'खालिद का शिवाजी'ची देश-परदेशातही चर्चा, 'कान'मध्ये कौतुक झालेल्या वऱ्हाडी सिनेमाची गोष्ट काय?

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji
- Author, आशय येडगे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
विदर्भातल्या एका शाळेत पाचवीत शिकणाऱ्या खालिदला 'छत्रपती शिवाजी महाराजांबाबत' प्रश्न पडू लागतात. याच प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी खालिद त्याच्या भोवतालातील शिवाजी राजांचे उल्लेख धुंडाळून त्याचा स्वतःचा 'शिवाजी' शोधू लागतो.
सध्याच्या वातावरणात 'खालिद' नावाचा कुणीतरी एक पोरगा शिवाजी महाराजांचा शोध घेतोय हीच मुळात आपलं लक्ष वेधून घेणारी गोष्ट. पण वऱ्हाडी भाषेतल्या 'खालिद का शिवाजी' नावाच्या चित्रपटाने थेट कान चित्रपट महोत्सवापर्यंत भरारी घेतली आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
पाचवीतला खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेतून त्याच्या प्रिय शिवाजी महाराजांना, महाराजांनी शिकवलेल्या जीवनमूल्यांना, त्यांनी दिलेल्या समतेच्या विचारणा शोधत असतो आणि याच शोधप्रवासात 'खालिद का शिवाजी' हा चित्रपट तयार होतो.
नुकत्याच पार पडलेल्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या 'मार्शे दु फिल्म' (Marché du Film) या विभागासाठी 'खालिद का शिवाजी' या चित्रपटाची निवड झाली होती.
फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आलेल्या कान चित्रपट महोत्सवातील 'मार्शे दु फिल्म' या विभागात जगभरातील काही निवडक चित्रपट दाखवले जातात.
विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील अनेक स्थानिक कलाकारांच्या सहभागातून तयार झालेला हा अस्सल वऱ्हाडी भाषेतला चित्रपट थेट कानमध्ये पोहोचला.
आणि याच निमित्ताने 'खालिद का शिवाजी' हे नाव कसं सुचलं? सध्याच्या वातावरणात एखाद्या मुस्लिम पात्राला शिवाजी महाराजांच्या जवळ नेण्याचं धाडस कसं केलं? कानमधल्या प्रेक्षकांनी हा चित्रपट बघून काय प्रतिक्रिया दिल्या आणि एकूणच हा संपूर्ण अनुभव कसा होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही चित्रपटाचे दिग्दर्शक राज मोरे यांच्याकडून जाणून घेतली.
'खालिद का शिवाजी' ही नेमकी कुणाची गोष्ट आहे?
या चित्रपटाची गोष्ट उलगडून सांगताना दिग्दर्शक राज मोरे म्हणाले, "पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुसलमान मुलाची ही गोष्ट आहे. खालिदला त्याच्या धर्मावरून त्याचे वर्गमित्र सतत चिडवत असतात. त्याला सतत 'अफझलखान, अफझलखान' म्हणून चिडवलं जातं. यानंतर खालिदच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होतात. त्याच्या बालसुलभ बुद्धीला मला याच नावावरून का चिडवलं जातं? शिवाजी नेमका कोण? असे प्रश्न पडू लागतात."
खालिदला पडलेले प्रश्न तो केवळ स्वतःजवळ ठेवत नाही. त्याच्या सभोवारात, त्याच्या कुटुंबात तो या प्रश्नांची उत्तरं शोधू लागतो. आईला, आजीला हे प्रश्न विचारून भंडावून सोडतो. आणि याच प्रवासात त्याला त्याचे त्याचे शिवाजी महाराज भेटतात.

