महिलाकेंद्रित सिनेमांनी 2024 मध्ये जगभरातल्या प्रेक्षकांना भारतीय सिनेमांकडे कसं आकर्षित केलं?

ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पायल कपाडिया यांच्या (उजवीकडून तिसऱ्या) 'ऑल वी इमॅजिन अ‍ॅज लाईट' या चित्रपटाने यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलचा दुसरा सर्वोच्च पुरस्कार जिंकला.
    • Author, यासीर उस्मान
    • Role, चित्रपट पटकथा लेखक

सरत्या वर्षात म्हणजे 2024 मध्ये बॉलीवूड पाय रोवण्यासाठी संघर्ष करत असताना गुंतागुंतीच्या, सूक्ष्म विषयांची मांडणी करणाऱ्या कथाप्रधान आणि भारतीय महिलांनी तयार केलेल्या छोट्या चित्रपटांची देशातील आणि जगभरात मोठ्या प्रमाणात चर्चा झाली.

मे महिन्यात भारतीय सिनेनिर्मात्या पायल कपाडिया यांच्या 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट' या चित्रपटानं जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवात ग्रँड पिक्स जिंकून इतिहास घडवला.

तेव्हापासून 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट' हा चित्रपट भारतीय सिनेमाची एक शक्ती बनला आहे. तो चित्रपट महोत्सव आणि पुरस्कार समारंभांमध्ये झळकतो आहे, त्याचं मोठं कौतुक होतं आहे.

न्यूयॉर्क फिल्म क्रिटिक्स सर्कल आणि टोरोंटो फिल्म क्रिटिक्स असोसिएशन सह प्रतिष्ठित संघटना, संस्थाकडून या चित्रपटाला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट म्हणून गौरवण्यात आलं आहे.

या चित्रपटाला दोन गोल्डन ग्लोब नामांकन मिळाली. त्यात पायल कपाडिया यांना सर्वोत्तम चित्रपट दिग्दर्शकाचं नामांकन देखील आहे.

यंदाच्या वर्षातील सर्वोत्तम चित्रपटांच्या अनेक याद्यांमध्ये या चित्रपटाला स्थान मिळालं आहे. त्यात बीबीसी आणि न्यूयॉर्क टाईम्सच्या यादीचाही समावेश आहे.

अर्थात हा काही एकमेव भारतीय चित्रपट नाही त्याच्या जोडीला इतरही चित्रपट आहेत.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

दिग्दर्शिका शुची तलाटी यांच्या बालपणापासून तारुण्यापर्यंतचं चित्रण करणाऱ्या 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटानं सनडान्स चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार जिंकले.

किरण राव यांच्या 'लापता लेडीज' हा चित्रपट नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांच्या यादीत किमान दोन महिने होता.

भारतातून ऑस्कर पुरस्कारांसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता (हा एक वादग्रस्त निर्णय होता). लापता लेडीज हा चित्रपट अकॅडमी पुरस्काराच्या अंतिम यादीत स्थान मिळवू शकला नाही.

तर ब्रिटिश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरी यांच्या 'संतोष' युकेकडून ऑक्सरसाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली होती.

भारतीय चित्रपटांचं बदलतं स्वरुप

भारतीय चित्रपटांच्या यशाची ही अचानक आलेली लाट एक वेगळीच किंवा अनपेक्षित बाब आहे, की जागतिक पातळीवरील सजगतेत प्रदीर्घ काळापासून अपेक्षित असलेला बदल आहे?

"यामध्ये दोन्ही गोष्टींची पराकाष्ठा झाली आहे," असं चित्रपट समीक्षक शुभ्रा गुप्ता म्हणतात. तसंच हे चित्रपट 'एका रात्रीत' तयार झाले नसल्याच्या मुद्याकडंही त्या लक्ष वेधतात.

उदाहरणार्थ, 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाच्या दिग्दर्शिका शुची तलाटी आणि चित्रपटाच्या सहनिर्मात्या रिचा चढ्ढा या दोघी महाविद्यालयात एकत्र शिकत असताना त्यांना पहिल्यांदा या चित्रपटाची कल्पना सुचली होती.

"त्या यावर अनेक वर्षांपासून काम करत होत्या," असं शुभ्रा गुप्ता पुढे सांगतात.

