महात्मा गांधी आता फक्त चलनी नोटा आणि शोभेपुरतेच उरणार का?

    • Author, शुभज्योती घोष
    • Role, बीबीसी बांगला, दिल्ली

अहिंसा आणि सत्याग्रहाचे प्रतीक असलेल्या महात्मा गांधींना संपूर्ण भारतात राष्ट्रपिता म्हणून ओळखलं जातं. पण आजच्या भारतात, विशेषत: भाजपच्या गेल्या साडेसात वर्षांच्या कार्यकाळात या देशात गांधींचे विचार आणि आदर्श किती महत्त्वाचे मानले जातात? हा प्रश्न वारंवार उपस्थित करण्यात येतो.

अलीकडेच महात्मा गांधीजींची 150 वी जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. दुसरीकडे गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेची पूजा आणि स्तुती हल्ली उघडपणे केली जाते.

सर्व हिंदुत्ववादी संघटना, भाजपचे खासदारही गोडसेच्या वंदनात सहभागी आहेत. महेश मांजरेकर यांनी तर गांधी जयंतीला गोडसेचा बायोपिक बनवण्याची घोषणाही केली.

आजच्या भारतात मोहनदास करमचंद गांधी यांची 'राष्ट्रपिता' म्हणून असलेली ओळख लोप पावत चालली आहे का?

गोडसेची पूजा

महात्मा गांधींच्या हत्येमध्ये हिंदू महासभेचे सदस्य असल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आजही ही हिंदू महासभा भारतात कार्यरत आहे. मध्यप्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेचे कार्यकर्ते सक्रिय आहेत.

वर्षभरापूर्वी ग्वाल्हेर येथील त्यांच्या कार्यालयात नथुराम गोडसेची मूर्ती ठेवण्यात आली होती.

गांधींच्या हत्येचा आरोप असलेले नारायण आपटे आणि नथुराम गोडसे यांना 15 नोव्हेंबर 1949 रोजी अंबाला मध्यवर्ती कारागृहात फाशी देण्यात आली.

हिंदू महासभा दरवर्षी हा दिवस 'बलिदान दिन' म्हणून साजरा करते. मंदिरात पूजादेखील केली जाते. दोन्ही मराठी माणसांच्या मूर्ती दूध आणि तुपाने धुतल्या जातात.

हिंदू महासभा त्या दिवशी प्रसारमाध्यमांना फोन करून हे सांगायला विसरत नाहीत की 'शहीद' नारायण आपटे आणि 'शहीद' नथुराम गोडसे यांना आदरांजली वाहण्यासाठी त्यांनी मंदिर बांधले आहे याचा अभिमान वाटतो.

भारतात कोणत्याही देवतेची पूजा करणं हा दंडनीय गुन्हा नसला, तरी काही वर्षांपूर्वीपर्यंत भारताच्या राष्ट्रपीत्याच्या मारेकऱ्याला अशी खुली श्रद्धांजली अर्पण करणे कल्पनेपलीकडे होते.

पण आता अशा घटना देशाच्या विविध भागांमध्ये होऊ लागल्या आहेत. तसंच गोडसेमुळे देशाला किती फायदा झाला आहे, हे ठामपणे सांगितलं जात आहे.

भाजप नेत्याचे प्रमाणपत्र

गेल्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान भोपाळमधील भाजप उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूर यांनी गोडसेला 'देशभक्त' म्हणायलाही संकोच केला नाही.

अतिरेकी प्रकरणात जामिनावर तुरुंगातून बाहेर आलेल्या या नेत्या खासदार बनल्या आणि संसदेच्या संरक्षण विषयक समितीच्या सदस्य बनल्या.

गोडसेसंदर्भात केलेल्या या विधानाबद्दल प्रज्ञा ठाकूर यांना कधीही माफ करणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. पण प्रत्यक्षात त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.

भगवे कपडे परिधान करणाऱ्या खासदार साध्वींनी नंतर संसदेत उभं राहून गोडसेला देशभक्त म्हटलं. न्यायालयासमोर 'महान' नथुराम गोडसेने 'गांधी-हत्या' आरोपावर स्वत:चा बचाव कसा केला, या वरील अनेक पोस्ट फेसबुक किंवा व्हॉट्सअॅपवर सतत शेअर केल्या जात आहेत.

