You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
‘उद्धव ठाकरे तू चांगलं केलंस’ कंगना राणावतची मुंबईत आल्यावर प्रतिक्रिया
कंगना राणावत मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत आल्यानंतर आधी ती तिच्या खारमधील घरी गेली. त्यानंतर तिने तिच्या पाली हिलच्या कार्यालयाचे तोडफोड झालेले व्हीडिओ फेसबुकवर शेअर केले आहेत.
कंगनाने एक व्हीडिओ ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याच्यावर टीका केली आहे.
"उद्धव ठाकरे तुला काय वाटतं, तू फिल्म माफियांबरोबर मिळून माझं घर तोडलं आणि माझा बदला घेतलाय. आज माझं घर तुटलं आहे उद्या तुझी घमेंड तुटेल. मला वाटतं की तू माझ्यावर फार उपकार केले आहेस," असं कंगना राणावतनं या व्हीडिओमध्ये म्हटलं आहे.
कंगना राणावतच्या कार्यालयावर कारवाई झाल्यानंतर कंगनाने बीएमसी आणि शिवसेनेचा उल्लेख बाबराची सेना असा केला आहे.
कंगनाचं विमान मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर एका वेगळ्या गाडीत बसवून कंगनाला विमानतळाच्या बाहेर नेण्यात आलं होतं.
मुंबई विमानतळासाहेब मोठी गर्दी जमली होती. शिवसेना, रिपाइं आणि कर्णी सेनेचे कार्यकर्ते याठिकाणी घोषणाबाजी करत होते.
'कंगना रणावत पाकिस्तान जाओ' अशा घोषणा शिवसेनेकडून दिल्या जात होत्या.
तर रिपाइं आणि कर्णी सेनेकडून कंगनाला पाठिंबा देण्यासाठी घोषणाबाजी करण्यात येत होत्या.
कंगनाच्या कार्यालयावरील कारवाईस हायकोर्टाची स्थगिती
कंगना राणावतच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर मुंबई महापालिकेनं कारवाई करण्यास सुरुवात केल्यानंतर कंगनानं मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कंगनानं वकिलांच्या मार्फत याचिका दाखल केली. त्यानंतर मुंबई हायकोर्टानं महापालिकेकडून सुरू करण्यात आलेल्या कारवाईवर स्थगिती आणली आणि कंगनाच्या याचिकेवर महापालिकेची भूमिका स्पष्ट करायला सांगितलं.
मुंबई महापालिकेनं कंगनाच्या कार्यालयाला दिलेली नोटीस आणि कार्यालयाच्या आवारात ज्याप्रकारे अधिकारी आले, ते बेकायदेशीर असल्याचं कंगनानं याचिकेत म्हटलंय. शिवाय, आपल्या कार्यालयात कुठलंच अनधिकृत बांधकाम नसल्याचंही कंगनानं याचिकेतून म्हटलंय. वकील रिझवान सिद्दिकी यांनी याबाबत ANI ला माहिती दिली.
मुंबई हायकोर्टानं मुंबई महापालिकेला उद्या (10 सप्टेंबर) दुपारी तीन वाजेपर्यंत भूमिका मांडण्याची मुदत दिलीय
भाजप नेत्यांची सरकारवर टीका
कंगना प्रकरणावरून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टीका केली.
नारायण राणे म्हणाले, "कंगना एक कलावंत आहे. मला तिची बाजू घ्यायची नाही. मी तिला पाहिलेलं नाही. मी तिला ओळखतही नाही. ती जे वाक्य बोलली, त्या वाक्याशी ममी सहमत नाही. दुसऱ्या बाजूला आता आपण बोलूया. मुंबईत कायदा सुव्यवस्था अस्तित्वात आहे का? असा प्रश्न मी उद्धव ठाकरेंना विचारतो."
"सुशांत सिंह राजपूत आत्महत्या संशयास्पद आहे, ती हत्या आहे. सगळ्या लोकांना वाटतं हत्या आहे. दिशा सालियनची आत्महत्या नसून, तिच्यावर बलात्कार करून तिला ढकलून देण्यात आलेलं आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत, तरी मुंबई सुरक्षित आहे का? तर मग कुणी म्हटलं की, मुंबई सुरक्षित नाही, तर मग किती लोकांना पुळका? काही कलावंतांना पुळका! शिवसेनेनं मुंबईतल्या गरीब, मराठी माणसांसाठी काय केलंय?" असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय.
कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी "महाष्ट्रात हा एक प्रकारे सरकार पुरस्कृत दहशत आहे," अशी टीका केली आहे.
त्यानी म्हटलंय, "महाराष्ट्रात एवढं घाबरट आणि लोकशाहीविरोधी सरकार पाहिलेलं नाही. विरोध करणाऱ्या लोकांना आणि पत्रकारांना दाबण्याचं काम या सरकारकडून होतंय. ज्या प्रकारे एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राचा अवमान होतो, त्याचं समर्थन करता येत नाही. तसंच सरकारच्या अशा कृतीचं समर्थन करता येत नाही. महाष्ट्रात हा एक प्रकारे सरकार पुरस्कृत दहशत आहे."