'गर्ल्स विल बी गर्ल्स'

फोटो स्रोत, Girls Will Be Girls

फोटो कॅप्शन, शुची तलाटी यांच्या मुलींच्या जीवन प्रवासावर आधारित 'गर्ल्स विल बी गर्ल्स' या चित्रपटाला सनडान्स चित्रपट महोत्सवात दोन पुरस्कार मिळाले

त्या म्हणतात, "2024 मध्येच हे सर्व अफलातून चित्रपट प्रदर्शित झाले आणि त्यातून यासंदर्भात चर्चा सुरू होत एक वातावरण निर्मिती झाली, हा निव्वळ योगायोग होता."

हे सर्व एकत्र येण्यामागची सुदैवी बाब म्हणजे एक सिनेमॅटिक स्वप्न. या चित्रपटांचा प्रभाव जगभरात झाला याची मूळं या चित्रपटांच्या दर्जामध्ये आणि त्यातून एकटेपणा, नातेसंबंध, ओळख, लिंग आणि कणखरपणा या वैश्विक मूल्यांच्या शोध घेण्यामध्ये आहे.

या चित्रपटातील सशक्त महिला पात्रं किंवा महिलांच्या विषयाची जबरदस्त मांडणी आणि अपारंपरिक स्त्रीवादी कथानकामुळं, भारतीय चित्रपटसृष्टीच्या मुख्य प्रवाहानं ज्या विषय, मुद्द्यांचा शोध घेतला नव्हता त्या नव्या वाटांकडे या चित्रपटांचा प्रवास झाला.

महिला केंद्रीत विषयांची हाताळणी

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट' या चित्रपटाची निर्मिती हिंदी, मराठी आणि मल्याळम भाषेत करण्यात आली होती.

चित्रपटात मुंबईत स्थलांतरित झालेल्या तीन महिला सहानुभूती, कणखरपणा आणि मानवी संबंधांचा शोध घेतात, त्याला सामोऱ्या जातात.

या चित्रपटाची कथा एकाकीपणा आणि सामाजिक-राजकीय पार्श्वभूमी भोवती गुंफलेली आहे.

चित्रपटातून अनु (दिव्या प्रभा) आणि तिचं शियाझ (ह्रधू हरून) या पात्रांच्या एकमेकांशी असलेल्या नात्याद्वारे हिंदू-मुस्लीम आंतरधर्मीय संबंध, त्यातील गुंतागुंत यांचा शोध घेण्यात आला आहे.

कपाडिया यांनी बीबीसीला सांगितलं की, त्यांच्या चित्रपटातील महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असल्या तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्यांना मर्यादांना तोंड द्यावं लागतं. विशेषकरून प्रेमासारख्या विषयाच्या बाबतीत या मर्यादा अधिक प्रकर्षानं समोर येतात.

त्या पुढे म्हणाल्या की, "मला वाटतं भारतातील प्रेम हे खूपच राजकीय स्वरुपाचं आहे. महिला म्हणजे कुटुंबाचा तथाकथित प्रचंड मानसन्मान असतात आणि जातीय वंशाचं त्या रक्षण करतात."

"समजा त्यांनी वेगळ्या धर्मातील किंवा वेगळ्या जातीतील व्यक्तीशी लग्न केलं तर ती खूप मोठी समस्या बनते. माझ्या दृष्टीनं महिलांवर नियंत्रण ठेवण्याची आणि त्यांना एखाद्या लहान मुलाप्रमाणे, कमकुवतरित्या वागवण्याची पद्धत आहे."

लापता लेडीज

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, किरण राव (उजवीकडे) यांच्या लापता लेडीज या उपहासात्मक चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये तरुण आणि नवखे चेहरे आहेत

तलाटी यांचा 'गर्ल्स विल बी गर्ल्स' हा चित्रपट, हिमालयातील प्रदेशात असणाऱ्या एका कडक शिस्तीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये शिकणारी एक 16 वर्षांची मुलगी आणि तिची आई अनिला, हिच्याबरोबरचे तिचं ताणलं गेलेलं, दुरावलेलं नातं याची कहाणी आहे.

मुलीच्या आईचा म्हणजे अनिलाचा स्वत:च्याच असुरक्षिततेशी आणि कुंथित, व्यक्त न झालेल्या, फुंकर न घातलेल्या भावनांशी संघर्ष सुरू असतो. या कथेद्वारे चित्रपट महिला किशोरावस्था, बंडखोरवृत्ती आणि दोन पिढ्यांमधील संघर्षाचा शोध घेतो.

