'लोकांना आता काहीतरी वेगळे हवे आहे': सशक्त महिला पात्रांसह बॉलिवूडला आरसा दाखवणारे चित्रपट

फोटो स्रोत, Altitude
- Author, एम्मा जोन्स
'सिस्टर मिडनाइट', 'संतोष' आणि 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' या भारतीय चित्रपटांमध्ये नव्या महिला केंद्रित भूमिका आहेत. या चित्रपटांनी पारंपरिक बॉलिवूड नायिकेची सुंदर, ग्लॅमरस अशी ओळख मोडून काढली आहे. महिलांना शक्तीशाली आणि वास्तववादी रूपात दाखवलं आहे.
या चित्रपटांतील महिला वेगळ्या आहेत, कधी मजेशीर, कधी स्पष्टवक्त्या, तर कधी बोल्ड. सर्वात खास म्हणजे त्या कोणाच्या आयुष्याचा फक्त भाग नाहीत, तर स्वतःच्या कहाण्यांच्या खऱ्या नायिका आहेत.
'सिस्टर मिडनाइट', 'संतोष', 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट', 'गर्ल्स विल बी गर्ल्स' आणि 'शॅडोबॉक्स' या चित्रपटांतील नायिका आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना भारतातील अशा महिलांची ओळख करून देत आहेत, ज्या पारंपरिक बॉलिवूड नायिकांपेक्षा खूप वेगळ्या आणि वास्तविक जीवनाशी जवळच्या आहेत.
परंतु, प्रश्न असा आहे की भारतीय प्रेक्षकांना अशा महिलांची पात्रं खरंच पाहायची आहेत का? आणि त्यांना ही वेगळी, वास्तववादी पात्रं पडद्यावर पाहायला मिळतील का?
महिला पात्रांचा 'फॉर्म्युला'
करण कंधारीच्या 'सिस्टर मिडनाइट' या कॉमेडी चित्रपटाची उमा ही मुख्य व्यक्तिरेखा आहे. उमाचं लग्न तिच्या इच्छेविरुद्ध ठरवलं गेलं आहे आणि या लग्नात ना तिला रस आहे, ना तिच्या होणाऱ्या पतीला.
हा चित्रपट 2024 मध्ये कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आला आणि बाफ्टा पुरस्कारासाठीही त्याला नामांकन मिळाले. या चित्रपटात अभिनेत्री राधिका आपटे घरगुती जबाबदाऱ्यांशी झुंजताना दिसते.
या चित्रपटात शेजारीण तिला म्हणते की, "पुरुष मूर्ख असतात, त्यांना काहीही खायला द्या. फक्त त्यात थोडं तिखट मीठ घाला."
राधिका आपटे म्हणते की, अनोखे संवाद, मजेशीर कॉमेडी आणि पॉप म्युझिक असलेला 'सिस्टर मिडनाइट' हा चित्रपट अशा नायिकेची कथा सांगतो, जी भारतीय चित्रपटात याआधी कधीच दाखवली गेली नाही.
ती म्हणाली की, "मी याआधी असं काही वाचलं नव्हतं. मी उमाच्या व्यक्तिरेखेशी पूर्णपणे जोडली गेले. उमा थोडी विचित्र आहे, पण खूपच मनोरंजक व्यक्तिरेखा आहे.
तिचं पात्र साकारताना खूप नजाकतीने काम करावं लागलं. कधी ती खूप कूल वाटायची, तर कधी चुकीची. पण हाच अनुभव मला उत्साह देणारा आणि आव्हानात्मक वाटला.
मला हेही आवडलं की, उमा स्वतःशी प्रामाणिक आहे, तिला कोणताच पश्चात्ताप नाही. आणि जसजशी ती स्वतःला स्वीकारते, तसतशी ती अधिक मोकळी आणि मजबूत बनते."
उमा ही अशी नवी व्यक्तिरेखा आहे, जी भारतीय प्रेक्षकांना नायिकेचं एक वेगळं रूप दाखवते. ती पारंपरिक बॉलिवूड नायिकांसारखी अजिबात नाही.

