‘हॉरर कॉमेडी’ चित्रपटांचा नवा ट्रेंड सेट होतोय का? ‘स्त्री 2’ आणि ‘तुंबाड’चे यश काय दर्शवते?

अभिनेत्री श्रद्धा कपूर (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेत्री श्रद्धा कपूर (फाइल फोटो)
    • Author, हिमांशु दुबे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

एका बाजूला ‘वीराना’ ‘तहखाना’ ‘बंद’ ‘दरवाजा’ किंवा ‘पुराना मंदिर’ सारखे जुने चित्रपट आहेत. तर दुसऱ्या बाजूला ‘भूत’, ‘स्त्री’, ‘भेडिया’ यासारखे नव्या काळातले चित्रपट आहेत.

या सर्व चित्रपटांमध्ये एक गोष्ट समान आहे ती म्हणजे हे सर्व हॉरर चित्रपट आहेत.

70 आणि 80 च्या दशकात रामसे ब्रदर आणि हॉरर चित्रपट हे समानार्थी शब्द झाले होते. त्यांनी जवळजवळ 45 चित्रपट तयार केले आणि त्यातील बहुतांश चित्रपट त्यांच्यासाठी फायदेशीर ठरले.

पडद्यावरून हॉरर चित्रपट गायब होऊन एक मोठा काळ उलटला आहे. राम गोपाल वर्मा सारख्या लोकांनी काही चित्रपट बनवले पण ते रामसे ब्रदरसारखी वातावरण निर्मिती करू शकले नाही, आणि तसं यशही त्यांना मिळालं नाही.

राम गोपाल वर्मा यांनी ‘कौन’, ‘रात’ ‘भूत’, ‘फुंक’, ‘डरना मना है’ ‘भूत रिटर्न’ आणि ‘ये कैसी अनहोनी’ सारखे चित्रपट बनवले.

मात्र प्रेक्षकांनी यातल्या ‘रात’ आणि ‘भूत’ सारख्या चित्रपटांनाच पसंत दिली. इतर चित्रपट हवे तसे चालले नाहीत.

त्यानंतर गेल्या काही वर्षात ‘1920’ ‘स्त्री’, ‘शैतान’, ‘भेडिया’, ‘मुंज्या’, ‘स्त्री 2’ आणि तुंबाडसारखे चित्रपट आले. ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आणि हा सिलसिला अद्यापही सुरू आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आताच्या हॉरर चित्रपटांना मिळत असलेलं यश पाहता, हॉरर चित्रपटांचा काळ परतलाय का? की हा बदल ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे पाहायला मिळतोय?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी बीबीसी हिंदीने काही तज्ज्ञांशी संवाद साधला आणि या ट्रेंड विषयीची काही कारणं त्यांच्याकडून जाणून घेतली.

‘हॉरर चित्रपटांत कॉमेडीचा सक्सेसफुल तडका’

प्रसिद्ध चित्रपट समीक्षक कोमल नाहटा म्हणतात, “मला वाटतं की आधीच्या काळातले हॉरर चित्रपट हे ‘सी’ कॅटेगिरीतले होते. अशा चित्रपटांची निर्मीतीही फारशी दर्जेदार नसायची. अभिनेतेही अशा चित्रपटांत काम करण्यास तयार नसायचे. त्यामुळेच अशा चित्रपटांमध्ये प्रसिद्ध स्टार्स नसायचे.”

“जेव्हापासून अभिनेत्यांनी अशा चित्रपटांना महत्त्व देणं सुरू केलं तेव्हापासून या चित्रपटांचं बजेटही वाढलं कारण फिल्म स्टार्स चित्रपटांत भरपूर मानधन घेतात.”

कोमल नाहटा यांना वाटतं की हॉररबद्दल पुन्हा आवड निर्माण होण्यामागचं श्रेय प्रेक्षकांनाही जातं.

श्रद्धा कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, स्त्री-2 मध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहे.

ते म्हणतात, “प्रेक्षकांचीसुद्धा आवड विकसित झाली आहे. कारण इतके वर्ष हॉरर हा प्रकार फारसा समोर आला नव्हता. त्यामुळे हॉरर चित्रपट बघायला मजा येते असं अचानक प्रेक्षकांना वाटू लागलं आहे. हॉरर बरोबर कॉमेडी असेल तर अधिकच मजा येते.” ते पुढे म्हणतात.

“त्यामुळेच तुम्ही पहाल की ‘स्त्री’ चित्रपट चालला त्याचप्रमाणे ‘स्त्री 2’ सुद्धा चालला. त्याआधी आलेला ‘मुंज्या’ चित्रपटही चालला. काही वर्षांआधी आलेल्या ‘गोलमाल अगेन’लाही प्रेक्षकांनी पसंती दिली. तो एक हॉरर कॉमेडीचा प्रकार होता. चित्रपटाच्या या नवीन प्रकाराला प्रेक्षकांची भरभरून दाद मिळतेय.” असं कोमल नाहटा म्हणाले.

