राजेश खन्ना यांच्या 'आशीर्वाद'ची जेव्हा 'भूत बंगला' म्हणून चर्चा झाली, पण या बंगल्यानं पाहिले दोन 'सुपरस्टार'

एकेकाळी राजेश खन्ना यांचं घर असलेला आशीर्वाद बंगला.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एकेकाळी राजेश खन्ना यांचं घर असलेला आशीर्वाद बंगला.
    • Author, यासिर उस्मान
    • Role, चित्रपट इतिहासकार

चित्रपट तारे-तारकांची जीवनशैली नेहमीच चर्चेचा विषय असते. असाच एक मधला काळ होता, जेव्हा फिल्म स्टारचे आलिशान बंगले यावरूनच त्यांचं स्टारडम ठरवलं जात होतं.

हे बंगले आकाशाला भिडणाऱ्या यशापासून ते नैराश्यात ढकलणाऱ्या अपयशापर्यंत, काळाच्या सर्व चक्रांचे साक्षीदार होते. मानवी जीवनातील सर्व रंग-ढंग या बंगल्यांनी अनुभवले.

बॉलीवूडचे अनेक बंगले स्टार असलेल्या त्यांच्या मालकांइतकेच प्रसिद्ध आहेत. शाहरुख खानचा 'मन्नत' बंगला हे अलीकडच्या काळातील त्याचं उत्तम उदाहरण आहे.

मात्र, शाहरुखच्या 'मन्नत'च्या कितीतरी वर्षे आधी एक बंगला म्हणजे बॉलीवूडचा एक अध्यायच ठरला होता. त्या काळी या बंगल्याचं फक्त नाव जरी घेतलं तरी पुरेसं व्हायचं.

हा बंगला म्हणजे सुपरस्टार राजेश खन्ना यांचा 'आशीर्वाद'.

मात्र, या बंगल्याची कहाणी राजेश खन्ना यांच्या सुपरस्टारपदावर पोहोचण्याच्या कित्येक वर्षे आधीच सुरू झाली होती.

भूत बंगला नावानं प्रसिद्ध असलेला 'बानो व्हिला'

बांद्रा (वांद्रे) हे पश्चिम मुंबईतील प्रसिद्ध आणि महत्त्वाचं उपनगर. बँडस्टँड आणि त्याच्या जवळचा कार्टर रोड ही इथली प्रसिद्ध ठिकाणं आहेत.

समुद्रकिनाऱ्यासमोरच असलेल्या या पॉश परिसरात आजही अनेक मोठे फिल्म स्टार आणि उद्योगपती, तसंच व्यापारी राहतात.

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

अलीकडच्या काळात मुंबईतील इतर भागांप्रमाणेच इथंही गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळं आता हा परिसर गर्दीचा, दाटीवाटीचा वाटू लागला आहे.

मात्र या परिसरातून जाताना थोडसं नीट पाहिलं तर या आलिशान आणि उंच इमारतींदरम्यान आजही कित्येक वर्षांपासून उभ्या असलेल्या जुन्या इमारती आणि जुने बंगले दिसतात.

या जुन्या इमारती आणि बंगल्यांमध्ये इतिहासाची काही पानं दडलेली आहेत. 1950-60 च्या दशकांमध्ये कार्टर रोडवर अनेक बंगले असायचे. यातील बहुतांश बंगले ईस्ट इंडियन आणि पारशी समाजाच्या लोकांचे होते.

याच कार्टर रोडवर, समुद्रासमोर एक बंगला होता. त्या बंगल्याचं नाव होतं 'आशियाना'. त्या काळातील हिंदी चित्रपटसृष्टीतील ख्यातनाम संगीतकार नौशाद यांचा हा बंगला होता.

'आशियाना' जवळच आणखी एक दुमजली बंगला होता. तो फारच जुनाट होता आणि वाईट स्थितीत होता.

इंटरनेटवरील अनेक लेखांमध्ये आधी हा बंगला अभिनेते भारत भूषण यांचा होता असं लिहिलेलं असतं. मात्र ते खरं नाही.

या बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीवर इंग्रजीत लिहिलेलं होतं 'बानो व्हिला.' आजूबाजूचे लोक या बंगल्याला शापित बंगला किंवा भूत बंगला म्हणून ओळखायचे.

साहजिकच हा बंगला विकत घेण्यास कोणीही तयार नव्हतं.

