'तुम्बाड'साठी तुडुंब गर्दी, जुन्या सिनेमांकडे प्रेक्षक पुन्हा का वळू लागलेत?

फोटो स्रोत, Rahi Anil Barve/Facebook
- Author, मेरिल सेबॅस्टियन, शरण्या ऋषिकेश
- Role, बीबीसी न्यूज
सध्या देशात जुने चित्रपट पुनर्प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटांना प्रेक्षकांकडूनही चांगला प्रसिसाद मिळतोय.
एखादा चित्रपट अनेक आठवडे किंवा अनेक वर्षं सिनेमागृहात चालण्याची कित्येक उदाहरणं आहेत. मात्र, एखादा चित्रपट काही वर्षांनंतर पुन्हा रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झाल्यानंतर तो पाहण्यासाठी प्रेक्षकांनी गर्दी करणं हे ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं. त्यामागचं कारण काय? हे जाणून घेऊयात.
याआधी 'तुझे मेरी कसम' हा चित्रपट काही शहरांमध्ये पुनर्प्रदर्शित केला जात असे. मात्र, आता पूर्वीचे फ्लॉप चित्रपट सिनेमागृहांमध्ये पुन्हा प्रदर्शित केले जात असून तेही चांगली कमाई करताना दिसत आहेत.
2018 साली आलेला 'तुंबाड' हा चित्रपट सहा वर्षांनी पुन्हा रिलिज झाला आहे. या चित्रपटाने चित्रपटगृहात प्रदर्शित होण्यापूर्वीच विक्रम रचायला सुरुवात केल्याचं दिसून आलं. तब्बल 13 हजार लोकांनी या चित्रपटाचं आगाऊ बुकिंगही केलं.
सिनेमागृहात जुने चित्रपट प्रेक्षकांना का भुरळ घालत आहेत, जाणून घेऊया.
2018 साली प्रदर्शित झालेला 'लैला मजनू' हा चित्रपट पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
26 वर्षीय जाकिया रफिकी हिला जेव्हा या चित्रपटाबाबत कळलं तेव्हाच तिने हा चित्रपट पुन्हा बघायचा निर्धार केला.
आपल्या बहिणीसोबत हा चित्रपट बघायला गेलेली जाकिया सांगते, "2018 सालीही मी हा चित्रपट पाहिला होता. मात्र, त्यावेळी फार कमी लोक होते. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण आलेले दिसत आहेत. हा चित्रपट पाहताना काहीजण हसत होते, मधूनच रडतही होते.

फोटो स्रोत, Balaji Motion Pictures/Instagram
हा चित्रपट लोकांच्या भावनांसोबत जोडला गेलेला आहे. या चित्रपटातील प्रेमकथा काश्मीरशी संबंधित आहे. जाकिया काश्मिरी असल्याने तिला या चित्रपटाच्या कथेबाबत अधिक जवळीक वाटते.
प्रसिद्ध चित्रपट निर्माते इम्तियाज अली यांचा 'लैला मजनू' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, त्यावेळी तो अपयशी ठरला होता. मात्र, आता दुसऱ्यांदा सिनेमागृहात प्रदर्शित होत असताना या चित्रपटाने प्रेक्षकांना आपल्याकडे खेचण्यास सुरूवात केली आहे. भारतीय चित्रपट इतिहासात पुनर्प्रदर्शित झाल्यानंतर गर्दी खेचणाऱ्या मोजक्या चित्रपटांच्या पंगतीत हा सिनेमा जाऊन बसला आहे. यातील काही चित्रपट अनेक दशकांनीही पुन्हा रिलिज करण्यात आलेले आहेत.
कोरोना काळात अनेक महिने सिनमागृह बंद राहिल्याने भारतीय सिनेनृष्टीलाही मोठा फटका बसला होता. यादरम्यान सिनेजगताने अनेक चढ-उतार पाहिले.
दरम्यान, सध्याचं चालू वर्षही सिनेमांसाठी फारसं लाभदायक ठरलेलं नाही. कारण यावर्षी रिलिज झालेला कोणताही चित्रपट लक्षवेधी कामगिरी करणारा ठरला नाही, असं विश्लेषक कोमल नहाटा यांनी सांगितलं.
ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे सिनेमागृहांना फटका ?
देशात अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पण आजकाल लोक सिनेमागृहात न जाता नेटफ्लिक्स किंवा अॅमेझॉन प्राइमसारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर ते चित्रपट येण्याची वाट बघतात. त्यामुळे सिनेमागृहातील प्रेक्षकांचा टक्का घटत चाललेला आहे.
काही चित्रपट मात्र सिनेमागृहातच बघण्याला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. जसे की, नुकताच रिलिज झालेल्या स्त्री-2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. तो यंदाचा सर्वात हीट चित्रपट ठरला आहे.
कमाईच्या दृष्टीने हा चित्रपट कल्की या चित्रपटाच्या मागे आहे. पण कल्की चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांनी काम केलं आहे. तुलनेने स्त्री -2 मध्ये स्टार चेहरा नसतानाही त्याने केलेली कमाई विस्मयकारक आहे. तसं पाहिल्यास यावर्षी अनेक दिग्गज कलाकारांचे चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटले आहेत.


