युक्रेन-रशिया युद्ध : 'रशियन फौजांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि नंतर अचानक गोळीबार सुरू केला'

    • Author, योगिता लिमये
    • Role, बीबीसी न्यूज, कीव्ह, युक्रेन

इव्हेन रेबकॉन यांनी कॉफीन हळूच उघडलं. मुलाबरोबरचं त्यांचं ते शेवटचं बोलणं. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले, अश्रूंचा ओघ थांबेना.

त्यांची बायको इना स्वत:ला सावरत होत्या. त्यांनी कॉफीनवरचा मुलाचा फोटो नीट केला. तरुण, हसरा असा तो फोटो. आईचा मुलाबरोबरचा तो शेवटचा संवाद.

मुलाचं नाव एलिसेई रेबकॉन. मे महिन्यात तो 14 वर्षांचा झाला असता.

रशियाच्या सैनिकांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात महिनाभरापूर्वी एलिसेईने जीव गमावला. त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी त्याच्या घरचे, नातेवाईक, मित्रमैत्रिणी कीव्ह शहराच्या पूर्वेला असलेल्या ब्रोव्हरी शहरातल्या चर्चमध्ये जमले आहेत. पेरेमोहा गावात एलिसेई आणि त्याच्या घरचे राहतात. युद्धाने विखुरलेले गावकरी जीव गमावलेल्या आप्तस्वकीयांसाठी एकत्र जमले आहेत.

सच्चा, नम्र आणि मदतीला तत्पर असं यलीसीचं वर्णन केलं जातं. त्याला भांडायला आवडत नसे. धसमुसळा आणि आक्रमक स्वरुपाचा कोणताही खेळ तो खेळत नसे.

युद्ध सुरू झालं तेव्हा इना, एलिसेई आणि लहान भाऊ पेरेमोहामध्येच अडकले.

11 मार्च रोजी रशियाच्या फौजांनी आम्हाला गाव सोडण्याची परवानगी दिली. त्यांनी आम्हाला शुभेच्छाही दिल्या. आम्ही शेतातून जात असताना त्यांनी आमच्यावर चहूबाजूंनी हल्ला चढवला, इना सांगतात.

गाव सोडून अन्यत्र जाणाऱ्या पाच गाड्या आगेकूच करत होत्या. एलिसेई दुसऱ्या गाडीत होता. रशियाच्या फौजांनी जोरदार हल्ला केला. दुसऱ्या गाडीतलं कोणीच वाचलं नाही.

"मी शेतातून कशीबशी वाट काढली आणि तीन वर्षाच्या माझ्या मुलाला वाचवलं. जॅकेटला धरून मी त्याला बाहेर काढलं. आम्ही जिवंत राहिलो ते केवळ नशीब म्हणून," असं इना सांगितलं.

"लहान मुलगा वाचला या बळावर मी हे दु:ख पचवते आहे. त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे."

एलिसेईच्या मृत्यूप्रकरणी त्यांनी न्यायाची मागणी केली आहे.

"रशियाचे अपराध जगाला कळावेत असं मला वाटतं. प्रत्येक गुन्ह्याची नोंद व्हावी आणि तो जगासमोर यावा. आमच्या भूमीवर आमची माणसं, लहान मुलं, महिला-ज्यांना ज्यांना त्यांनी मारलं त्या प्रत्येकासाठी रशियाला उत्तर देणं बंधनकारक करावं."

दोनशेहून अधिक मुलांनी गमावला जीव

युक्रेन-रशिया युद्धात आतापर्यंत दोनशेहून अधिक लहान मुलांनी जीव गमावला आहे. एलिसेई त्यापैकीच एक. युक्रेनच्या सरकारनेच यासंदर्भात माहिती दिली आहे. शेकडो मुलं जखमीही झाली आहेत.

संघर्षादरम्यान जखमी झालेल्या शेकडो मुलांना ओहम्हाडइट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

सहा वर्षांच्या डानील अव्हडेन्को याला चेरनिव्ह शहरातून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं. रशियाच्या फौजांनी या शहरावर तुफान हल्ला केला. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला रशियाच्या फौजांनी माघार घेईपर्यंत जोरदार धुमश्चक्री चालली.

डानील आणि त्याचे आईबाबा त्यांच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्यात जखमी झाले.

जेव्हा बॉम्बहल्ला झाला सगळे जमिनीवर फेकले गेले. डानीलच्या आईच्या पायातून प्रचंड रक्त येत असल्याचं बाबांनी पाहिलं. त्यांनी बॅगचा बंद वापरुन पायाला गुंडाळला. त्यांनी वेळेत हे केल्यामुळे आईचा पाय वाचला.

बाबा डानीलशी बोलले. त्याची तब्येत बरी असल्याचं हॉस्पिटलने सांगितलं. डानील जेव्हा उभा राहून चालू लागला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, त्याच्या पायाला किती मार बसला असेल.

बॉम्बस्फोटातून बाहेर पडलेल्या गोष्टींचे तुकडे त्याच्या अंगात घुसून अनेक जखमा झाल्या आहेत. त्यातून खूप सारं रक्त येत होतं.

त्या तिघांना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

"पहिल्या चार दिवसात कोण जिवंत आहे याबद्दल काहीही कळलं नाही. माझ्या मुलाला दाखल करण्यात आलं तेव्हा हॉस्पिटलने त्याच्या नावाची नोंदच केली नाही. अनेक दिवसांनंतर सगळे घरचे भेटलो आणि मग आम्हाला कीव्हमध्ये उपचारासाठी आणण्यात आलं."