आशीर्वाद बंगला विकल्यानंतर तो पाडून इथं नवीन इमारत बांधण्यात आली, 2016 चा फोटो.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, आशीर्वाद बंगला विकल्यानंतर तो पाडून इथं नवीन इमारत बांधण्यात आली, 2016 चा फोटो.

हिंदी चित्रपटसृष्टीत त्यावेळी दहा वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या अभिनेते राजेंद्र कुमार यांना याच काळात थोडंसं यश मिळू लागलं होतं.

मदर इंडिया (1957) मधील त्यांची छोटीशी भूमिका आणि त्यानंतर धूल का फूल (1959) या चित्रपटातून त्यांची ओळख निर्माण होऊ लागली होती.

त्याच दरम्यान त्यांना मुलगी झाली. तिचं नाव त्यांनी डिंपल ठेवलं होतं. राजेंद्र कुमार त्यावेळी सांताक्रूझ इथं एका भाड्याच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये राहत होते. कुटुंब वाढू लागल्यानं त्यांना एखादं मोठं घर हवं होतं.

3 फेब्रुवारी 1959 च्या सकाळी राजेंद्र कुमार यांना एका प्रॉपर्टी एजंटचा फोन आला. तो म्हणाला, "कार्टर रोडवर एक दुमजली घर आहे. तुम्हाला जसं हवं आहे, अगदी तसंच आहे. तुम्ही आता पाहायला येऊ शकता का?"

ही माहिती लेखिका सीमा सोनी आलिमचंद यांच्याकडून मिळाली. 'जुबली कुमार: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ सुपरस्टार' हे राजेंद्र कुमार यांचं चरित्र सीमा सोनी आलिमचंद यांनी लिहिलं आहे.

त्यांनी सांगितलं की, "राजेंद्र कुमार लगेचच तिथं पोहोचले. समुद्रासमोर असलेलं हे अतिशय सुंदर असं जुनं घर त्यांनी पाहिलं. तिथे थंडगार हवा येत होती. त्यांना लगेचच त्यांच्या ज्योतिषाची आठवण झाली."

"त्या ज्योतिषानं सांगितलं होतं की, राजेंद्र कुमार यांचं नवं घर समुद्राकिनारी असेल. पाहताक्षणी राजेंद्र कुमार यांना बानो व्हिला अतिशय आवडला."

राजेंद्र कुमार.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राजेंद्र कुमार.

राजेंद्र कुमारांनी त्या प्रॉपर्टी एजंटला बंगल्याचं भाडं विचारलं. त्यावर तो म्हणाला की, "मालकाला हा बंगला भाड्यानं द्यायचा नाही तर विकायचा आहे. इथे कोणीतरी लेखक राहतात."

"ते लोकांना हे घर भुतानं पछाडलेलं आहे, असं सांगत असतात. घर विकलं जाऊ नये आणि त्याला इथं राहता यावं, म्हणून ते असं सांगत असतात. पण, घरमालकाला कोणत्याही परिस्थितीत हा बंगला विकायचा आहे. मी तुम्हाला चांगल्या किमतीत तो मिळवून देऊ शकतो."

65,000 रुपयांमध्ये घराचा व्यवहार झाला. या घराच्या संदर्भातील भुताची कहाणी ऐकून राजेंद्र कुमार यांच्या पत्नी घाबरल्या होत्या. पण, राजेंद्र कुमार यांच्या पत्नीच्या आईनं म्हणाल्या की, "मुंबईसारख्या शहरात माणसांना राहायला जागा नाही, इथं भूतं कशी राहतील."

अखेर बंगला विकत घेण्याचा निर्णय झाला. पण, बंगला विकत घेण्यासाठी राजेंद्र कुमार यांच्याकडं पूर्ण रक्कम नव्हती. त्यांनी प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक बी आर चोप्रा यांना संपर्क केला.

राजेंद्र कुमार यांनी बी आर चोप्रांना सांगितलं की, त्यांच्या कानून या चित्रपटाबरोबरच आणकी दोन चित्रपटांत काम करण्यास तयार आहे असं सांगितलं. फक्त त्यासाठीची फीस आधीच मिळावी अशी त्यांची अट होती.

बी आर चोप्रा तयार झाले. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी 'भूत बंगला' म्हणून ओळखल्या जाणारा 'बानो व्हिला' बंगला विकत घेतला.

