IC 814 या अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील वेबसीरिजमुळे वाद का निर्माण झालाय?

या मालिकेत अभिनेता विजय वर्मा (मध्यभागी) याने कॅप्टन देवी शरणची भूमिका साकारली आहे

फोटो स्रोत, Netflix PR

फोटो कॅप्शन, या सिरीजमध्ये अभिनेता विजय वर्मा (मध्यभागी) याने कॅप्टन देवी शरणची भूमिका साकारली आहे

एखाद्या घटनेवर आधारित वेबसीरिज प्रदर्शित झाल्यावर त्यावर वाद निर्माण होण्याचे प्रकार अनेकदा घडत असतात. विमान अपहरणाच्या सत्यघटनेवर आधारित नव्या वेबसीरिजमुळे वाद निर्माण झाला आहे. यातून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होते आहे. ही वेबसीरिज नेमकी कशावर आधारित आहे, नेमका वाद काय आहे आणि प्रत्यक्षात काय घडलं याविषयी...

चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा आणि त्यांची नवी वेबसीरिज सध्या चर्चेत आहे. अलीकडेच नेटफ्लिक्स या ओटीटी व्यासपीठावर IC 814 ही सीरिज प्रदर्शित झाली आहे. डिसेंबर 1999 मध्ये झालेल्या कंदहार विमान अपहरणावर ही वेबसीरिज आधारित आहे.

या वेबसीरिजवर बहिष्कार घातला जाण्याची मागणी, सोशल मीडियात केली जातेय.

त्यासाठी काही सोशल मीडिया युजर्स #IC814, #BoycottNetflix, #BoycottBollywood सारखे हॅशटॅग चालवत आहेत. या हॅशटॅगद्वारे ते याला विरोध करत आहेत.

वेबसीरिजवर काय आरोप होतो आहे?

चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी जाणूनबुजून सत्याचा विपर्यास केला असल्याचा आरोप सोशल मीडियावरील काही युजर्स करत आहेत.

त्यांचं म्हणणं आहे की या वेबसीरिजचा वापर विशिष्ट प्रपोगांडा करण्यासाठी करण्यात आला आहे. कारण यामध्ये अपहरणकर्त्यांची नावं चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर अशी दाखवण्यात आली आहेत.

त्याचबरोबर असाही आरोप केला जातो आहे की यात चार अपहरणकर्त्यांची नावं मुद्दाम बदलण्यात आली आहेत.

वेब सिरीजमधील एक सीन

फोटो स्रोत, Netflix PR

फोटो कॅप्शन, वेब सिरीजमधील एक सीन

सोशल मीडियावर IC 814 या वेब सेरीज वरून वाद सुरू असतानाच ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी न्यूजनं बातमी दिली आहे की या प्रकरणात नेटफ्लिक्सच्या कंटेंट प्रमुखांना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं बोलावलं आहे.

ऑल इंडिया रेडिओ आणि डीडी न्यूज नुसार नेटफ्लिक्सच्या कंटेंट प्रमुखांना आज मंगळवारी (3 सप्टेंबर) माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांसमोर हजर राहावं लागणार आहे.

कोण काय म्हणालं?

या वादाच्या संदर्भात भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख अमित मालवीय यांनी वेबसीरिजच्या निर्मात्यांवर टीका केली आहे.

मालवीय म्हणाले, "IC 814 विमानाचे अपहरणकर्ते दहशतवादी होते. त्यांनी त्यांची मुस्लीम ओळख लपवली होती. अनुभव सिन्हा यांनी त्या अपहरणकर्त्यांना बिगर मुस्लीम नावं देऊन त्यांच्या गुन्ह्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे."

"याचा परिणाम काय होईल? काही दशकांनंतर लोकांना वाटेल की IC 814 विमानाचं अपहरण हिंदूंनीच केलं होतं."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

या सर्व वादाबाबत चित्रपट दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांनी आतापर्यंत कोणतंही उत्तर दिलेलं नाही. मात्र त्यांनी काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर अरुणेश कुमार यादव यांच्या एका पोस्टला रिपोस्ट केलं आहे.

