भगत सिंहांची फाशी महात्मा गांधींनी खरंच रोखली नाही?

    • Author, उर्वीश कोठारी
    • Role, बीबीसी गुजरातीसाठी

23 मार्च 1931 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशी देण्यात आली होती.

आदर्श क्रांतिकारी म्हणून मानले जाणारे शहीद भगत सिंह हिंसेच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवावं या विचारांचे होते. 1907 मध्ये त्यांचा जन्म झाला तेव्हा 38 वर्षांचे लोकसेवक मोहनदास करमचंद गांधी दक्षिण आफ्रिकेत अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत होते.

सत्याग्रहाच्या तत्त्वांसह गांधीजी 1915 मध्ये मायदेशी परतले. पण भगत सिंह आणि महात्मा गांधी यांच्यात अनेक साम्यस्थळं होती. देशातल्या शेवटच्या म्हणजेच गरीब, वंचित लोकांना प्राधान्य हा दोघांच्या विचारातला महत्त्वाचा मुद्दा होता.

स्वातंत्र्य हे त्या दोघांसाठी फक्त राजकीय दृष्टिकोनातून नव्हतं. देशातली जनता शोषणातून मुक्त व्हावी असं दोघांनाही वाटत असे आणि त्याच दृष्टीने दोघांचे प्रयत्न सुरू होते. मात्र दोघांच्या विचारात एक मोठा फरक होता. पण तसं असलं तरी साम्यस्थळं होती हे दुर्लक्षून चालणार नाही.

भगत सिंह नास्तिक होते, तर महात्मा गांधी आस्तिक. पण धर्माच्या नावाखाली फैलावला जाणारा द्वेष आणि हिंसा याच्या ते दोघेही विरोधात होते.

भगत सिंह यांना फाशी

1928 साली सायमन आयोगाविरोधात आंदोलन करणारे ज्येष्ठ काँग्रेस नेते लाला लजपतराय हे पोलिसांच्या लाठीहल्ल्यात घायाळ झाले. त्यानंतर काही दिवसांनंतर त्यांचं निधन झालं.

लालाजींच्या शेवटच्या काही वर्षातील राजकारणाचा नूर भगत सिंह यांना पटला नव्हता. त्यांनी जाहीरपणे त्याचा विरोध केला होता.

पण इंग्रज अधिकाऱ्यांच्या लाठीमारात घायाळ लालाजींची अवस्था पाहून भगत सिंह यांना राग अनावर झाला.

या घटनेचा बदला घेण्यासाठी भगत सिंह यांनी सहकाऱ्यांच्या साथीने पोलीस सुप्रिडेंडंट स्कॉट याच्या हत्येचा कट रचला.

मात्र एका सहकाऱ्याच्या चुकीमुळे स्कॉटच्या ऐवजी 21 वर्षीय पोलीस अधिकारी साँडर्सची हत्या झाली.

याप्रकरणी भगत सिंह यांना अटक झाली नाही. मात्र काही दिवसांनंतर त्यांनी असेंब्लीत बॉम्ब फोडला. त्यावेळी सरदार पटेलांचे मोठे बंधू विठ्ठल भाई पटेल भारतीय अध्यक्ष म्हणून सभेचं संचालन करत होते.

भगत सिंह यांचं उद्दिष्ट जीवितहानी करणं हे नव्हतं. ब्रिटिशांना खऱ्या परिस्थितीची जाणीव व्हावी हा या बॉम्बस्फोटामागचा उद्देश होता.

बॉम्ब फेकल्यानंतर भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त तिथून पळ काढू शकले असते. पण ते पोलिसांच्या स्वाधीन झाले.

अटकेच्या वेळेस भगत सिंह यांच्याकडे रिव्हॉल्व्हर होतं.

साँडर्सच्या हत्येवेळी हेच रिव्हॉल्व्हर वापरल्याचं सिद्ध झालं. असेंब्लीत बॉम्ब टाकल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या भगत सिंह यांना साँडर्सच्या हत्येच्या गंभीर गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

गांधी आणि शिक्षेत माफी

1930 मध्ये दांडी यात्रेनंतर काँग्रेस आणि इंग्रज सरकार यांच्यातील संघर्ष तीव्र झाला होता.