मुलीच्या नावावरून दिलं बंगल्याला नवीन 'डिंपल'. हे नाव दिलं.

बी आर चोप्रा (मध्यभागी) यांच्यासह वैजयंती माला, रवी चोप्रा आणि दिलीप कुमार.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बी आर चोप्रा (मध्यभागी) यांच्यासह वैजयंती माला, रवी चोप्रा आणि दिलीप कुमार.

प्रसिद्ध अभिनेते मनोज कुमार हे राजेंद्र कुमार यांचे यांचे जवळचे मित्र होते. त्यांनी राजेंद्र कुमार यांना गृहप्रवेशाआधी भूतं पळवून लावण्यासाठी एक विशेष यज्ञ करण्याचा सल्ला दिला. राजेंद्र कुमार यांनीही तसं केलं.

चित्रपटसृष्टीतील जुन्या लोकांच्या मते, या घरामुळं राजेंद्र कुमार यांचं नशीबच पालटलं. दहा वर्षांपासून हवं असलेलं यश त्यांना अचानक मिळालं.

राजेंद्र कुमार या बंगल्यात राहिले तो काळ त्यांच्या करियरचा सुवर्णकाळ होता. मेरे मेहबूब, घराना संगम, आरजू, सूरज असे त्यांचे अनेक चित्रपट तुफान हिट झाले.

त्यांचे बहुतांश चित्रपट ज्युबली व्हायचे. त्यामुळं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचे 'ज्युबली कुमार' म्हटलं जाऊ लागलं.

लेखिका सीमा सोनी आलिमचंद यांनी लिहिलेल्या 'ज्युबली कुमार: द लाइफ अँड टाइम्स ऑफ अ सुपरस्टार' या पुस्तकात राजेंद्र कुमार सांगतात की "माझ्या आयुष्यातील सर्वात यशस्वी आणि सुंदर वर्षे मी याच घरात घालवली."

भरपूर पैसा आणि नावलौकिक कमावलेले राजेंद्र कुमार काही वर्षांनंतर हा बंगला सोडून पाली हिल परिसरातील नव्या बंगल्यात गेले.

कार्टर रोडवरील हा बंगला राजेंद्र कुमार यांच्या यशाचा साक्षीदार होता. पण, तो वाट पाहत होता, एका नव्या मालकाची.

इतिहासाची पुनरावृत्ती होणार होती

राजेश खन्ना यांच्या तुफानी यशाची सुरुवात झाली 1969 मध्ये. त्यांनी फक्त चित्रपटसृष्टीवरच नव्हे तर संपूर्ण देशावर गारुड केलं. 'फिनोमिना' म्हटलं गेलेले ते पहिले सुपरस्टार, आणि 'सुपरस्टार' हा शब्दही पहिल्यांदा त्यांच्यासाठीच वापरात आला.

राजेश खन्ना मुंबईतच वाढले होते. त्यांना समुद्र खूपच आवडायचा. समुद्रकिनारी घर विकत घ्यावं असं त्यांचं बऱ्याच वर्षांपासूनचं स्वप्न होतं. हा बंगला त्यांना त्यांच्या स्वप्नातील घरासारखाच वाटला.

1969 मध्ये एका संध्याकाळी दिग्दर्शक रमेश बहल आणि राजेश खन्ना, राजेंद्र कुमार यांच्या घरी बसलेले होते.

त्यावेळी राजेश खन्ना, राजेंद्र कुमारांना म्हणाले, "पापाजी, तुमचा कार्टर रोडवरील बंगला रिकामा पडून आहे, आणि मला एक घर विकत घ्यायचं आहे..."

1969 मध्ये राजेश खन्ना यांना प्रचंड यश मिळालं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1969 मध्ये राजेश खन्ना यांना प्रचंड यश मिळालं.

त्यावर राजेंद्र कुमार यांनी उत्तर दिलं, 'ते घर विकण्याची मला गरज नाही."

त्यावर राजेश खन्ना राजेंद्र कुमार यांना म्हणाले, "पापाजी, प्लीज याबद्दल विचार करा. माझं करिअर सुरू झालं आहे आणि तुम्ही देशातील सर्वात मोठे स्टार आहात. मी तुमचं घर विकत घेतलं तर माझं नशीबही बदलेल. कदाचित तुमच्यासारखं थोडंफार यश माझ्याही पदरी पडेल."