फोटो स्रोत, Altitude
बॉलिवूडने अनेक वर्षांपासून बॉक्स ऑफिसवर आपलं वर्चस्व टिकवून ठेवलं आहे. गेल्यावर्षी बॉलिवूडने सुमारे 1.36 अब्ज डॉलर्सची कमाई केली होती. मात्र त्याच वेळी, बॉलिवूडवर महिलाविरोधी विचार दाखवल्याचे आरोपही होत आले आहेत.
2023 मध्ये झालेल्या एका अभ्यासात लोकप्रिय चित्रपटांमध्ये स्त्री-पुरुषांचं (जेंडर) चित्रण आणि लैंगिक पूर्वग्रह (सेक्सुअल स्टिरियोटाइपिंग) कसे दाखवले जातात, याचा अभ्यास करण्यात आला.
या अभ्यासात असं दिसून आलं की, बॉलिवूडमधील बहुतांश महिला पात्रं एकाच ठराविक 'फॉर्म्युल्यानुसार' दाखवली जातात.
या अभ्यासाच्या प्रमुख प्राध्यापिका लक्ष्मी लिंगम यांनी त्यावेळी बीबीसीला सांगितलं की, "चित्रपटात मुख्य नायिकेला बारीक आणि सुंदर दाखवणं आवश्यक समजलं जातं.
तिला सहसा लाजाळू, शांत स्वभावाची दाखवतात, जी आपली संमती बोलून नव्हे तर इशाऱ्यांमधून व्यक्त करते.
पण तिचे कपडे मात्र आधुनिक दाखवले जातात. तिचं 'मॉडर्न' असणं हे बहुतेकदा लग्नाआधीच्या तिच्या पुरुष संबंधांशी जोडून दाखवलं जातं, ज्याला समाजात अजूनही चुकीचं मानलं जातं."
त्यांनी असंही म्हटलं, "चित्रपटांमध्ये काही वेगळं किंवा नवीन दाखवण्याचा प्रयत्न फारच कमी केला जातो."
चित्रपटाच्या पडद्यावर पुरुष आणि महिला पात्रं कशी दाखवली जातात, याला खूप महत्त्व असतं, असं त्यांनी सांगितलं.

प्राध्यापिका लक्ष्मी लिंगम म्हणतात की, "भारतामध्ये कुटुंबं आणि शाळा सेक्स एज्युकेशन (लैंगिक शिक्षण) आणि सहमतीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर क्वचितच बोलतात. त्यामुळे लोक या गोष्टी बहुतेक वेळा चित्रपटांमधून आणि पुस्तकांमधूनच शिकतात."
याच्या उलट, 2023 मधील मोठ्या बॉलिवूड चित्रपटांनी नायकाला 'मर्द' ढंगात दाखवलं गेलं. म्हणजे मजबूत शरीर, हातात बंदुका आणि शत्रूंना ठार मारणारा असा त्याचा आक्रमक अंदाज दाखवला गेला.
या हिट चित्रपटांमध्ये शाहरुख खानच्या 'पठाण' आणि 'जवान'चाही समावेश होतो. यात शाहरुखने गुप्तहेर आणि बदला घेणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.
याशिवाय रणबीर कपूरचा 'ॲनिमल' हाही चित्रपट या यादीत आहे. या चित्रपटातील रणबीरच्या व्यक्तिरेखेवर अत्यंत हिंसक आणि महिलाविरोधी असल्याची टीका झाली.
हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा यांनी दिग्दर्शित केला आहे. त्यांनी यापूर्वी 'कबीर सिंग' हा चित्रपट बनवला होता. त्या चित्रपटात हिरोला खुलेआम मुलीचा पाठलाग करताना आणि तिला त्रास देताना दाखवलं होतं.
तरीदेखील, 'कबीर सिंग' हा 2019 मधला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिट चित्रपट ठरला.