दुसरीकडे हिंदू महासभेचे नेते विनायक दामोदर सावरकर यांना भाजपच्या राजवटीत राष्ट्रीय नायकाचा दर्जा दिला जात आहे.

दशकभरापूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन भाजप सरकारने अंदमानमधील पोर्ट ब्लेअर विमानतळाचे नाव बदलून 'वीर सावरकर' असे केले होते.

'गोडसेचे चाहते मुख्य प्रवाहातील लोक नाहीत'

भाजपचे धोरण संशोधन कक्ष सदस्य आणि धोरणकार अनिर्बान गांगुली यांचा असा दावा आहे की गोडसेचे कौतुक करणाऱ्यांचा भाजपच्या मुख्य प्रवाहाशी काहीही संबंध नाही.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "गोडसेचा स्वीकार किंवा आकर्षण नेहमीच एका वर्गात दिसून आले आहे. त्यांनी गांधींना का मारलं याचा युक्तिवाद केला होता - काही जण त्यांच्याशी सहमत असू शकतात, काही त्यांच्या विरोधात असू शकतात."

गांगुली म्हणाले, "गोडसेला देशभक्त मानणं हे लोकांवर अवलंबून आहे. पण आजकाल सोशल मीडियाच्या ट्रेंडमुळे लोकांना अशा गोष्टी कळतात ज्या आधी माहिती नव्हत्या. पण याला मुख्य प्रवाहातील विचारधारा म्हणता येईल का? कधीच नाही."

ते पुढे सांगतात, "भाजपने कधीही गोडसेची पूजा केली नाही, असं समाजाबाहेरील लोक करत आहेत आणि गोडसेने स्वत: हिंदू महासभा किंवा सावरकरांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचे नाकारले होते."

'भाजपचा डीएनए गोडसे समर्थकाचा'

माजी सनदी अधिकारी आणि आता तृणमूल कॉंग्रेसचे खासदार जवाहर सरकार सांगतात, भाजप-आरएसएस-जनसंघ-हिंदू महासभा आणि गोडसे-सावरकर प्रत्यक्षात एकमेकांशी जोडलेले आहेत. ते म्हणतात, "गोडसे हे त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य होते, पण नंतर ते कट्टरतावादी संघटना हिंदू महासभेकडे वळले."

जवाहर सरकार सांगतात, ''त्यावेळी सावरकर स्वत: हिंदू महासभेचे कामकाज पाहायचे. परिणामी गोडसेकडे दोन जीन्स आहेत - आरएसएस आणि हिंदू महासभा."

आणि भाजपचा डीएनए सावरकर समर्थक किंवा गोडसे समर्थक आहे यात शंका नाही - म्हणूनच नरेंद्र मोदी जेव्हा सावरकरांची मूर्ती पाहतात तेव्हा नतमस्तक होतात आणि पूजा करतात."

जवाहर सरकार यांच्या मते सावरकरांचे लेखन आणि निवेदनं वाचली तर तुम्हाला समजेल की ते गांधीविरोधी, शांतताविरोधी व्यक्ती आहेत.

"सुरुवातीला त्यांना स्वतंत्र भारताच्या राजकीय प्रवाहात सामील व्हायचे नव्हते. नंतर 1953 मध्ये त्यांनी जनसंघ पक्षाची स्थापना केली. आणि जर त्यांना राजकारणात रहायचे असेल तर लोकांना दाखवण्यासाठी त्यांना काही परंपरा सुद्धा कराव्या लागल्या. गांधी पूजा हा त्याचाच एक भाग आहे."

"तरीही ते गोडसे किंवा सावकरांबाबत बोलत राहतील," असंही ते सांगतात.

'शेतकरी चळवळीत गांधी'

नथुराम गोडसेची स्तुती सामाजिकदृष्ट्या मान्य केली जात असेल तर याचा अर्थ असा समजायचा की, देशही महात्मा गांधींना विसरत आहे का?

देशाचे सुप्रसिद्ध इतिहासकार आणि नेहरू स्मारक संग्रहालयाच्या माजी प्रमुख मृदुला मुखर्जी याचं थेट उत्तर देत म्हणतात, "या देशातील शेतकरी गेल्या वर्षभरापासून सत्याग्रह आणि गांधींनी दाखविलेल्या अहिंसक निषेधाच्या मार्गाचे अनुसरण करत आहेत. गांधी त्यांच्या स्मरणात आहे हेच यातून दिसतं."