राजेश खन्ना यांनी बराच वेळ राजेंद्र कुमार यांना समजावलं. शेवटी हसत राजेंद्र कुमार म्हणाले, "जर असं असेल तर डिंपल बंगला तुझा झाला. या घरामुळं तुझं नशीब बदलेल आणि यश मिळेल, अशी मला आशा आहे."

राजेश खन्ना यांनी राजेंद्र कुमार यांच्या पाया पडत आशीर्वाद घेतला.

बंगल्याबरोबर नशीबंही पालटली

सीमा सोनी आलिमचंद यांनी लिहिलं आहे की, राजेंद्र कुमार यांच्या या निर्णयामुळं त्यांच्या पत्नी शुक्ला खूपच नाराज झाल्या. त्या राजेंद्र कुमार यांना म्हणाल्या होत्या, "आपल्याला पैशांची गरज नव्हती. तरीही तुम्ही फक्त साडे तीन लाखात ते घर विकलं."

मात्र, राजेंद्र कुमार यांनी शब्द दिला होता. पण बंगला विकल्यानंतर आश्चर्यकारकरित्या राजेंद्र कुमार यांचे चित्रपट कोसळू लागले. हिरो म्हणून त्यांचं करिअर उतरणीला लागलं.

यावर प्रसार माध्यमांनी म्हटल की, 'डिंपल' बंगला विकल्यामुळं हे होतं आहे. मात्र राजेंद्र कुमार यांचा यावर विश्वास नव्हता.

सुपरस्टार राजेश खन्ना थाटामाटात या बंगल्यात शिफ्ट झाले. त्यांनी वडील चुन्नीलाल खन्ना यांना बंगल्याला नवीन नाव देण्यास सांगितलं.

राजेश खन्ना यांना मिळालेल्या प्रचंड यशामुलं त्यांना कोणाची नजर लागेल, अशी भीती त्यांच्या आईवडिलांना वाटायची.

प्रसिद्ध अभिनेते सचिन पिळगावकर यांनी बंगल्याच्या नावाशी संबंधित एक मजेशीर गोष्ट सांगितली. ते म्हणाले, "काकाजी (राजेश खन्ना) यांचे वडील म्हणाले की, बंगल्याचं नाव आशीर्वाद ठेवा."

"मुलगा नेहमीच 'आशीर्वादा'च्या सावलीत राहील, असा त्यामागचा विचार होता. जतीन (राजेश) बद्दल इर्ष्या, मत्सर असणाऱ्यानं पत्रात त्याला शिव्या किंवा अपशब्द लिहून पाठवले, तरी पत्रावर त्याला 'राजेश खन्ना, आशीर्वाद' असंच लिहावं लागेल," असं ते म्हणाले होते.

"म्हणजेच राजेश खन्ना यांना त्यांच्या घरी येणाऱ्या प्रत्येक पत्राद्वारे, प्रत्येक संदेशाद्वारे आशीर्वाद मिळत राहील."

'आशीर्वाद' हा बंगला मुंबईतील पर्यटन विभागाचं खास पर्यटन स्थळ बनलं होतं.

फोटो स्रोत, Harper Collins

फोटो कॅप्शन, 'आशीर्वाद' हा बंगला मुंबईतील पर्यटन विभागाचं खास पर्यटन स्थळ बनलं होतं.

राजेश खन्ना यांना बंगल्यात शिफ्ट झाल्यावर राजेंद्र कुमार यांच्यापेक्षा कितीतरी पट अधिक यश मिळालं. अगदी करिश्मा व्हावा तसं.

राजेश खन्ना यांचे सगल पंधरा चित्रपट सुपरहिट झाले. फिल्मी मासिकं आणि वृत्तपत्रांमध्ये सुपरस्टारच्या नव्या बंगल्याचे फोटो छापून आले.

आशीर्वाद हा बंगलाही राजेश खन्ना यांच्याप्रमाणेच प्रसिद्ध झाला. मुंबईतील पर्यटन विभागाचं, ते एक पर्यटन स्थळ बनलं.

देशभरातील मुंबईत येणाऱ्या लोकांची एक खास मागणी असायची. ती म्हणजे त्यांना सुपरस्टार राजेश खन्ना यांचा बंगला पाहायचा आहे.

राजेश खन्ना यांना चाहत्यांची दररोज हजारो पत्रं यायची. त्यावर पत्ता म्हणून फक्त इतकंच लिहिलेलं असायचं - राजेश खन्ना, आशीर्वाद, मुंबई.

