राज कपूर यांच्या 'या' कृतीमुळे तुटलं देव आनंद-झीनत अमानचं नातं...

देव आनंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देव आनंद
    • Author, रेहान फझल
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये 'स्टाइल आयकॉन' या शब्दाचा वापर खऱ्या अर्थाने देव आनंद यांच्या बाबतीत अचूक ठरत होता.

विशिष्ट ढंगात बोलणं, एका बाजूला किंचित कलून हिंदकळत चालणं, घट्ट पॅन्ट, गळ्यात मफलर, डोक्यावर बॅगी कॅप आणि समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांमध्ये रोखून पाहणारे डोळे- असं 88 वर्षं जगलेल्या चिरतरुण देव आनंद यांचं वर्णन केलं जातं.

चित्रपटांसाठी आपण आयुष्यभर तरुणच राहू, असं ते एकदा म्हणाले होते. प्रत्यक्षात ते तसंच जगले. गुरदासपूर इथे 1923 साली जन्मलेले देव आनंद जुलै 1943 मध्ये खिशात 30 रुपये घेऊन लाहोरहून फ्रंटियर मेलने मुंबईला आले.

चार वर्षांत भारताची फाळणी होईल आणि त्यांना परत लाहोरला जायला 56 वर्षं वाट पाहावी लागेल, असं त्यांना स्वप्नातही वाटलं नव्हतं.

एकदा बीबीसीशी बोलताना देव आनंद म्हणाले होते, "मी लाहोरमधल्या गव्हर्न्मेन्ट कॉलेजातून इंग्रजीत बीए ऑनर्स केलं. मला मास्टर्स करायचं होतं, पण माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. मी बँकेत वगैरे नोकरी करावी, अशी त्यांची इच्छा होती. मग मी फ्रंटियर मेलमधल्या थर्ड क्लासचं तिकीट काढलं आणि मुंबईला आलो. दोन वर्षं मी संघर्ष केला. १९४५ साली मला पहिला चित्रपट मिळाला, त्याचं नाव 'हम एक है' असं होतं. लोक मला भेटून खूप खूश होत असत. मी हसायचो तर लोक वेडे होऊन जात. एकदा संधी मिळाल्यावर मी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही."

गुरुदत्त यांना दिलेलं वचन

गव्हर्न्मेन्ट कॉलेजला असताना देव आनंद हफीझ जलंधरी यांची 'अभी तो मैं जवान हूँ' ही गझल अनेकदा गुणगुणत असत. देव आनंद यांचे जवळचे स्नेही मोहन चुडीवाला या संदर्भातील आठवण सांगताना म्हणतात, "त्यांनी 1961 साली हम दोनो हा चित्रपट केला, तेव्हा 'अभी तो मैं जवान हूँ'च्या धर्तीवर एखादं गाणं लिहावं, अशी विनंती त्यांनी गीतकार साहिर लुधियानवी यांना केली. साहिर यांनी त्याच लयीमध्ये 'अभी न जाओं छोड कर के दिल अभी भरा नहीं' हे गाणं लिहिलं आणि ते प्रचंड लोकप्रिय झालं."

चुडीवाला सांगतात, "चित्रपटविश्वामध्ये देव आनंद यांचे सर्वांत सुरुवातीचे आणि जवळचे मित्र होते गुरुदत्त. मी दिग्दर्शक होईन तेव्हा माझा पहिला नायक तू असशील, असं वचन एके दिवशी गुरुदत्त यांनी देव यांना दिलं. देव आनंद यांनीसुद्धा त्याच उत्कटतेने गुरुदत्त यांना सांगितलं की, मी कधी चित्रपट निर्मितीत उतरलो, तर माझ्या पहिल्या चित्रपटाचा दिग्दर्शक तूच असशील. हे वचन त्यांच्या लक्षात होतं, त्यामुळे त्यांच्या नवकेतन फिल्म्स या संस्थेने बाझी हा चित्रपट तयार करायचं ठरवलं, तेव्हा त्याच्या दिग्दर्शनाची जबाबदारी गुरुदत्त यांच्याकडे देण्यात आली."