या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, स्वत: भारत सरकारनं अपहरणकर्त्यांची नावं सांगितली होती.

मात्र डॉ. यादव यांची ती पोस्ट देखील पत्रकार सिद्धांत मोहन यांच्या पोस्टवर आधारित आहेत.

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, X

सिद्धांत मोहन यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की "अपहरणकर्त्यांच्या नावासंदर्भात काही लोक वाद पेटवत आहेत. ते म्हणत आहेत की अपहरणकर्त्यांचं खरं नाव का वापरण्यात आलं नाही? 'भोला' आणि 'शंकर' या नावांचा वापर करणं हा हिंदू धर्माचा अपमान आहे."

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, X

"वस्तुस्थिती अशी आहे की अपहरणकर्ते याच नावानं विमानात दाखल झाले होते. त्यांची खरं नावंदेखील वेबसीरिजच्या शेवटी दाखवण्यात आली आहेत."

त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सरकारच्या प्रसिद्धीपत्रकाचा एक भाग देखील सोबत जोडला आहे.

मुकेश छाबडा या वेब सेरीजचे कास्टिंग डायरेक्टर आहेत. त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितलं की "या वेब सेरीजसाठी पूर्ण संशोधन करण्यात आलं आहे. अपहरणकर्ते एकमेकांना याच नावांनी हाक मारत होते."

सत्य काय आहे?

6 जानेवारी 2000 ला गृह मंत्रालयानं जे प्रसिद्धी पत्रक जारी केलं होतं. त्यानुसार अपहरणकर्त्यांची खरी नावं इब्राहिम अतहर (बहावलपूर), शाहिद अख्तर सैयद (गुलशन इकबाल, कराची), सनी अहमद काझी (डिफेन्स एरिया, कराची), मिस्त्री जहूर इब्राहिम (अख्तर कॉलनी, कराची) आणि शाकिर (सुक्कुर सिटी) अशी होती.

या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं होतं की प्रवाशांसमोर अपहरणकर्ते एकमेकांना चीफ, डॉक्टर, बर्गर, भोला आणि शंकर या नावांनी हाक मारत होते.

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, Netflix PR

गृह मंत्रालयाची ही माहिती किंवा प्रसिद्धी पत्रक भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर अजूनही उपलब्ध आहे.

गृह मंत्रालयानं म्हटलं होतं की विमान अपहरणाच्या घटनेनंतर भारताच्या गुप्तहेर यंत्रणांनी मुंबईतून चार कट्टरतावाद्यांना अटक केली होती.

मंत्रालयानुसार या कट्टरतावाद्यांकडून माहिती मिळाली होती की विमान अपहरणाची पूर्ण योजना आयएसआय (ISI)या पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेनं आखली होती. तर हरकत-उल-अंसार या कट्टरतावादी संघटनेनं प्रत्यक्ष अपहरणाचं काम केलं होतं.

वेबसीरिज कशावर आधारित आहे?

पत्रकार श्रीन्जॉय चौधरी आणि कॅप्टन देवी शरण (फ्लाइट IC 814 चे पायलट) यांनी IC 814 च्या अपहरणावर 'फ्लाइट इनटू फियर: द कॅप्टन्स स्टोरी' हे पुस्तक लिहिलं आहे. नेटफ्लिक्सवरील ही बेबसीरिज याच पुस्तकावर आधारित आहे.

ही वेबसीरिज भारतीय विमानाचं अपहरण करून अफगाणिस्तानातील कंदहारला नेण्यात आल्याच्या घटनेवर आधारित आहे.

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, Netflix PR

या वेब सेरीजमध्ये विजय वर्मा, नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, मनोज पाहवा, अरविंद स्वामी, अनुपम त्रिपाठी, दीया मिर्झा, पत्रलेखा, अमृता पुरी, दिब्येंदु भट्टाचार्य आणि कुमुद मिश्रा या कलाकारांच्या भूमिका आहेत.

कंदहारमध्ये नेमकं काय झालं होतं?