डानीलच्या डोक्यातही बॉम्बस्फोटाचे काही तुकडे गेले होते. ते काढण्यात आले आहेत. पण पाठीत अजूनही काही तुकडे बाकी आहेत. आता ते तुकडे काढले तर त्याला प्रचंड वेदनांना सामोरं जावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. त्याला अनेक ठिकाणी लागलं आहे, पायाला फ्रॅक्चर झालं आहे. तो कधी चालायला लागेल हे सांगता येणार नाही.

तो दिवसभरात आनंदी असतो, पण नर्स औषधं द्यायला आलं की शरीरात कुठे कुठे दुखतंय याची त्याला जाणीव होते.

रक्ताच्या थारोळ्यात कसे सापडलो याबाबत त्याने नर्सला सांगितलं. त्याला सगळं आठवतं आहे. पण त्याने स्वत:लाच दोष दिला. सगळं घडलं त्याआधी मीच त्याला आईबरोबर बेसमेंटला जायला सांगितलं. पण माझ्याबरोबर बाहेर यायचा त्याने आग्रह केला. त्याचं काहीही चुकलं नाही हे मी त्याला सांगितलं. आमच्या सगळ्यांचंच चुकलं.

युद्ध सुरू झाल्यानंतर डानीलने अनेक प्रश्न विचारायला सुरुवात केली. गोळीबार सुरू झाला तेव्हा तेव्हा बाबा कोण गोळीबार करतंय असं त्याने विचारलं. आपलीच माणसं आपल्यावर हल्ला करत आहेत असं मी सांगितलं. झोपेतही त्याला रशियाचे रणगाडे दिसत असत. आकाशातून बॉम्बहल्ल्यांचा वर्षाव होत असे तेव्हा तो झोपेतून घाबरलेला जागा होत असे. पण तरी तो मजामस्ती करत होता. पण हल्ला झाल्यानंतर त्याचं वागणं बदललं, असं ओलेकसांड्र यांनी सांगितलं.

'ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही'

जे हल्ल्यातून वाचून दूर जाण्यात यशस्वी झाले त्यांच्या मनावर मानसिक ओरखडा उमटला आहे.

रशियाच्या फौजांकडून लक्ष्य झालेल्या बुचा शहरातून 13वर्षीय इलया बॉबकोव्ह आणि त्याच्या घरचे पळून जाण्यात यशस्वी झाले.

मार्च महिन्यात तयार करण्यात आलेल्या ह्युमॅनिटेरिअन कॉरिडॉरच्या माध्यमातून ते सगळे बाहेर पडले. कीव्हमध्ये सरकारने दिलेल्या एका खोलीत ते राहतात.

24 फेब्रुवारीला संघर्षाला सुरुवात झाली तेव्हा मला धक्का बसला. तो नेहमीसारखा दिवस असेल असं मला वाटतं. शाळेत जायचं, अभ्यास करायचा, खेळायचं. आई माझ्या खोलीत आली आणि तिने सामान गुंडाळायला सांगितलं. त्यानंतर आम्ही बेसमेंटमध्ये राहायला सुरुवात केली. तेव्हा खूप भीती वाटू लागली. रात्री भयंकर वाटायचं असा इलया सांगते.

इलया आणि त्याच्या कुटुंबीयांनी सुरक्षित परतताना जळलेल्या इमारती, उद्धवस्त रणगाडे आणि मृतदेहांचे ढीग पाहिले.

युद्ध अजून सुरू आहे ही वस्तुस्थिती मी नाकारू शकत नाही. माझ्या अख्ख्या कुटुंबाला मारलं किंवा रशियाच्या फौजांनी आम्हाला ओलीस धरलं आहे अशी स्वप्नं मला पडतात. दरदरून घाम फुटलेल्या स्थितीत मी अनेकदा झोपेतून जागा होतो.

त्याची आत्या व्हेन्टाया सोलोकोव्हा यांचं कुटुंबही स्थलांतरित झालं. लहान मुलांचं लक्ष युद्धावरून दूर ठेवण्यासाठी ते खेळायला देतात. फॅमिली फोटो बघायला देतात. अन्नपुरवठा मर्यादित झाल्यानंतर त्यांना लहान मुलांशी याबाबत संवाद साधला.

जेवण आणि पाणी या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. युद्ध होण्याआधी त्यांचं आयुष्य सुखनैव होतं. सगळ्या सुखसोयी सहजपणे उपलब्ध होत्या. ते शाळेत जात होते, खेळत होते. आता या सगळ्याशिवाय जगणं त्यांना शिकावं लागणार आहे. तुम्ही मोठं व्हायला हवं हे मी त्यांना सांगितलं आहे.

युद्धामुळे युक्रेनमधल्या अनेक मुलांचं बालपण हिरावून घेतलं आहे. युक्रेनची लोकसंख्या 7.8 दशलक्ष आहे. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अंदाजानुसार यापैकी दोन तृतीयांश लहान मुलं विस्थापित झाली आहेत.

युक्रेनच्या दक्षिण आणि पूर्व भागांना युद्धाचा मोठा फटका बसला आहे. लिव्ह आणि कीव्हमध्ये गोळीबार होत असल्याने युक्रेनमध्ये कोणताच भाग पूर्ण सुरक्षित नाही.

युक्रेनमधली लहान मुलं पुन्हा नेहमीसारखं जगू शकतील का याविषयी साशंकता आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)