या पत्रांमध्ये राजेश खन्नावर फिदा असलेल्या तरुणींची सुगंधी पत्रं देखील असायची. लग्नाचे प्रस्ताव असायचे. इतकंच काय काही पत्रं तर रक्तानंदेखील लिहिलेली असायची. या पत्रांबद्दल याआधीच बरंच काही सांगितलं आणि लिहिलं गेलं आहे.

आशीर्वादवर येणाऱ्या पत्रांची संख्या इतकी प्रचंड असायची की, त्या पत्रांची वर्गवारी करण्यासाठी तसंच त्यांना उत्तर देण्यासाठी राजेश खन्ना यांनी एक व्यक्तीच ठेवली होती. ती व्यक्ती म्हणजे प्रशांत रॉय. जवळपास 20 वर्षे प्रशांत रॉय यांनी आशीर्वादमध्ये काम केलं.

राजेश खन्ना मुलाखत द्यायचे ती प्रसिद्ध खोली.

फोटो स्रोत, Penguin Publisher

फोटो कॅप्शन, राजेश खन्ना मुलाखत द्यायचे ती प्रसिद्ध खोली.

प्रशांत रॉय यांनी सांगितलं की, "आशीर्वादमध्ये दररोज चाहत्यांच्या पत्राचा ढीग लागायचा. काकाजी अनेकदा यायचे आणि विचारायचे की, प्रशांत आज निवडलेली सर्वात चांगली पत्रं कोणती आहेत? ते जोरजोरात पत्रं वाचायचे आणि आमच्याकडे पाहून छान हसायचे."

चाहत्यांच्या भावना पाहून ते थक्क व्हायचे. हसत हसत पंजाबी मध्ये म्हणायचे - 'हुँण की करां? इधर से लोग...उधर से लोग, खून दे लेटर...मैं क्या करूं? ऐ की हो गया?'

त्याकाळी परिस्थिती अशी झाली होती की, चित्रपटसृष्टीत एक नवीन वाकप्रचार तयार झाला होता - ऊपर आका, नीचे काका."

या बंगल्यात एक खोली होती. त्यात राजेश खन्ना यांचे फोटो आणि सजवलेल्या होत्या. ती खोलीही प्रसिद्ध झाली होती. त्याच खोलीत बसून राजेश खन्ना मुलाखती द्यायचे.

लेखक सलीम खान यांनी सांगितलं की, "आज माझा मुलगा सलमान मोठा स्टार आहे. आमच्या घराबाहेर त्याला पाहण्यासाठी दररोज मोठी गर्दी जमा होते. लोक मला सांगतात की, कोणत्याही स्टारसाठी इतकं वेड, प्रेम याआधी पाहिलेलं नाही."

"मी त्या लोकांना सांगतो की, याच रस्त्यावर काही अंतरावर कार्टर रोडवर आशीर्वाद बंगल्याच्या बाहेर मी अशी अनेक दृश्ये पाहिली आहेत. राजेश खन्ना यांच्यानंतर दुसऱ्या कोणत्याही स्टारसाठी मी चाहत्यांचं अशाप्रकारचं प्रेम, वेड पाहिलेलं नाही."

दररोज संध्याकाळी 'आशीर्वाद' मध्ये मैफल सजायची. याला चित्रपटसृष्टीत 'खन्ना दरबार' असं म्हटलं जायचं.

आशीर्वादमध्ये डिंपलची 'एन्ट्री'

या बंगल्याच्या बाबतीत एक विचित्र योगायोग झाला होता. तो म्हणजे राजेंद्र कुमार यांच्या मालकीचा असताना आधी या बंगल्याचं नाव डिंपल असं होतं. ते त्यांच्या मुलीचं नाव होतं. मात्र आता राजेश खन्नाच्या काळात या घराची मालकीण आणखी एक डिंपल झाली.

राजेश खन्ना यांच्या गैरहजेरीत घरी आलेले सर्व फोन घेत त्यांची नोंद ठेवण्याचं काम प्रशांत रॉय यांचं होतं. त्यांनी सांगितलं की, "काकाजी यांचा फोन नंबर 53117 होता. जवळपास प्रत्येक मिनिटाला एक फोन यायचा."

"एका सकाळी एका तरुणीचा फोन आला. तिला काकाजींशी बोलायचं होतं. तिनं स्वत:चं नाव डिंपल सांगितलं. मी सांगितलं की, काकाजी तर शूटिंगला गेले आहेत."