देव आनंद

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, देव आनंद

ललितमोहन जोशी सांगतात, "बाझी चित्रपट पाहिल्यावर, त्यांनी या चित्रपटासाठी कोणकोणत्या लोकांची निवड केली हे लक्षात येतं. गुरुदत्त यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. बलराज साहनी यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली होती. शिवाय, साहिर लुधियानवी यांनी गाणी लिहिली होती, तर एस. डी. बर्मन यांनी संगीत दिलं होतं. सोबतच जोहरा सहगलसुद्धा होत्या. देव आनंद यांची स्वतःची अशी दृष्टी होती. मोठा चित्रपट कसा करायचा, याची कल्पना त्यांना करता येत होती."

सुरैयाच्या प्रेम

देव आनंद आणि सुरैया यांचे प्रेमसंबंध, ही हिंदी चित्रपटसृष्टीमधील विलक्षण प्रेमकहाण्यांपैकी एक आहे. त्या वेळची आठवण सांगताना देव आनंद बीबीसीला म्हणाले होते, "पहिल्याच दिवसापासून आम्ही एकमेकांना आवडू लागलो होतो. ती खूप मोठी स्टार होती. तिच्याकडे मोठमोठ्या गाड्या होत्या. कॅडलक होती, लिंकन होती, आणि मी मात्र पायी जात होतो. मी तरुण होतो, चांगल्यापैकी आकर्षक होतो आणि माझ्यात आत्मविश्वास भरपूर होता. मग आमच्यातील मैत्री वाढत गेली."

पण ही मैत्री लग्नापर्यंत पोचू शकली नाही. देव आनंद यांनी मुंबईतील झवेरी बाजारातून सुरैया यांच्यासाठी हिऱ्याची एक अंगठी विकत घेतली. परंतु, सुरैया यांची आजी (आईची आई) बादशाह बेगम यांना हे संबंध मान्य नव्हते.

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

विख्यात चित्रपटविषयक इतिहासकार राजू भारतन यांनी 'अ जर्नी डाउन मेलडी लेन' या पुस्तकात लिहिलं आहे की, "सुरैया मला मरीन ड्राइव्हवर कृष्ण महल या त्यांच्या घरी बाल्कनीमध्ये घेऊन गेल्या. देव आनंद यांनी दिलेली अंगठी त्यांच्या आजीने मरीन ड्राइव्हवरच्या समुद्रात कशी फेकून दिली, हे त्यांनी मला तिथे सांगितलं."

परंतु, देव आनंद यांनी 'रोमान्सिंग विथ लाइफ' या त्यांच्या आत्मचरित्रमध्ये या घटनेचं दुसरं कथन नोंदवलं आहे, "मी पाठवलेली अंगठी घेऊन सुरैया समुद्रापाशी गेली. तिने अंगठीकडे शेवटचं प्रेमाने पाहिलं आणि समुद्रात दूर लाटांमध्ये फेकून दिली."

काळाच्या पुढचा चित्रपट- 'गाइड'

'गाइड' हा चित्रपट देव आनंद यांच्या कारकीर्दीचं शिखर होता. आर. के. नारायण यांच्या कादंबरीवर आधारीत या चित्रपटाला जगभरात समीक्षकांची दाद मिळाली आणि भारताच्या वतीने ऑस्कर पुरस्कारांसाठी हा चित्रपट पाठवण्यात आला होता.

मोहन चुडीवाला सांगतात, "देवसाहेबांनी गाइड दोन भाषांमध्ये केला होता. पहिल्यांदा त्यांना या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी त्यांचे मोठे भाऊ चेतन आनंद यांच्याकडे सोपवायची होती. पण त्या वेळी चेतन हकीकत हा चित्रपट करत होते. मग त्यांनी राज खोसला यांनी दिग्दर्शक म्हणून घ्यायचा प्रयत्न केला. पण राज खोसला आणि वहिदा रहमान यांचे संबंध ठीक नसल्यामुळे त्यांना हाही पर्याय सोडून द्यावा लागला."

