'साबर बोंडा', 'स्थळ'सारखे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला बॉलिवूडच्या सावलीतून बाहेर काढू शकतील?

मराठी चित्रपट उद्योगाला संस्थात्मक पाठिंबा कमी आहे, असं 'स्थळ'च्या निर्मात्यांपैकी शेफाली भूषण सांगत होत्या.

फोटो स्रोत, Dhun Production

फोटो कॅप्शन, मराठी चित्रपट उद्योगाला संस्थात्मक पाठिंबा कमी आहे, असं 'स्थळ'च्या निर्मात्यांपैकी शेफाली भूषण सांगत होत्या.
    • Author, निखिल इनामदार
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मराठीतला पहिला मूक चित्रपट 'राजा हरीशचंद्र' हा 1913 साली आला. त्याला मराठीतून सबटायटल्स दिले होते.

पण गेल्या काही दशकात मराठी चित्रपटातली अस्सलता हरवली आणि बॉलिवुडच्या हिंदी चित्रपटांची कास धरली. या अस्सलतेचं पुर्नरुज्जीवन करता येणं शक्य आहे का?

'स्थळ' या अलिकडेच प्रसिद्ध झालेल्या मराठी चित्रपटाच्या सुरुवातीला एक अतिशय उल्लेखनीय प्रसंग दाखवला आहे. त्यात लग्न ठरवण्यासाठी मुलीऐवजी मुलाचीच वर परिक्षा घेतली जात असते. मुलीला विचारतात तसे अपमानास्पद प्रश्न मुलाला विचारले जात असतात.

पण लगेचच चित्रपटाची नायिका, सविता झोपेतून आणि अशक्य वाटणाऱ्या स्वप्नातून जागी होते. तिचं खरं आयुष्य भारतातल्या बहुतांश स्त्रियांप्रमाणं लग्नाच्या परंपरेत अडकून पडलेलं असतं. तिच्या स्वप्नापेक्षा ते अगदी उलटं असतं.

भारतीय परंपरेतल्या ठरवून केलेल्या लग्नाच्या अंधारलेल्या बाजूकडे 'स्थळ' हा सिनेमा निर्भिडपणे पहायला शिकवतो. मोहक संगीत आणि नृत्यानं सजवून ही बाजू आत्तापर्यंत पडद्यावर फक्त रोमँटिक स्वरुपातच दाखवण्यात आली आहे.

या वेगळेपणामुळेच हा सिनेमा या वर्षीच्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या मराठी सिनेमांमध्ये सामील झाला आहे.

या यादीत 'साबर बोंडा' ही दोन पुरूषांमधली ग्रामीण प्रेमकथा पहिल्या स्थानावर आहे. सनडान्स चित्रपट महोत्सवामध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटानं तिथं ग्रँड ज्युरी पुरस्कारही पटकावला.

टोरन्टो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान या सिनेमाबद्दल बोलताना दक्षिण आशियाई चित्रपट विभागाच्या वरिष्ठ सल्लागार मिनाक्षी शेड्डे म्हणाल्या की, "ही एक धाडसी आणि नितांत सुंदर ग्रामीण भागातल्या पुरूषांच्या प्रेमाची गोष्ट आहे आणि ती ठसठशीत पण हळूवारपणे उलगड जाते."

शेड्डे यांनी या चित्रपटाला 'ऐतिहासिक' असंही म्हटलं आहे.

सनडान्स चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला आणि आणि ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकलेला साबर बोंडा हा पहिला मराठी चित्रपट ठरलाय.

फोटो स्रोत, Lotus Visual Productions

फोटो कॅप्शन, सनडान्स चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला आणि आणि ग्रँड ज्युरी पुरस्कार जिंकलेला साबर बोंडा हा पहिला मराठी चित्रपट ठरलाय.

एकेकाळी भारतीय सिनेसृष्टीचा पाया रचणारा मराठी सिनेमा गेल्या काही वर्षांत मराठी भाषा बोलली जाते त्या महाराष्ट्रातल्याच पिछाडीवर पडला. त्याचं कारण म्हणजे बॉलिवूडचा प्रभाव देशातल्या इतर भागांवरही बॉलिवूडचा प्रभाव आहेच.

पण गेल्या दशकभरात मराठी सिनेमे शांतपणे जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करत आहेत.

वेगवेगळ्या विषयांवर आधारलेले आणि समीक्षकांनी गौरवलेले अनेक चित्रपट आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये झळकले आहेत.