नॅरेटिव्ह बदलणं
काही हिट चित्रपटांमध्ये महिलांना सशक्त भूमिकांमध्येही दाखवण्यात आलं आहे. उदाहरणार्थ, 'मिशन मंगल' या चित्रपटात महिला रॉकेट वैज्ञानिकांची कथा आहे, आणि तो 2019 मधील सर्वात यशस्वी बॉलिवूड चित्रपटांपैकी एक ठरला होता.
याशिवाय करण जोहरचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सारखा चित्रपटही आहे, ज्यात आधुनिक पद्धतीने स्त्री-पुरुषांच्या भूमिकांचं (जेंडर रोल्स) चित्रण केल्याबद्दल त्याचं कौतुक झालं.
तरीही, 'इंडियन एक्सप्रेस'च्या चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता यांचं म्हणणं आहे की, बहुतेक नायिकांना त्यांच्या भूमिकांमध्ये फारसं स्वातंत्र्य नसतं.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "या नायिकांची सर्वात मोठी ओळख म्हणजे त्यांची सभ्यता."
"कधी कधी त्या स्वतःचं मत मांडतात किंवा थोड्या मजबूत दिसतात, पण त्यांना नेहमी सुंदर दाखवलं जातं. त्यांना हिरोपेक्षा नेहमी एक पायरी खाली ठेवतात.
नायिकेला हिरोचं म्हणणं ऐकावंच लागतं. बहुतांश चित्रपटांमध्ये तिची भूमिका फक्त नावापुरती असते. मोजक्याच दृश्यांमध्ये तिला संधी मिळते."
अलीकडेच संध्या सूरी यांच्या 'संतोष' या चित्रपटात एका दलित महिलेला पोलिसाच्या भूमिकेत दाखवण्यात आलं आहे. या नोकरीमुळे तिला त्या पदासोबत येणारी शक्ती आणि अधिकार मिळतात.
संतोषला ही नोकरी तिच्या पतीच्या मृत्यूनंतर मिळते. पतीचा मृत्यू त्याच्या नोकरीदरम्यान झालेला असतो.
या चित्रपटात शहाना गोस्वामीने संतोषची भूमिका केली आहे. एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार आणि हत्येनंतर संतोषला तिच्या भोवताली असलेल्या पोलीस व्यवस्थेतील भ्रष्टाचार समजतो.
तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या भूमिकेत सुनीता राजवार आहेत. व्यवस्थेत टिकून राहण्यासाठी तडजोड करायला शिकलेली ही वरिष्ठ अधिकारी असते.

फोटो स्रोत, TIFF
संध्या सूरी या आधी माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवत होत्या. त्यांना हा चित्रपट बनवण्याची प्रेरणा 2012 मध्ये दिल्लीतील बसमधील तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्येच्या घटनेतून मिळाल्याचे त्यांनी सांगितलं.
या घटनेने संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. त्यानंतर भारतात महिलांच्या सुरक्षेबाबत नवे कायदे करण्यात आले होते.
तरीसुद्धा, भारतात महिलांवर आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण अजूनही खूप जास्त आहे.
2022 च्या एका अहवालात असं दिसून आलं की, महिलांवर होणारे सर्वात जास्त गुन्हे हे त्यांच्या पतीकडून किंवा नातेवाइकांकडूनच केले जातात.
सुरी यांनी बीबीसीला सांगितलं, "त्या घटनेनंतर (बलात्कार आणि हत्येनंतर) आंदोलनं सुरू होती. तेव्हा मी एका महिला पोलीस कर्मचारीचा फोटो पाहिला, त्यात काही महिला आंदोलनकर्त्या तिच्याभोवती रागाने उभ्या होत्या.
त्या पोलिसाच्या चेहऱ्यावरच्या भावना इतक्या गुंतागुंतीच्या आणि गूढ वाटल्या की मी भारावून गेले. ती व्यक्तिरेखा खूपच मनोरंजक होती.
ती दोन शक्तींमध्ये अडकलेली होती. तिच्यावर हिंसाचार होऊ शकला असता, पण तिच्या गणवेशामुळे ती स्वतःही हिंसा करू शकत असती."