शुभ्रा गुप्ता म्हणतात, "एखाद्या पात्राची बालपणापासून तरुणपणापर्यंतची मानसिक, भावनिक वाढ, प्रवास दाखवणारा हा चित्रपट आहे. अशा प्रकारचा चित्रपट भारतात अजिबात तयार केला जात नाही. भारतीय चित्रपट महिलांकडे खूपच सहानुभुतीच्या, दयेच्या आणि अतिशय प्रेमळ पद्धतीनं पाहतो."

त्या पुढे म्हणतात, "ज्या वयात लोक त्यांच्या शरीर आणि मनासह आणि त्याशिवाय भावना अनुभवतात - त्या अनुभवाला कोणताही कमकुवतपणा किंवा लहानपणा न देता तो शोध घेतात. तो शोध भारतातील मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये कधीच नव्हता."

पुरुषप्रधान संस्कृती आणि चित्रपट

किरण राव यांच्या 'लापता लेडीज' या चित्रपटाला तिकिटबारीवर चांगला गल्ला जमवता आला नाही. मात्र प्रेक्षक आणि समीक्षकांच्या पसंतीला तो उतरला. त्याचं कौतुक झालं.

या महिन्यात लंडनमध्ये बाफ्टा (BAFTA) स्क्रिनिंगच्या वेळेस, किरण राव यांनी त्या क्षणाचं वर्णन 'भारतातील महिलांसाठीचा खास क्षण' असं केलं होतं. अशा प्रकारच्या कथांवर आधारित चित्रपटांची लाट यापुढेही येत राहील अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती.

त्यांचा चित्रपट म्हणजे एक व्यंगात्मक किंवा उपहासात्मक विनोद आहे. यातून समाजातील विसंगती, विरोधाभास मांडण्याचा प्रयत्न आहे. नव्यानं लग्न झालेल्या दोन वधूंची त्यांच्या बुरख्यामुळे ट्रेनमध्ये चुकून अदलाबदल होते, त्यातून निर्माण होणाऱ्या व्यंगाची ही कहाणी आहे.

या चित्रपटात पितृसत्ता, ओळख आणि लैंगिक भूमिकांवर टोकदार भाष्य करण्यात आलं आहे. अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत दाखवल्या जात असलेल्या पुरुष किंवा नायकप्रधान चित्रपटांपासून घेतलेली ही फारकती आहे किंवा त्यात झालेला हा बदल आहे.

समाजातील महिलांची स्थिती, पितृसत्ताक समाजव्यवस्था याबद्दल बॉलीवूडचा ख्यातनाम अभिनेता आणि 'लापता लेडीज' या चित्रपटाचा सह-निर्माता असलेला आमिर खान म्हणाला,

"आपल्यापैकी बऱ्याचजणांची विचारपद्धती, जगण्याचा दृष्टीकोन सहसा पितृसत्ताकच असतो. कारण आपण त्याच वातावरणात, त्याच प्रकारच्या विचारांमध्ये मोठे झालेलो असतो."

"मात्र अशा प्रकारच्या विचारसरणीतून बाहेर पडण्यासाठी आपण वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. महिलांची बाजू लक्षात घेतली पाहिजे. किमान त्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि एकमेकांची मदत केली पाहिजे."

संतोष

फोटो स्रोत, Santosh

फोटो कॅप्शन, शहाना गोस्वामी यांची भूमिका असलेला संतोष हा चित्रपट एक रहस्यपट असून ऑस्कर पुरस्कारांसाठी युकेनं या चित्रपटाची निवड केली आहे

यावर्षी सर्वात मोठा आश्चर्याचा सुखद धक्का युकेमधून बसला. त्यांनी हिंदी भाषेतील "संतोष" या चित्रपटाची निवड ऑस्करला पाठवण्यासाठी केली.

या चित्रपटाचं दिग्दर्शन ब्रिटिश-भारतीय चित्रपटकार संध्या सुरी यांनी केलं आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण 44 दिवसांत पूर्णपणे भारतातच करण्यात आलं आहे.

चित्रपटाच्या टीममध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश होता. या चित्रपटात, शहाना गोस्वामी आणि सुनिता राजभर या भारतीय कलाकारांच्या भूमिका आहेत. संतोषची सह-निर्मिती युके, भारत, जर्मनी आणि फ्रान्समधील लोकांनी आणि कंपन्यांनी केली होती.

हा चित्रपट मूलत: भारतातील महिलांवरील हिंसाचाराची कथा आहे. त्याची मांडणी एका धारदार रहस्यपटाची आहे.