कारवाईला स्थिगीती
कंगना राणावतच्या पाली हिल येथील कार्यालयावर BMCने सुरुवात केली होती. हे बांधकाम बेकायदा आहे की नाही याबाबत सध्या न्यायालयात सुनावणी सुरू झाल्यानंतर या कारवाईवर स्थगिती आणण्यात आली आहे.
"मुंबई ही पाकव्याप्त काश्मीरसारखी झाली आहे या विधानावर मी ठाम आहे. माझे शत्रू हे वारंवार दाखवून देत आहेत आहेत की माझं काहीही खोटं नाही," असं ट्वीट अभिनेत्री कंगना राणावतने केलं आहे.
आपण 9 सप्टेंबर रोजी मुंबईत येणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी कंगनाने केली होती. पण शिवसेनेने तिच्या प्रवेशाला विरोध दर्शवला होता.
दरम्यान, 7 सप्टेंबर रोजी मुंबईतील पाली हिल परिसरातील कंगनाच्या कार्यालयात मुंबई महापालिकेचे अधिकारी पोहोचले. त्यानंतर आपला बंगला तोडला जाऊ शकतो, असं कंगनाने म्हटलं होतं.
पण मंगळवारी अधिकारी आले नाहीत. फक्त लिकेज नीट करून घ्यावं, अशी नोटीस अधिकाऱ्यांनी चिकटवली, असं कंगनाने सांगितलं होतं.
मीडियाने या प्रकरणाला जास्त प्रसिद्धी देऊ नये - शरद पवार
शरद पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मीडियानं या प्रकणाला जास्त हवा दिल्याचं म्हटलंय.
"माझ्यामते आपण या प्रकणाला अधिक महत्त्व देत आहोत, या प्रकरणाला जास्त प्रसिद्धी देऊ नये, जनता याला गंभीरपणे घेत नाही. मीडियाने याला जास्त प्रसिद्धी दिली," असं शरद पवार यांनी म्हटलंय.
"मुंबईत अनेक बांधकाम अवैध असतील, ही कारवाई केल्याने विनाकारण बोलायला संधी उपलब्ध करून देणं आहे. अधिकाऱ्यांनी असा निर्णय का घेतला हे बघावं लागेल," असं कंगनाच्या कार्यालयावर झालेल्या कारवाईबाबत शरद पवार म्हणालेत.
"पोलीस दलच मुंबई आणि महाराष्ट्र सुरक्षेसाठी काम करत. हे सामान्य जनतेला माहीत आहे. त्यामुळे कोणी काहीही म्हणालं तरी जनता त्याला फारसा गंभीरपणे घेत नाही. त्यामुळे तुम्हीही आशा लोकांना जास्त प्रसिद्धी देऊ नका," शरद पवारांनी मीडिया उद्देशून म्हटलं आहे.
हे सुडाने पेटलेले सरकार - प्रवीण दरेकर
कंगना राणावतच्या बंगल्यावर कारवाई केल्याच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबई महापालिका आणि राज्य सरकारवर टीका केली आहे.
हे सरकार सुडाने पेटलेलं सरकार आहे, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
नागरिकांनी तक्रार केल्यानंतर कारवाई
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून ही कारवाई करण्यात आल्याचं स्पष्टीकरण मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलं आहे. कंगनाने मुंबईची तुलना पाकिस्तानशी केली होती. तिने स्वतःहून शत्रू वाढवले आहेत. त्यामुळे तिच्याबाबत कुणीतरी तक्रार केली आहे, असं पेडणेकर म्हणाल्या.
मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते, असं ट्विट करून वादाला तोंड फोडल्यानंतर एका आठवड्याने कंगना राणावत आज (9 सप्टेंबर) मुंबईत दाखल होणार आहे. सध्या कंगना मोहाली विमानतळावर पोहोचली आहे. थोड्याच वेळात ती मुंबईला पोहोचणार आहे.
कंगना तिचं राज्य हिमाचल प्रदेश इथून निघताना हमीरपूर जिल्ह्यातील कोठी परिसरातील एका मंदिरात ती दर्शन घेतानाचा फोटो ANI वृत्तसंस्थेने ट्वीट केला होता.
दरम्यान, कंगना एकामागून एक ट्वीट करून वातावरण तापवत असल्याचं दिसत आहे. सकाळी 8 वाजून 49 मिनिटांनी कंगनाने एक ट्वीट केलं.
मुंबई माझं घर आहे. महाराष्ट्राने मला सर्वकाही दिलं, असं मी मानते, पण आपणही महाराष्ट्राला अशी एक मुलगी दिली आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर महिलांच्या सन्मान आणि अस्मितेसाठी आपलं रक्त सांडू शकते, असं कंगनाने म्हटलं आहे.
