इलॉन मस्क ते सुझी वाइल्स, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॉप टीम'मध्ये कोण कोण असू शकतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सॅम कॅब्रल, एमी वॉकर, नदीन युसूफ
- Role, बीबीसी न्यूज
व्हाईट हाऊस मधल्या प्रशासनाची सूत्रं हातात घेण्याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांची पहिली अधिकृत नियुक्ती केली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून सुझान समरऑल वाइल्स (सुझी वाइल्स) यांची नियुक्ती केली आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 2024च्या निवडणूक अभियानात सुझान यांनी सह-अध्यक्ष म्हणून काम केलं होतं.
20 जानेवारी 2025 रोजी डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये परततील, त्याआधी त्यांची टीम अनेक उमेदवारांच्या तपासणीचं काम करत आहे. हे काम एका ट्रान्झिशन टीमतर्फे केलं जात आहे.
यातील अनेक चेहरे असे आहेत ज्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात काम केले होते, परंतु आता त्यांचा परतण्याचा कोणताही विचार नाही. काही निष्ठावंत परतत असल्याच्या अफवा अमेरिकन माध्यमांमध्ये पसरत आहेत.
सध्या 78 वर्षांच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याभोवती अनेक इच्छुकांची गर्दी आहे.
यापैकी काही जणांना ट्रम्प यांच्या मंत्रिमंडळाचा भाग व्हायचं आहे, काहींना व्हाईट हाऊसचे कर्मचारी म्हणून काम करायचं आहे तर काहींना ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अमेरिकन सरकारमध्ये महत्त्वाची भूमिका बजवायची आहे.
व्हाईट हाऊसमध्ये अतिमहत्त्वाच्या पदांवर ज्या लोकांची नियुक्ती होऊ शकते, त्यांचीच चर्चा आपण या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.


चीफ ऑफ स्टाफ - सुझी वाइल्स
कमला हॅरिस यांच्याविरुद्ध डोनाल्ड ट्रम्प यांनी मिळवलेल्या विजयामध्ये त्यांच्या प्रचार मोहिमेचे सह-अध्यक्ष सुझी वाइल्स आणि ख्रिस लासिविटा यांचा मोठा हात होता.
निवडणूक जिंकल्यानंतर केलेल्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी सुझी वाइल्स यांचं खूप कौतुक केलं. ते म्हणाले की त्या खूप शांत आहेत. आणि सुझी यांचा स्वतः समोर न येता पडद्यामागे काम करण्यावर विश्वास आहे.
या भाषणाच्या दुसऱ्याच दिवशी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातली पहिली अधिकृत नियुक्ती ही त्यांच्या चीफ ऑफ स्टाफ पदाची करण्यात आली. आणि त्या पदावर विराजमान झाल्या सुझी वाइल्स. सुझी यांना व्हाईट हाऊसमध्ये चीफ ऑफ स्टाफची जबाबदारी मिळाली आहे. हे पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला असतील.

