उषा चिलुकूरी : कोण आहेत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी, आंध्र प्रदेशात राहायचे पूर्वज

फोटो स्रोत, Getty Images
- Author, गैरिकिपति उमाकांत
- Role, बीबीसी तेलुगूसाठी
आंध्र प्रदेशातल्या पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या निदादावोलू शहरापासून सात किलोमीटर अंतरावर मार्कोंडापाडू हे गाव आहे.
चहूकडे हिरव्यागार शेतांनी वेढलेलं शेतकऱ्यांचं हे गाव सध्या प्रचंड आनंदात आहे. बीबीसीच्या प्रतिनिधींनी अभिनंदन केल्यानंतर इथले गावकरीही भावूक झाले होते.
अमेरिकेचे भावी उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा चिलुकूरी यांचं मूळ याच गावात आहे.
2020 साली भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष झाल्या होत्या आणि आता तेलुगू वंशाच्या उषा व्हेन्स यांचे पती जेडी व्हेन्स हे अमेरिकेचे पुढचे उपराष्ट्राध्यक्ष असतील हे स्पष्ट झालं आहे.
या घटनेमुळे उषा चिलुकूरी यांच्या नावाची आंध्र प्रदेशसह देशभरात चर्चा आहे.



लक्ष्मी आणि राधाकृष्ण चिलुकूरी या उच्चशिक्षित दांपत्याच्या पोटी उषा यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माआधीच हे कुटुंब अमेरिकेला गेलं आणि तिथेच स्थायिक झालं होतं.
त्यांचे पूर्वज कृष्णा जिल्ह्यातील उयुरू मंडलातील साईपुरम गावातून पश्चिम गोदावरी जिल्ह्यातल्या (सध्याच्या पूर्व गोदावरी जिल्ह्यात स्थित) पूर्वीच्या कोव्वूर मतदारसंघातील चागल्लू मंडलातील मार्कोंडापाडू या गावात एका पिढीपूर्वी स्थलांतरित झाले होते आणि इथंच स्थायिक झाले होते.
आता उषा वेन्स यांचे पती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणार असल्याने या गावातल्या चिलुकूरी कुटुंबांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
कोण आहेत उषा आणि जे.डी.वेन्स
2013 मध्ये येल लॉ स्कूलमध्ये शिकत असताना उषा आणि वेन्स या दोघांची भेट झाली. न्यूयॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार त्यावेळी "श्वेतवर्णीय अमेरिकेतील सामाजिक अधोगती" या विषयावरील चर्चासत्रात ते सहभागी झाले होते. या दाम्पत्याला इव्हान, विवेक आणि मीराबेल अशी तीन अपत्यं आहेत.
लिंक्डइनवर दिलेल्या माहितनुसार, उषा चिलुकुरी यांनी येल विद्यापीठातून इतिहासात बीए पदवी प्राप्त केली आहे. नंतर केंब्रिज विद्यापीठातून त्यांनी आधुनिक इतिहासात एम.फिल ही पदवी मिळवली.
कोलंबियातील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ब्रेट कॅवनॉग यांच्यासाठी त्यांनी क्लर्क म्हणून काम केले होते. नंतर त्यांनी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्यासाठीही काम केले. सध्या त्या वकील म्हणून कार्यरत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जे.डी. वेन्स हे सतत उषा यांचे कौतुक करत असतात. उषा येल विद्यापीठातील माझी'आध्यात्मिक गुरू'असल्याचं ते म्हणतात.
तर, "मांसाहारी व्यक्तीनं माझ्या शाकाहारी आहाराशी जुळवून घेतलं आणि माझ्या आईसाठी भारतीय पदार्थ कसे बनवायचे हे देखील शिकले", असं उषा पतीबद्दल कौतुकानं सांगतात.
वेन्स यांनी 2020 मध्ये एका पॉडकास्टमध्ये म्हटलं होते की,"जर मला स्वतःविषयी कधी जास्त अभिमान वाटला तर मी स्वतःला एवढीच आठवण करून देतो की, उषा माझ्यापेक्षा जास्त कर्तृत्ववान आहे. त्यामुळं मी अहंकारापासून दूर राहतो."
"ती किती जास्त हुशार आहे हे लोकांना माहितीच नाही. 1000 पानांचं पुस्तक उषा काही तासांत संपवू शकते," असंही ते म्हणाले.
आम्हाला अभिमान आहे
उषा वेन्स यांच्या चुलत बहीण चिलुकूरी शकुंतला यांनी बीबीसीला प्रतिक्रिया देताना आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, चिलुकूरी कुटुंबातल्या एका मुलीचे पती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत, याचा अभिमान आहे.
शकुंतला चिलुकूरी यांचे पती श्रीपती शास्त्री यांनी बीबीसीला उषा चिलुकूरी यांच्या कुटुंबीयांसोबतच्या काही आठवणी सांगितल्या.
ते म्हणाले की, "मी आता ज्या घरात राहतो त्याच घरात उषा यांच्या आजोबांचा म्हणजेच राम शास्त्री यांचा जन्म झाला होता. त्याकाळी हे घर म्हणजे एक मोठा वाडा होता. राम शास्त्री यांचे वडील वीरवधनुला हे याच गावचे होते.
राम शास्त्री यांनी याच गावात शिक्षण घेतलं आणि पुढे ते राजमुंदरी महाविद्यालयात शिक्षणासाठी गेले. त्यानंतर ते मद्रास (चेन्नई) मध्ये जाऊन स्थायिक झाले. उषा यांचे वडील राधाकृष्ण यांचा जन्म चेन्नईतच झाला आणि नंतर ते अमेरिकेला निघून गेले."

