झीनत अमानने दिला लिव्ह-इन रिलेशनशिपचा सल्ला, काय म्हणाल्या मुमताज आणि सायरा बानो?

फोटो स्रोत, GETTY IMAGES/ MUMTAZTHEACTRESS
ज्येष्ठ अभिनेत्री झीनत अमान यांनी नुकतेच लिव्ह-इन रिलेशनशिपवर आपले मत व्यक्त केले होते.
यानंतर, मुमताज आणि सायरा बानू या त्यांच्या समकालीन आणि लोकप्रिय अभिनेत्रींनी त्यांच्यावर टीका केली.
सुमारे आठवडाभरापूर्वी झीनत अमान यांनी लिव्ह इन रिलेशनशिपचं समर्थन करताना म्हटलं होतं की, जर कोणी रिलेशनशिपमध्ये असेल तर त्यांनी लग्नापूर्वी काही काळ एकत्र राहावं. यामुळे तुमच्या जोडीदाराच्या उणिवा लक्षात येतील.
मात्र, मुमताज त्यांच्या मताशी सहमत नसल्याचं दिसलं.
त्या म्हणाल्या की, "झीनत अमान यांनी नात्यांवर सल्ले देऊच नये कारण त्यांचं स्वतःचं लग्न नरकापेक्षाही वाईट होतं.
तेच सायरा बानो म्हणाल्या की, "लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलचं त्यांचं मत अस्वीकार्य आहे."
काय म्हणाल्या झीनत अमान?
एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये झीनत अमान यांनी लिहिलंय की, त्यांच्या मागील पोस्टमध्ये लोकांनी त्यांना रिलेशनशिपसाठी सल्ला विचारला होता. त्यावर त्यांनी स्वतःचं मत व्यक्त केलं, असं मत त्यांनी यापूर्वी व्यक्त केलं नव्हतं.

फोटो स्रोत, INSTAGRAM
त्यांनी लिहिलंय की, "तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल, तर लग्नाआधी तुम्ही एकत्र राहा असं मी सुचवेन. मी माझ्या मुलांनाही हाच सल्ला दिला आहे आणि ते दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहेत."
झीनत अमान म्हणाल्या की, दोन व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबीयांना सामील करून घेण्यापूर्वी त्यांना स्वतःला त्यांच्या नातेसंबंधाची कल्पना यावी.
यामागे तर्क देताना त्या म्हणतात की, एखादा माणूस दिवसातले काही तास दुसऱ्या सोबत खूप चांगल्या पद्धतीने जगू शकतो. पण दोन लोक एकच बाथरूम वापरू शकतात का? एकमेकांचा वाईट मूड सांभाळू शकतात का? सोबत जेवण्यासाठी आणि एकसारखं जेवण जेवण्यासाठी तयार होऊ शकतात का?
झीनत अमान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिलंय की, "मला माहीत आहे की भारतीय समाजाला लिव्ह-इनचं वावड आहे. पण मग समाजाला अनेक गोष्टींचं वावडं असतं. लोक काय म्हणतील? याची भीती कायमच असते.
यावर मुमताज आणि सायरा बानो काय म्हणाल्या?
देव आनंद यांच्या 1971 मध्ये आलेल्या 'हरे रामा, हरे कृष्णा' या चित्रपटात झीनत अमानसोबत काम केलेल्या अभिनेत्री मुमताज यांनी झीनत अमान यांनी विचारपूर्वक सल्ला दिला पाहिजे, असं म्हटलंय.
त्यांनी मनोरंजन वेबसाइट झूमला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "झीनतने सल्ला देण्यापूर्वी विचार केला पाहिजे. ती सोशल मीडियावर अचानक चर्चेत आली आणि मी तिचा 'कूल आंटी' सारखा दिसण्याचा उत्साह समजू शकते. पण उलटा सुलटा सल्ला देऊन आपले फोलोअर्स वाढवणं योग्य गोष्ट नाहीये. ती लग्नापूर्वी ती मजहर खानला अनेक वर्षांपासून ओळखत होती. पण तरीही त्यांचं लग्न एका नरका पेक्षा कमी नव्हतं. त्यामुळे तिने लग्नावर सल्ले देऊच नये."
झीनत अमान यांनी 1985 मध्ये मजहर खानशी लग्न केलं. मजहर खान यांचं 1997 मध्ये निधन झालं. हिंदुस्तान टाइम्सने मुमताज यांच्या या कमेंटबाबत झीनत अमान यांना प्रश्न केला.

फोटो स्रोत, MUMTAZTHEACTRESS
यावर झीनत म्हणाल्या, "प्रत्येकजण आपलं मत मांडायला मोकळा आहे. मी कधीही इतरांच्या वैयक्तिक जीवनावर भाष्य करणारी किंवा माझ्या सहकाऱ्यांना कमी लेखणारी व्यक्ती नाही आणि आताही मी हे करणार नाही."
दोन्ही अभिनेत्रींमधील या मतभेदावर सायरा बानो यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना त्या म्हणाल्या, "मी हे सर्व फारसं वाचत नाही आणि त्या (मुमताज आणि झीनत) काय म्हणत आहेत ते मी खरोखर पाहिलेलं नाही. पण आम्ही जुन्या पद्धतीचे आहोत. आमचा ट्रेंड 40-50 वर्षांपूर्वीचा होता.
लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दलच्या मतांबद्दल बोलताना सायरा बानो म्हणाल्या, "मी हे कधीही मान्य करू शकत नाही. ही गोष्ट माझ्यासाठी अकल्पनीय आणि अस्वीकार्य आहे."
सोशल मीडियावर लोक काय म्हणतात?
लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल झीनत अमानच्या मताबद्दल सोशल मीडियावरील लोकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका इंस्टाग्राम युजरने झीनत यांच्या पोस्टच्या कमेंटमध्ये लिहिलंय की, "मी एका जोडप्याला ओळखतो जे एकत्र राहत होते परंतु त्यांचं लग्न होताच, अडचणी सुरू झाल्या आणि अलीकडेच त्यांचा घटस्फोट झाला. याला काय म्हणायचं?"

फोटो स्रोत, Getty Images
तेच दुसऱ्या एका युजरने लिहिलंय की, जर हे (झीनतचा सल्ला) खरं असतं तर पाश्चात्य देशांमध्ये राहणारी जोडपी, जी लग्नाआधी एकत्र राहतात, त्यांचा घटस्फोट झाला नसता. लग्न एखाद्या जॅकपॉटपेक्षा कमी नाही. सर्व काही नशीब आणि आशीर्वादांवर अवलंबून असतं.
कमेंटमध्ये आपलाच अनुभव सांगताना एक युजर लिहितो, त्यांचं त्याच्या प्रेयसीशी आठ वर्षांचं नातं होतं. त्यांनी सोबत राहायचा प्रयत्न केला आणि ते नातं एका वर्षात संपलं.
झीनत यांच्या पोस्टवर एका महिलेने कमेंट करताना म्हटलंय की, "मलाही असंच वाटतं. मी 63 वर्षांची आहे आणि मी आणि माझी बहीण, जी आता 50 वर्षांची आहे, आमच्या मुलींनाही हाच सल्ला देतो."











