सासू आणि जावयाच्या प्रेमसंबंधांवर बनलेला चित्रपट इंडोनेशियात प्रचंड हिट का झाला?

फोटो स्रोत, Netflix
- Author, कोह वी आणि रियान इब्राहिम
- Reporting from, सिंगापूर, बीबीसी इंडोनेशिया
अनेक महिन्यांपासून इंडोनेशियातील चित्रपट रसिक एकाच चित्रपटाची चर्चा करत आहेत. तो चित्रपट आहे 'नोरमा'.
हा चित्रपट म्हणजे बाहेरून अतिशय सुखी, आनंदी दिसणाऱ्या संसाराची कहाणी आहे. मात्र तो संसार सासू आणि जावयामधील प्रेम संबंधांमुळे उद्ध्वस्त होतो.
हे एक असं नाट्य किंवा मेलोड्रामा आहे जे चित्रपट रसिकांना नेहमीच आकर्षून घेतं. मात्र नोरमा या चित्रपटानं संपूर्ण देशालाच वेड लावलं आहे. कारण हा चित्रपट एका व्हायरल झालेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.
2022 मध्ये इंडोनेशियाच्या जावा बेटावरील सेरांग शहरातील नोरमा रिस्मा नावाच्या एका महिलेनं टिकटॉक व्हीडिओ बनवला होता. त्यात तिनं तिचा पती आणि तिच्या आईमध्ये सुरू असलेल्या अफेअरबद्दल सांगितलं होतं.
तिच्या या व्हीडिओला लवकरच लाखो व्ह्यूज मिळाले. हे प्रकरण चर्चेत राहिलं आणि शेवटी एका चित्रपटाकडून नोरमाला डील मिळाली. या चित्रपटानं संपूर्ण आग्नेय आशियाला हादरवून टाकलं.
'नोरमा' हा चित्रपट मार्च महिन्यात इंडोनेशियातील चित्रपटगृहांमध्ये आणि ऑगस्ट महिन्यात नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला.
हा चित्रपट फक्त इंडोनेशियातीलच नाही तर मलेशिया आणि सिंगापूरसारख्या देशांमध्ये देखील सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या चित्रपटांपैकी एक बनला. या देशांमध्ये मोठ्या संख्येनं मलय-मुस्लीम लोक राहतात.
हा चित्रपट इंडोनेशियातील चित्रपट निर्मात्यांनी शोधलेल्या एका यशस्वी फॉर्म्युल्यात अगदी फिट बसतो. तो म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्कँडलवर चित्रपट बनवायचा.
व्हायरल कथांवर चित्रपट बनवण्याचा ट्रेंड
या वर्षी जूनपर्यंत, इंडोनेशियातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता KKN di Desa Penari.
2022 मध्ये विद्यापीठातील सहा विद्यार्थ्यांना आलेल्या भीतीदायक अनुभवांवर आधारित असलेला हा हॉरर चित्रपट होता.
एक्सवरील एका लोकप्रिय थ्रेडवरून प्रेरणा घेऊन हा चित्रपट बनवण्यात आला होता. त्यानंतर 2023 मध्ये Sewu Dino हा आणखी एक हॉरर चित्रपट आला. हा चित्रपट त्याच एक्स अकाउंटवरील आणखी एका कथेवर आधारित होता.
अशाच प्रकारे आणखी काही बोल्ड आणि वादग्रस्त कहाण्यादेखील तितक्याच लोकप्रिय ठरल्या आहेत.