भलेही गांधींचा आदर्श कोणाच्याही मनात नसला, तरी आज ज्या प्रकारे त्यांच्या मारेकऱ्याला स्वीकारलं जात आहे, हे मृदुला मुखर्जी कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यास तयार नाहीत. त्या म्हणाल्या, "ही घटना वास्तवापलीकडे, दुःखद आणि अक्षम्य आहे."

"न्यायालयात फाशीची शिक्षा झालेल्या मारेकऱ्याची पूजा तुम्ही कशी करू शकता? मग गांधींची हत्या बरोबर आहे, नाही का? आणि गोडसेबद्दल असे बोलणाऱ्यांवर काय कारवाई झाली?"असाही प्रश्न त्या उपस्थित करतात.

भारतात कुठेही एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही हे वास्तव आहे.

गांधींचे पणतू आणि लेखक-संशोधक तुषार गांधी म्हणतात की, यात आश्चर्यकारक काहीच नाही. महात्मा गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष तुषार गांधी यांनी बीबीसी बांगलाशी बोलताना सांगितलं, "ज्यांना माहीत आहे की प्रज्ञासिंग ठाकूर आणि नरेंद्र मोदी यांची विचारधारा एकच आहे त्यांना आश्चर्य वाटणार नाही."

तुषार गांधी म्हणतात, "पूर्वी गोडसेंची गुप्तपणे पूजा केली जात होती, पण जेव्हा त्यांना दिसत आहे की देशाचे सरकारही त्यांच्याच विचारसरणीचे पालन करते, तेव्हा ते आता उघडपणे हे करत आहेत. भ्याड लोक नेहमीच असेच करतात."

गांधी, गोडसे आणि बॉलिवुड

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त बॉलिवुड कलाकरांच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदीही उपस्थित होते.

पंतप्रधानांच्या आवाहनानंतर त्यादिवशी आमिर खान, शाहरूख खान यांच्यासहीत कंगना राणावत, आलिया भट, सोनम कपूर असे अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

यापैकी अनेक सेलिब्रिटी सरकारी मोहिमेतही सहभागी झाले. नरेंद्र मोदी यांनी कलाकारांना गांधींच्या विचारधारेवर सिनेमा बनवण्याचाही आग्रह केला. परंतु एकही तसा सिनेमा दिसला नाही. याउलट यावर्षी गांधींच्या जयंती निमित्त बॉलीवूड प्रोड्यूसर महेश मांजरेकर यांनी गोडसेच्या जीवनावर सिनेमा बनवणार असल्याचं जाहीर केलं.

महेश मांजरेकर यांनी म्हटलं की, "नथुराम गोडसे यांची कहाणी नेहमीच त्यांची आवडती राहिली आहे. आणि गोडसे ना योग्य होते ना अयोग्य" त्यांचा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी निर्णय घ्यावा अशी त्यांची इच्छा आहे.

गोडसे बायोपिक बनवणार असल्याचे ट्वीट करण्याबरोबरच त्यांनी गांधींचं आवडतं भजन "रघुपती राघव राजा राम" ट्वीट केलं आहे. तरीही हे सांगणं कठीण नाही की ते गांधी किंवा गोडसे कोणाच्या दृष्टिकोनातून कथा सांगण्याचा प्रयत्न करतील.

नरेंद्र मोदी आणि गांधींची गुजराती ओळख

भारताचे माजी सांस्कृतिक सचिव आणि प्रसार भारती मंडळाचे माजी अध्यक्ष जवाहर सरकार यांना असे वाटते की, "नरेंद्र मोदी यांना मोहनदास गांधींच्या गुजराती अस्मितेचीही काळजी नाही."

जवाहर म्हणतात, "गांधींना जिवंत ठेवण्याचा राजकीय फायदा असल्यामुळे ते गांधींपासून पूर्णपणे मुक्त होऊ शकत नाहीत - प्रत्येकाला त्यात रस आहे."

"दुसरं कारण म्हणजे मोदींचा गुजरातबद्दलचा पक्षपातीपणा. ते देशाचे पंतप्रधान असले तरी त्या राज्यात सर्व काही चांगलं असल्याप्रमाणे ते गुजरातसमर्थक भूमिका घेतात. आणि गांधी सुद्धा गुजराती आहेत, त्यामुळे त्यांना उघडपणे नाकारू शकरत नाहीत. गांधी गुजराती होते आणि मीही - एवढेच!"