भारतीय सिनेसृष्टीत दिवसेंदिवस होत आहेत बदल
प्रेक्षकांचा बदलता मूड आणि त्यांना उपलब्ध झालेले नवनवीन प्लॅटफार्म यामुळे भारतीय सिनेसृष्टीत वेगाने नवीन बदल घडत आहेत.
यावर्षीच्या टॉप 10 चित्रपटांपैकी 3 चित्रपट केरळचे आहेत. केरळच्या चित्रपटांचा निर्मितीखर्च तुलनेने कमी असतो.
पुनर्प्रदर्शित झालेल्या चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल वाढण्यामागचं गमक नेमकं कुणालाही स्पष्टपणे सांगता येत नाही. प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे आहेत. वितरक आणि प्रेक्षक सिनेसृष्टीतील हा नवीन प्रयोग यशस्वी करताना दिसत आहे.
'रॉकस्टार', 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'जब वी मेट' यांसारख्या चित्रपटांनी प्रेक्षकांना पुन्हा भुरळ घातली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अर्थात, हे चित्रपट तेव्हाही हीट झालेले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी ते बघण्यासाठी गर्दी करणे यात काहीही नवल नाही.
मात्र, 'लैला मजनू'सारख्या चित्रपटाने सर्व समीक्षकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण 2018 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी सुपरफ्लॉप ठरला होता.
या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या मते काश्मीरमध्ये गेल्या दोन दशकांपासून सिनेमागृहे बंद आहेत. 2022 साली ती खुली करण्यात आली. त्यामुळे काश्मिरी प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतले आहे.
कोमल नहाटा सांगतात, "हा चित्रपट आता त्याच्या निर्मितीसाठी लागेलेला खर्च वसूल करू शकतो. या चित्रपटाला आता मिळालेले यश इतर चित्रपटांनाही अशाच कामगिरीसाठी प्रेरित करू शकते. "
जुने चित्रपट सिनेमागृहात चालण्याची कारणं काय ?
बॉलीवूड विश्लेषक तरण आदर्श सांगतात, "हे पुनर्प्रदर्शित होणारे चित्रपट नवीन चित्रपटांची कमतरता आणि बॉक्स ऑफिसला आलेली मरगळ झटकून टाकण्यास मदत करत आहेत. "
या जुन्या चित्रपटांचे प्रमोशनही फारसे होताना दिसत नाही. सोशल मीडिया आणि ऑनलाईन तिकीट बुकींग साईटवर दिसणारे पोस्टर्स एवढीच काय ती या चित्रपटांची जाहिरात.
तरीही हे चित्रपट चालण्याचं कारण सांगताना तरण आदर्श म्हणतात, "हे सगळं नॉस्टॅल्जियावर (जुन्या रमणीय आठवणी) आधारीत आहे. तसेच काही चित्रपट हे प्रेक्षकांनी उत्स्फुर्तपणे डोक्यावर घेततले असतात. त्यामुळे ते केव्हीही रिलिज झाले तरी प्रेक्षकांची पावलं आपोआप सिनेमागृहांकडे वळतात."
तर तामिळ आणि तेलुगु सिनेसृष्टीचं गणित वेगळं आहे. त्यांचे चित्रपट पुनर्प्रदर्शित होण्यामागे त्या सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. नुकतेच तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी यांच्या 2002 साली आलेल्या 'इंद्रा' चित्रपटाच्या गाण्यांवर त्यांचे चाहते नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत.