अभिनेता सोहम शाह दिसला होता (फाइल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 'तुंबाड' चित्रपटात अभिनेता सोहम शाह दिसला होता (फाइल फोटो)

मग तुंबाड या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद काय सांगतो?

या प्रश्नाच्या उत्तरादाखल कोमल नाहटा म्हणतात, “जेव्हा तुंबाड रिलीज झाला तेव्हा तो फारसा चालला नव्हता. बॉक्सऑफिसवर त्याने फारशी कमाई केली नाही. पण त्याची चर्चा खूप झाली. काही विशिष्ट वर्गाला हा चित्रपट खूप आवडला होता. मला असं वाटतं की या चित्रपटाचा बिजनेस आधी पेक्षा जास्त होईल. अनेकदा आपल्याला असं वाटतं की आपण हा चित्रपट ओटीटीवरही पाहिला आहे. तर थिएटर मध्येही पाहूया.”

स्त्री 2 आणि तुंबाडची कमाई

स्त्री 2 आणि तुंबाडच्या कमाईने प्रेक्षकांच्या आवडीत बदल होत असल्याचे संकेत दिसून येत आहेत.

सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरण आदर्श सोशल मीडियावर लिहितात, “स्त्री 2 ने रिलीज झाल्यावर पाचव्या आठवड्यात सोमवारी (16 सप्टेंबर 2024) 3.17 कोटींची कमाई केली. आतापर्यंत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळजवळ 583 कोटींची कमाई केली आहे आणि तो 600 कोटींचा आकडाही पार करू शकतो.”

दुसऱ्या ट्विटमध्ये ते लिहितात, “तुंबाड 2018 मध्ये पहिल्यांदा थिएटरमध्ये लागला होता, तेव्हा या चित्रपटाने दोन आठवड्यात नऊ कोटी रुपये कमावले होते. त्यापैकी पहिल्या आठवड्यात 5.85 कोटी आणि दुसऱ्या आठवड्यात 3.14 कोटी रुपये कमावले होते.”

“मात्र थिएटरमध्ये पुन्हा प्रदर्शित झाल्याच्या चार दिवसांतच या चित्रपटाने जवळजवळ नऊ कोटी रुपये कमावले आहेत. यात शुक्रवारी 1.65 कोटी रुपये, शनिवारी 2.65 कोटी रुपये, रविवारी 3.04 कोटी रुपये आणि सोमवारी 1.69 कोटी रुपये कमावले. शुक्रवारपेक्षा सोमवारी या चित्रपटाने जास्त कमाई केली.”

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर

बॉक्स ऑफिसवर तुंबाडसारख्या चित्रपटांच्या कमाईबाबत ज्येष्ठ सिनेपत्रकार अजय ब्रम्हात्मज एक नवीन पैलू जोडतात.

ते म्हणतात, "तुंबाड चित्रपटाला थिएटरमध्ये जो प्रतिसाद मिळतो आहे त्याबाबत एक मजेशीर गोष्ट आहे. हा प्रतिसाद फक्त हॉरर चित्रपटालाच मिळतो असं समजू नये. आजकाल चित्रपटांना पुन्हा एकदा थिएटरमध्ये रिलीज होण्याची संधी मिळते आहे. त्याची सुरुवात लव्ह स्टोरी चित्रपटाने झाली होती."

ते म्हणाले, “जेव्हा असं होतं तेव्हा चित्रपटाबद्दल सोशल मीडियावर चर्चा होतात. प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल एक आपुलकी निर्माण होते. त्यामुळे प्रेक्षक थिएटरपर्यंत आकर्षित होतात. तुंबाडबरोबर असंच होत आहे.

लाल रेष

या बातम्याही वाचा :

लाल रेष

अजय ब्रह्मात्मज यासाठी ओटीटी प्लॅटफॉर्मची एक मोठी भूमिका असल्याचं सांगतात.

ते म्हणतात, “यामध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मचा मोठा वाटा आहे. त्यामुळे चित्रपटांचं प्रेक्षकांशी एक वेगळं नातं आधीच तयार झालं होतं. त्यामुळेच आता प्रेक्षक थिएटरपर्यंत खेचले जात आहेत.

“खरंतर घरी तुम्हाला थिएटरसारखा अनुभव मिळत नाही. थिएटरमध्ये तुम्ही लोकांबरोबर चित्रपट पाहता. घरी तुम्ही एकटेही चित्रपट पाहू शकता पण तो एकाग्रतेने पाहू शकत नाही. थिएटरमध्ये हे शक्य होतं.”

हॉरर चित्रपटांचा ट्रेंड कोणत्या दिशेला जात आहे?

हिंदी चित्रपटांमध्ये हॉरर चित्रपटांचा काळ पुन्हा येईल का?

या प्रश्नाच्या उत्तरादाखल कोमल नाहटा म्हणतात, “नाही. तुंबाडसारख्या चित्रपटांमुळे हा काळ परत येणार नाही. हा ट्रेंड सेट होत आहे तो ‘स्त्री 2’ सारख्या चित्रपटांनी. खरंतर हा ट्रेंड ‘स्त्री’ चित्रपटानंतरच सुरू झाला होता. ‘गोलमाल अगेन’सारखे चित्रपटही चालले होते.”

