कोरियातील या 'हॅपिनेस फॅक्टरी'मध्ये आई-वडील स्वत:ला का कोंडून घेत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, ह्योजंग किम
- Role, बीबीसी कोरियन प्रतिनिधी
शारीरिक आरोग्याबाबत जगभरात चर्चा होते आणि जागरूकताही पाहायला मिळते. पण, त्याहूनही अधिक महत्त्वाच्या मानसिक आरोग्याबद्दल मात्र जगभरातच अनास्था पाहायला मिळते.
मानसिक आरोग्याकडं किंवा मानसिक समस्यांकडं पुरेसे किंवा अजिबात लक्ष दिले जात नाही.
दक्षिण कोरियातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात मानसिक समस्या आढळून येत आहेत. नोकरी मिळण्यातील अडचण किंवा आर्थिक स्थैर्याचा अभाव यामुळं हे तरुण स्वत:ला बंद खोल्यांमध्ये कोंडून घेत आहेत, एकांतवासात राहत आहेत. त्यामुळं त्यांच्या पालकांसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.
मुलांच्या एकटेपणाच्या मन:स्थितीबाबत जाणून घेण्यासाठीच पालक हॅपिनेस फॅक्टरी मध्ये राहत आहेत. ही समस्या नेमकी काय आहे? किंवा हॅपिनेस फॅक्टरी काय आहे, हे सविस्तरपणे जाणून घेऊया.
कोरियातील 'हॅपिनेस फॅक्टरी' मधील छोट्या खोल्यांना बाहेरील जगाबरोबर जोडणारी एकमेव गोष्ट म्हणजे त्या खोल्यांच्या दरवाजावरील एका छोटीशी जागा. तिचा वापर वापर खोलीत जेवण पोहोचवण्यासाठी केला जातो. त्याला फीडिंग होल असं म्हणतात.
या छोट्या बंद खोल्यांमध्ये राहणाऱ्यांना फोन, लॅपटॉप बाळगण्याची परवानगी नाही.
या खोल्या स्टोअर एवढ्या आहेत आणि त्यात राहणाऱ्यांना साथ असते ती फक्त रिकाम्या भिंतींची.
या खोल्यांमध्ये राहणारे लोक तुरुंगात कैदी घालतात तसे कपडे परिधान करतात.

फोटो स्रोत, KOREA YOUTH FOUNDATION
हे सगळे लोक जगातील धावपळ, गोंगाटापासून दूर 'एकांतात राहण्याचा अनुभव' घेण्यासाठी या खोलीत राहत आहेत.
यातील बहुतांश लोक असे आहेत, ज्यांची मुलं समाजापासून पूर्णपणे दुरावली आहेत किंवा दूर गेली आहेत.
जगापासून वेगळं, एकांतात राहिल्यावर काय वाटतं? काय अनुभव येतो? हे जाणून घेण्यासाठी हे आई-वडील या बंद खोल्यांमध्ये राहत आहेत.
एक खोली आणि एकांतवास
जगापासून आणि समाजापासून वेगळे किंवा दूर राहणाऱ्या लोकांना 'हिकिकोमोरी' म्हणतात. जपानमध्ये 1990 च्या दशकात हिकिकोमोरी शब्दाचा जन्म झाला होता. जपानमधील तरुण आणि मुलं समाजापासून वेगळे राहत होते. त्याचं गांभीर्य दर्शवण्यासाठी तेव्हा या शब्दाचा वापर केला जायचा.
गेल्यावर्षी दक्षिण कोरियातील हेल्थ अँड वेल्फेअर मिनिस्ट्री म्हणजे आरोग्य आणि समाजकल्याण मंत्रालयानं 15 हजार लोकांचं एक सर्वेक्षण केलं. 19 ते 34 वयोगटातील तरुणांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणात असं आढळून आलं की, यामध्ये सहभागी होणाऱ्या 5 टक्के लोकांना एकांतवासात राहणं आवडतं.
या आकडेवारीचा दक्षिण कोरियाच्या एकूण लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून विचार केला तर त्याचा अर्थ असा होईल की, पाच लाख 40 हजार लोकांना जग आणि समाजापासून वेगळं राहण्याची इच्छा होती.
दक्षिण कोरियातल्या अशाच एकांतात राहणाऱ्या किंवा राहू इच्छिणाऱ्या तरुणांचे आई-वडील या वर्षी एप्रिलपासून 13 आठवड्यांच्या पॅरेंटल एज्युकेशन प्रोग्राम म्हणजे पालकत्व शिक्षण कार्यक्रमात सहभागी होत आहेत.