फोटो स्रोत, Facebook/Mohanlal
पवन कल्याण यांचा 2012 साली आलेला 'गब्बर सिंह' हा चित्रपट पुन्हा सिनेमागृहात लावण्यात आला आहे; तर तमिळ अभिनेता विजय याचा 2004 साली आलेला 'घिल्ली' हा चित्रपट गेल्या एप्रिलमध्ये पुन्हा सिनेमागृहात प्रदर्शित झाला तेव्हा तो हाऊसफुल्ल चालल्याचं दिसून आलं.
दाक्षिणात्य सिनेमांचे विश्लेषक श्रीधर पिल्लई सांगतात, "यातील अनेक चित्रपट हे वीस वर्षांपूर्वी प्रचंड हीट झालेले आहेत. प्रेक्षकांचं या चित्रपटांसह त्यातील अभिनेत्यांवर असलेलं प्रेम हे त्या चित्रपटातील रि-रिलिजमागचं खरं कारण आहे."
मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांचा 2000 साली आलेला 'देवदूतन' आणि 1993 साली आलेला 'मनिचित्रथाजू' हे दोन्ही चित्रपट केरळमधील सिनेमागृहात गाजत आहेत. हे दोन्हीही हॉरर चित्रपट आहेत.
जुने चित्रपट बघताना प्रेक्षक कसे व्यक्त होतात?
'देवदूतन' हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा तो फ्लॉप झाला होता. आता मात्र तोच चित्रपट एक महिना सिनेमागृहात चालताना दिसतोय.
पिल्लई सांगतात, मनिचित्रथाजुने त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सर्व विक्रम मोडीत काढले होते. दक्षिण भारतात पुनर्प्रदर्शित होणारा तो कदाचित सर्वाधिक हिट चित्रपट असावा.
कधी कधी एखाद्या चित्रपटाचा सिक्वेल येणार असल्याची चाहूल लागत असल्यास त्या मूळ चित्रपटाबाबत लोकांची ऋची अधिक वाढते.
नहाटा सांगतात, गदर -2 चित्रपट येणार असल्याने 2001 साली प्रदर्शित झालेला 'गदर एक प्रेमकथा' हा चित्रपट प्रेक्षकांनी पुन्हा एकदा डोक्यावर घेतला.
मात्र, असं असलं तरी कमल हसन यांच्या 'इंडियन' चित्रपटाचा सिक्वेल आल्यानंतर आधीच्या चित्रपटाला हवं तितकं यश मिळालं नाही. कारण इंडियन-2 अपयशी ठरला होता.

फोटो स्रोत, Getty Images
जे चित्रपट स्ट्रीमींग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत, अशा जुन्या चित्रपटांवर प्रेक्षक का खर्च करत असावेत, या प्रश्नाचं उत्तर देताना तरण आदर्श सांगतात, "कोणताही चित्रपट सिनेमागृहात बघण्याचा अनुभव हा ऑनलाइन किंवा इतर माध्यमांवर बघण्यापेक्षा खूप वेगळा असतो. त्यामुळे प्रेक्षक जुने चित्रपट मोबाईल किंवा टीव्हीवर न बघता सिनेमागृहात जाऊन बघण्याला पसंती देतात."
तरण आदर्श यांच्या विधानाशी पुण्याच्या श्रृती झेंडे सहमत आहेत. त्यांनी मागील 30 वर्षांत असे अनेक पुनर्प्रदर्शित झालेले चित्रपट पाहिले आहेत.
त्या सांगतात, "असे चित्रपट लोक त्या चित्रपटांच्या कथेसाठी बघत नाहीत. ते चित्रपट सामूहिकरित्या बघणं हा एक प्रकराचा सोहळा असतो. प्रेक्षकांना पुढे काय होणार आहे, याची कल्पना असते. एखादा सीन किंवा डायलॉग ते एकमेकांसोबत शेअर करत करत चित्रपटाचा आनंद घेतात."
तेलुगु सुपरस्टार नागार्जून याचा 2004 साली आलेला 'मास' हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर येण्याची प्रतीक्षा श्रुती करत आहेत.
"अर्थात मी वर्षातून एक किंवा दोन वेळाच असे जुने चित्रपट सिनेमागृहांत पाहू शकते. त्यानंतर मात्र मला नवीन चित्रपटच पहायला आवडेल," असंही श्रृती म्हणाल्या. त्यांच्या या दृष्टिकोनामुळे चित्रपट निर्मात्यांचा उत्साह नक्कीच वाढेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