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji
राज मोरे म्हणतात की, खालिदला पडलेले प्रश्न हे केवळ त्याचे नाहीयेत. धर्मावरून, जातीवरून चिडवल्या गेलेल्या प्रत्येकाच्या मनात असे प्रश्न निर्माण होत असतात. आणि याच प्रश्नांची योग्य उत्तरं मिळाली नाहीत तर काहीही घडू शकतं.
'खालिद का शिवाजी' हा चित्रपट कैलास वाघमारे यांनी लिहिलाय, तर त्यातले संवाद 'शिवाजी अंडर ग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या सुप्रसिद्ध नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांनी लिहिलेले आहेत.
सध्याच्या काळात हा चित्रपट का महत्त्वाचा आहे?
छत्रपती शिवाजी महाराजांकडे बघण्याचे, त्यांच्याकडून काहीतरी शिकण्याचे आणि प्रेरणा घेण्याचे असंख्य मार्ग आहेत. शिवाजी महाराजांचं आयुष्यच अनेकांना प्रेरित करतं, रोजच्या आयुष्यात जगण्याचा मार्ग दाखवतं. 'मोहिमेवर जाता शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याचा' सल्ला देणारे महाराज द्रष्टे होते, शिवाय तत्कालीन राजवटींमध्ये महाराजांंचं 'स्वराज्य' लोककल्याणकारी होतं, असं एव्हाना इतिहास संशोधकांनी सप्रमाण लिहून ठेवलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांना वर्तमानाच्या चष्म्यातून बघण्याचा प्रयत्न आम्ही केला असल्याचं राजकुमार तांगडे यांनी सांगितलं.
"सध्या समाजातील धार्मिक विद्वेषाच्या वातावरणात कुठेतरी बंधुभावाची फुंकर घालावी आणि शाळकरी मुलाच्या भाबड्या भाषेत समाजाला शिवाजी समजावून सांगावा म्हणून हा चित्रपट आम्ही बनवला," असं तांगडे म्हणाले.

फोटो स्रोत, Raj More/Khalid ka shivaji
चित्रपट आणि सध्याची सामाजिक परिस्थिती याबाबत बोलताना दिग्दर्शक राज मोरे म्हणाले, "हा चित्रपट 2025चा आहे. या चित्रपटात आम्ही फक्त एखाद्या विशिष्ट धर्माबाबत, फक्त शिवाजी महाराजांबाबत बोललो नाही तर खालिदच्या एकूणच प्रवासाचं चित्रण यामध्ये आहे. खालिदला पडणारे प्रश्न या देशासमोरचे ज्वलंत प्रश्न आहेत, तुम्हा-आम्हाला रोज भेडसावून टाकणारे हे प्रश्न आहेत."
"सध्या शिवाजी महाराजांचा इतिहास बदलून, तोडून मोडून सांगण्याचा एक प्रघात पडला आहे. दुसरीकडे चिकित्सेच्या जोरावर, कष्ट घेऊन खरा इतिहास वाचणाऱ्यांचं, शोधणाऱ्यांचं प्रमाण कमी होत चाललं आहे. पुस्तकच मुळात कमी वाचली जात असताना, चित्रपटासारख्या मनोरंजक आणि लोकप्रिय माध्यमातून खरा इतिहास प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही करतो आहोत. शिवाजी महाराज आणि ऐतिहासिक महापुरुषांवर अनेक प्रकारच्या चित्रपटांची गर्दी झालेली असताना आम्ही 'खालिद का शिवाजी'च्या माध्यमातून खरे महाराज मांडण्याचा प्रयत्न केला आहे," असं राज मोरे म्हणाले.