फोटो स्रोत, Getty Images
सुरी म्हणतात, "मला हे जाणून घ्यायचं होतं, जर तुम्ही संतोषसारख्या एखाद्या महिलेला तिच्या घरातील स्वयंपाकघरात बंद केलं किंवा तिला अशी परिस्थिती दिली, तर त्यावर तिची प्रतिक्रिया कशी असेल?"
"मला हे विचारायचं होतं की, अशी एखादी स्त्री व्यक्तिरेखा तयार होऊ शकते का जी ना पुरुषासारखी वागण्याचा प्रयत्न करेल, ना त्याच्या अत्याचाराची बळी ठरेल? समाजात तिचा जगण्याचा काही वेगळा मार्ग असू शकतो का?"
'संतोष' हा चित्रपट ब्रिटनकडून 2025 साठीच्या सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ऑस्कर पुरस्कारासाठी निवडला गेला होता.
'सिस्टर मिडनाईट' आणि 'संतोष' या दोन्ही चित्रपटांमध्ये एक साम्य आहे. दोन्हींचे भारतात चित्रिकरण झाले होते, पण त्यांची निर्मिती ब्रिटन येथील भारतीयांनी केली होती.
'सिस्टर मिडनाईट'चे निर्माते हा चित्रपट 2025 मध्ये भारतात प्रदर्शित करण्याची आशा व्यक्त करत आहेत. पण सुरी यांनी बीबीसीला सांगितलं की 'संतोष' कदाचित भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार नाही.
सुरी म्हणतात, "आम्ही हा चित्रपट मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवला, आणि प्रेक्षकांना तो खूप आवडला. स्थानिक प्रेक्षकांना हा चित्रपट खरा आणि वास्तविक वाटला हे पाहून मला खूप आनंद झाला."
"परंतु, असं वाटतं की हा चित्रपट भारतात रिलीज होणार नाही. आणि ती खूप खेदाची गोष्ट आहे. कारण आम्ही तो सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला होता. पण त्यांनी इतके कट्स सुचवले की, चित्रपटाचं खरं स्वरूप कायम ठेवणं अशक्य झालं."
भारतातील सेन्सॉरशिप
भारतात सेन्सॉर बोर्डाचे निर्णय अनेकदा वादग्रस्त ठरले आहेत. 2017 मध्ये 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' या स्त्रीवादी चित्रपटावर 'खूपच महिला-केंद्रित' असल्याचं कारण देत बंदी घालण्यात आली होती.
नंतर हा निर्णय बदलला गेला. तरीसुद्धा, अनेक मोठे भारतीय चित्रपट अजूनही स्वतःच सेन्सॉरशिप लावतात. विशेषतः सेक्स आणि सेक्शुअलिटीसारख्या विषयांवर.
2021 मधील तेलुगू भाषेतील हिट चित्रपट 'पुष्पा: द राइज' जी एका तस्कराची कथा आहे. या चित्रपटातील एक दृश्य काढून टाकण्यात आलं होतं. कारण त्या दृश्यात हिरो पुष्पा नायिका श्रीवल्लीच्या छातीला स्पर्श करतो, प्रेक्षकांनी त्यावर आक्षेप घेतला होता.
2024 मध्ये 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटावरही भारतात वाद निर्माण झाला होता.
शुभ्रा गुप्ता यांच्या मते, या चित्रपटात असा संकेत दिला गेला होता की, श्रीवल्लीला कदाचित आपल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते.
गुप्ता म्हणतात, "चित्रपटात महिला पात्राला अतिशय गोड आणि खट्याळ पद्धतीने दाखवलं आहे. ती हिरोच्या प्रेमात पडलेली असते आणि जेव्हा तिला त्याच्यासोबत थोडा वेळ घालवायचा असतो, तेव्हा ती खोडकर अंदाजात वागते."