फोटो स्रोत, KOREA YOUTH FOUNDATION
'कोरिया यूथ फाऊंडेशन' आणि 'ब्लू व्हेल रिकव्हरी सेंटर' या दोन स्वयसेंवी संस्थांच्या मदतीनं हा कार्यक्रम चालवला जात आहे.
एकांतात राहणाऱ्या मुलांशी अधिक चांगल्या पद्धतीनं संवाद कसा साधावा हे आई-वडिलांना शिकवणं हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
कार्यक्रमात भाग घेणाऱ्या लोकांना, गँगवॉन प्रांताच्या होंगचियॉन-गन याठिकाणी चालवल्या जाणाऱ्या हॅपिनेस फॅक्टरीच्या एका खोलीत तीन दिवस कोंडून राहावं लागतं. त्या ठिकाणालाच 'हॅपिनेस फॅक्टरी' म्हटलं जातं.
एकांतात काही काळ घालवल्यानंतर हे आई-वडील मुलांना अधिक चांगल्या रीतीनं समजून घेऊ शकतील, असं या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्यांना वाटतं.
मानसिक आरोग्य हेल्पलाईन
आरोग्य मंत्रालय - 080 4611 0007
सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय - 1800 599 0019
इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन बिहेवियर अँड अलायड सायंसेस - 9868 39 6824, 9868 39 6841, 011-2257 4820
विद्यासागर इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलायड सायन्सेस- 011 2980 2980
काही मानसोपचारतज्ज्ञ गरजूंना अत्यंत कमी शुल्क आकारून किंवा मोफत सेवाही देतात. अशा डॉक्टरांच्या यादीसाठी याठिकाणी क्लिक करा.
'भावनिक कैद'
जिन यंग-हेई (नाव बदललेले) यांचा मुलगा तीन वर्षांपासून खोलीबाहेर पडलेला नाही. त्याला एकटं राहायला आवडतं.
काही दिवस बंद खोलीत एकांतात राहिल्यानंतर आता, त्यांच्या 24 वर्षांच्या मुलाची 'भावनिक कैद' अधिक चांगल्या रीतीनं समजू शकते असं जिन यांना वाटतं.
50 वर्षांच्या जिन यंग-हेई यांच्या मते, "मी काय चुकीचं केलं असा विचार माझ्या मनात यायचा. असा विचार करणं खूपच त्रासदायक असायचं. पण, तिथं राहत असताना मी सर्वच गोष्टींबद्दल नव्यानं विचार केला आणि मला काही गोष्टींबाबत स्पष्टता मिळाली."
जिन म्हणतात की त्यांचा मुलगा आधीपासूनच हुशार होता. त्यांना आणि त्यांच्या पतीला मुलाकडून खूप अपेक्षा होत्या.
पण तो बऱ्याचदा आजारी असायचा. इतरांशी मैत्री करण्यास त्याला अडचण यायची. हळूहळू त्याला खातानाही अडचणी येऊ लागल्या. मग त्यानं शाळेत जाणं बंद केलं.
मुलगा जेव्हा विद्यापीठात गेला, तेव्हा सहा महिने सर्वकाही ठिक होतं. पण, नंतर एक दिवस त्यानं स्वतःला समाजापासून वेगळं करून घेतलं, असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, KOREA YOUTH FOUNDATION
"तो स्वत:च्या खोलीतच राहायचा, त्याने स्वत:ला त्या खोलीत कोंडून घेतलं होतं. स्वच्छता आणि खाण्या-पिण्याकडंही त्याचं अजिबात लक्ष नव्हतं," असंही त्या म्हणाल्या.
हे सर्व पाहून खचून गेल्याचं त्या सांगतात.
बोलताना कचरणे
जिन यंग-हेई यांनी सांगितलं की, त्यांच्या मुलाला तणाव हाताळणं, कुटुंब आणि मित्रांशी असलेलं नातं जपणं यात अडचणी येतात. त्यात चांगल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला नाही, त्यामुळं कदाचित चत्याला नैराश्यं आलं असावं. पण, याबाबत कोणाशीही बोलण्याची त्याला भीती वाटते किंवा संकोच वाटतो, असं त्यांनी म्हटलं.