देव आनंद

फोटो स्रोत, VIDYA MOVIE

"शेवटी देव आनंद यांनी त्यांचे छोटे भाऊ गोल्डी आनंद यांची दिग्दर्शक म्हणून निवड केली. या चित्रपटाची कथा विवाहबाह्य संबंध दाखवणारी असल्यामुळे पटकथा पुन्हा लिहावी लागेल, असं गोल्डी यांनी सांगितलं. त्यांनी स्वतः ही पटकथा नव्याने लिहिली. आता या कथेचा शेवट नारायण यांच्या कादंबरीपेक्षा निराळ्या पद्धतीने करण्यात आला. हा चित्रपट त्या काळाच्या बराच पुढचा होता. या चित्रपटातून देवसाहेबांना काय सांगायचं होतं, हे लोकांना चित्रपट वारंवार पाहिल्यानंतर लक्षात आलं."

आपल्यासाठी हा चित्रपट सर्वोत्कृष्ट असल्याचं वहिदा रहमान कायमच म्हणतात. सुरुवातीला आर. के. नारायण यांना या चित्रपटाचं रूप रुचलं नव्हतं, पण शेवटी त्यांना चित्रपट दाखवण्यात आल्यावर त्यांना अत्यानंद झाला. तुम्ही माझी कथा बदलली आहे, पण त्यामुळे आता ती एक स्वतंत्र कलाकृती झालेय, असं नारायण म्हणाले.

'देवसाहेब' हे संबोधन त्यांना खटकायचं

वहिदा रहमान यांनी 'सीआयडी' या त्यांच्या पहिल्या चित्रपटात देव आनंद यांच्या सोबत काम केलं होतं. दोघांनी एकूण सात चित्रपटांमध्ये एकत्र काम काम केलं. बीबीसीशी बोलताना वहिदा रहमान म्हणाल्या होत्या, "'वहिदा, तू मला फक्त 'देव' असंच म्हण', असं ते मला म्हणाले. 'मी असं कसं काय म्हणू', असं त्यांना विचारलं."

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

"'तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, सिनियर आहात, इतके मोठे स्टार आहात', असं मी त्यांना म्हटलं. त्यावर ते म्हणाले, 'माझ्या नायिकांनी मला 'साहेब' किंवा 'मिस्टर आनंद' असं म्हटलं तर मला त्यांच्या सोबत नीट काम करता येत नाही'. सेटवर गेल्यावर त्यांना 'गुड मॉर्निंग, मिस्टर आनंद' असं म्हणायची मला सवय होती. मी असं म्हटल्यावर ते इकडेतिकडे बघायचे आणि मी कोणाशी बोलतेय असं विचारायचे. तर, मी त्यांच्याशीच बोलत असल्याचं त्यांना सांगायचे. 'पण मी तर देव आहे,' असं ते सांगायचे. काही दिवसांनी मलाही त्यांना 'देव' अशीच हाक मारायची सवय लागली."

अनेक प्रतिभावान कलाकारांना शोधलं

देव आनंद यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला अनेक प्रतिभावान कलाकार दिले. शत्रुघ्न सिन्हा, जॅकी श्रॉफ, टिना मुनीम, तब्बू आणि झीनत अमान या सर्वांना पहिल्यांदा देव आनंद यांनी संधी दिली.

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

ललितमोहन जोशी म्हणतात, "त्यांचं प्रयोगशील आणि चौकटीबाहेर विचार करणारं व्यक्तिमत्व याला कारणीभूत होतं. त्यांना ड्रग्सच्या वापरासंदर्भात 'हरे रामा हरे कृष्णा' हा चित्रपट करायचा होता. त्यासाठी ते कधी लंडनला जायचे, तर कधी नेपाळला नि कधी दिल्लीला जायचे. त्यांच्यात खूप कुतूहल होतं. ते निवडलेल्या विषयावर बराच वेळ खर्च करायचे. त्यांनी एका पार्टीत झीनत अमान यांना पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा झीनत सिगरेट पीत होत्या. देवसाहेबांनी त्यांना हॅलो म्हटलं, तर त्यासुद्धा त्यांना हॅलो म्हणाल्या आणि सिगरेटही देऊ केली. आपण झीनत अमानला पहिल्यांदा पाहिलं, तेव्हाच ही मुलगी आपल्या चित्रपटात काम करेल असं आपण ठरवलं होतं, असं देवसाहेब कालांतराने म्हणाले."