जवाहर सरकार म्हणतात, "त्यांनी गांधींची 150 वी जयंती अत्यंत साधेपणाने साजरी केली. मी सांस्कृतिक मंत्रालयात असताना सरकारने रवींद्रनाथ-विवेकानंद जयंतीही भव्य पद्धतीने साजरी केली, त्या तुलनेने एकही टक्का गांधींच्या बाबतीत केलं गेलं नाही."

भाजपने गांधींचा सन्मान केला

परंतु गांधी विचारधारा अंमलात आणण्यासाठी मोदी सरकारने गेल्या साडेसात वर्षांत काही केले आहे का?

भाजप नेते अनिर्बान गांगुली यांच्या मते, "टीकाकार काहीही म्हणतील पण त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल पूर्वीच्या काँग्रेस सरकारांपेक्षा अधिक आदर दाखवला आहे."

"गांधी ज्या ठिकाणी गेले किंवा देशात राहिले त्या सर्व ठिकाणांचे जतन करण्यासाठी काँग्रेसने काय केले आहे? गांधींनी तर काँग्रेस पक्षाला बरखास्त करण्यास सांगितले होते."

"1917 मध्ये गांधीजींनी स्वच्छतेबद्दल बोलताना असा युक्तिवाद केला की, जर आपण आपला परिसर, घरं, शहरं आणि गावं स्वच्छ ठेवू शकत नाही, तर आपण स्वराज चालवू शकणार नाही," असंही ते सांगतात.

"आज भाजप सरकारने त्यांना श्रद्धांजली म्हणून 'स्वच्छ भारत अभियान' सुरू केले आहे. हा कार्यक्रम खूप यशस्वी झाला आहे. गांधीजींच्या साबरमती आश्रमाला आता आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात येत आहे. लाखो पर्यटक तिथे येण्यासाठी हा प्रयत्न केला जात आहे. आणि ते नरेंद्र मोदी सरकारने सुरू केले आहे."

स्वच्छता अभियानाच्या 'लोगो'मध्येच नव्हे तर गावांमध्ये शौचालये बांधून आणि खादी ब्रँडला नवीन जीवन देऊन भाजपने राष्ट्रपित्याला नवा दर्जा दिल्याचा अनिर्बन गांगुलीचा दावा आहे.

बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "गांधीजी नेहमीच शौचालय स्वत: साफ करण्याबद्दल बोलत होते - त्यांच्या फिनिक्स, साबरमती आणि वर्धा आश्रमात हा नियम होता."

शौचालयातून घाण पाणी बाहेर पडताना पाहून महात्मा गांधींनी काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनात स्वच्छतेची प्रथा सुरू केली, याची अनिर्बान गांगुली आठवण करून देतात.

"त्यामुळे त्यांच्या विचारसरणीचा ध्वजवाहक असल्याचा दावा करणाऱ्या पक्षाला स्वातंत्र्यानंतर इतकी वर्षे देशाच्या दुर्गम भागात किंवा ग्रामीण भागात शौचालये का बांधता आली नाहीत, असा प्रश्न कोणीही विचारत नाही." असंही ते म्हणाले.

"आणि खादीबाबत बोलायचं झाल्यास, ज्या खादीला स्वतंत्र अशी ओळख आहे, ती खादी वापरली जात नव्हती. जी खादी गांधीजींची ओळख आहे त्याच्या दुकानांची दुरावस्था का आहे? आज खादी दररोज कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करत आहे,"

त्यांचा मार्ग गांधीविरोधी आहे का?

तुषार गांधी म्हणतात की, "गांधींचा कथित विकास कार्यक्रम ही एक गोष्ट आहे आणि सर्व जाती-धर्मांना एकत्र घेण्याच्या त्यांच्या विचारधारेविरोधात प्रशासनाचा कार्यक्रम चालवणे दुसरी गोष्ट आहे.

ते म्हणतात, "गांधींना राष्ट्रपिता म्हटले जाते ही वस्तुस्थिती प्रत्यक्षात निरर्थक बनली आहे."

