You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युक्रेनने रशियाला कसं झुंजवत ठेवलं? थेट युद्धभूमीवरून मराठी पत्रकारानं सांगितली कहाणी
रशिया-युक्रेनदरम्यान गेल्या पावणेदोन महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. युक्रेनमधील परिस्थितीचे अपडेट्स आपण बीबीसी मराठीवर पाहत आहोत. बीबीसी न्यूजच्या प्रतिनिधी योगिता लिमये या रशिया-युक्रेन युद्धाचं वार्तांकन थेट युद्धभूमीतूनच करत आहेत.
नुकताच त्यांनी बुचा शहरात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. सध्या योगिता लिमये या युक्रेनची राजधानी कीव्ह येथे असून येथील युद्धस्थितीवर त्या लक्ष ठेवून आहेत.
बीबीसी मराठी प्रतिनिधी सिद्धनाथ गानू यांनी योगिता लिमये यांच्याशी संवाद साधला आणि युक्रेनमधली परिस्थिती जाणून घेतली.
युक्रेनमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे?
योगिता - मी सध्या युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये आहे. 2-3 एप्रिलपासून इथलं वातावरण थोडं शांत आहे. युद्धाला सुरुवात झाल्यापासून रशियाचे सैनिक कीव्हच्या सीमेवर ठाण मांडून होते. त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्नही खूपवेळा केला पण त्यांना यश आलं नाही.
आता ते सीमेपासून दूर गेले आहेत. सायरन वगैरे वाजण्याचे प्रकार इथे नेहमी होतात. पण बॉम्बहल्ल्याचे वगैरे आवाज मी आल्यापासून अद्याप तरी ऐकलेले नाहीत. पण युक्रेनच्या पूर्वेकडील शहरांमधील परिस्थिती बिकट आहे. तिथं रशियाकडून बॉम्बहल्ले सुरू आहेत.
रशियन सैन्याने मोर्चा पूर्वेकडे का वळवला?
योगिता-हा रशियाच्या युद्ध धोरणाचा भाग आहे. युक्रेनच्या पूर्वेकडील शहरं आणि प्रांतांवर रशिया अतिशय आक्रमकपणे हल्ला करणार आहे.
योगिता-याचं कारण म्हणजे रशियाने सुरुवातीच्या काळात कीव्हकडे लक्ष केंद्रीत केलं होतं. कीव्ह ही राजधानी असल्याने त्याचा ताबा मिळवल्यास संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवला, असं ते म्हणू शकले असते. पण युक्रेनने कीव्हचं रक्षण अतिशय चांगल्या प्रकारे केलं. त्यामुळे रशियन सैन्याने आपला मोर्चा पूर्व युक्रेनकडे वळवला आहे.
युक्रेनच्या पूर्वेकडील प्रांतांवर रशियन सैन्य जोरदार हल्ले करत आहे. हे हल्ले यापुढे आणखी वाढू शकतात, अशी शक्यता युक्रेनने व्यक्त केली आहे.
रशियाने युद्धगुन्हे केल्याचा आरोप युक्रेन का करतोय?
योगिता-रशियाने सुरुवातीला कीव्ह शहराच्या भोवती वेढा घातला. त्यांनी आजूबाजूचा परिसर ताब्यात घेतला होता. पण नंतर त्या ठिकाणाहून त्यांनी आपलं सैन्य दुसरीकडे नेलं.
यानंतर युक्रेन प्रशासनाने या परिसरात प्रवेश करून पाहणीस सुरुवात केली. याठिकाणचा बहुतांश परिसर हा रहिवासी भाग होता. हे सैन्यातील लोक नव्हते. तरीही त्यांना मारण्यात आलं, अशी येथील नागरिकांची तक्रार आहे. बुचा शहरात आयरिना नामक एका महिलेच्या पतीला बाहेर बोलावून डोक्यात गोळी घालण्यात आली.
एका शाळेच्या तळघरात पाच मृतदेह आढळून आले. या मृतदेहांचे हात पाठीमागे बांधलेल्या अवस्थेत सापडले. युक्रेन प्रशासनाच्या मते, हे पाचही जण सर्वसामान्य नागरिक होते. त्यांना युद्धादरम्यान मारण्यात आलं.
एका व्यक्तीने आम्हाला सांगितलं की, त्यांना एके ठिकाणी 140 जणांना 700 स्क्वेअर फूट जागेत वीस-पंचवीस दिवस डांबून ठेवण्यात आलं होतं. इथं 12 जणांचा मृत्यू झाला. तिथं नेमकं काय झालं, हे तपासानंतरच कळू शकणार आहे. जर अशा गोष्टी तिथं घडत असतील तर त्याठिकाणी युद्धगुन्हे घडल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.