"चित्रपटाच्या उरलेल्या भागात ती फक्त हिरोची सेवा करताना दिसते. तिच्या पतीने इतर कोणाशीही शारीरिक संबंध ठेवू नयेत अशी तिची इच्छा आहे. पण ही गोष्ट भारतात चर्चेचा विषय बनली, कारण आपल्या इथं नायक किंवा नायिका असे विषय क्वचितच उघडपणे बोलताना दिसतात."
शुभ्रा गुप्ता पुढे म्हणतात, "आजही आपल्या मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये असं दाखवलं जातं की, जर एखाद्या महिलेनं विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवले, तर तिला टीकेला सामोरं जावं लागतं."

फोटो स्रोत, CMPR
पायल कपाडियांच्या 'ऑल वुई इमॅजिन अॅज लाइट' या चित्रपटात सेक्ससारख्या विषयांवर योग्य आणि संवेदनशील पद्धतीनं मांडणी केली आहे, ज्यामुळे हा चित्रपट आणखी धाडसी वाटतो.
कान्स फिल्म फेस्टिव्हलचा ग्रां प्री जिंकणारा हा पहिला भारतीय चित्रपट आहे. यात प्रभा नावाच्या नर्सची कथा दाखवली आहे, जी आपल्या अरेंज मॅरेजमध्ये एकाकी वाटत आहे.
तिची रूममेट अनू, जी एक हिंदू मुलगी आहे, ती आपल्या मुस्लिम प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवू इच्छिते आणि हा आपल्या समाजात अजूनही एक संवेदनशील आणि टॅबू (निषिद्ध) मानला जाणारा विषय आहे. चित्रपटात लग्नाआधी अशा गोष्टींवर कोणतीही मोकळी चर्चा दाखवण्यात आलेली नाही.
कपाडिया बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "हा चित्रपट त्या भावना आणि विचारांवर आधारित आहे, ज्या मी काही काळापासून अनुभवत आहे."
"भारतामध्ये महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र झाल्या असल्या तरी, त्यांना अजूनही स्वतःच्या वैयक्तिक आयुष्याबाबत निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य फार कमी आहे. अजूनही त्यांच्याकडे लहान मुलींसारखं पाहिलं जातं.
तुम्ही 25 वर्षांच्या असाल, स्वतःच्या कमाईवर घर चालवत असाल, पण तरीही कोणासोबत राहायचं किंवा कोणाशी लग्न करायचं हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे नसतो."
'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाचं खूप कौतुक झालं, पण तरीही तो भारताकडून 2025 च्या ऑस्करसाठी निवडला गेला नाही. ज्युरीचं म्हणणं होतं की, हा चित्रपट 'भारतामध्ये बनलेला युरोपियन चित्रपट' वाटतो.
परंतु, 2024 मध्ये ही अशी एकमेव भारतीय महिला दिग्दर्शक नव्हती, जिने तरुण मुलीच्या लैंगिक जाणिवेचं चित्रपटात दर्शन घडवलं. शुची तलाठीच्या इंग्रजी आणि हिंदी भाषेतील 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाने सनडान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऑडियन्स अवॉर्ड जिंकला.

फोटो स्रोत, Getty Images
हा चित्रपट हिमालयातील एका बोर्डिंग स्कूलमधील कथा सांगतो, जिथे 18 वर्षांची मुलगी पहिल्यांदाच एका मुलावर प्रेम करते. पण तिचं हे प्रेम तिच्या आईमुळे अपूर्ण राहतं.
काही भारतीय चित्रपटांनी समाजातील 'ठरलेले नियम' मोडून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. जसं मीरा नायरचा 'मॉन्सून वेडिंग' (2001), 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' (2016) आणि एलजीबीटीक्यू+ किशोरवयीन प्रेमकथेवर आधारित 'मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ' (2014).
शुभ्रा गुप्ता सांगतात की, आजही आंतरराष्ट्रीय प्रेक्षक आणि सामान्य भारतीय प्रेक्षक यांच्या आवडीत मोठा फरक आहे.
