कंगना आणि विक्रम गोखलेंची भारतीय स्वातंत्र्याबद्दलची विधानं वरवरची की मुद्दाम केलेला बुद्धिभेद?

    • Author, मयुरेश कोण्णूर
    • Role, बीबीसी मराठी

सध्या भारतीय स्वातंत्र्याच्या आणि स्वातंत्र्यलढ्याबद्दलच्या बुचकळ्यात टाकणाऱ्या अतार्किक विधानांमुळे समाज आणि समाजमाध्यमं ढवळून निघाली आहेत.

विधानं करणारे काही संघटनांच्या पदांवर आहेत, लोकप्रिय आहेत आणि सध्याच्या भाषेत 'इन्फ्लुएन्सर्स' आहेत. त्यामुळे अशी विधानं होण्याचं गांभीर्य अधिक. ही विचारपूर्वक, पुरत्या गांभीर्यानं केलेली विधानं आहेत की जाणिवपूर्वक केलेला बुद्धिभेद आणि राजकारण, हा प्रश्न विचारला जातो आहे.

उत्तर प्रदेशच्या 'भारतीय जनता युवा मोर्चा'च्या पदाधिकारी रुची पाठक मध्यंतरी एका चर्चासत्रात म्हणाल्या की भारत देश हा पूर्णपणे स्वतंत्र नाही आहे तर तो 99 वर्षांच्या भाडेकरारावर ब्रिटिशांकडून आपण घेतला आहे. त्यांना वारंवार विचारल्यावरही त्या आपल्या मतावर तेच सत्य आहे म्हणून ठाम राहिल्या.

त्यानंतर अभिनेत्री कंगना राणावतनं 'टाइम्स नाऊ' या वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलतांना केलेल्या स्वातंत्र्याबद्दलच्या विधानावरुन गदारोळ झाला, तो अद्याप शमत नाही आहे. "आपल्याला 1947 मध्ये जे मिळालं ती भीक होती, खरं स्वातंत्र्य तर 2014 मध्ये मिळालं" असं त्या म्हणाल्या.

त्यावर स्पष्टीकरण म्हणून देतांना त्यांनी प्रतिप्रश्न केला की 1857 मध्ये युद्ध झालं होतं, पण 1947 मध्ये कोणतं युद्ध झालं होतं? मला उत्तर दिलं तर 'पद्मश्री' परत करेन.

त्यानंतर अजून एक अभिनेते विक्रम गोखले या विधानांच्या गदारोळात उतरले. त्यांनी कंगना राणावतला बरोबर ठरवलं.

पुण्यातल्या ब्राह्मण महासंघाच्या कार्यक्रमात ते म्हणाले, "कंगना राणावत जे म्हणाली आहे ते खरं आहे. ते स्वातंत्र्य भीक मागूनच मिळालेलं आहे यावर मी सहमत आहे. हे दिलं गेलेलं आहे बरं का. ज्या योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला त्यांना फाशी देताना मोठे लोक बघत राहिले. त्यांना वाचवलं नाही. आपले लोक ब्रिटिशांविरोधात उभे आहेत हे पाहूनसुद्धा वाचवलं नाही."

ही मुख्य विधानं आणि सोबतीनं त्यांच्या समर्थनार्थ अन्य काहींची विधानं, वा पोस्टस्. पण स्वातंत्र्याच्या इतिहासाची ही नवी मांडणी कोणत्या तथ्यांवर आधारित आहे की वरवर केलेली विधानं आहेत की हा बुद्धिभेद आहे, यासोबतच, सत्ताधारी भाजपाशी वा त्यांच्या राजकीय विचारधारेशी या विधानकर्त्यांची असलेली जवळीक पाहता, काय या मांडणीला भाजपाची मान्यता आहे का, असा प्रश्नही विरोधकांनी उपस्थित केला आहे.

पाठक या तर भाजपाच्या पदाधिकारी आहे. कंगना राणावत भाजपाच्या जवळच्या आहेत, या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतात. सध्याच्या सरकारनं नुकताच त्यांना 'पद्मश्री' सुद्धा दिला आहे.