झीनत अमान यांच्याही प्रेमात पडले

काही काळाने देव आनंद झीनत अमान यांच्याही प्रेमात पडले. 'रोमान्सिंग विथ लाइफ' या आपल्या आत्मचरित्रात देव आनंद लिहितात, "मी झीनतच्या प्रेमात पडल्याचं एके दिवशी माझ्या लक्षात आलं. हे तिला सांगण्यासाठी मी ताज हॉटेलात रेनडावू रेस्तराँमध्ये एक टेबल बुक केलं. त्या आधी आम्हाला एका पार्टीत सोबत जायचं होतं. तिथे दारूच्या नशेत बुडालेल्या राज कपूरने झीनतचं पहिल्यांदा स्वागत केलं.

"झीनतने वाकून त्यांच्या पाया पडायचा प्रयत्न केला. पण त्यांच्यात थोडी जास्तच जवळीक असल्याचं मला जाणवलं. माझ्या समोरच राज झीनतला म्हणाले, 'कायम सफेद कपडे घालायचं आश्वासन तू पाळलं नाहीस.'

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

"त्या वेळेपासून झीनत माझ्यासाठी आधीसारखी उरली नव्हती. 'तुम्ही एन्जॉय करा, मी निघतो', असं मी झीनतला सांगितलं. 'पण आपल्याला कुठेतरी जायचं होतं ना', असं झीनत म्हणाली. 'काही हरकत नाही', असं मी म्हणालो. मग मी तिथून बाहेर पडलो." त्यानंतर देव आनंद यांनी झीनत अमान यांच्याकडे परत कधी पाहिलं नाही.

देव आनंद आणि नेहरू यांची भेट

१९४७नंतर हिंदी चित्रपटांवर राज कपूर, 'ट्रॅजेडी किंग' दिलीप कुमार आणि रोमॅन्टिक हिरो देव आनंद, या तीन अभिनेत्यांचं वर्चस्व होतं. एकदा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या तिघांना भेटायला निमंत्रित केलं.

'रोमान्सिंग विथ लाइफ'मध्ये देव आनंद लिहितात, "आम्ही त्यांच्या अभ्यासिकेत गेलो, तेव्हा नेहरूंनी आमच्या तिघांचीही गळाभेट घेतली. तेव्हा त्यांची तब्येत बरी नव्हती, पण थोड्याच वेळात ते मूडमध्ये आले. राज कपूर यांनी याचा फायदा घेऊन त्यांना विचारलं, 'पंडितजी, तुम्ही जिथे जायचात तिथे बायका तुमच्या मागे धावायच्या, असं आम्ही ऐकलंय.'

देव आनंद

फोटो स्रोत, PYASA

यावर नेहरू त्यांचं विख्यात स्मितहास्य करत म्हणाले, 'तुम्हा लोकांइतका मी लोकप्रिय नव्हतो.' मग मीसुद्धा विचारलं, 'तुमच्या विलक्षण स्मितहास्याने लेडी माउंटबॅटन यांचं मन जिंकलं होतं, हे खरंय का?'

हे ऐकल्यावर नेहरूंचा चेहरा लालबुंद झाला, पण त्यांनी माझा प्रश्न खिलाडूपणे घेतला आणि ते हसत म्हणाले, 'माझ्याबद्दल बोलल्या जाणाऱ्या या गोष्टी ऐकून मला मजा वाटते.'