"त्यानंतर लागोपाठ 3-4 दिवस फोन येत राहिले. ती तरुणी माझ्याशी खूप आदरानं बोलायची. मला ती प्रशांत साहेब म्हणायची. एका संध्याकाळी मी काकाजींना म्हटलं की, डिंपल नावाची एक तरुणी दररोज फोन करून तुमच्याबद्दल विचारते."

"यावर काकाजी हसले... म्हणाले हो हो... ती बॉबी चित्रपटाची नायिका आहे. तिचा फोन आला तर व्यवस्थित घेत जा."

ग्राफिक्स
ग्राफिक्स

काही दिवसांनी चुन्नीभाई कपाडिया आशीर्वाद बंगल्यावर आले. त्यांच्यासोबत एक तरुणी देखील होती. प्रशांतला पाहून चुन्नीभाई म्हणाले, "प्रशांत ही माझी मुलगी डिंपल आहे."

यावर डिंपलला हसू आलं आणि ती म्हणाली, "प्रशांत साहेब मला ओळखलं का? आपण अनेकवेळा फोनवर बोललो आहोत."

प्रशांतही हसले आणि पाहुण्यांना घरात घेऊन गेले. आशीर्वाद बंगल्यात पडलेलं डिंपलचं हे पहिलं पाऊल होतं.

मार्च 1973 मध्ये, बॉबी हा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच डिंपल राजेश खन्ना यांची पत्नी बनून आशीर्वाद मध्ये आली.

त्या काळी मुंबईतच नव्हे तर देशभरातील सर्वात मोठा विवाह म्हणून याची चर्चा झाली होती. लग्नानंतरची सुरुवातीची वर्षे अतिशय आनंदाची आणि चांगली होती.

डिंपलनं चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला होता. दोघांना दोन मुली झाल्या.

पण नंतर चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांची एंट्री झाली आणि रोमॅंटिक चित्रपटांऐवजी अ‍ॅक्शन चित्रपटांचा काळ आला. त्यामुळं परिस्थिती बदलली.

काही वर्षांतच अमिताभ बच्चन एक सुपरस्टार म्हणून उदयाला आले. प्रचंड यशानंतर राजेश खन्ना यांचं करियर उतरणीला लागलं. यामुळं राजेश खन्ना खूपच हादरले होते.

महाचोर, महबूबा, अजनबी, आशिक हूं बहारों का यासारखे चित्रपट अपयशी ठरले. त्याचा परिणाम राजेश खन्ना यांच्या आत्मविश्वासावर देखील झाला होता.

1973 मध्ये राजेश खन्ना आणि डिंपलचं लग्न झालं होतं.

फोटो स्रोत, Penguin Publisher

फोटो कॅप्शन, 1973 मध्ये राजेश खन्ना आणि डिंपलचं लग्न झालं होतं.

त्यांच्या मनात अपयशाची आग लागली होती. त्यात दररोज संध्याकाळी दारू प्यायल्यानं ही आग जास्तच भडकत असे.

त्यानंतर एका रात्री आशीर्वाद बंगल्याच्या गच्चीवर एक घटना घडली. अनेक वर्षांनंतर या घटनेबद्दल राजेश खन्ना यांनी एका चित्रपट मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं.

ते म्हणाले होते, "मला आठवतं की, पहाटेचे तीन वाजले होते. मी खूप जास्त दारू प्यायलो होतो. इतक्या मोठ्या अपयशाशी माझी पहिल्यांदाच गाठ पडली होती. त्यामुळं माझ्यासाठी हे सहन करण्यापलीकडचं होतं."

"माझे एकापाठोपाठ सात चित्रपट फ्लॉप झाले. त्या रात्री पाऊस पडत होता. गुडूप अंधार होता आणि मी बंगल्याच्या गच्चीवर एकटाच होतो."

अचानक माझं भान हरपलं आणि मी ओरडलो, "परमेश्वरा! आम्हा गरीबांची इतकी परीक्षा घेऊ नकोस की, आम्हाला तुझ्या अस्तित्वाबद्दलच शंका वाटू लागेल."

करिअरमधील प्रतिकूल परिस्थिती आणि अपयशाचा परिणाम डिंपलबरोबरच्या त्यांच्या नात्यावरही होत होता. दोघांमधील तणाव वाढत चालला होता. जवळपास नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे झाले.