कंगनाच्या मुंबई प्रवेशाला शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे आक्रमक भूमिकेसाठी ओळखली जाणारी शिवसेना आता काय करणार, याची उत्सुकता आहे.
नुकतेच बीबीसी मराठीने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत शिवसेना काय करायचं ते समोरून सांगणार नाही, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं.
"कंगना राणावतनं आव्हान दिलंय की, 9 सप्टेंबरला मी मुंबईत येतेय, काय करायचं ते करा. शिवसेना नेमकं काय करणार आहे? शिवसेनेनं काही ठरवलंय का?" या बीबीसी प्रतिनिधी मयुरेश कोण्णूर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, "जर ठरवल असेल, तर ठरवलेल्या गोष्टी अशा समोरून सांगायच्या असतात का? पाहू काय करायचं ते. या लोकांशी आमचं व्यक्तिगत भांडण नाही. फार लहान माणसं आहेत. मुंबई त्यांना पोसते. मुंबई त्यांना देते. मुंबई नसती, मुंबईचे पोलीस नसते, मुंबईचा उद्योग नसता, तर हे इथे कशाकरता आले असते?
त्यामुळे त्यांनी मुंबईचे ऋण मान्य केले पाहिजे. सगळ्यांनीच, अगदी आमच्यासारख्यांनी सुद्धा. मुंबई महाराष्ट्राकडे आहे, ती आपल्या लोकांनी मिळवली. त्यासाठी बलिदान दिलं. त्यामुळे लाखो मराठी लोकांना इथे राहता येतं, रोजगार मिळतोय, विविध प्रकारचे उद्योग आम्ही करतो. कुणी उठायचं आणि मुंबईवर थुंकायचं आणि तेही इथलंच खाऊन, तर त्यासंदर्भात आम्ही बोललो."
सामनाचा आजचा अग्रलेख
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कंगना राणावत मुंबई पोलिसांवर निशाणा साधताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (8 सप्टेंबर) महाराष्ट्र विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरूद्ध तर विधानपरिषदेत कंगना राणावत हिच्याविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवरच आजचा सामना अग्रलेख आहे.
'बेइमान लेकाचे- मुंबाई मातेचा अवमान' या अग्रलेखात शिवसेनेनं कंगना आणि तिला पाठिंबा देणाऱ्यांवर टीका केली आहे.
'त्यांची नावे डांबराने लिहिली जातील'
'मुंबाई' मातेचा अवमान करणाऱ्यांची नावे महाराष्ट्राच्या इतिहासात डांबराने लिहिली जातील. बेइमान लेकाचे! या मंडळींनी आता राष्ट्रभक्तीचे तुणतुणे वाजवू नये इतकीच अपेक्षा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. मुंबई महाराष्ट्राचीच आहे. ती मुंबईत इमानाने राहणाऱ्या सर्वांची आहे. कारण ती हिंदुस्थानची आहे, पण ती आधी छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राची आहे. म्हणूनच ती हिंदुस्थानची आहे. त्यामुळे मुंबईची तुलना 'पाकव्याप्त' काश्मीरशी करणे व मुंबई पोलिसांना माफिया वगैरे हिणवून खाकी वर्दीचा अवमान करणे हे बिघडलेल्या मानसिकतेचे लक्षण आहे.
'देवी'स्वरूप आईची तुलना पाकव्याप्त भागाशी करून आमच्या देवीचाच अवमान केला. हिंदुत्वाचा आणि संस्कृतीचा, धर्माचा आणि 106 हुतात्म्यांच्या त्यागाचाच अवमान केला व असा अवमान करून छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रावर नशेच्या पिचकाऱ्या टाकणाऱ्या व्यक्तीला केंद्र सरकार विशेष सुरक्षेच्या पालखीचा मान देत आहे.
मुंबादेवीचा हा अवमान ज्यांना प्रिय आहे असे लोक दिल्लीत आणि महाराष्ट्राच्या विधिमंडळात बसले आहेत म्हणून मुंबईचा धोका कायम आहे. मुंबईला आधी बदनाम करायचे, नंतर खिळखिळे करायचे. मुंबईस संपूर्ण कंगाल करून एक दिवस ती महाराष्ट्रापासून तोडायची या कारस्थानाची पावले नव्याने पडू लागली आहेत हे आता स्पष्ट दिसत आहे. महाराष्ट्रातील लोकनियुक्त सरकारच्या अधिकारावर आणि स्वातंत्र्यावर हल्ले करण्याची एकही संधी महाराष्ट्रातील भाजपवाले आणि केंद्र सरकार सोडत नाही, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांना धमकी
दरम्यान, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर ऑफिसात हिमाचल प्रदेशमधून धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाची ड्रग्ससंबंधित चौकशी करणार असल्याचं वक्तव्य नुकतंच केलं होतं. त्यानंतर काल (8 सप्टेंबर) अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील कार्यालयात धमकी देणारा फोन आल्याची माहिती गृहमंत्रालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)