24 डिसेंबर 1999 ला नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडूहून दिल्लीला येत असलेल्या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. हरकत-उल-अंसार या कट्टरतावादी संघटनेच्या पाच सदस्यांनी हे विमान अपहरण केलं होतं.

अपहरणाच्या वेळेस विमानातील प्रवासी आणि कर्मचारी (क्रू) मिळून एकूण 180 जण होते. विमान अपहरण केल्यानंतर काही तासांतच अपहरणकर्त्यांनी रुपिन कट्याल या प्रवाशाची हत्या केली.

25 वर्षांच्या रुपिनवर अपहरणकर्त्यांनी चाकूनं अनेक वार केले होते.

रात्री पावणेदोन वाजता हे विमान दुबईत पोहोचलं. तिथे विमानात इंधन भरण्याच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी काही प्रवाशांना सोडावं, अशी तडजोड झाली.

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, Netflix PR

त्यानुसार दुबईत 27 प्रवाशांची सुटका करण्यात आली. यात बहुतांश महिला आणि मुलं होती. यानंतर विमान अफगाणिस्तानातील कंदहार इथं नेण्यात आलं.

विमानात सिमोन बरार नावाची महिला प्रवासी होती. सिमोन यांना पोटाचा कर्करोग होता. कंदहार ला त्यांना उपचारासाठी विमानाबाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. अर्थात ती देखील फक्त 90 मिनिटांसाठी.

विमानातील प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात सुरुवातीला अपहरणकर्त्यांनी त्यांच्या 36 कट्टरतावादी साथीदारांच्या सुटकेसह 20 कोटी अमेरिकन डॉलरच्या खंडणीची मागणी भारत सरकारसमोर ठेवली होती.

हे 36 कट्टरतावादी त्यावेळी भारतातील वेगवेगळ्या तुरुंगात होते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

त्याचबरोबर एका काश्मीरी विभाजनवाद्याचा मृतदेह ताब्यात देण्याच्या मागणीवर देखील अपहरणकर्ते अडून बसले होते. मात्र तालिबाननं त्यांना आवाहन केल्यानंतर त्यांनी पैसे आणि मृतदेहाची मागणी मागे घेतली.

भारतीय तुरुंगात असणाऱ्या कट्टरतावाद्यांची सुटका करण्याच्या मागणीवर मात्र अपहरणकर्ते अतिशय ठाम होते.

अपहरणकर्ते आणि भारत सरकार यांच्यातील वाटाघाटी आणि थरार आठ दिवस चालला. अखेर वाजपेयी सरकार भारतीय तुरुंगात असणाऱ्या काही कट्टरतावाद्यांची सुटका करण्यास तयार झाल्यानंतर हे अपहरणनाट्य संपलं.

IC 814 : अनुभव सिन्हा यांच्या नेटफ्लिक्सवरील नव्या वेबसीरिजमुळे वाद होण्यामागचं कारण काय?

फोटो स्रोत, Netflix PR

बरोबर आठ दिवसांनी, वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 डिसेंबर 1999 ला सरकारनं या वाटाघाटी यशस्वी झाल्याची घोषणा केली. पंतप्रधान वाजपेयी यांनी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला देशाला माहिती देताना सांगितलं की, अपहरणकर्त्यांच्या मागण्या बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात सरकारला यश आलं आहे.

जसवंत सिंह तत्कालीन केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री होते. 31 डिसेंबर 1999 ला जसवंत सिंह स्वत: तीन कट्टरतावाद्यांना त्यांच्यासोबत कंदहारला घेऊन गेले.

ज्या कट्टरतावाद्यांना सोडण्याचा निर्णय झाला होता, ते कट्टरतावादी म्हणजे, जैश-ए-मोहम्मद या कट्टरतावादी संघटनेचा प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद.

या कट्टरतावाद्यांच्या बदल्यात अपहरणकर्त्यांनी विमानातील प्रवासी, कर्मचाऱ्यांची सुटका केली होती आणि या अपहरणनाट्याचा शेवट झाला होता.

( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)