रशियापेक्षा तुलनेने लहान युक्रेनने त्यांना झुंजवत कसं ठेवलं?
योगिता- याची काही प्रमुख कारणे सांगता येऊ शकतात. रशिया-युक्रेनमधील तणाव हा काही नवा नाही. रशिया-युक्रेनदरम्यान 2014 सालीही संघर्ष झाला होता. त्यावेळी युक्रेनचा क्रिमिया हा प्रदेश रशियाने ताब्यात घेतला. तेव्हापासून युक्रेनने आपलं लष्करी बळ वाढवण्यास सुरुवात केली. तेव्हापासूनच युक्रेन लष्कराची क्षमता जवळपास दुप्पट वाढली आहे.
त्याचप्रमाणे युरोपातील इतर देशांनी थेट लष्करी मदत देऊ केली नसली तरी शस्त्रास्त्रांची मदत केली आहे. वोलोदिमीर झेलेंस्की यांनीही लोकशाही टिकवण्यासाठी आम्हाला शस्त्रांची मदत करा, असं आवाहन केलं. त्याला प्रतिसाद देत युरोपातून त्यांना शस्त्रास्त्रांची मदत मिळाली.
याशिवाय, आपल्या सामान्य नागरिकांनाही युक्रेनने युद्धासाठी तयार केलं. त्यांना प्राथमिक आवश्यक प्रशिक्षण देऊन रशियाचा प्रतिकार करण्यासाठी मनुष्यबळ युक्रेनने जमवलं. त्यांना प्रत्यक्ष बंदुका देऊन त्यांनी रस्त्यांवर उभं केलं होतं. त्यांच्या बळावर बलाढ्य रशियाला युक्रेनने झुंज दिली, असं दिसून येत आहे.
युद्धाचं तटस्थ वार्तांकन बीबीसीने कशा प्रकारे केलं?
योगिता-युद्धादरम्यान इथली प्रत्यक्ष स्थिती मांडण्याचा प्रयत्न संपूर्ण वार्तांकनादरम्यान बीबीसीने केला. रशियाने सर्वसामान्यांना लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेनने केला होता, तर रशियाने त्यांच्यावरचे आरोप फेटाळून लावले आहेत. अशा स्थितीत प्रत्यक्ष स्थिती काय आहे, हे दाखवणं महत्त्वाचं असतं.
थेट लोकांमध्ये जाऊन बीबीसीने या संपूर्ण परिसरात वार्तांकन केलं. वर उल्लेख केलेल्या आयरिना नामक महिलेला आम्ही स्पष्टपणे युद्धगुन्ह्यांच्या विषयावर प्रश्न विचारले. आयरिनाच्या म्हणण्यानुसार, तिचा पती वेल्डिंगचं काम करायचा. त्याने कधी हातात बंदूक पकडलीही नाही. त्याला का मारलं, याचं उत्तर आपल्याला हवंय, असं ती रडत विचारत होती.
आयरिनाने तिचं उद्ध्वस्त झालेलं घर, तिथले रक्ताचे डाग दाखवले. पतीला मारल्यानंतर रशियन सैनिकांनी मलाही मारावं, अशी विनवणी ती त्यावेळी करत होती, असंही आयरिनाने म्हटलं.
या संवेदनशील विषयाचं वार्तांकन करताना बीबीसीने स्वतःचं मत व्यक्त न करता तिची प्रत्यक्ष परिस्थिती जगासमोर जशीच्या तशी मांडली.
एकूण काय, तर इथे गुन्हे घडले आहेत. त्यांचा तपास सुरू आहे. दोन्ही बाजू त्यांचं म्हणणं मांडतील. तपासानंतर संपूर्ण सत्य समोर येईल.
युद्ध नेमकं कधी संपेल?
योगिता- खरं तर या प्रश्नाचं उत्तर सध्या तरी कुणाकडेच नाही. तज्ज्ञ वेगवेगळे अंदाज व्यक्त करतात. काही महिने-वर्ष लागतील, असंही काहीजण म्हणत आहेत.
पण दोन्ही देशांमध्ये होत असलेल्या चर्चांमध्ये काहीच ठोस तोडगा निघताना दिसत नाही. पुतीन यांचं राजकारण जवळून अभ्यासणाऱ्या लोकांच्या मते, पुतीन यांच्या कामाची पद्धत अतिशय 'अनप्रेडिक्टेबल' आहे. त्यांच्या मनात नेमकं काय आहे, याचा अंदाज लावणं कठीण आहे. त्यामुळे युद्ध किती काळ चालेल, कधी संपेल, हे सध्या तरी सांगणं अवघड आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)