अशा चित्रपटांची संख्या अजूनही कमी आहे. तुलनेने फॅमिली ड्रामा आणि रोमान्सला जास्त पसंती मिळते. पण या चित्रपटांमुळे वातावरण निर्मिती नक्कीच होत आहे.” असं ते म्हणाले

दक्षिण भारतातील अभिनेते मामुटी यांच्या ‘ब्रह्मयुगम’ सारख्या चित्रपटानेसुद्धा चांगली कमाई केली आणि आता ओटीटीवरही हा चित्रपट लोकप्रिय होत आहे.

मग भारतात आज हॉरर चित्रपटांचा ट्रेंड परत येत आहे का?

यावर ज्येष्ठ पत्रकार अजय ब्रम्हात्मज म्हणतात, “मला असं वाटत नाही. महत्प्रयत्नांनी मुंज्या आणि स्त्री सारखे एक दोन चित्रपट यशस्वी झाले आहे. त्यामुळे हा ट्रेंड आहे असं म्हणता येणार नाही.”

अभिनेत्री तमन्ना भाटिया (डावीकडे) 'स्त्री 2' चित्रपटातील एका गाण्यात दिसली होती. सोबत श्रद्धा कपूर (उजवीकडे)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अभिनेत्री तमन्ना भाटिया (डावीकडे) 'स्त्री 2' चित्रपटातील एका गाण्यात दिसली होती. सोबत श्रद्धा कपूर (उजवीकडे)

ते म्हणतात, “तुंबाड हा जुना चित्रपट होता. प्रेक्षकांचं त्याच्याशी एक कनेक्शन होतं. त्यामुळे या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मध्यंतरी भुलभुलय्या 2 सुद्धा चांगला चालला. आता भुलभुलय्या 3 सुद्धा येत आहे.”

अजय ब्रम्हात्मज यांच्या मते एक दोन चित्रपटांवरून ट्रेंड ओळखणं कठीण आहे.

ते म्हणतात, “खरंतर हॉरर आणि कॉमेडी लोकांना फार आवडतं आहे असं म्हणता येणार नाही आणि अगदीच आवडत नाही असंही नाही कारण लोकांची आवड समजून घेणं कठीण काम आहे.”

त्यांनी स्वतःचं उदाहरण देत सांगितलं, “मला ‘स्त्री 2’ अजिबात आवडला नाही. ‘स्त्री’ हा तुलनेने जास्त चांगला चित्रपट होता. त्यात एक विचार होता. ज्याचा वापर निर्मात्यांनी केला होता. मात्र ‘स्त्री 2’ ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. आकडेवारीवरून ते कळतंच आहे.”

अजय म्हणतात, “हा एक ट्रेंड झाला आहे हे मानायला मी तयार नाही. आता एक दोन आणखी चित्रपट तयार होत असून त्यात काही लोकप्रिय कलाकारही काम करत आहेत. अशा चित्रपटांची एक श्रृंखला तयार झाली असून त्याला प्रतिसाद मिळतोय पण तो क्षणिक असू शकतो.”

बॉलीवूडमध्ये चित्रपटांचा ट्रेंड कसा राहिला आहे?

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

वरील ट्रेंडशिवाय बॉलीवूडच्या ट्रेंडबद्दल ज्येष्ठ पत्रकार सुदीप मिश्रा म्हणतात, “बॉलीवूडमध्ये सुरुवातीपासूनच एक ट्रेंड आहे. तो असा की काही प्रॉडक्शन हाऊस एकसारखे चित्रपट बनवत राहतात.”

ते म्हणाले, “ जसं आधीच्या काळात रामसे ब्रदर्स हॉरर चित्रपट तयार करायचे. त्यांचे बहुतांश चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. आता ‘भेडिया’, ‘मुंज्या’ किंवा ‘स्त्री 2’ सारख्या चित्रपटांबद्दल बोलायच झालं तर त्यांची निर्मिती मॅडॉक फिल्म करत आहे. आताही बरेच प्रॉडक्शन हाऊस असे चित्रपट बनवत नाही.”

मग हॉरर चित्रपटांच्या संख्येत वाढ होणार नाही असं म्हणायचं का?

त्यावर सुदीप म्हणतात, “हे बघा, बॉलीवुडसाठी विक्रम भट यांनीसुद्धा अनेक हॉरर चित्रपट तयार केले आहेत. 1920, 1920 रिटर्न्स, राज हे चित्रपट याच श्रेणीत येतात. तेही यशस्वी झाले.”

“पण त्यामुळे अशा चित्रपटांचा काळ परत येतो आहे असं काही नाही. काही चित्रपट यशस्वी होतात, काही अयशस्वी होतात. म्हणून यशराज किंवा धर्मासारख्या प्रॉडक्शन हाऊसने हॉरर चित्रपट तयार करण्यात कधीही जास्त रस दाखवलेला नाही.”

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.