फोटो स्रोत, Getty Images
चीफ ऑफ स्टाफ हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे प्रमुख सहकारी असतात. राष्ट्राध्यक्षांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन आणि नियुक्ती करण्याबरोबरच चीफ ऑफ स्टाफ राष्ट्राध्यक्षांच्या दैनंदिन कामकाजाची देखरेख देखील करत असतात.
सुझी वाइल्स या 67 वर्षांच्या आहेत आणि त्या अनेक दशकांपासून रिपब्लिकन राजकारणात सक्रिय आहेत. 1980 मध्ये रोनाल्ड रीगन यांच्या निवडणूक प्रचार अभियानापासून ते 2010 मध्ये रिक स्कॉट यांना फ्लोरिडाचे गव्हर्नर बनवण्यापर्यंत रिपब्लिकन पक्षाच्या प्रत्येक मोहिमेत त्यांचा सहभाग होता.
वाइल्स या सन्मानास पात्र असल्याचं रिपब्लिकन पक्षाने म्हटलं आहे. ट्रम्प यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय राखण्यासोबत त्या त्यांच्याकडून पूर्ण काम करून घेण्यासही सक्षम असल्याचं अनेकांचं मत आहे. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात चीफ ऑफ स्टाफ असलेल्या व्यक्तींना हे काम जमलं नव्हतं.
अॅटर्नी जनरल
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात सगळ्यात महत्त्वाची नियुक्ती असेल त्यांच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टीस विभागाच्या प्रमुखांची. त्यांच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांचे अॅटर्नी जनरल राहिलेल्या जेफ सेशन्स आणि विलियम बार यांच्यासोबत ट्रम्प यांचं नातं असंतुलित राहिलेलं होतं.
यामुळे या नवीन कार्यकाळात डिपार्टमेंट ऑफ जस्टीसच्या प्रमुखपदासाठी डोनाल्ड ट्रम्प अशा एका व्यक्तीच्या शोधात आहेत जी व्यक्ती विश्वासार्ह तर असेलच, पण या विभागाची ताकद वापरून डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधक आणि टीकाकारांना शिक्षा देण्यासही ती सक्षम असेल.
या कॅबिनेट पदासाठी प्रामुख्याने जी नावं घेतली जातायत त्यामध्ये टेक्सासचे ॲटर्नी जनरल केन पॅक्स्टन यांचंही नाव आहे. त्यांच्यावर महाभियोगाची कारवाई देखील करण्यात आलेली होती.

फोटो स्रोत, Getty Images
याशिवाय डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात तीन महिने ॲटर्नी जनरल म्हणून काम केलेल्या मॅथ्यू व्हिटेकर यांचं नावही चर्चेत आहे. याशिवाय माइक डेव्हिस यांच्या नावाचाही विचार केला जातोय. राईट विंगमध्ये त्यांच्या सक्रियतेमुळे त्यांचं नाव घेतलं जात असल्याची चर्चा आहे. अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश नील गोर्सच यांचे क्लार्क म्हणूनही डेव्हिस यांनी काम केलं आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या टीकाकारांना आणि पत्रकारांना धमकीही दिली होती.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बजेट ऑफिसमध्ये काम केलेल्या मार्क पाओलेटा यांच्या नावाचाही विचार केला जातो आहे. न्याय विभागाच्या निर्णयापासून राष्ट्राध्यक्षांनी दूर राहीलच पाहिजे, अशी कुठलीही कायदेशीर तरतूद किंवा नियम नसल्याचा युक्तिवात मार्क करत असतात.
होमलँड सेक्रेटरी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात होमलँड सेक्युरिटीच्या सचिवांच्या दोन प्रमुख जबाबदाऱ्या असतील. पहिली म्हणजे अमेरिका-मेक्सिको बॉर्डर सील करणे आणि ज्या प्रवाशांकडे वैध कागदपत्रं नसतील त्यांना अमेरिकेतून बाहेर काढण्याची सोय करणे.
ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मतदारांना हीच आश्वासनं दिलेली होती. याशिवाय नैसर्गिक संकटांमध्ये सरकारी यंत्रणेचं नेतृत्व देखील याच सचिवांकडे असेल. या पदासाठी एक नाव टॉम होमन यांचं आहे.
ज्यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात इमिग्रेशन आणि सीमा शुल्क अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक म्हणून काम केलं होतं. त्यांचीच निवड होण्याशी शक्यता जास्त आहे.