"भारतातील फारच कमी लोक गांधींकडे त्यादृष्टीने पाहतात किंवा त्याचे अनुसरण करतात. आज ही पहिलीच वेळ नाही. पण ही स्थिती अधिक डळमळीत झाली आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही."

ते पुढे म्हणाले, "हे खरं की आहे गांधींना आपल्या गुजराती असण्याबाबत अभिमान होता पण यासोबतच त्यांनी मानवतावादी दृष्टिकोन स्वीकारलेला होता."

ते असंही सांगतात, "आज एकीकडे पंतप्रधान अभिमानाने म्हणतात की ते गांधींसारखे गुजराती आहेत - दुसरीकडे त्यांचे सरकार देशातील नागरिकांच्या एका गटाला प्रोत्साहन देण्यापुरते मर्यादित आहे. मला वाटत नाही की कोणीही असे करेल."

तुषार गांधी म्हणतात, "यापेक्षा गांधीविरोधी पाऊल असू शकत नाही."

भारतातील नर्मदा बचाओ आंदोलनाच्या नेत्या आणि गांधीवादी मेधा पाटकर यांचं मत आहे की, 'या सरकारचा मार्ग अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गापासून खूप दूर आहे.'

'मोदी विरुद्ध गांधी' ही लढाई भारतात नेहमीच सुरू आहे, असं त्या मानतात.

"या सरकारची सर्व मॉडेल्स - आर्थिक, राजकीय किंवा सामाजिक - गांधींच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत,"

"अहिंसेऐवजी हिंसेची निवड करणाऱ्याला मी गांधीवादी कसे म्हणू शकेन, ते नेहमीच सत्येऐवजी असत्य वागत आले आहेत?"

गांधींच्या धर्मनिरपेक्षतेवर हल्ला

जवाहर सरकार असंही मानतात की, "भाजपचे धार्मिक जातीयवादाचे राजकारण हाच राष्ट्रपीत्यासोबत केलेला सर्वांत मोठा विश्वासघात आहे."

"धर्म असूनही देशाला धर्मनिरपेक्ष ठेवण्याचा गांधींचा मंत्र आज भारतात नामशेष होण्याच्या मार्गावर आहे," असे त्यांचे मत आहे.

जवाहर सरकार म्हणतात, "या देशातील कट्टरतावादाविरोधात गांधींनी कठोर भूमिका घेतली यात शंका नाही. नेहरूंनी धर्मापासून अंतर ठेवले, पण धार्मिक असूनही आपण धर्मनिरपेक्ष राहू शकतो हे गांधींनी दाखवून दिले."

"हे एक विचित्र भारतीय चरीत्र आहे असे म्हणता येईल. परदेशात धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्माचा त्याग करणे, पण भारतात याचा अर्थ आपल्या धर्मावर विश्वास ठेवून इतर धर्मांबद्दल सहिष्णू असणे होय," सरकार सांगतात.

जवाहर सरकार म्हणतात, "नेहरू हे पाश्चिमात्य विचारसरणीचे धर्मनिरपेक्ष विचारधारेचे व्यक्ती होते, जे भारतात चालू शकत नाहीत. परंतु भारताचे मध्यवर्ती तत्त्वज्ञान - धार्मिक असूनही अजातीय असणे - आणि सर्वांना सोबत घेणे - हे गांधींचे योगदान आहे."

"जरी त्यांनी रघुपती राघव भजन गायले असले, तरी रामाच्या नावाने मशीद पाडण्याचे त्यांनी कधीही समर्थन केले नाही. आज ना राम, पहिल्यासारखा राहिला ना पहिल्यासारखी अयोध्या राहिली."

"मोहनदास करमचंद गांधी भारताच्या राजकारणात, समाजात आणि एकूणच अर्थव्यवस्थेत अप्रस्तुत होत आहेत. दुसरीकडे नथुराम गोडसे-सावरकरांचे समर्थक अधिकाधिक बोलके होत आहेत आणि उघडपणे समोर येत आहेत,"

"कदाचित तो दिवस फार दूर नाही जेव्हा भारतीय राष्ट्रपिता केवळ सरकारी कार्यालयांच्या भिंतींवर, सरकारी कर्मचाऱ्यांच्या कोटपिनवर किंवा चलनी नोटांच्या चित्रांवर सजलेले दिसतील," असं सरकार सांगतात.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)