जिन म्हणतात की 'हॅपिनेस फॅक्टरी' मध्ये आल्यानंतर त्यांनी एकांतात राहणाऱ्या तरुणांनी लिहिलेल्या नोट्स वाचल्या.
"या नोट्स वाचल्यानंतर मला जाणीव झाली की, खरं तर तो स्वत:चा बचाव करत होता. कारण त्याला वाटतं की, त्याला समजून घेणारं कोणीही नाही."
जिन यांच्या प्रमाणंच पार्क हान-सिल (नाव बदललेले) याही याठिकाणी आल्या आहेत. त्या त्यांच्या 26 वर्षांच्या मुलासाठी इथं आल्या आहेत. त्यांच्या मुलानं सात वर्षांपूर्वीच जगाशी संपर्क तोडला असून, तो एकांतात राहतो.
त्यांच्या मुलानं अनेकदा घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, आता त्याच्या खोलीबाहेरही पडत नाही.

फोटो स्रोत, KOREA YOUTH FOUNDATION
पार्क आपल्या मुलाला घेऊन डॉक्टर आणि समुपदेशकांकडं गेल्या. पण डॉक्टरांनी दिलेली औषधं घेण्यास त्यांच्या मुलानं नकार दिला. त्यांच्या मुलाला व्हिडिओ गेम खेळण्याचं व्यसन जडलं आहे.
संबंध ठेवण्यात अडचणी
पार्क हान-सिल यांच्या मते, मुलगा एकांतात राहत असल्यामुळं त्यांना मुलाशी बोलणंदेखील कठिण झालं होतं.
'हॅपिनेस फॅक्टरी'मध्ये आल्यानंतर मात्र, त्या मुलाच्या भावना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकत आहेत.
"त्याला जबरदस्तीनं विशिष्ट प्रकारे घडवण्यापेक्षा त्याचं आयुष्य जसं आहे, तसा मी त्याचा स्वीकार केला पाहिजे या गोष्टीची मला जाणीव झाली," असं त्या म्हणाल्या.
दक्षिण कोरियाच्या हेल्थ अँड वेल्फेअर मंत्रालयाच्या मते, तरुण जगापासून वेगळं राहत आहेत किंवा स्वत:ला एकांतवासात ठेवत आहेत, यामागं अनेक कारणं असू शकतात.
जगात आत्महत्येचं प्रमाण सर्वाधिक असणाऱ्या देशांमध्ये दक्षिण कोरियाचा समावेश आहे. मागील वर्षी दक्षिण कोरियाच्या सरकारनं ही समस्या दूर करण्यासाठी पाच वर्षांची एक योजना सुरू केली होती.
दर दोन वर्षांनी 20 ते 34 वर्षे वयोगटातील तरुणांच्या मानसिक आरोग्याची तपासणी केली जाईल, असं सरकारनं जाहीर केलं होतं. यासाठीचा सर्व खर्च सरकारतर्पे करण्यात येणार आहे.
1990 च्या दशकात जपानमध्ये तिथल्या तरुणांनी स्वत:ला समाजापासून वेगळं ठेवण्यास, एकांतात राहण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम म्हणजे त्यामुळं तिथल्या समाजात बदल होऊ लागला. मध्यमवयीन लोक म्हाताऱ्या आई-वडिलांवर अवलंबून राहायला लागले.

फोटो स्रोत, KOREA YOUTH FOUNDATION
याठिकाणचे वृद्ध फक्त पेन्शनच्या आधारे जगत होते. या वयात प्रौढ मुलांची मदत करणं या वृद्धांसाठी सोपं नव्हतं. अशा परिस्थितीत वृद्धांची आर्थिक परिस्थिती अधिक ढासळत गेली आणि ते अधिक गरीब होत गेले. अनेक जणांना तर या परिस्थितीमुळं नैराश्यं आलं.
क्युंग ही विद्यापीठातले समाजशास्त्राचे प्राध्यापक जियोंग गू-वॉ यांच्या मते, कोरियन समाजातील धारणेनुसार, आयुष्यातील काही मोठ्या उद्दिष्टांची पूर्तता विशिष्ट वयातच व्हायला हवी. त्यामुळं तरुणांमध्ये तणाव निर्माण होतो. उत्पन्नात वाढ न होणं आणि रोजगार न मिळणं या समस्या तिथं सर्वत्र आढळतात. त्यामुळे साहजिकच तरुणांवर मोठा दबाव येतो.