शुभ्रा गुप्ता म्हणतात, "आपण ज्या चित्रपटांबद्दल बोलतो आहोत, ते स्वतंत्र भारतीय सिनेमाचा भाग आहेत. तिथेच सगळ्यात जास्त मनोरंजक आणि नवे प्रयोग होत आहेत. हे फक्त भारतच नाही, तर जगभरातील सिनेमासाठी सत्य आहे."
"पायल कपाडियांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' या चित्रपटाने चांगली कामगिरी केली आहे आणि तो भारतात थिएटरमध्येही प्रदर्शित झाला. पण खरं सांगायचं तर, त्याने बॉक्स ऑफिसवर किती कमाई केली हे मला माहीत नाही."
त्या पुढे म्हणतात की, जर भारतीय प्रेक्षकांनी 'सिस्टर मिडनाइट'मधील उमा किंवा 'संतोष'सारख्या नायिका पडद्यावर पाहिल्या, तर त्यांना कदाचित आश्चर्य वाटेल किंवा विश्वास बसणार नाही. कारण या भूमिका नेहमीच्या सामान्य चित्रपटांपेक्षा खूप वेगळ्या आहेत.
त्या म्हणाल्या, "लोकांना हे मानणं कठीण जाईल की, संतोषसारखी एक दलित महिला, जी समाजाच्या खालच्या थरातून आली आहे. ती चित्रपटाची मुख्य नायिका असू शकते आणि संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरते. असा चित्रपट भारतात विकणं खूप अवघड जाईल."
"'सिस्टर मिडनाइट'मध्ये राधिका आपटेचं (उमा) पात्र एक पत्नीचं आहे, पण ती 'आज्ञाधारक' नाही. ती स्वतःच्या मनाने जगते आणि बऱ्याच प्रमाणात बेफिकीरपणे वागते.
हा उत्कृष्ट चित्रपट आहे, पण असे चित्रपट कदाचित ओटीटी प्लॅटफॉर्मवर किंवा विशेष समज असलेल्या प्रेक्षकांमध्येच लोकप्रिय ठरतील. मात्र अशा प्रेक्षकांची संख्या इतकी मोठी नसते की, ते चित्रपट एखाद्या मोठ्या बॉलिवूड चित्रपटाइतकी कमाई करू शकतील."
स्टिरियोटाइप बदलणं
बंगाली चित्रपट 'शॅडोबॉक्स'चे दिग्दर्शक तनुश्री दास आणि सौम्यानंद साही यांचं म्हणणं आहे की, भारतीय चित्रपट निर्मात्यांना आजही प्रेक्षकांची विचारसरणी बदलण्यासाठी जुने ठरलेले साचे (स्टिरियोटाइप) मोडावे लागतात.
या वर्षी बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'शॅडोबॉक्स' हा चित्रपट दाखवण्यात आला. ही कथा माया नावाच्या महिलेची आहे, तिची भूमिका तिलोत्तमा शोमने केली आहे.
माया अनेक नोकऱ्या करून आपल्या कुटुंबाचा खर्च भागवण्याचा प्रयत्न करते, कारण तिचा नवरा, जो पूर्वी सैनिक होता, आता तो मानसिक समस्यांशी झुंजतो आहे. या सगळ्यामुळे मायाचाच समाजात अनेकदा अपमान होत असतो.
'शॅडोबॉक्स'च्या दिग्दर्शिका तनुश्री दास बीबीसीशी बोलताना म्हणाल्या, "जेव्हा आपण कामगार वर्गातील वंचित महिलांविषयी बोलतो, तेव्हा त्यांना बहुतेक वेळा 'समाजाच्या काठावर जगणाऱ्या महिला' असं म्हटलं जातं."
"पण 'काठावरचं आयुष्य जगणारे' (उपेक्षित) लोक हे खरं तर आपल्या समाजाचा मोठा भाग आहेत. मग त्यांच्या कथा आपल्याला का दिसत नाहीत? आता वेळ आली आहे की, आपण हे ठरलेले स्टिरियोटाइप तोडावेत. त्यासाठी जास्तीत जास्त महिलांनी स्वतःच्या कथा स्वतः सांगायला हव्यात.
