अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष कोण असणार याची घोषणा कधी होईल?

राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, SAUL LOEB/AFP via Getty Images

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष पदासाठी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प
    • Author, सॅम कॅबरल
    • Role, बीबीसी वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. अनेक राज्यांत रिपब्लिकन पक्ष आणि राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प जिंकणार असल्याचा अंदाज बांधला जातोय.

अमेरिकन मतदाते निवडणुकीत थेटपणे आपला राष्ट्राध्यक्ष निवडत नाहीत. त्यामुळे अमेरिकेत अमेरिकेच्या निवडणुकीचे निकाल स्पष्ट व्हायला वेळ लागतो. खासकरून, दोन्ही प्रतिस्पर्धी तुल्यबळ असतात तेव्हा.

यावेळी डेमोक्रेटिक पक्षाकडून अमेरिकेच्या सध्याच्या उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची तर रिपब्लिकन पक्षाकडून डोनाल्ड ट्रम्प यांची उमेदवारी दिली गेलीय. दोघांमध्येही अटीतटीची लढत आहे.

कधी येणार अंतिम निर्णय?

अनेक राज्यांत दोन उमेदवारांना मिळालेल्या मतांमधलं अंतर फार कमी असेल तर परत मतमोजणी करण्याची गरज पडू शकते.

त्यातही 2020 नंतर अनेक अमेरिकन राज्यांनी निवडणूक प्रक्रियेत काही बदल केले आहेत. त्यामुळे आत्ताच्या निवडणुकीचे निकाल यायला अजून उशीर होणार असल्याचं म्हणलं जातंय.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प वादविवादादरम्यान

फोटो स्रोत, VCG/VCG via Getty Images

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प वादविवादादरम्यान

मिशिगनसारख्या ठिकाणी मतांची मोजणी वेगानं केली जातेय. त्यातच मागच्या कोव्हिड महासाथीदरम्यान झालेल्या निवडणुकीच्या तुलनेत पोस्टाने यावेळी फार कमी मतदान केलं गेलंय.

याचाच अर्थ असा की विजेत्याच्या नावाची घोषणा करण्यासाठी निवडणूक झाली ती रात्र, दुसऱ्या दिवशीची सकाळ किंवा अगदी एक आठवडाही लागू शकतो.

कधी आले होते 2020 च्या निवडणुकीचे निकाल?

2020 ला राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक 3 नोव्हेंबरला झाली होती. पण अमेरिकन टीव्ही चॅनल्सने 7 नोव्हेंबरच्या सकाळी उशिरापर्यंत ज्यो बायडन यांना विजयी घोषित केलं नव्हतं.

मतदान झालं त्या रात्री ट्रम्प समर्थकांना जिंकण्याची आशा वाटत होती. पण राष्ट्राध्यक्ष बनण्यासाठी लागणारे '270 इलेक्टोरल कॉलेज व्होट' मिळवण्याची क्षमता दोन्ही उमेदवारांकडे होती.

अनेक राज्यांनी 24 तासातच निर्णय घोषित केला होता. पण पेन्सिल्विनिया आणि नेवाडा यासारख्या मुख्य राज्यांचा निर्णय यायला खूप उशीर झाला.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

पेन्सिल्विनिया त्याच्या 19 इलेक्टोरेट मतांसोबत डेमोक्रेटिक पक्षाकडे झुकत होता. त्यानंतर 7 नोव्हेंबरच्या सकाळी झालेल्या मतमोजणीनंतर बायडनच जिंकणार असल्याचा विश्वास टीव्ही चॅनल्सने व्यक्त केला.

निर्णयाची घोषणा सगळ्यात पहिले सीएनएन या वृत्त संस्थेने केली आणि पुढच्या 15 मिनिटांत बाकी टीव्ही चॅनल्सही तेच सांगू लागले.

निर्णयाची घोषणा कधी केली जाते?

सहसा अमेरिकेच्या मतदारांना त्याच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव मतदानाच्या रात्री किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी माहीत होतं.

उदाहरणच द्यायचं झालं तर 2016 ला जेव्हा ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजल्यापासूनच त्यांना विजेता घोषित केलं जात होतं.

त्याआधी 2012 ला बराक ओबामा दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हाही मतदान झालं त्यादिवशी अर्ध्या रात्रीच ते जिंकणार असल्याचा अंदाज लावला जात होता.

2016 मध्ये ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते

फोटो स्रोत, Win McNamee/Getty Images

फोटो कॅप्शन, 2016 मध्ये ट्रम्प पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले होते

पण 2000 ला जॉर्ज डब्लू बुश आणि अल गोर यांच्या दरम्यान झालेल्या निवडणुकीवेळी असं नव्हतं झालं. त्या निवडणुकीवेळी फ्लोरिडामधल्या दोन उमेदवारांमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. त्यामुळे 12 डिसेंबरपर्यंत विजेत्याच्या नावाची घोषणा केली गेली नाही.

त्यानंतर अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टानं परत परत होणारी मतमोजणी थांबवण्याचे आदेश दिले आणि जॉर्ज बुश निवडणूक जिंकले असल्याची घोषणा केली.

यावेळी कोणत्या महत्त्वाच्या राज्यांवर नजर असेल?

अमेरिकेत दोन्हीपैकी कोणत्याही एका पक्षाचा उमेदवार जिंकू शकतो असं चित्र असणाऱ्या राज्यांना ‘स्विंग राज्य’ म्हणतात. या निवडणुकीचा निकाल सात स्विंग राज्यांवर अवलंबून असेल. त्यांची नावं अशी - एरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, उत्तर कॅरोलिना, पेन्सिल्विनिया, आणि विस्कॉन्सिन.