शहाना गोस्वामी म्हणतात, संतोष आणि ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट या चित्रपटांचं यश चित्रपट उद्योगाचा विस्तार आणि सीमांचं विलीनीकरण दिसून येतं. यातून विचारांची देवाण-घेवाण आणि रुजणं यासाठीची जागा निर्माण होते.

"आपल्याला अनेकदा असं वाटतं की भारतीय चित्रपटांसाठी काही विशिष्ट सांस्कृतिक संदर्भ आवश्यक आहेत. मात्र तसे ते नाहीत. भावनांवर आधारित कोणताही चित्रपट जगभरात सर्वत्र स्वीकारला जाईल, तो प्रेक्षकांना आवडेल. मग त्याचं मूळ कोणतं का असेना, तो कुठेही तयार झालेला का असेना," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

चित्रपट निर्मितीतील सकारात्मक बदल

ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाईट, गर्ल्स विल बी गर्ल्स आणि संतोष या तीन चित्रपटांमध्ये एक समान धागा, वैशिष्ट्यं आहे. ते म्हणजे हे तिन्ही चित्रपट क्रॉस-कंट्री (दोन देशांमधील) सह-निर्मिती आहेत.

गोस्वामी या गोष्टीशी सहमत आहेत की भविष्यातील चित्रपट निर्मितीसाठी हे एक सूत्र ठरू शकतं.

"उदाहरणार्थ, एका फ्रेंच चित्रपट निर्माता असल्यास फ्रेंच प्रेक्षकांकडून तो चित्रपट पाहिला जाण्याची संधी निर्माण होते, जे त्या निर्मात्याच्या किंवा व्यापक चित्रपट उद्योगाचे अनुसरण करू शकतात. याचप्रकारे चित्रपट जागतिक पातळीवर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकतो आणि तो काळाशी सुसंगत देखील बनू शकतो," असं त्या म्हणाल्या.

अगदी बॉलीवूडमध्ये देखील, यावर्षी महिलांच्या प्रमुख भूमिका असलेल्या किंवा महिला केंद्रीत चित्रपटांना मोठं यश मिळालं.

स्त्री 2, एक भयपट-विनोदीपट होता. त्यात मुक्त विचारसरणीच्या महिलांचं अपहरण करणाऱ्या एका राक्षसाशी लढणाऱ्या एक रहस्यमयी महिलेची कथा होती.

2024 मधील तो दुसरा सर्वात मोठा हिट चित्रपट होता. चित्रपटगृहांमध्ये तो अनेक महिने सुरू होता.

अभिनेत्री श्रद्धा कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेत्री श्रद्धा कपूर (फाइल फोटो)

स्ट्रीमिंग व्यासपीठांचा विचार करता, संजय लीला भंसाळी यांची नेटफ्लिक्सवरील 'हीरामंडी: द डायमंड बझार' ही वेबसेरीज आहे. त्यात स्वातंत्र्यपूर्व भारतातील सेक्स वर्करबद्दलचा तिरस्कार, पूर्वग्रह आणि त्यांचं शोषण याचा शोध घेण्यात आला आहे. "हीरामंडी: द डायमंड बझार" चा समावेश यावर्षी गुगलवर सर्वाधिक सर्च केल्या जाणाऱ्या टीव्ही शो मध्ये होता.

या चित्रपट, वेबसेरीजच्या यशातून याप्रकारच्या कथा, विषयांसाठी वाढती भूक, वाढती स्वीकार्यता दिसून येते.

या चित्रपटाचं मोठ्या प्रमाणात पडलेला प्रभाव, त्याचं यश यातून दिसून येतं की मुख्य प्रवाहातील चित्रपट मनोरंजनाच्या मूल्यांचा त्याग न करता महत्त्वाच्या विषयांना हात घालू शकतात.

शिस्तबद्ध आव्हानं असतानाही, 2024 नं भारतातील महिलांची जागतिक पातळीवरील शक्ती आणि वैविध्यपूर्ण कथांसाठी असलेल्या मागणीवर प्रकाश टाकला आहे.

या चित्रपटांना मिळालेलं यश, त्यांचं झालेलं कौतुक हे भारतीय चित्रपट उद्योगाला त्यांच्या स्वतंत्र चित्रपटांचं मोठ्या प्रमाणात वितरण करण्यासाठी आणि अधिक वैविध्यपूर्ण आणि न्याय्य, भेदभावरहित चित्रपट निर्मितीसाठी मार्ग मोकळा करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)