फोटो स्रोत, NetFlix
2024 मध्ये Ipar Adalah Maut हा चित्रपट आला होता. तोदेखील लोकप्रिय झाला होता. यात एक पुरुष आणि त्याच्या वहिनीचं अफेयर दाखवण्यात आलं आहे.
टिकटॉकवरील एक व्हीडिओवरून या चित्रपटाची कहाणी सत्य घटना म्हणून घेण्यात आली होती.
याचप्रकारे, 2022 मध्ये Layangan Putus ही ड्रामा सिरीजदेखील टिकटॉकवरूनच घेण्यात आली होती. यात एका विवाहबाह्य अफेअर करणाऱ्या पतीमुळे वाताहत होणाऱ्या कुटुंबाची कहाणी दाखवण्यात आली होती.
इंडोनेशियातील संस्कृती आणि चित्रपट
या प्रकारच्या कहाण्या इंडोनेशियात टॅबू किंवा वाईट मानल्या जातात. या देशात विवाह्यबाह्य संबंध ठेवल्यास तुरुंगवासदेखील होऊ शकतो.
इंडोनेशियातील नवीन गुन्हेगारी कायदा, पुढील वर्षापासून लागू होणार आहे. यात विवाहबाह्य शारीरिक संबंध ठेवण्यास बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे.
इंडोनेशियातील सर्वाधिक प्रतिगामी प्रांतात तर विवाहापूर्वीच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी सार्वजनिकरीत्या चाबकाचे फटके दिले जाण्याची शिक्षा आधीपासूनच आहे.
मात्र तज्ज्ञांना वाटतं की धार्मिकदृष्ट्या प्रतिगामी असलेल्या या संस्कृतीत दुसऱ्याच्या घरात होणारे स्कँडल्स जाणून घेण्याची उत्सुकता अलीकडच्या काळात वाढते आहे.

फोटो स्रोत, NetFlix
आधी चित्रपटांमधील कथा शेजारी-पाजारी होणाऱ्या गॉसिपपर्यंत मर्यादित होत्या. त्या आता सोशल मीडियामुळे व्हायरल होतात.
जकार्ता आर्ट्स कौन्सिल फिल्म समितीच्या सदस्य एसएम गीटी टाम्बुनन यांनी बीबीसीला सांगितलं की, "या स्कँडल्सवर आधारित असलेल्या चित्रपटांमुळे लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा एक मार्ग सापडतो. विशेषकरून इथे असलेल्या प्रतिगामी वातावरणामुळे लोकांमध्ये अधिक कुतुहल असतं."
लोकांना काय वाटतं?
वेरो या जकार्तामधील 42 वर्षांच्या गृहिणी आहेत. त्या नोरमाची कहाणी टिकटॉकवर व्हायरल झाल्यापासून फॉलो करत आहेत.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की या कथेमुळे त्यांना 'पती आणि आई दोघांचा राग' आला.
त्या म्हणाल्या, "मला जेव्हा माहीत झालं की या कथेवर चित्रपट तयार होतो आहे. तेव्हा मी विचार केला की हे लोक नोरमाशी किती निर्दयपणे वागले हे मला पाहायचं आहे."
चित्रपटगृहात चित्रपट पाहत असताना चित्रपटाचा क्लायमॅक्सचा सीन सुरू असताना त्यांनी रडण्यास सुरुवात केली.
या दृश्यात नोरमा घराबाहेरील गर्दीतून वाट काढत घरात येते. आत आल्यावर तिला तिचा पती आणि आई एकाच खोलीत आक्षेपार्ह अवस्थेत दिसतात.

चित्रपटातील नोरमाचा पती आणि तिच्या आईमधील रोमँटिक दृश्यांनी एकीकडे प्रेक्षक आश्चर्यचकित झाले, तर दुसरीकडे त्यांचं लक्षदेखील वेधलं गेलं.
टिकटॉकवरील एका युजरनं चित्रपटातील जावई-सासूच्या चुंबन दृश्यावर कॉमेंट केली, "निश्चितच हे दृश्य चित्रीत केल्यानंतर त्यांना किळस वाटली असेल."
चित्रपटात एका मैत्रिणीला या अनैतिक संबंधांबद्दल कळतं, तेव्हा ती उलटी करते.
एसएम गीटी इशारा देतात की अशा कथांमध्ये एक धोकादायक प्रवृत्ती असते. जी नेहमीच फसवणूक करणाऱ्या पुरुषांऐवजी महिलांनाच जास्त दोषी ठरवते.
त्या म्हणतात, "पत्नी आणि प्रेमिकामधील अशा संघर्षांमध्ये सर्वसाधारणपणे पुरुषाला कोणतीही शिक्षा मिळत नाही."