फोटो स्रोत, Getty Images
62 वर्षांच्या टॉम होमन यांनी घुसखोरी रोखण्यासाठी स्थलांतरित कुटुंबातल्या लहान मुलांना त्यांच्या पालकांपासून वेगळे करण्याला समर्थन दिलेलं होतं. टॉम हे देखील म्हणाले होते की जे राजकीय नेते अमेरिकेच्या इमिग्रेशन सेंच्युरी पॉलिसीचे समर्थन करतात त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत.
टॉम होमन यांनी 2018मध्ये ट्रम्प यांचा कार्यकाळ अर्ध्यात असतानाच राजीनामा दिला होता. पण त्यांनी त्यानंतरही ट्रम्प यांचं समर्थन केलं होतं.
या पदासाठी आणखी एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे चॅड वूल्फ. 2019 पासून 2020 पर्यंत वूल्फ यांनी होमलँडचे कार्यकारी सचिव म्हणून काम पाहिलेलं होतं. त्यांची नियुक्ती अवैध ठरवेपर्यंत ते त्या पदावर होते.
त्यांच्याशिवाय, चॅड मिझेल हे देखील शर्यतीत आहेत, जे होमलँड विभागाचे माजी कार्यवाहक जनरल काउंसिल राहिले आहेत.
स्टीफन मिलर हे ट्रम्प यांच्या इमिग्रेशन धोरणांचे शिल्पकार मानले जातात. त्यांना पुन्हा एकदा व्हाईट हाऊसमधील वरिष्ठ सल्लागाराची भूमिका दिली जाण्याची शक्यता आहे.
सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्र मंत्री)
अमेरिकेतील सेक्रेटरी ऑफ स्टेट (परराष्ट्र मंत्री) हे परराष्ट्र धोरणाबाबत राष्ट्राध्यक्षांचे प्रमुख सल्लागार असतात. अमेरिकेच्या बाहेर देशांमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करत असताना ते मुख्य राजनयिक अधिकारी म्हणून काम करतात.
फ्लोरिडाचे सिनेटर मार्को रुबिओ यांचं नाव एका महत्त्वाच्या कॅबिनेट पदासाठी चर्चेत आहे. त्यांना उपाध्यक्ष करण्याबाबतही चर्चा झाली होती.
53 वर्षांचे रुबिओ यांनी 2016 च्या रिपब्लिकन प्राइमरीमध्ये ट्रम्प यांना विरोध केला होता, परंतु नंतर त्यांनी त्यांचे मतभेद कमी केले. ते सिनेट फॉरेन रिलेशन कमिटीचे वरिष्ठ सदस्य आणि चेंबरच्या इंटेलिजन्स पॅनेलचे उपाध्यक्ष आहेत.
या पदासाठी इतर दावेदारांमध्ये ट्रम्प यांचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन, टेनेसी सिनेटर बिल हॅगर्टी, ब्रायन हुक यांच्या नावांचा समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हॅगर्टी हे ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात जपानचे राजदूत होते. तर हुक हे इराणमध्ये विशेष राजदूत राहिले आहेत.
रिचर्ड ग्रेनेल देखील अनेकांना धक्का देऊ शकतात. कारण ट्रम्प यांच्यावर त्यांचा विश्वास आहे आणि त्यांनी जर्मनीतील राजदूताची भूमिका बजावली आहे. ते बॉल्कन्समध्ये विशेष राजदूत आणि राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे कार्यवाहक प्रमुख देखील राहिले आहेत.
2020 मध्ये ट्रम्प यांच्या पराभवाचा निकाल बदलण्यासाठी 58 वर्षीय ग्रेनेल यांनी प्रयत्न केले होते. डोनाल्ड ट्रम्प यांनी सप्टेंबरमध्ये युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली तेव्हा ग्रेनेल त्यांच्यासोबत उपस्थित होते.
ग्रेनेल यांची कार्यशैली त्यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या भूमिकेसाठी योग्य बनवू शकते. या पदावरील नियुक्तीसाठी सिनेटच्या मंजुरीची आवश्यकता नाही.
इंटेलिजन्स नॅशनल सेक्युरिटी पोस्ट