मधे दिलीप म्हणाले, 'पण स्वतः लेडी माउंटबॅटन यांनी कबूल केलेलं की, तुमच्याबद्दल त्यांच्या मनात नाजूक कोपरा राखून ठेवलेला आहे.' त्यावर नेहरू म्हणाले, 'मी या गोष्टींवर विश्वास ठेवावं, असं लोकांना वाटत असतं'."

'४७११ कोलोन'- देव आनंद यांच्या आवडीचा पर्फ्यूम

भारतातील विख्यात शेअर मार्केट तज्ज्ञ मोहन चुडीवाला देव आनंद यांचे घनिष्ठ स्नेही होते. ते सांगतात, "मी माझ्या बेडरूममध्ये देव आनंद यांचं मोठं छायाचित्र लावलेलं आहे. त्यापुढे माथा टेकवून मी कामाला घराबाहेर पडतो. माझ्या बेडरूममधील कुशनवरसुद्धा देव आनंद यांचं छायाचित्र लावलेलं आहे. त्यांच्या निधनाच्या काहीच दिवस आधी मी त्यांच्या आवडीचा ४७११ कोलोन हा पर्फ्यूम विकत घेतला होता. त्यांना हा पर्फ्यूम खूप आवडत असे."

चुडीवाला सांगतात, "एकदा आम्ही दोघे किंगफिशर एअरलाइन्सने लंडनला जात होतो. त्यांच्या फर्स्ट क्लासमधल्या टॉयलेटमध्ये ४७११ कोलोन ठेवलेला होता. देवसाहेब ते पाहून खूश झाले. आपल्याला तितला कोलोन विकत घेता येईल का, असं मी एअरहोस्टेसला विचारू का, असं मी देवसाहेबांना विचारलं.

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

पण हे बरं दिसणार नाही, आपण लंडनमध्ये विकत घेऊ, असं देव आनंद म्हणाले. पण लंडनला कोलोन शोधूनही सापडला नाही. मी मुंबईत आल्यानंतर एकाकडून कोलोन मागवला होता. पण पर्फ्यूम त्यांना देण्याआधीच ते हे जग सोडून गेले. अजूनही मी कोलोनची ती बाटली त्यांच्या आठवणीसाठी माझ्याकडे तशीच ठेवलेली आहे, तिचं झाकणसुद्धा मी आजतागायत उघडलेलं नाही.

"त्यांना पोलो ग्रीन हा पर्फ्यूमसुद्धा खूप आवडत असे. माझ्याकडे त्यांची टोपी, स्कार्फ, जॅकेट, मनगटी घड्याळ, मोबाइल आणि त्यांचं पेन असं सगळं सुरक्षित ठेवलेलं आहे. त्यांची जुनी फोर्ड आयकॉन 524 कारसुद्धा मी विकत घेतली. ती आता खूपच जुनी झालेय, पण माझ्या लेखी तिचं भावनिक महत्त्व खूप जास्त आहे.

"मी ती कार अजूनही जशीच्या तशी कोरीकरकरीत ठेवलेली आहे. माझ्यासाठी ती गाडी देवळासारखी आहे. त्या गाडीत बसल्यावर मला त्यांचा सहवास जाणवतो. मी नवीन मर्सिडीस कार घेतली, तेव्हा तिथल्या ग्लव्ह बॉक्समध्ये मी देव आनंद यांची टोपी ठेवली. माझ्या प्रत्येक कारमध्ये त्यांच्या 'रोमान्सिंग विथ लाइफ' या आत्मचरित्राची एकेक प्रत ठेवलेली आहे."

फिटनेसची आवड

देव आनंद त्यांच्या तब्येतीची खूप काळजी घेत असत. एके काळी बीबीसीसोबत काम केलेले संजीव श्रीवास्तव यांनी मला सांगितलं होतं की, देवसाहेब मुलाखत देण्यासाठी मुंबईला त्यांच्या घरी आले, तेव्हा 76 वर्षांचे असतानासुद्धा नवव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये जाण्यासाठी त्यांनी लिफ्टऐवजी जिन्यांचाच वापर केला.