फोटो स्रोत, Dee Company Documents
चित्रपटाच्या पटकथा लेखिका ओका औरोरा यांनी बीबीसीला सांगितलं की 'नोरमा' चित्रपट मुख्य पात्रांच्या सर्जनशील सहभागामुळे इतरांपेक्षा वेगळा ठरतो.
ओका औरोरा यांनी टिकटॉकवर आधारित इतर कथांची पटकथादेखील लिहिली आहे.
ओका म्हणतात की नोरमा यांच्याबरोबर त्यांच्या भावना आणि त्यांच्या आईबद्दल अनेक तास झालेल्या चर्चेमुळे मुख्य कथा बऱ्याच अंशी सत्य घटनेवरच आधारित आहे.
अर्थात त्या असंही म्हणाल्या की "प्रेक्षक चित्रपटाशी भावनिकदृष्ट्या जोडले जावेत यासाठी चित्रपटाचा काही भाग नाट्यमयरीत्या सादर करण्यात आला आहे."
त्या म्हणाल्या, "हा चित्रपट लोकांसाठी त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा आणि नंतर थोडा आनंद घेण्याचा एक मार्गदेखील आहे. जेणेकरून ते जेव्हा चित्रपटगृहाबाहेर पडतात, तेव्हा त्यांच्याकडे विचार करण्यासाठी आणि बोलण्यासाठी काहीतरी असतं."
कसं आहे नोरमाचं आयुष्य?
आज खऱ्या आयुष्यात नोरमा, सेरांग या त्यांच्या मूळ शहरात एक आउटसोर्स्ड वर्कर आहेत.
त्यांची आई रिहाना अनैतिक संबंधांच्या आरोपाखाली आठ महिने तुरुंगवास भोगून आता त्यांच्या कुटुंबात परतल्या आहेत.
नोरमा यांचे माजी पती रोजी यांना नऊ महिन्यांची शिक्षा झाली होती.
फेब्रुवारी महिन्यात या चित्रपटासाठी प्रसारमाध्यमांसमोर आल्यानंतर नोरमा म्हणाल्या होत्या की पतीकडून फसवणूक झालेल्या इतर महिलांकडून मिळालेल्या संदेशांमुळे त्यांची हिंमत वाढली आहे.
त्या म्हणाल्या, "माझ्याबरोबर जेव्हा हे घडलं, तेव्हा मला वाटलं की माझीच फसवणूक का होते आहे. तीदेखील माझ्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडून? हे फक्त माझ्याच वाट्याला आलं आहे का?"
"मात्र मी जेव्हा याबद्दल आवाज उठवला, तेव्हा मला माहीत झालं की इतर अनेकांना देखील असाच अनुभव आला आहे."
पटकथालेखिका ओका या चित्रपटातून मिळणाऱ्या महिलांच्या समस्यांशी निगडीत संदेशावर भर देतात.
त्या म्हणतात, "ज्या महिलांना हिंसाचार आणि त्यांच्या जोडीदाराकडून फसवणुकीला सामोरं जावं लागतं, त्यांनी पुढे यावं आणि त्याविरोधात आवाज उठवावा... हा चित्रपट म्हणजे या दिशेनं उचललेलं छोटंसं पाऊल आहे."

तर एसएम गीटी यांना वाटतं की नोरमासारख्या घरगुती समस्यांना तोंड देणाऱ्या महिलांच्या सत्यघटनांनी प्रेरित होऊन तयार झालेल्या चित्रपटांचा वापर एक व्यासपीठ म्हणून केला जाऊ शकतो. हे व्यासपीठ पुरुषप्रधान समाजात महिलांच्या सबलीकरणासाठी मदत करू शकतं. ते महिलांना त्यांचा आवाज उठवण्याची हिंमत देऊ शकतं.
प्रतिक्रियेसाठी बीबीसीनं नोरमा यांच्याकडे मुलाखतीची विनंती केली होती ती नोरमा यांनी नाकारली.
मात्र त्या अजूनही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या आयुष्याशी निगडित गोष्टी शेअर करत असतात.
इंडोनेशियातील लोकांकडून नोरमा यांना भरपूर पाठिंबा आणि प्रेम मिळतं आहे.
याच महिन्यात त्यांनी टिकटॉकवर काही फोटो पोस्ट केले. त्या फोटोंमध्ये त्या केकसोबत दिसत होत्या.
हा केक त्यांना चित्रपटाच्या प्रोडक्शन हाऊसकडून पाठवण्यात आला होता. या पोस्टसाठी शेकडो लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
एका युजरनं कॉमेंट केली की, "मिस नोरमा, मी जेव्हा तुमच्या आयुष्याची कहाणी चित्रपटात पाहिली, तेव्हा तुम्हाला मनापासून मिठी मारण्याची इच्छा झाली."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