विक्रम गोखले सावरकरवाद, हिंदुत्ववाद याबद्दल पूर्वीही बोलले आहेत. अगोदर काही मुलाखतींमध्ये मोदींवर टीका करणाऱ्या गोखले यांनी आता '70 वर्षांत जे जमलं नाही ते मोदींनी करुन दाखवलं' असं म्हणत त्यांचं जाहीर कौतुक केलं आहे.

त्यामुळे या प्रसिद्ध व्यक्तींची अशी विधानं भाजपाला मान्य आहेत का? भाजप या व्यक्तींना पाठिंबा देतं, मग या वक्तव्यांनाही त्यांचा पाठिंबा आहे असा प्रश्न कॉंग्रेसनं विचारला आहे. या मागे काही राजकारणही आहे?

'असे लोक पूर्वापारपासून होते'

ज्येष्ठ राजकीय अभ्यासक आणि भाष्यकार सुहास पळशीकर यांच्या मते या अशा भूमिका आजच्या नव्या नव्हेत. यापूर्वीही त्या व्यक्त झालेल्या आहेत. पण सध्याच्या राजवटीत त्या अधिक मोठ्यानं आणि अधिक वारंवारतेनं बोलल्या जात आहेत.

"भारताला मिळालेलं स्वातंत्र्य हे काही खरं नाही असं ज्यांना वाटतं ते मुख्यत: हिंदूंचं राज्य स्थापन झालं नाही म्हणून त्यांना तसं वाटतं. हे वाटणारे लोक पूर्वापारपासून होते. आता त्यांचा आवाज वाढला आहे कारण त्यांच्या विचारांचं सरकार आहे आणि ते छातीठोकपणे सगळ्या गोष्टी करतं आहे," सुहास पळशीकर म्हणतात.

"या राजवटीत अशा लोकांचा एक प्रकारे वैचारिक नेतृत्व त्यांच्याकडे घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे. त्यातून मग विक्रम गोखले किंवा कंगना राणावत हे केवळ प्रसिद्धीसाठी नाही तर ते वैचारिक नेतृत्व घेण्यासाठी असं बोलतात. आणि याचा आताच्या राजवटीला नक्कीच फायदा मिळतो," पळशीकर पुढे म्हणतात.

'स्वातंत्र्यलढा कुणा एका पक्षाचा वा कुटुंबाचा नाही'

कंगनाच्या स्वातंत्र्याबद्दलच्या विधानापासून भाजपनं अंतरच राखलं. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्वातंत्र्याविषयी असं बोलणं चुकीचं असल्याचं म्हटलं. राष्ट्रीय स्तरावरही हीच भूमिका घेतली गेली. पण तरीही विरोधकांच्या टीकेचा रोख काही चुकला नाही. पण भाजपचं म्हणणं हे आहे की ही व्यक्तिगत मतं आहे आणि त्यांचा संघटनेशी काही संबंध नाही.

"प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. कंगना राणावत वा विक्रम गोखले हे भाजपचे वा अन्य कोणत्याही संघटनेचे पदाधिकारी नाहीत. समाजाला त्यांची ओळख एक कलाकार म्हणून आहे. त्यांची व्यक्तिगत मतं काय असतील हा त्यांचा प्रश्न आहे," भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी 'बीबीसी मराठी'शी बोलताना म्हणाले.

पण भांडारी पुढे असं म्हणाले की ही मात्र त्यांची भूमिका आहे की स्वातंत्र्यसंग्राम हा कोण्या एका पक्षाचा नव्हता.

"भाजपानं 1947 सालापासून आजपर्यंत अशी कोणतीही भूमिका कधीही घेतली नाही. आमच्या सगळ्यांनी मांडलेली भूमिका एकच आहे की स्वातंत्र्यसंग्रामाची चळवळ कुण्या एका पक्षाची नव्हती. त्यात सगळे होते.

