या दिवशीच ऑक्सिजनचा तुटवडा जाणवल्याचे श्वास कोव्हिड सेंटरचे संचालक संदीप पिंगळे यांच्याकडून सांगण्यात आले. पिंगळे म्हणाले, ''आम्हाला डीलरकडून सांगण्यात आले की लिक्विड ऑक्सिजन हे इंडस्ट्रीला सप्लाय करण्यात आल्याने वेळेवर ऑक्सिजन हॉस्पिटलसाठी उपलब्ध होऊ शकले नाही. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्यास रुग्णांचा प्राण जाण्याची देखील शक्यता आहे. सध्या पुण्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा जाणवतो आहे. आम्हाला दुसरीकडून ऑक्सिजनची व्यवस्था करावी लागली.''
पुण्यातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी मंगळवारी ऑनलाईन प्रत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव तसेच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार ऑक्सिजन उत्पादन आणि पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासकीय अधिकाऱ्यांचे पथक नियुक्त केल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. तसेच रिफिलिंग ऑक्सिजन उत्पादकांनी 100 टक्के साठा कोव्हिडच्या उपचारासाठी वितरीत करण्याचे आदेश दिले असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.
दरम्यान, कोव्हिड रुग्णांवर वैद्यकीय उपचारादरम्यान रुग्णालयांच्या अतिरिक्त मागणीनुसार ऑक्सिजन उत्पादक व रिफिलिंग करणाऱ्या अस्थापनाकडून दैनंदिन पुरवठा अखंडितपणे सुरू ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आली आहे. ऑक्सिजनचा पुरवठा वैद्यकीय कारणासाठी न होता विना परवाना अन्य ठिकाणी होत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.
पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयाच्या डॅशबोर्डवरील माहितीनुसार पुणे जिल्ह्यात 5469 इतके ऑक्सिजनचे बेड आहेत, 950 इतके आयसीयु परंतु व्हेंटिलेटर नसलेले बेड आहेत तर 713 व्हेंटिलेटर असलेले बेड आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)