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात राष्ट्रीय गुप्तहेर विभागाचे माजी संचालक जॉन रॅटक्लिफ, उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार किथ केलॉग, संरक्षण विभागाचे माजी अधिकारी एल्ड्रिज कोल्बी आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे अधिकारी काश पटेल यांच्या नावांची चर्चा मोठ्या पदांवरील नियुक्तीबाबत होत आहे.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात अखेरच्या काही महिन्यांमध्ये काश पटेल यांनी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम केलं आहे. 44 वर्षीय पटेल यांना अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेचे (सीआयए) प्रमुख बनवले जाऊ शकते.
ट्रम्प असंही म्हणाले होते की ते फेडरल ब्युरो ऑफ इंटेलिजन्स (एफबीआय) चे संचालक ख्रिस रे यांना हटवतील. 2017 मध्ये त्यांना ट्रम्प यांनीच नॉमिनेट केलेलं होतं. पण, त्यानंतर ट्रम्प आणि रे यांच्यात मतभेद झाले. आता त्यांच्या जागी जेफ्री जेन्सन यांची नियुक्ती करण्याचा ट्रम्प विचार करत आहेत.
संरक्षण सचिव (डिफेन्स सेक्रेटरी)
या पदासाठी ज्या दोन नावांची चर्चा होत आहे ती म्हणजे फ्लोरिडाचे खासदार मायकेल वॉल्ट्ज, जे यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या सशस्त्र सेवा समितीवर आहेत आणि दुसरे नाव रॉबर्ट ओब्रायन आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी माईक पॉम्पीओ यांना काढून टाकलं आहे. खरंतर त्यांचंच नाव पेंटागॉनचे नेतृत्व करण्यासाठी सुरुवातीपासून चर्चिलं जात होतं.
सीआयएचे माजी संचालक पोम्पीओ यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र सचिवपद भूषवलं होतं. या काळात त्यांनी मध्यपूर्वेतील प्रशासनाच्या मुत्सद्दी धोरणांचं नेतृत्व केलं होतं.
संयुक्त राष्ट्रांचे राजदूत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, न्यू यॉर्कच्या काँग्रेस वुमन एलिस स्टेफनिक यांनी सुरुवातीला उदारमतवादी ते ट्रम्प समर्थक होण्यापर्यंतचा प्रवास केला आणि आता ट्रम्प समर्थकांमध्ये त्यांची गणना होते.

फोटो स्रोत, Getty Images
रिपब्लिकन पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये त्या चौथ्या क्रमांकावर आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासातील नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यामुळेच संयुक्त राष्ट्रांमध्ये अमेरिकेच्या राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती होऊ शकते.
पण, यासाठी परराष्ट्र विभागाचे माजी प्रवक्ते मॉर्गन ऑर्टॅगस, ट्रम्प यांचे इस्रायलमधील राजदूत डेव्हिड फ्रेडमन आणि ट्रम्प यांच्या कार्यकाळात संयुक्त राष्ट्रांचे राजदूत म्हणून काम केलेल्या केली क्रॉफ्ट यांच्याही नावांचा विचार होऊ शकतो. एलिस यांना यासाठी या सगळ्यांसोबत स्पर्धा करावी लागू शकते.
ट्रेझरी सेक्रेटरी (कोषागार सचिव)
डोनाल्ड ट्रम्प ट्रेझरी सेक्रेटरी या पदासाठी रॉबर्ट लाइटहाइझर यांचा विचार करत आहेत. रॉबर्ट यांनी चीनबरोबरच्या व्यापार युद्धात अमेरिकेचं नेतृत्व केलं होतं. त्यानंतर ते मुख्य आर्थिक अधिकाऱ्याच्या भूमिकेत होते.
पण, या पदासाठी किमान चार नावे चर्चेत येऊ शकतात. स्कॉट बेझंट, जॉन पॉलसन, जे क्लेटन आणि लॅरी कडलो यांच्या नावांचा त्यात समावेश आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्कॉट बेझंट यांना डोनाल्ड ट्रम्प यांचे आर्थिक सल्लागार बनवले जाऊ शकते. मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्यात ते अग्रेसर आहेत. जॉन पॉलसन यांनीही निधी उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
जे क्लेटन हे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनचे माजी प्रमुख राहिले आहेत. तर लॅरी कडलो यांनी ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात राष्ट्रीय आर्थिक परिषद चालवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
कॉमर्स सेक्रेटरी (वाणिज्य सचिव)
ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन टीमचं नेतृत्व करणाऱ्या लिंडा मॅकमोहन यांचं नाव अमेरिकन व्यवसाय आणि रोजगार निर्मिती क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांमध्ये आघाडीवर आहे.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात, लिंडा यांनी लघु व्यवसायाच्या प्रशासकाची भूमिका बजावली.
इतर नावांमध्ये ब्रुक रोलिन्स, रॉबर्ट लाइटहाइझर आणि कॅली लोफ्लर यांचा समावेश आहे. त्या एक यशस्वी महिला उद्योजक आहेत. यासोबतच त्यांनी काही काळ यूएस सिनेटमध्ये काम केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इंटेरियर सेक्रेटरी (गृह सचिव)