फोटो स्रोत, Raj More
'खालिद का शिवाजी' बघितल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या?
'खालिद का शिवाजी' हा चित्रपट आजवर अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे.
गोव्यातला इफ्फी (इंडियन पॅनोरमा एनडीएफसी फिल्म फेस्टिव्हल), अजंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 सारख्या चित्रपट महोत्सवांमध्ये चित्रपटाला नामांकन मिळालं आहे.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांबाबत राज मोरे म्हणाले, "या चित्रपटाच्या नावामुळेच अनेकांना त्याचं आकर्षण वाटतं. पण चित्रपट पाहिल्यानंतर लोक खूप सविस्तर व्यक्त होतात, अनेकदा भावूक होतात. या चित्रपटाची भाषा अनेकांना भावली. त्यात दाखवलेले लोकेशन्स अगदीच नवीन होते, मुख्य प्रवाहातल्या चित्रपटांमध्ये हे वैदर्भीय रंग दिसत नाहीत आणि म्हणून अनेकांना हा चित्रपट खूप आवडला."
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या तोडीचं मराठीतही काम होऊ शकतं असं राज मोरे यांना वाटतं. पण त्यासाठी आपल्याला भाषा, चित्रपटाची संहिता, विषय आणि मांडणीमध्ये करावे लागतील असंही ते म्हणतात.

फोटो स्रोत, RajMore
राज मोरे म्हणाले की, "अनेक मुस्लिम धर्मियांनी देखील हा चित्रपट बघून ही आमचीच गोष्ट असल्याचं सांगितलं. खालिदला त्याच्या धर्मापलीकडे जाऊन प्रेम मिळालं. त्याचं म्हणणं अनेकांना पटलं. हा चित्रपट केवळ सामाजिक संदेश देत नाही तर निव्वळ चित्रपट बघायला आलेल्या प्रेक्षकांना देखील ताजतवानं करण्याची, त्यांचं मनोरंजन करण्याची ताकद त्यामध्ये आहे."
राज मोरे यांची ही पहिलीच मराठी फिचर फिल्म आहे. याआधी त्यांनी केलेल्या 'खिसा' नावाच्या शॉर्टफिल्म(लघुपट)ला राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं आहे.
राज मोरे हे एक पुरस्कारप्राप्त चित्रकार आहेत. चित्रपटाची प्रेरणा त्यांना त्यांच्या चित्रांमधूनच मिळाल्याचं ते सांगतात.
"माझ्या चित्रांमध्ये नेहमीच माझ्या आजूबाजूला काय घडतंय ते चितारण्याचा प्रयत्न करत आलो आहे. त्यामुळे मला माझा पहिला चित्रपट देखील असाच करायचा होता आणि त्यातच खालिद का शिवाजीची कथा माझ्याकडे आली. आपल्या अनेक चित्रपटांमध्ये आपण नेहमीच संवादावर भर देतो पण गोष्ट सांगण्यात कमी पडतो, खालिद का शिवाजीमधून मला एक छान गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायची होती," असं राज मोरे म्हणाले.
'कान'मध्ये प्रेक्षकांना काय वाटलं?
'खालिद का शिवाजी' या नावावरून अनेकांचे गैरसमज झाल्याचं मोरे यांनी सांगितलं.
सुरुवातीला अनेकांनी नाव बदलण्याचा किंवा नावाबाबत आक्षेप घेतला, पण अखेर 'कान'मध्ये चित्रपट गेल्यानंतर अनेकांना या नावाचंच कौतुक वाटलंच ते म्हणाले.
कानच्या अनुभवाबाबत बोलताना ते म्हणाले, "मलाही सुरुवातीला असं वाटलं होतं की महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांची, त्यातल्या त्यात एका गावातल्या खालिदची गोष्ट तिथल्या लोकांना खरोखर बघायला आवडेल का? भारतातल्या चित्रपट महोत्सवांमध्ये आम्हाला प्रेम मिळालं कारण ही गोष्ट त्यांना माहिती होती, महाराज बहुतेकांना माहिती होते. पण तिकडे काय होईल असं मला सतत वाटायचं. पण हा चित्रपट बघून काही ब्रिटिश चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक म्हणाले की, या गोष्टीतल्या खालिदला पडलेले प्रश्न आम्हाला देखील पडले होते. त्यांना देखील या चित्रपटाने प्रेरित केलं."
खालिद का शिवाजी या चित्रपटामध्ये प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे या कलाकारांनी मुख्य भूमिका वठवल्या आहेत. खालिदचं पात्र क्रिश मोरे याने साकारलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