भारतातील राज्यव्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने ब्रिटनच्या सरकारने विविध नेत्यांना लंडनमध्ये आयोजित गोलमेज परिषदेचं निमंत्रण दिलं.

याआधीच्या गोलमेज परिषदेत महात्मा गांधी तसंच काँग्रेसने सहभाग नोंदवला नव्हता. त्यामुळे ती परिषद निष्प्रभ ठरली.

दुसऱ्या गोलमेज परिषदेसाठी ब्रिटिशांनी चर्चेचा मार्ग पत्करला. 17 फेब्रुवारी 1931 रोजी व्हॉईसरॉय आयर्विन आणि गांधीजी यांच्यात चर्चा झाली.

5 मार्च 1931 रोजी दोघांमध्ये करार झाला.

अहिंसक मार्गाने संघर्ष करताना पकडले गेलेल्या कैद्यांच्या सुटकेचा निर्णय झाला. पण राजकीय हत्येप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या भगत सिंह यांना शिक्षेतून माफी मिळाली नाही.

भगत सिंह यांच्याव्यतिरिक्त अशा स्वरुपाचे गुन्हे नावावर असलेल्या कैद्यांना शिक्षेतून माफी किंवा सूट मिळाली नाही. तिथूनच वादाची ठिणगी पडली.

गांधीजींचा विरोध

भगत सिंह तसंच बाकी सहकारी यांना शिक्षा दिली जात असताना ब्रिटनच्या सरकारशी वाटाघाटी किंवा करार कसा होऊ शकतो, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला.

या मुद्याशी निगडीत प्रश्नांसह देशभरात पत्रकं वाटण्यात येऊ लागली. साम्यवादी या करारामुळे नाराज होते. सार्वजनिक सभांमध्ये ते गांधीजींना विरोध करत होते.

23 मार्च 1931 रोजी 1931 रोजी भगत सिंह, सुखदेव आणि राजगुरू यांनी फाशी देण्यात आली. या घटनेनंतर लोकांमध्ये आक्रोश उसळला. हा आक्रोश फक्त ब्रिटिशांविरोधात नव्हता, तर गांधीजींविरोधातही होता.

भगत सिंह यांची फाशीची शिक्षा माफ होत नसेल तर करार-वाटाघाटी नाही यासाठी त्यांनी ब्रिटिशांनी पाठपुरावा केला नाही हे आक्रोशाचं कारण होतं.

26 मार्च 1931 रोजी कराचीत काँग्रेसचं अधिवेशन सुरू झालं. पहिल्यांदा आणि एकमेव वेळी सरदार पटेल काँग्रेसचे अध्यक्ष झाले.

या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी 25 मार्च रोजी गांधीजी पोहोचले त्यावेळी त्यांच्याविरोधात आंदोलन झालं. काळ्या कपड्यांपासून बनलेली फुलं आणि 'गांधी मुर्दाबाद' आणि 'गांधी गो बॅक' अशा घोषणा देण्यात आल्या.

या आंदोलनाने व्यथित झालो असं गांधीजी म्हणाले.

तत्कालीन वर्तमानपत्रातील बातम्यांनुसार 25 मार्चच्या दुपारी गांधीजी अधिवेशनासाठी ज्या ठिकाणी उतरले होते तिथे अनेक माणसं पोहोचली.

खूनी कुठे आहे असं लोक ओरडू लागले. त्यावेळी जवाहरलाल नेहरू त्या लोकांना भेटले. ते त्या लोकांना एका तंबूत घेऊन गेले. तीन तास चर्चा करून त्यांनी लोकांनी समजावलं. पण संध्याकाळी पुन्हा त्या लोकांनी आंदोलन केलं.