डिंपल आशीर्वाद सोडून गेल्या. 1992 मध्ये राजेश खन्ना यांनी चित्रपटांना रामराम करत राजकारणात पाऊल टाकलं. ते दिल्लीतून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक जिंकले. वीस वर्षे आशीर्वाद बंगल्यात राहिल्यानंतर बंगला सोडून ते दिल्लीत शिफ्ट झाले.

नवी दिल्लीत एका प्रचार सभेत बोलताना राजेश खन्ना.

फोटो स्रोत, Penguin Publisher

फोटो कॅप्शन, नवी दिल्लीत एका प्रचार सभेत बोलताना राजेश खन्ना.

आशीर्वाद मध्ये काम करणारे अनेक कर्मचारीही काम सोडून हळूहळू इतरत्र काम करू लागले.

राजेश खन्ना यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. प्रतिकूल परिस्थितीत प्रत्येकवेळी जवळच्या लोकांची साथ सुटत गेली. पण त्यांची साथ कोणी सोडली नसेल तर तो होता त्यांचा एकटेपणा.

दिवस जात होते तसा त्यांचा एकटेपणा वाढत होता.

काही वर्षांनी राजकारणातला रसही कमी झाला. ते पुन्हा मुंबईत परतले. तोपर्यंत बंबईचं नाव मुंबई झालं होतं.

प्राप्तीकराशी संबंधित त्यांचं एक प्रकरण वाढलं आणि काही काळानं प्राप्तीकर विभागानं राजेश खन्ना यांचा आशीर्वाद बंगला सील केला.

एक काळ असा आला की, आशीर्वाद बंगला सोडून राजेश खन्ना वांद्रे लिंकिंग रोडवरच्या टायटन शोरुमच्या वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये शिफ्ट झाले.

ते ऑफिस खूप मोठं होतं, मात्र स्वत:चा बंगला सोडण्याचं राजेश खन्ना यांना प्रचंड दु:ख झालं होतं.

जवळपास नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे झाले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, जवळपास नऊ वर्षे एकत्र राहिल्यानंतर राजेश खन्ना आणि डिंपल वेगळे झाले होते.

रियासत हा राजेश खन्ना यांचा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक अशोक त्यागी यांनी मला सांगितलं की, "राजेश खन्ना लिंकिंग रोडवरील ऑफिसमध्ये राहत असतानाची गोष्ट आहे. त्यांचा बंगला प्राप्तीकर विभागानं सील केला होता."

"एक दिवस ते मला घेऊन ड्राइव्हला गेले आणि थेट आशीर्वाद बंगल्यासमोर कार थांबवली. तिथे एका बेंचवर आम्ही दोघे समोरा-समोर बसलो होतो."

त्या रात्री रिमझिम पावसात राजेश खन्ना यांनी अशोक त्यागी यांना त्यांच्या सोनेरी दिवसांच्या अनेक आठवणी सांगितल्या.

त्यांनी अशोक त्यागींना म्हटलं की, "ज्या बेंचवर आपण बसलो आहोत, कधीकाळी त्याच बेंचजवळ मला पाहण्यासाठी दररोज शेकडो लोक तासनतास वाट पाहायचे."

भूतकाळातील सुपरस्टारच्या मनातील वेदना अशोक त्यागी यांच्या लक्षात आली. ते म्हणाले, "काकाजी चिंता करू नका. तुमचे ते चाहते नक्की परत येतील."

त्यावर राजेश खन्ना खिन्नपणे हसले होते.

...आणि चाहते 'आशीर्वाद' वर परतले

राजेश खन्ना यांचा बंगला त्या आर्थिक अडचणीतून सोडवला गेला. पण तरीही आयुष्याच्या शेवटच्या काळात राजेश खन्ना आशीर्वादवर एकटेच राहिले.

त्यांचं चित्रपटातून पुन्हा त्या ताकदीनं पुनरागमन झालं नाही. अनेक वर्षांनी त्यांच्या गंभीर आजारपणाची बातमी आली. त्यावेळी राजेश खन्ना इतके अशक्त झाले होते की, ते वारंवार बेशुद्ध व्हायचे. त्यांना मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

20 जूनला हॉस्पिटलमध्ये ते शुद्धीवर आले. त्यावेळी त्यांनी कुटुंबीयांना म्हटलं की, त्यांना हॉस्पिटलमध्ये राहायचं नाही. घरी जायचं आहे.