देव आनंद

फोटो स्रोत, Getty Images

मोहन चुडीवाला सांगतात, "देव आनंद यांच्या हेल्थ रिपोर्टला फ्रेम करून ठेवायला हवं, असं डॉक्टर म्हणायचे. दिवसातून ते 11 ग्लास कोमट पाणी प्यायचे. ते पोटभर नाश्ता करत. त्यात लापशी असायची. चहात ते थोडा मध घालत. कधी ऑमलेट खायचे. पण ते दुपारचं जेवण घेत नसत. रात्रीच्या जेवणानंतर ते थोडा फेरफटका मारत. त्यांना शाकाहारी जेवण जास्त आवडायचं आणि वांग्याचं भरीत त्यांच्या आवडीचं होतं. ते दारू किंवा सिगरेट प्यायचे नाहीत."

चुडीवाला सांगतात, "मुंबईतल्या टेलिफोन डिरेक्टरीमध्ये अभिनेत्यांची नाव आणि दूरध्वनी क्रमांक नोंदवले जात नसत. पण त्यात 'ए' अक्षराच्या यादीत देव आनंद यांचं नाव मात्र असायचंच. - आनंद देव, 2, आयरिस पार्क, जुहू, मुंबई. आणि त्यांचा क्रमांक त्यापुढे लिहिलेला असायचा. ते स्वतः फोन उचलायचे.

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

त्यांच्या घरी फोन केल्यावर 'काय काम आहे?' असं विचारणारं कोणी ऑपरेटर किंवा सेक्रेटरी नसायचं. आपल्याला कोण-कोण संपर्क करू इच्छितं, हे त्यांना जाणून घ्यायचं असे. वाढदिवसाच्या दिवशी वय सांगायला त्यांचा तीव्र विरोध होता. 'एजिंग इज अ स्टेट ऑफ माइंड' असं त्यांचं म्हणणं होतं. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते रोज १८ तास काम करायचे."

नवाझ शरीफ यांच्याशी मैत्री

नेपाळचे राजे महेंद्र, भारताचे माजी संरक्षण मंत्री कृष्ण मेनन आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ हे देव आनंद यांचे जवळचे मित्र होते. अटलबिहारी वाजपेयी त्यांना बसमधून लाहोरला घेऊन गेले, तेव्हा त्यांची शरीफ यांच्याशी पहिली भेट झाली.

देव आनंद

फोटो स्रोत, Getty Images

भारतातून आपल्यासाठी काय आणू, असं वाजपेयींनी बसप्रवास सुरू होण्यापूर्वी नवाझ शरीफ यांना विचारलं. त्यावर शरीफ म्हणाले, तुम्ही फक्त देव आनंद यांना तुमच्या सोबत घेऊन या. यानंतरच्या काळात देव आनंद जेव्हाकेव्हा लंडनला जायचे तेव्हा नवाझ शरीफ त्यांना भेटण्यासाठी तिथे जात असत.

मोहन चुडीवाला या संदर्भातील आठवण सांगताना म्हणतात, "हाइड पार्कमध्ये नवाझ शरीफ यांचा एक महाल होता. तिथे ते देवसाहेबांना जेवणासाठी बोलवायचे. 'आज तुम्ही लोकांनी काय केलंत?' असं ते मला विचारायचे. आम्ही हॅरड्समध्ये हॉट चॉकलेट प्यालो, असं मी सांगितल्यावर ते म्हणायचे, 'मलासुद्धा देवसाहेबांसोबत तिकडे घेऊन चला.' आम्ही त्यांच्या घरी जेवायला गेलो, तेव्हा त्यांची पत्नी कुलसुम हयात होत्या. 'मी देवसाहेबांना तुमची एक खोडी सांगू का,' असं त्यांनी जेवणाच्या टेबलावर नवाझसाहेबांना विचारलं."

देव आनंद

फोटो स्रोत, MOHAN CHUDIWALA

नवाझ शरीफ यांनी पत्नीला असं न करण्याचं सुचवलं. मी त्यांना आग्रह केल्यावर त्या म्हणाल्या, "आमच्या मियाँसाहेबांनी घरातली सीआयडी चित्रपटाची डीव्हीडी खराब करून टाकली आहे. 'लेके पहेला पहेला प्यार' हे गाणं सुरू झालं की हेसुद्धआ देवसाहेबांसारखे थिरकायला लागतात आणि स्लो मोशनमध्ये गाणं वारंवार बघत राहतात."