काँग्रेसच्या अंतर्गतही सुभाषचंद्र बोस अनेक नेत्यांनी गांधी-आयर्विन कराराचा विरोध केला. ब्रिटिश सरकार भगत सिंहांना दिलेली फाशीची शिक्षा माफ होत नसताना त्यांच्याबरोबर करार करण्याची काही आवश्यकता नाही असं या नेत्यांचं मत होतं. पण काँग्रेस वर्किंग कमिटीचं संपूर्ण समर्थन गांधीजींना होतं.

गांधीजींची भूमिका

गांधीजींनी या मुद्यावर आपली भूमिका मांडली होती. गांधीजी म्हणाले होते, भगत सिंह यांच्या शौर्यासाठी आमच्या मनात आदराचीच भावना आहे. मात्र स्वत:चं बलिदान करून लोकांना त्रास होता कामा नये... लोक तुमच्यासाठी फाशीवर जाण्यासाठी तयार होऊ नयेत.

ब्रिटिश सरकार वातावरण भडकावत आहे. मात्र कराराच्या अटी शर्तींनुसार फाशीच्या शिक्षेतून माफी देण्याचा समावेश नव्हता. त्यामुळे करारातून माघार घेणं योग्य नव्हतं.

गांधीजींनी स्वराज्य नावाच्या आपल्या पुस्तकात लिहिलं आहे की, मृत्यूची शिक्षा देण्यात येऊ नये. भगत सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी बोलण्याची संधी मिळाली असती तर मी त्यांना सांगितलं असतं की तुमचा स्वातंत्र्यप्राप्तीसाठीचा मार्ग चुकला आहे. तो विफळ ठरणार आहे. देवाला साक्षी ठेऊन मी सांगू इच्छितो की हिंसेच्या मार्गाने स्वराज्य मिळू शकत नाही. त्याने अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

मी व्हॉईसरॉयना जेवढं समजावू शकत होतो तेवढं समजावलं. माझ्यात जेवढी सांगण्याची, समजावण्याची ताकद होती तेवढं सांगितलं. 23 तारखेला व्हॉईसरॉयना मी वैयक्तिक पत्र लिहिलं त्यामध्ये मी सगळे मुद्दे तपशीलात मांडले.

भगत सिंह अहिंसेचे पाईक नव्हते पण ते हिंसेचा धर्म मानणाऱ्यांपैकी नव्हते. या वीरांनी मृत्यूचं भयही पचवलं होतं. त्यांच्या शौर्याला वंदन. पण त्यांच्या कृत्याचं अनुकरण करता कामा नये. त्यांच्या कृत्याने देशाचा फायदा झाला असं मला वाटत नाही. खून करून चर्चेत येण्याची प्रथा सुरू झाली तर लोक न्यायासाठी एकमेकांचा जीव घेऊ लागतील.

गांधीजींच्या या म्हणण्याचा काय अर्थ होता?

भगत सिंहांची फाशीला माफी मिळावी यासाठी गांधीजींनी व्हॉईसरॉयवर सर्वपद्धतीने दबाव आणला असेल पण शोधकर्त्यांना याचे पुरावे मिळालेले नाहीत.

फाशीच्या दिवशी सकाळी गांधीजींनी व्हॉईसरॉयल भावनिक पत्र लिहिलं. तो दबाव टाकण्याचाच भाग होता. पण तोवर खूप उशीर झाला होता.

या विषयाशी निगडीत संशोधनावर आधारित हे म्हणता येऊ शकतं की फाशी देण्याच्या आधी गांधी आणि व्हॉईसरॉय यांच्यात जी चर्चा झाली, त्यामध्ये भगत सिंह यांच्या फाशीचा मुद्दा अनावश्यक असल्याचं गांधीजी म्हणाले.

त्यामुळे भगत सिंहांची फाशी रद्द व्हावी यासाठी व्हॉईसरॉयवर सर्वशक्तीनिशी दबाव टाकल्याचा गांधीजींचा दावा खरा ठरत नाही.

लोकांच्या विरोधातली तीव्रता लक्षात घेऊन गांधीजींनी स्वत विरोधातील विरोध आणि टीकेला उत्तर देत भूमिका मांडली.