नागराज मंजुळे यांचा रोमंँटिक शोकांतिका सांगणारा 'सैराट' हा चित्रपट 2016 मध्ये बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झळकला होता.

काही वर्षांतच, चैतन्य ताम्हाणे यांचा 'द डिसायपल' हा व्हेनिस चित्रपट महोत्सवात दाखवला गेलेला मीरा नायर यांच्या 'मॉन्सून वेडिंग' नंतरचा पहिला भारतीय चित्रपट ठरला.

विशेष म्हणजे ऑस्कर-विजेते अल्फॉन्सो क्युरोन हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते म्हणून सहभागी झाले.

त्यापाठोपाठ वेगवेगळे विषय हाताळणाऱ्या आणखी किमान डझनभर स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपटांना जागतिक महोत्सवात स्थान मिळालं.

ऑस्कर विजेता अफोंसो क्यारोन हे द डिसायपल या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते होते.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ऑस्कर विजेता अफोंसो क्यारोन हे द डिसायपल या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते होते.

उदाहरणार्थ, हर्षद नलावडे यांचा 'फॉलोवर' हा चित्रपट भारतातले तरूण कट्टरतावादाकडे कसे झुकतात त्याची गोष्ट सांगतो. रॉटरडॅम चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेलेला हा सिनेमा फार मोजक्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता.

सुभद्रा महाजन यांचा 'सेंकड चान्स' हा पहिला ब्लॅक अँड व्हाईट सिनेमा. त्यात मानसिक धक्क्यातून सावरणाऱ्या एका महिलेचा हिमालयापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आलाय.

तो पहिल्यांदा बुसानमध्ये दाखवला गेला होता. आता येत्या जून महिन्यात भारतीय चित्रपटगृहातही प्रदर्शित केला जाईल.

'स्थळ' हा सिनेमा लग्नाच्या नीरस वास्तवावर एक कटू आणि प्रामाणिक दृष्टिकोन मांडतो.

फोटो स्रोत, Dhun Production

फोटो कॅप्शन, 'स्थळ' हा सिनेमा लग्नाच्या नीरस वास्तवावर एक कटू आणि प्रामाणिक दृष्टिकोन मांडतो.

अंतर्मुख करणारे सिनेमे

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

मराठी साहित्य आणि नाटकातून तसंच प्रायोगिक नाटकातून वर आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीनं नेहमीच ताकदीचे सिनेमे दिले आहेत, असं शेड्डे म्हणतात.

"हे सिनेमे अतंर्मुख व्हायला भाग पाडतात," त्या पुढे सांगतात. बॉलिवूडच्या गोंगाट आणि व्यापारी मोहापेक्षा त्यांची अगदी वेगळी वाटचाल असते, असं त्यांचं म्हणणं होतं.

या सिनेमांचं सौंदर्य निर्मात्यांच्या परिघावरच्या जगण्यातून आलेलं असतं. हे निर्माते बहुतेक वेळा स्वतः सिनेमाचं तंत्रज्ञान शिकतात आणि पारंपरिक सत्ताकेंद्रापासून दूर असतात.

साबर बोंडाचे दिग्दर्शक रोहन कनावडे यांचं उदाहरण घेऊ. मुंबईच्या झोपडपट्टीत वाढताना सिनेमा बनवण्याचं स्वप्न पाहण्याचं धाडसंच ते करत होते.

"यामुळे या सिनेमात त्यांचं स्वतःचं जगणं आणि पठडीबाहेरचा पण रसरशीत कच्चेपणा येतो. ते आंतरराष्ट्रीय स्क्रिप्ट लॅब्समधून किंवा आंतरराष्ट्रीय सह-निर्मितीतून येणाऱ्या गुळगुळीत चित्रपटांपेक्षा फारच वेगळे असतात," असं शेड्डे म्हणतात.

पण मल्याळम सिनेसृष्टीतून असे रसरशीत सिनेमे एका प्रवाहात येत राहतात, तसं मराठी सिनेमाचं होत नाही. अजूनही असे मराठी सिनेमे तुकड्यात येतात.

मराठी चित्रपट उद्योगाला संस्थात्मक पाठिंबा कमी आहे, असं 'स्थळ'च्या निर्मात्यांपैकी शेफाली भूषण सांगत होत्या.

फोटो स्रोत, Dhun Production

फोटो कॅप्शन, मराठी चित्रपट उद्योगाला संस्थात्मक पाठिंबा कमी आहे, असं 'स्थळ'च्या निर्मात्यांपैकी शेफाली भूषण सांगत होत्या.