हुसैन यांनी देव आनंद यांचं चित्र काढलं

देव आनंद यांना एम. एफ. हुसैन यांचंही काम आवडायचं. एकदा ऑफिसातल्या खुर्चीवर रेललेल्या देव आनंद यांचं रेखाचित्र हुसैन यांनी 15 मिनिटांत काढून त्यांना भेट दिलं होतं. या संदर्भातील आठवण सांगताना मोहन चुडीवाला म्हणतात, "एकदा फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याची निमंत्रणपत्रिका देवसाहेबांकडे आली, तेव्हा त्या पत्रिकेवर हुसैनसाहेबांनी काढलेलं चित्र छापलं होतं. ते बघून त्यांना हुसैनसाहेबांची आठवण आली.

देव आनंद

फोटो स्रोत, MOHAN CHUDIWALA

"त्यांनी लगेच हुसैन यांना फोन केला आणि आठवण येत असल्याचं सांगितलं. तुमच्या हाताचं चुंबन घ्यायची इच्छा होतेय, असं ते म्हणाले. त्या वेळी केवळ देव आनंद यांना भेटण्यासाठी हुसैन रात्री इंदूरहून मुंबईला आले आणि त्यांना भेटून परत इंदूरला गेले."

महिलांमध्ये लोकप्रिय

देव आनंद यांच्या उत्फुल्ल व्यक्तिमत्वामुळे ते कधी म्हातारे झाले नाहीत. ललितमोहन जोशी सांगतात, "दिलीप कुमार, राज कपूर आणि देव आनंद या तिघांचंही व्यक्तिमत्व वेगवेगळं होतं. दिलीप कुमार यांचा अभिनय गंभीर स्वरूपाचा होता, त्यात खोली होती. ते एका वेळी एकाच चित्रपटामध्ये काम करत असत. राज कपूर यांनी पहिल्यांदाच भारतीय चित्रपटांना आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. पण देव आनंद यांना घरोघरी लोकप्रियता मिळाली होती.

देव आनंद

फोटो स्रोत, PENGUIN VIKING

"मी लखनौला माझ्या आत्याकडे राहून शिकलो. ती आत्या माझ्या आईच्या वयाची होती, पण देव आनंद आपल्या स्वप्नात यायचे, असं तिने एकदा कबूल केलं होतं. आमच्या वयाच्या मुलीसुद्धा देव आनंद यांच्या चाहत्या होत्या आणि त्यानंतरच्या पिढीतही त्यांच्या प्रशंसक महिलांची संख्या कमी नव्हती. देव आनंद यांच्याबद्दल लोकांना वाटणारा आपलेपणा दिलीप कुमार किंवा राज कपूर यांच्याबद्दल वाटला असेल का, याचा अंदाज नाही. हे दोघे महान कलाकार होते, पण देव आनंद सर्वसामान्य माणसाशी जोडले गेले होते. त्यामुळे लोक- विशेषतः महिला त्यांच्यावर वेड्यासारखं प्रेम करत."

शिवाय, त्यांच्या चित्रपटांचं कथासूत्र शहरी असायचं. 'काला बाजार' हा चित्रपट ब्लॅक मार्केटिंगवर होता. 'तेरे मेरे सपने' डॉक्टरी पेशावर आणि डॉक्टर लोकांना गावांकडे का जायचं नसतं या प्रश्नावर होता. 'देस परदेस' या चित्रपटामध्ये अनिवासी भारतीयांच्या समस्या दाखवल्या होत्या. त्यांच्या डोक्यात कायम काही ना काही कल्पना रेंगाळत असायची. किमान चाळीस वर्ष देव आनंद यांचं वलय चित्रपटचाहत्यांवर भुरळ टाकून होतं.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)