मला वाटतं, चित्रपट निर्माते आणि वितरकांना अजूनही हे समजलेलं नाही की, महिला प्रेक्षकांची संख्या किती मोठी आहे आणि त्यांना अशा चित्रपटांचा अनुभव घ्यायचा आहे, ज्यात त्यांच्या आयुष्याचं खरं चित्र दिसतं."
सिनेमा हा एकमेव पर्याय नसल्यास, कोविड-19 च्या काळात वाढलेल्या आंतरराष्ट्रीय स्ट्रीमिंग सेवा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी (जे प्रेक्षकांना थेट टीव्ही किंवा मोबाइलवर कंटेंट पाहण्याची संधी देतात) महिलांवर आधारित आणि धाडसी चित्रपटनिर्मितीसाठी एक नवीन व्यासपीठ तयार केलं आहे.

फोटो स्रोत, CMPR
2021 मध्ये जिओ बेबी दिग्दर्शित मल्याळम चित्रपट 'द ग्रेट इंडियन किचन' नीस्ट्रीम या अॅपवर हिट ठरला. नंतर हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषेतही बनवण्यात आला.
ही एका अरेंज मॅरेजची गोष्ट आहे. या चित्रपटात घरातील कामं, त्रास देणारे सासरचे लोक आणि बेफिकीर पती दाखवण्यात आला आहे.
एका महिला समीक्षकानं सांगितलं की, "हा चित्रपट पितृसत्तेला धक्का देतो, जी कुटुंब आणि धर्मासारख्या संस्थांची पायाभूत व्यवस्था आहे."
किरण रावचा चित्रपट 'लापता लेडीज' (भारताची ऑस्कर एंट्री ठरलेला ठरला) हाही एका नकोशा अरेंज मॅरेजची गोष्ट आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. यापूर्वी 2020 मध्ये आलेला 'गुंजन सक्सेना' हा भारतातील पहिल्या महिला लढाऊ वैमानिकेवर आधारित चित्रपटही तिथेच प्रदर्शित झाला होता.
शुभ्रा गुप्ता म्हणतात, "पण खरं सांगायचं तर लोक या चित्रपटांसाठी तिकीट घेत नाहीत. हे चित्रपट प्रामुख्याने 15 ते 35 वयोगटातील तरुण पाहतात, आणि त्यातही बहुतांश पुरुष असतात. त्याशिवाय, चित्रपटसृष्टी अजूनही मोठ्या प्रमाणात 'बॉइज क्लब'च आहे."
2023 मधील उत्तम कामगिरीनंतर गेल्या वर्षी बॉलिवूडने भारतीय बॉक्स ऑफिसवरील एकूण कमाईपैकी फक्त 40 टक्के हिस्सा मिळवला. शुभ्रा गुप्ता यांच्या मते, बॉलिवूडच्या या 'फॉर्म्युला फिल्म्स'मुळेच ही परिस्थिती आणखी बिघडली आहे.
त्या म्हणतात, "लोकांना आता काहीतरी नवीन आणि वेगळं पाहायचं आहे."
"पण अडचण अशी आहे की जर तुम्ही त्यांच्या विचारसरणीपासून खूप वेगळा चित्रपट बनवला, तर लोक तो पाहायलाच येणार नाहीत. म्हणूनच दुर्दैवाने, आपण असं संतुलन ठेवतो की प्रेक्षकांना स्त्रीवादी किंवा 'चांगली महिला' कशी असावी हे न मानणाऱ्या स्त्रिया पडद्यावर पाहायची सवयच होऊ नये."
पण त्या असंही म्हणतात की, बदल घडवण्यासाठी फक्त महिला पात्रं वेगळ्या पद्धतीनं दाखवणं पुरेसं नाही.
त्या म्हणतात, "जर तुम्हाला महिलांची पात्रं वेगळी दाखवायची असतील, तर पुरुष पात्रंही नव्या पद्धतीनं लिहावी लागतील."
"यासाठी प्रत्येक स्तरावर मोठ्या बदलाची गरज आहे."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