मुलांनी आयुष्यात मिळवलेलं यश हेच आई-वडिलांचं यश आहे हाच तिथल्या समाजाचा दृष्टीकोन आहे. साहजिकच मुलं अपेक्षित यश मिळवत नाहीत किंवा मुलांना त्या आघाडीवर अपयश येतं तेव्हा सर्व कुटुंब एकटं पडतं. सर्व कुटुंबच एकांतवासाच्या दरीत ढकललं जातं.
ज्या पालकांच्या मुलांना नोकरी मिळण्यात अडचण येते किंवा ज्यांच्या मुलांना आर्थिक स्थैर्य मिळत नाही, ते पालक यासाठी स्वत:ला दोष देतात. आपण मुलांचं जे संगोपन केलं त्यातच त्रुटी राहिल्या, असं त्यांना वाटतं. त्यासाठी ते पश्चाताप करतात.
प्राध्यापक जियोंग गू-वॉन यांच्या मते, दक्षिण कोरियामध्ये बहुतांश वेळा आई-वडील प्रेम किंवा भावना बोलून दाखवत नाहीत. कुटुंबाच्या आणि मुलांच्या जबाबदाऱ्या पार पाडून, कुटुंबाला स्थैर्य देऊन ते प्रेम व्यक्त करतात.

"आई-वडील मुलांच्या शिक्षणासाठी कठोर परिश्रम करतात, हे कन्फ्युशियस संस्कृतीत नेहमीच दिसून येतं. आई-वडिलांच्या या परिश्रमाकडे एका मोठ्या जबाबदारीच्या रुपात पाहिलं जातं."
ते म्हणतात की "इथल्या संस्कृतीत कठोर परिश्रमावर भर देण्यात आला आहे. त्याचा संबंध दक्षिण कोरियाच्या वेगाने झालेल्या विकासाशी देखील जोडून पाहिला जाऊ शकतो."
21 व्या शतकाच्या उत्तरार्धात इथे वेगानं आर्थिक विकास झाला. त्यामुळे दक्षिण कोरियाची अर्थव्यवस्था जगातील आघाडीच्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली.
वर्ल्ड इनइक्वालिटी डेटाबेस किंवा जागतिक विषमतेच्या आकडेवारीनुसार मात्र, मागील तीन दशकांमध्ये देशातील आर्थिक विषमता आणखी वाढली आहे.
ब्लू व्हेल रिकव्हरी सेंटरच्या संचालिका किन ओक-रॅन यांच्या मते, एकांतात राहणारे किंवा खोलीत स्वत:ला कोंडून घेणारे तरुण ही एक कौटुंबिक समस्या आहे. या दृष्टीकोनाचा एक परिणाम म्हणजे, अनेक आई-वडील मुलांशी असलेले संबंधच संपवून टाकू शकतात.
काही तरुणांना त्यांच्याबद्दल एक विशिष्ट मत बनवलं जाईल, अशी भीतीही वाटते. अशा परिस्थितीत ते त्यांच्या स्थितीबाबत, समस्येबाबत कुटुंबातील कोणाशीही बोलू शकत नाही. समस्या, भावना व्यक्त करण्यास ते कचरतात.
किम यांच्या मते, "हे तरुण त्यांच्या समस्यांवर मोकळेपणानं बोलू शकणार नसतील तर त्यामुळे त्यांचे पालकदेखील एकटे पडण्याचा धोका आहे. असे लोक मग अनेकदा सुट्ट्यांमध्ये कौटुंबीक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणं बंद करतात."
'चिंता करू नका...'
'हॅपिनेस फॅक्टरी'मध्ये एकांतात राहण्याच्या कार्यक्रमात सहभागी होणारे पालक आता मुलं त्यांच्याशी मोकळेपणानं बोलतील, त्या क्षणाची वाट पाहत आहेत. आपली मुलं पुन्हा समान्य आनंदी जीवन जगण्यास कधी सुरुवात करतील याची ते वाट पाहत आहेत.
मुलानं एकांतवासात राहणं सोडलं, तर मुलाला काय सांगाल असं आम्ही जिन यंग-हेई यांना विचारलं. प्रश्न ऐकून त्यांचे डोळे भरून आले आणि कंठही दाटला.
"तू खूप काही सहन केलं आहेस. हे सर्व खूप कठीण होतं ना? चिंता करू नकोस, मी तुझी काळजी घेईन," असं उत्तर त्यांनी दिलं.