अशा चित्रपटांना संस्थात्मक आधार न मिळणं हे यामागचं एक कारण असल्याचं 'स्थळ'च्या निर्मात्या शेफाली भूषण सांगत होत्या. तीन सहकाऱ्यांसोबत त्यांनी स्वतःचा पैसा हा सिनेमा बनवण्यात लावला होता.

चित्रपटात 'व्यावसायिक यश' दिसत नसेल तर मोठे स्टुडिओ मराठी प्रकल्प स्वीकारत नाहीत. याचाच अर्थ, प्रयोगशील आणि कलात्मक आवाजांना आधार देणारं एक मजबूत पर्यावरण अजूनही फारसं विकसित झालेलं नाही, असंही शेफाली पुढे म्हणतात.

केरळच्या विरुद्ध स्थानिक चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारकडून फार कमी पाठिंबा मिळतो. त्यामुळेच इथं चित्रपटांचा प्रवाह चालू ठेवण्यासाठी लागणारी संस्कृती कमी पडते.

त्यातही मराठी सिनेमे मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांवरच भर देत असल्याने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचा भारही सहन करावा लागतो. तो इतर प्रादेशिक चित्रपटसृष्टींना फारसा जाणवत नाही, असं शेड्डे सांगत होत्या.

शिवाय केरळसारखा सिनेमाबुद्धी असलेला प्रेक्षकही महाराष्ट्रात नाही, असंही शेड्डे पुढे सांगत होत्या. "तिथे भात पिकवणारे शेतकरीही प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सर्गेई आईझनस्टाईन आणि त्याच्या वारशावर चर्चा करतात," असं त्या म्हणतात.

त्यामुळेच त्यांचा लहानसा स्वतंत्र चित्रपटही झालेला खर्च वसूल करून नफा कमवू शकतो असा विश्वास चित्रपट निर्मात्यांना असतो.

सनडान्स चित्रपट महोत्स

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सनडान्स चित्रपट महोत्स

पण यासाठी चित्रपट निर्मात्यांनाही जबाबदार धरायला हवं, असं ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक अशोक राणे यांना वाटतं.

कान्स चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र सरकारच्या वतीनं स्थानिक चित्रपटांचं प्रतिनिधित्व करण्याची जबाबदारी राणे यांना देण्यात आली आहे. गेली दहा वर्ष ते हे काम करत आहेत.

चित्रपट निर्मात्यांनी सगळ्यांना समजेल अशी भाषा बोलणारे आणि जागतिक प्रेक्षकांना भावतील असे विषय शोधण्यासाठी फार थोडे प्रयत्न केल्याचं राणे बीबीसीशी बोलताना सांगत होते.

शेड्डे म्हणतात की, "आक्रमक महत्त्वाकांक्षेचा अभाव" असल्यानं चित्रपट उद्योगाच्या वाढीला आळा बसला आहे. चित्रपट वितरणासाठी चांगली प्रणाली नसल्यामुळे भारत अनेक दशकं 'चांगल्या चित्रपटांची स्मशानभूमी'च ठरला Eus.

मात्र सनडान्स आणि कान्स यासारख्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय ओळख मिळाल्याने हे चित्र बदलू शकेल, असं शेड्डे यांना वाटतं. विशेषतः पारंपरिक बाजारपेठांपलीकडे जाण्याची इच्छा असलेल्या स्वतंत्र चित्रपट निर्मात्यांसाठी हे फायद्याचं ठरेल.

शेफारी भूषणही त्याला दुजोरा देतात. कान्समध्ये त्यांचा चित्रपट दाखवायला मिळल्यानं आणि महाराष्ट्र सरकारने दखल घेतल्याने त्यांना नवी दारं उघडल्यासारखं वाटतं.

महोत्सव म्हणजे "तुमचा चित्रपट वेगवेगळ्या भागात कसा विकायचा आणि जगभरातल्या लोकांसोबत सह-निर्माती म्हणून नवे प्रकल्प कसे मिळवायचे हे शिकण्याची संधी असते."

"जणू संपूर्ण जग कवेत घेण्यासाठी वाट पहात आहे," असं शेफाली म्हणतात.

'राजा हरिश्चंद्र' मराठी भाषेत बनवलेला पहिली चित्रपट असल्याचं आणि 'द डिसिपल'ने व्हेनिस चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम पटकथा पुरस्कार जिंकला असल्याचं या लेखात लिहिलं होतं. ही चुकीची माहिती दुरुस्त करण्यात आली आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)