हिंदू महासभेची स्थापना करणारे पंडित मदन मोहन मालवीय कॉंग्रेसमध्येच होते आणि कम्युनिस्ट पार्टीचं काम करणारेही कॉंग्रेसमध्येच होते. स्वातंत्र्यलढ्यात जसे पंडित नेहरु होते, तसे सुभाषचंद्र बोस होते, शहिद भगतसिंग होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार हेसुद्धा 1927 पर्यंत विदर्भ कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते. त्यामुळे स्वातंत्र्यलढा हा कुणा एका व्यक्तीचा, कुणा एका संघटनेचा वा कुटुंबाचा नव्हता," भांडारी म्हणाले.

भाजपनं जरी अंतर राखलं आणि आपली भूमिका ही नाही असं म्हटलं तरीही या विधानांनी जो आभास निर्माण होणं अपेक्षित असतं तो होतोच, असं सुहास पळशीकर म्हणतात.

"अशा विधानांमधून एका प्रकारचा भ्रम किंवा आभास तयार होतो की आता जे हिंदूचं तथाकथित वर्चस्व निर्माण झालेलं आहे, ते वर्चस्व म्हणजेच स्वातंत्र्य आहे. त्यामुळे भाजप आत्ता औपचारिकपणे काहीही म्हणाली तरीही त्यांचं जे राजकारण सुरु आहे त्याला बळ मिळायला किंवा लोकांमध्ये काही प्रमाणात अनुकूलता निर्माण होण्यास निश्चित मदत होते," पळशीकर मत नोंदवतात.

'कारवाई होत नाही याचा अर्थ सत्तेचा पाठिंबा असं होतो'

राजकीय विश्लेषक आणि पत्रकार राजू परुळेकर यांच्या मते मात्र सत्ताधाऱ्यांनी अशा प्रकारच्या विधानांना त्यांच्या कृतीनं असा पाठिंबा दिल्यानंतर अशा प्रकारची विधानं वारंवार आणि स्वयंस्फूर्तीनं होतात.

"ज्या कॉमेडियननं जोक केलाच नव्हता, गाणं गायलं म्हणून गायकावर किंवा त्रिपुरावर ट्वीट केलं तुम्ही पत्रकारांवर जर UAPA कायदा लावला जातो. अशी परिस्थिती असलेल्या देशामध्ये एवढी भयंकर विधानं केल्यावर साधी अटक होत नाही किंवा शांतता भंग केल्याची कारावाई होत नाही याचा अर्थ तुम्हाला थेट सत्तेचा पाठिंबा आहे असा होतो.

सत्तेचा पाठिंबा इथं दोन प्रकारासाठी आहे. त्यांना येनकेनप्रकारेण स्वत:ला महापुरुष निर्माण करता येत नाहीत, तेव्हा अशा वेळेस जे महापुरुष आहेत, जे गांधीजी, नेहरु, बोस यांच्यासारखे कॉंग्रेसचे नेते आहेत, त्यांना परस्परविरोधी विधानं करुन डिफेम करणं हे त्यांना हवं आहे," परुळेकर म्हणतात.

"दुसरं म्हणजे त्यांना क्रिप्टोकरन्सीमधला घोटाळा, 'पीएमकेअर' मधला घोटाळा, रफालचा भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी, चीनची घुसखोरी या सगळ्या प्रकारांपासून लोकांचं लक्ष हटवायचं आहे. त्यामुळे चुकीच्या बातम्या, ज्या रंजक असतील आणि त्यानं डिफेम पण करता येईल, अशा दुधारी तलवार असतात.

त्यासाठी स्वयंस्फूर्तीनं पुढे येणारे स्वयंसेवक त्यांना हवे आहेत. त्यातली कंगना राणावत एक आहे, विक्रम गोखले दुसरे आहेत. त्यामुळे हे जमवलेलं भाजपचं आणि मुख्यत्वे संघ परिवाराचं काम आहे," परुळेकर पुढे म्हणतात.

कंगना राणावतनं पुढं असंही म्हटलं की 2014 नंतर भारताला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं. संदर्भ नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2014 मध्ये बहुमतातलं सरकार येणं हा होता. भाजपचं या भूमिकेवर मत काय आहे?

"आम्ही असं कोणतीही विधान केलं नाही. असं आम्हाला वाटत नाही. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. त्या जे म्हणाल्या असं आम्हाला वाटत असतं तर स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आम्ही गावोगाव का फिरलो असतो?