श्रीपती शास्त्री म्हणाले की त्यांच्या वडिलांच्या पिढीपर्यंत राधाकृष्ण हे या गावात येत असत पण नंतर या भेटी कमी होत गेल्या.
पुढे ते म्हणाले की, "आता याच राधाकृष्ण यांचे जावई आणि आमच्या उषाचे पती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे. यामुळे फक्त माझ्या कुटुंबाचंच नाही तर संपूर्ण गावाचं नाव लोकप्रिय होत आहे याबाबत आम्ही खूप समाधानी आहोत."
न्याय विभागात नोकरी केलेल्या चिलुकूरी सूर्यनारायण यांनी बीबीसीला सांगितलं की, "आता जरी आमचा आणि त्या कुटुंबाचा काही संबंध नसला तरी आमच्या गावच्या कन्येचे पती अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होणार आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे."

या गावात राहणारे आणि कर सल्लागार (टॅक्स कन्सल्टन्ट) म्हणून काम करणारे चिलुकूरी वेंकट रामकृष्ण शास्त्री बीबीसीसोबत बोलताना भावुक झाले. ते म्हणाले की, "आमच्या या छोट्याशा गावाचं नाव जगभर पोहोचवणाऱ्या उषाला आमचा सलाम आहे."
याच गावातल्या शिवमंदिराच्या समोर राहणारे चिलुकूरी नागमणी यांनी बीबीसीला सांगितलं की ते खूप खुश आहेत. चिलुकूरी कुटुंबातील लोकांसोबत गावातले इतर लोकही या आनंदात सहभागी झाले होते.
या गावातील जमीनदार रामचंद्र राव, मद्दुला सूर्या राव आणि गंगीशेट्टी हरिबाबू यांनी बीबीसीला सांगितलं की गावातले चिलुकूरी पुजारी हे उषा व्हेन्स यांचे नातेवाईक आहेत हे कळल्यामुळे त्यांना देखील आनंद झाला आहे.

एकही नातेवाईक न राहणाऱ्या वडालुर गावानेही आनंद साजरा केला
चिलुकूरी उषा यांचे पती जेडी व्हेन्स हे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष होणार हे स्पष्ट झाल्यानंतर थानूजवळच्या वडालूर गावातही आनंद साजरा केला गेला.
खरंतर या गावात चिलुकूरी आडनावाचं एकही कुटुंब राहत नाही, एवढंच काय तर त्यांचे कुणी नातेवाईकही इथे राहत नाहीत.
काही वर्षांपूर्वी उषा यांचे आजोबा सुब्रमण्यम शास्त्री आणि चिलुकूरी कुटुंबातले इतर काही लोक या गावात राहत होते.
कृष्णा जिल्ह्यातून गोदावरी जिल्ह्यात स्थलांतरित होत असताना चिलुकूरी वंशाची काही कुटुंबं काही वर्षांसाठी वडालूर या गावात राहिली होती. त्यानंतर ते मार्कोंडापाडूमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले.

उषा यांच्या आजोबांनी या गावाला त्यांची काही जमीनही दान केली होती. या गावातल्या पेनमात्सा चलपति राजू यांनी त्याच जमिनीवर एक कल्याण मंडपम आणि साई बाबांचं मंदिर बांधलं. आता, वडालुरू गावचे माजी सरपंच, चलपति राजू यांचे नातू श्रीनू राजू यांच्या नेतृत्वाखाली, स्थानिक लोक कल्याण मंडपमसह मंदिराचे व्यवस्थापन करत आहेत.
या गावातल्या लोकांनी बुधवारी कल्याण मंडपम आणि मंदिरासाठी जमीन देणाऱ्या चिलुकूरी कुटूंबाच्या आठवणीत आनंद साजरा केला. त्यांनी यावेळी फटाके फोडले.
श्रीनू राजू म्हणाले की, "आमच्या गावात राहिलेल्या एका कुटुंबाची वंशज असलेल्या मुलीचे पती आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होत आहेत याचा आनंद आम्ही गावकऱ्यांनी साजरा केला."
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