जॉर्जिया आणि इतर काही राज्यांत मतदान संपल्यानंतर अमेरिकेचे टीवी चॅनल राज्य कुणाकडे झुकली आहेत हे दाखवणं सुरू करू शकतात.

निवडणुकीचा निकाल यायला उशीर का होऊ शकतो?

उमेदवारांना मिळालेल्या मतांमधलं अंतर कमी असेल तर वृत्त संस्थांना निर्णयाचा अंदाज लावायलाही खूप वाट पहावी लागू शकते. अशावेळी दोनदा मतमोजणी होते किंवा इतरही अनेक कायदेशीर आव्हानं येतात.

पुन्हा उदाहरण द्यायचं झालं तर पेन्सिल्विनियामध्ये जिंकणाऱ्या आणि हरणाऱ्या उमेदवाराच्या मतांमध्ये अर्ध्या टक्क्याचा फरक असेल तर संपूर्ण राज्यात परत मतमोजणी सुरू होते. 2020 मध्ये हे अंतर फक्त 1.1 टक्के इतकंच होतं.

अमेरिका निवडणूक

फोटो स्रोत, Getty Images

अमेरिेकेत निवडणुक सुरू होण्याआधीच 100 पेक्षा जास्त खटले भरले गेलेत. त्यात रिपब्लिकन पक्षाकडून निवडणुकीबद्दलच्या अनेक तक्रारी आहेत. या खटल्यांचे रोज येणारे निर्णय राष्ट्राध्यक्ष पदाची लढाई आणखीनच मनोरंजक बनवत आहेत.

याशिवाय मतदान केंद्रांवर झालेली हिंसा आणि मतमोजणीत आणलेले अडथळे यामुळेही निर्णयाची घोषणा व्हायला उशीर होऊ शकतो. असं 2020 मध्ये जॉर्जियाच्या एका पोलिंग स्टेशनवर पाण्याची पाइप फाटल्यामुळे झालं होतं.

निवडणुकीच्या निर्णयाला आव्हान दिलं गेलं तर काय होईल?

प्रत्येक मत एकदा अंतिम निर्णयात मोजलं गेल्यानंतर पुन्हा मतमोजणी होत असेल तर पहिले स्थानिक न्यायालयाला आणि मग राज्यस्तरीय न्यायलायातून निवडणुकीच्या निर्णयावर शिक्का मारून घेतला जातो.

त्यानंतर राज्य कार्यपालिकेचा प्रतिनिधी, म्हणजे राज्यपालाकडून, इलेक्टोरल कॉलेजमध्ये आपल्या राज्यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना प्रमाणित करतो. हे लोक 17 डिसेंबरला त्यांच्या त्यांच्या राज्यांतून मत देतात आणि ती मते वॉशिंग्टनला पाठवली जातात.

त्यानंतर महिन्याच्या सुरूवातीला एक नवीन अमेरिकन काँग्रेस निवडणुकीच्या मतांची मोजणी करायला बसते. त्याचं अध्यक्षपद सध्याच्या उप राष्ट्राध्यक्षांकडे असतं.

2020 मध्ये ट्रम्प त्यांचा पराभव स्वीकारायला तयार नव्हते. त्यांनी उप-राष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांना निर्णयाचा अस्वीकार करण्याचा आग्रह केला. पण पेन्स यांनी त्याला नकार दिला.

त्यानंतर उसळेल्या दंगली शांत झाल्यानंतर आणि काँग्रेसची पुन्हा बैठक झाल्यानंतरही 147 रिपब्लिकन्सने ट्रम्प यांच्या बाजूने मत दिले. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प

त्यानंतर अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यामुळे आलेल्या निकालांवर शंका घेणं अवघड झालं आहे. उप राष्ट्राध्यक्षांना निवडणुकीचे निर्णय एकतर्फी अमान्य करण्याचा अधिकार नाही हेही या सुधारणांमुळे आता स्पष्ट झालंय.

तरीही स्थानिक आणि राज्य स्तरावर राष्ट्राध्यक्ष निवडणुकीला मान्यता देण्यात उशीर केला जाण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो असं निवडणुकीचं विश्लेषण करणाऱ्यांचं म्हणणं आहे. अनेक गट निवडणुकीच्या निर्णयावर शंका घेण्यासाठी तयार बसलेत असं त्यांचं म्हणणं आहे.

हारलो तर निवडणुकीचे निकाल अमान्य करू असं ट्रम्प, यांच्यासोबत उप-राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या जेडी वेन्स आणि रिपब्लिकन पक्षाच्या इतर अनेक मोठ्या नेत्यांनी अनेक वेळा म्हटलं आहे.

राष्ट्राध्यक्षांचं काम कधी सुरू होईल?

नव्या राष्ट्राध्यक्षांचा शपथविधी 20 जानेवारी 2025 ला युएस कॅपिटॉल कॉम्प्लेक्सच्या मैदानावर पार पडेल.

अमेरिकेच्या इतिहासातला हा 60वा राष्ट्राध्यक्ष शपथविधी सोहळा असेल. या समारंभात नवीन राष्ट्राध्यक्ष अमेरिकेची राज्यघटना पाळण्याची शपथ घेतील आणि नंतर देशातल्या लोकांना उद्देशून दोन शब्द बोलतील.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)