2014 मध्ये स्वातंत्र्य मिळालं असं आम्हाला वाटलं असतं तर आम्ही असं का केलं असतं? स्वातंत्र्याचा अमृत्महोत्सव साजरा करतांना ज्यांनी यात भाग घेतला त्या साऱ्यांची नोंद आम्ही करतो आहोत," माधव भांडारी म्हणाले.

पण राजू परुळेकरांच्या मते मात्र कृती आणि विधानं परस्परविरोधी आहेत.

"कसं आहे की गांधीजींचे गोडवे गाणारे पण संघाचेच लोक असतात आणि गांधीहत्येमध्ये पुरावे नसल्यानं सुटलेल्या सावरकरांचा फोटो संसदेत लावणारे पण संघाचेच लोक असतात. एकाच वेळेला परस्परविरोधी विधानं करणं, परस्परविरोधी कृती करणं आणि लोकांच्या मनामध्ये गोंधळ उडवून देणं हे फॅसिझमचं एक महत्त्वाचं अंग आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही विधानावर परिवारातल्या प्रत्येक घटकाची कृती जर नसेल, तर त्यांच्यावर विश्वास ठेवण्याची गरज नाही," परुळेकर म्हणतात.

'सावरकरांना दूषणं दिल्यानं स्वातंत्र्यलढ्याचा अपमान होत नाही?'

पत्रकार आणि लेखक वैभव पुरंदरे एक वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते टोकाची मतं चुकीची आहेत आणि ती दोन्ही बाजूंकडून मांडली जात आहेत.

"स्वातंत्र्य 1947 मिळालं याबद्दल काही वाद असणं शक्यच नाही. तसं नाही असं जर कोणाला म्हणायचं असेल तर त्याविषयी आवश्यक अभ्यास हवा आणि मला वाटत नाही की इथं काही अभ्यास केला गेला असावा. अनेकांनी कंगना किंवा बाकींच्यांनी स्वातंत्र्यलढ्याबद्दल जे काही विधान केलं तेव्हा त्याचा निषेध केला, जोरदार टीका केली," पुरंदरे म्हणतात.

मात्र पुढे ते म्हणतात, "जेव्हा सावरकरांना काही लोकांकडून देशद्रोही (ट्रेटर) म्हटलं जातं, तेव्हा तो स्वातंत्र्यलढ्याचा अपमान का मानला जात नाही? तोसुद्धा अपमानच नव्हे का? तुम्हाला एखाद्याची राजकीय भूमिका पटणार नाही, पण तुम्हाला ही शंका घेता येणार नाही की ते एक अग्रणी क्रांतिकारक होते. तरीही त्यांना द्रोही म्हणता? इथं दोन्ही बाजू चुकीच्याच. मला वाटतं की आपल्या वादामध्येही एका प्रकारची शुचिता हवी. नुसत्याच टोकाच्या भूमिका घेऊन चालणार नाहीत."

पण कंगना राणावत, विक्रम गोखले यांची विधानं आणि त्यावरुन उठणारा वादंग यातून सत्ताधारी भाजपचाच फायदा होईल असंही निरिक्षण ते नोंदवतात.

"राजकीयदृष्ट्या ही विधानं वा वादंग भाजपच्या फायद्याचीच ठरण्याची शक्यता आहे. जाहीरपणे ते सहाजिकच त्याचं समर्थन करणार नाहीत. कारण त्यामुळे एक मोठ्या मतदारवर्गाला ते नाखूष करतील. पण त्याचा राजकीय फायदा होईल.

कारण कंगना सरळ म्हणते की आम्हाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं आणि त्याचा अर्थ काय आहे हे स्पष्ट आहे. ती स्पष्ट राजकीय विधान करते आहे. ते 2014 नंतर आम्ही 'नवभारत' (न्यू इंडिया) घडवतो आहोत असं म्हणणाऱ्या सत्ताधारी पक्षासाठी चांगलं आहे. ते त्याचं स्वागतच करतील," पुरंदरे म्हणतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)