फोटो स्रोत, Getty Images
साउथ डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला मारल्याची विचित्र कबुली दिली होती.
ट्रम्प यांच्याशी असलेल्या एकनिष्टतेचा मोबदला त्यांना मिळण्याची शक्यता आहे.
त्यांना गृहसचिव केले जाण्याची शक्यता आहे. हा विभाग सार्वजनिक जमिनी आणि नैसर्गिक संसाधने हाताळतो. या पदासाठी त्यांना नॉर्थ डकोटाचे गव्हर्नर डग बुर्गम यांच्याशी स्पर्धा करावी लागू शकते.
एनर्जी सेक्रेटरी (ऊर्जा सचिव)
डग बर्गम यांचं नाव एनर्जी सेक्रेटरी पदाच्या शर्यतीत आहे. ट्रम्प यांनी याबाबत दिलेल्या आश्वासनाची जबादारी ते पार पाडू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'ड्रिल बेबी ड्रिल' या घोषणेला प्रत्यक्षात आणण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ते अमेरिकेच्या ऊर्जा धोरणातही बदल करू शकतात.
डग हे सॉफ्टवेअर उद्योजक आहेत, त्यांनी 2011 मध्ये त्यांची छोटी कंपनी मायक्रोसॉफ्टला विकली होती. बर्गम 2024 च्या रिपब्लिकन प्रायमरीमध्ये उमेदवार होते. माजी ऊर्जा सचिव डॅन ब्रुइलेट हे देखील शर्यतीत आहेत.
प्रेस सेक्रेटरी (माध्यम सचिव)
27 वर्षीय कॅरोलिन लेविट यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रीय प्रेस सचिव म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांना प्रभावित केलं आहे.

फोटो स्रोत, Reuters
त्यांनी यापूर्वी व्हाईट हाऊसमध्ये प्रेस सेक्रेटरी सहाय्यक म्हणूनही काम केलं आहे. त्यांना प्रशासनाच्या प्रवक्त्या म्हणूनही नियुक्त केलं जाऊ शकतं.
रॉबर्ट एफ केनेडी जूनियर
पर्यावरण विषयातील वकील म्हणून रॉबर्ट एफ. केनेडी जूनियर यांची ओळख आहे. माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांचे ते पुतणे आहेत.
त्यांच्या भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे त्यांचं मंत्रिमंडळातील स्थान डळमळीत होऊ शकतं. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका हेल्दी अगेन' या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांना सार्वजनिक आरोग्य खात्यात संधी मिळण्याची शक्यता आहे.

फोटो स्रोत, Reuters
त्यांच्या नावासोबत कोणतीही वैद्यकीय पात्रता जोडलेली नसली तरी, ते आरोग्य आणि मानव सेवा विभाग, कृषी विभाग, पर्यावरण संरक्षण संस्था, रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्रे, अन्न आणि औषध सुरक्षा प्रशासन हे प्रभावीपणे चालवू शकतात.
इलॉन मस्क
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले इलॉन मस्क यांनी ट्रम्प यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी लाखो डॉलर्स खर्च केले आहेत.
इलॉन मस्क यांच्याकडे त्यांच्या टेस्ला, स्पेसएक्स आणि एक्स या कंपन्यांना अडचणीचे ठरणारे नियम बदलण्याची ताकद आणि अधिकार येऊ शकतात अशी भीती त्यांच्या विरोधकांना आहे.

फोटो स्रोत, Reuters
डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी या विभागाचे नेतृत्व करण्याबाबत डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क हे दोघेही याआधी बोलले आहेत. त्यांनी या विभागात अनेक गोष्टी कमी करून या विभागाची गुणवत्ता सुधारण्याबाबत भाष्य केलं आहे. ‘नोकरशाही ही एक गुदमरणारी’ व्यवस्था असल्याचं मस्क अनेकवेळा म्हणाले आहेत.
53 वर्षीय मस्क जागतिक मुत्सद्देगिरीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांची भेट घेतली तेव्हा मस्कही तिथे उपस्थित होते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