भगत सिंह यांच्या शौर्याला त्यांनी वंदन केलं मात्र स्वातंत्र्यप्राप्तीसाठी त्यांनी निवडलेल्या मार्गाला त्यांनी विरोध दर्शवला. हा मार्ग बेकायदेशीर असल्याचंही ते म्हणाले.

एक नेता म्हणून गांधीजींच्या नैतिकतेला दाद द्यायला हवी. या मुद्यावर गांधीजींचं वर्तन लक्षात घेतलं तर त्यांच्या भूमिकेचा अन्वयार्थ काढता येतो.

फाशीच्या शिक्षेतून माफी मिळावी यासाठी स्वत: अर्ज लिहिण्यासाठी भगत सिंह तयार नव्हते. जेव्हा त्यांच्या वडिलांनी यासंदर्भात पत्र लिहिलं तेव्हा त्यांनी कडक शब्दात त्याला उत्तर दिलं.

गांधीजी भगत सिंह यांना झालेली फाशीची शिक्षा रद्द किंवा कमी करू शकले नाहीत. गांधीजींप्रती भगत सिंह नाराज असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही.

भगत सिंह यांचा स्वभाव लक्षात घेता त्यांच्या फाशीच्या शिक्षेला माफी मिळाली नाही याची सल त्यांना असेल असं वाटत नाही.

जातीयवाद आणि राष्ट्रवाद यांची पाळंमुळं किती खोलवर रुजली आहेत हे भगत सिंह यांच्या फाशीनंतर झालेल्या घटनांवेळी दिसून आलं. भगत सिंह यांना फाशी दिल्यानंतर देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. कानपूरमध्ये जातीय दंगल उसळली. ती रोखण्यासाठी जात असलेल्या गणेश शंकर विद्यार्थी यांचा मृत्यू झाला.

वर्तमानात विचार करण्यासारखे मुद्दे

भगत सिंह यांच्या फाशीप्रकरणी गांधीजींवर होणारी टीका ही भगत सिंह यांच्याप्रती असलेल्या प्रेमापोटी का गांधीजींविरोधातल्या रोषामुळे?

भगत सिंह यांचं नाव प्रतीक म्हणून वापरून त्याचा उपयोग गांधींवर टीका करायला केला जातो. भगत सिंह डाव्या विचारांचे, नास्तिक, बौद्धिक आणि जातीयताविरोधी होते असं घोषणा देऊन सांगितलं जातं.

भगत सिंह आणि बटुकेश्वर दत्त यांनी असेंब्लीत बॉम्ब फेकला तेव्हा प्रसिद्ध लेखक खुशवंत सिंह यांचे वडील सार सोभा सिंह तिथे उपस्थित होते.

त्यांनी न्यायालयात भगत सिंह यांना ओळखलं. यामुळे पुढच्या काही वर्षात खुशवंत सिंह यांना कमी लेखण्यासाठी ... विचाराच्या लोकांनी खुशवंत सिंह यांच्या साक्षीमुळे भगत सिंह यांना फाशी झाली असा प्रचार केला.

सत्य हे की भगत सिंह यांना फाशी असेंब्लीत बॉम्ब फेकण्यासाठी झाली नाही तर साँडर्सच्या हत्येप्रकरणी झाली. साँडर्स हत्येशी सोभा सिंह यांच्याशी काहीही संबंध नव्हता.

सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे भगत सिंह यांना फाशी होण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका सरकारी साक्षीदार झालेल्या क्रांतिकारी सहकाऱ्यांची होती. (यापैकी एक जयगोपाल होते ज्यांच्या चुकीमुळे स्कॉटऐवजी साँडर्सची हत्या करण्यात आली)

एवढ्या वर्षात भगत सिंह यांच्या फाशीसाठी महात्मा गांधी, सोभा सिंह यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. मात्र भगत सिंह यांच्याविरोधात साक्ष देणाऱ्या क्रांतिकारकांबद्दल कोणी कधीही काही बोललेलं नाही. कारण त्या टीकेतून कोणताही राजकीय फायदा होत नाही.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)