त्या दिवशी ते कार्टर रोडवरच्या त्यांच्या आशीर्वाद बंगल्यावर पोहोचले तेव्हा तिथलं दृश्यच वेगळंच होतं. इतिहासाची पुनरावृत्ती होत होती.

आशीर्वादसमोर पुन्हा एकदा शेकडो चाहते आणि देशभरातील प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी जमा झाले होते. देशातील पहिल्या सुपरस्टारची तब्येत कशी आहे? हे प्रत्येकालाच जाणून घ्यायचं होतं.

राजेश खन्नासोबत, डिंपल कपाडिया आणि भूपेश रसीन

फोटो स्रोत, bhupesh raseen

फोटो कॅप्शन, राजेश खन्नासोबत, डिंपल कपाडिया आणि भूपेश रसीन.

21 जून 2012 च्या दुपारी डोळ्यावर काळा गॉगल चढवून, अंगावर शाल गुंडाळून, त्यांच्या त्या खास शैलीत हसत राजेश खन्ना कार्टर रोडवरील त्यांच्या आशीर्वाद बंगल्यातील त्या प्रसिद्ध बाल्कनीत आले.

बाहेर उभे असलेले चाहते त्यांना पाहून आनंदानं ओरडू लागले. त्या क्षणी इतर सर्व बातम्या बाजूला सारून देशातील जवळपास प्रत्येक वृत्तवाहिनी राजेश खन्ना यांचं हे दृश्यं टीव्हीवर लाइव्ह दाखवत होती.

राजेश खन्ना यांनी त्यांच्या परिचित शैलीत हात उंचावून सर्वांच्या दिशेनं मोठ्या स्टाइलनं अभिवादन केलं. त्यांच्या ओठांवर हास्य पसरलं होतं...हो...त्यांचे चाहते पुन्हा आशीर्वाद वर परतले होते. तिथलं संपूर्ण वातावरण त्यांच्या सोनेरी दिवसांची आठवण करून देत होतं.

जणू त्यांच्या आयुष्यातील एक वर्तुळ पूर्ण झालं होतं.

पुढच्याच दिवशी म्हणजे 23 जूनला त्यांना पुन्हा लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

दिवसेंदिवस त्यांची तब्येत खराब होत गेली. कुटुंबीयांना वाटत होतं की, त्यांनी हॉस्पिटलमध्येच राहावं. पण, आशीर्वादमध्येच शेवटचा श्वास घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.

त्यांच्या इच्छेनुसार 17 जुलैला त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमधून शेवटचा डिस्चार्ज देण्यात आला आणि तिथून त्यांच्या आशीर्वाद बंगल्यावर नेण्यात आलं.

21 जून 2012 मध्ये पुन्हा एकदा राजेश खन्ना चाहत्यांना असे भेटले होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 21 जून 2012 मध्ये पुन्हा एकदा राजेश खन्ना चाहत्यांना असे भेटले होते.

राजेश खन्ना यांचं आयुष्य आणि चित्रपट करिअरवर मी एक पुस्तक लिहिलं आहे. मी ते पुस्तक लिहित असताना राजेश खन्ना यांच्या जवळच्या लोकांनी मला सांगितलं होतं की, 18 जुलैला आशीर्वाद बंगल्यात त्यांच्या बेडरुममध्ये शेवटचा श्वास घेताना ते म्हणाले होते, "टाइम अप हो गया...पॅकअप!"

2014 मध्ये त्यांच्या कुटुंबानं आशीर्वाद बंगला एका उद्योगपतीला विकला. एक मोठी इमारत बांधण्यासाठी काही वर्षांनी तो बंगला पाडण्यात आला. नियतीचा एक अनाकलनीय खेळ संपला होता.

राजेश खन्ना यांच्याबरोबरच आशीर्वाद बंगल्याचं जीवनचक्रही बहुधा पूर्ण झालं होतं. चित्रपटसृष्टीच्या इतिहासात जेव्हा जेव्हा राजेश खन्ना यांचा उल्लेख होईल तेव्हा तेव्हा चित्रपटांच्या इतिहासाचा एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणून आशीर्वादचा देखील त्यात समावेश असेल.

(लेखकांनी गुरुदत्त, राजेश खन्ना, संजय दत्त आणि रेखा यांच्या जीवनावर पुस्तकं लिहिली आहेत.)

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.