स्वामी विवेकानंद : 'मी वयाच्या 40व्या वर्षातला वसंत ऋतू पाहण्यासाठी नसेन' असं भाकित त्यांनी केलं होतं

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

    • Author, रेहान फजल
    • Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी

स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची शिकवण लहानपणापासून आपण घेतो, पण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फारसं माहीत असेलच असं नाही.

स्वामी विवेकानंदांना लहानपणापासूनच खाण्याचा आणि खाऊ घालण्याचा छंद होता. त्यांच्या आयुष्यात रसगुल्ल्याचं स्थान मोठं होतं, आयुष्यच बदललं त्यांचं या बंगाली मिठाईने. कसं?

'स्वामी विवेकानंद द फीस्टिंग, फास्टिंग माँक' म्हणजे 'स्वामी विवेकानंद - मेजवानी आणि उपवास दोन्ही करणारे सत्पुरुष' या नावाने त्यांचं एक चरित्र प्रसिद्ध आहे.

त्यांचं खाण्यावर किती प्रेम होतं याचा दाखला देणारा एक किस्सा प्रसिद्ध आहे. स्वामींनी वेद-वेदांतावरचा ग्रंथ करण्याच्या बरंच आधी फ्रेंच कुकिंगचा एन्सायक्लोपीडिया खरेदी केला होता तेही हप्त्याने पैसे देऊन.

जगात त्यांना सगळ्यात जास्त आवडणारं फळ होतं पेरू. याशिवाय त्यांना नारळ आवडायचा. पण कसा माहितीये? मऊमऊ कोवळ्या खोबऱ्यावर साखर भुरभुरून त्यात बर्फ घालून खायला त्यांना भारी आवडायचं. गांधीजींप्रमाणे तेसुद्धा शेळीचं दूध प्यायचे.

विवेकानंदांचा 'वीक पॉइंट' होता आइस्क्रीम. आइस्क्रीमला ते कुल्फी म्हणत. अमेरिकेत असताना शून्याखाली तापमानात कुडकुडत असतानाही ते चॉकलेट आइस्क्रीम खाण्याची संधी सोडत नसत.

एक दिवस त्यांचा चुलत भाऊ रामचंद्र दत्त त्यांना दक्षिणेश्वर मंदिरात चल असं सांगत आला. तिथे रामकृष्ण परमहंस येणाऱ्या प्रत्येकाला रसगुल्ला खायला देत होते.

विवेकानंद आपल्या भावाला म्हणाले की, मी तिथे आलो आणि मला रसगुल्ला नाही मिळाला तर मी त्या रामकृष्णांचे कान ओढीन. आता पुढची गोष्ट जगजाहीर आहे. विवेकानंद रामकृष्णांकडे जाऊन निराश झाले नाहीत आणि पुढे ते परमहंस यांचे पट्टशिष्य झाले.

विवेकानंद यांच्याबद्दलचे काही किस्से

  • वेद-वेदांतावर आधारित कुठल्या पुस्तक अथवा ग्रंथखरेदीच्या खूप आधी त्यांनी फ्रेंच कुकिंगचा एनसायक्लोपीडिया खरेदी केला होता आणि तेही हप्त्यावर.
  • विवेकानंद शेळीचं दूध प्यायचे. पेरू त्यांचं आवडतं फळ होतं आणि आइस्क्रीम त्यांचा वीक पॉइंट होता.
  • त्यांनी अनेक मोठ्या पंडित आणि उस्तादांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले होते आणि ते अनेक वाद्यही वाजवायचे.
  • काही दिवस मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूटमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं होतं.
  • कधीकधी ते स्वतःवरच विनोद करत स्वतःला 'मोटा स्वामी' असं म्हणवून घ्यायचे.
  • स्वामींना शांत आणि चांगली झोप लागत नसे. खूप प्रयत्न करूनही एका वेळी 15 मिनिटांपेक्षा अधिक वेळ ते सलग झोपू शकत नसत.
  • स्वामींना प्राण्यांविषयी प्रेम होतं. त्यांचा बाघा नावाचा कुत्रा अगदी लाडका होता. बाघा गेल्यावर त्याला मठाच्या आत गंगा नदीकिनारी दफन करण्यात आलं होतं.
  • एकदा त्यांच्या वैद्याने त्यांच्या पाणी पिण्यावर आणि मीठ खाण्यावर बंधन घातलं, तेव्हा स्वामीजी 21 दिवस एकही थेंब पाण्याचा न घेता राहिले होते.

लहानपणापासूनच संन्यासी व्हायचं होतं

विवेकानंद लहानपणी खूप खोडकर होते. त्यांना शांत करायचा एकच उपाय घरच्यांना माहीत होता. त्यांच्या डोक्यावर थंडगार पाणी ओतायचं.

गावोगाव भटकंती करणाऱ्या साधूंविषयी विवेकानंदांना आकर्षण होतं. साधूचा आवाज ऐकला की ते पळत घराबाहेर यायचे.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, rupa & company

कधीकधी तर हे आकर्षण इतकं होतं की, घरच्यांना त्याचं भय वाटे. साधूचा आवाज ऐकला की मग छोट्या नरेंद्रला खोलीत बंद करून ठेवायचे आणि साधू मार्गी लागला की मगच नरेंद्रची सुटका व्हायची.

आपल्याला संन्यासी व्हायचंय, हे त्यांना लहानपणापासूनच वाटायचं. अक्षरओळख व्हायची त्या काळात विवेकानंदांनी लिहिणं-वाचणं सुरू केलं होतं.

त्यांची स्मरणशक्ती विलक्षण होती. एकदा वाचून अखंड पुस्तक त्यांचं तोंडपाठ होई. खेळांमध्ये त्यांना पोहणं, कुस्ती आणि लाठी चालवणं हे आवडीचं होतं. तलवारबाजीचाही त्यांनी अभ्यास केला होता.

रायपूरमध्ये त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांनी बुद्धिबळही शिकून घेतलं होतं आणि ते तरबेजही झाले होते. शास्त्रीय संगीतातल्या बड्या उस्तादांकडून त्यांनी शिक्षण घेतलं आणि ते स्वतः तबला, पखवाज, इसराज (दिलरुबा) आणि सतार ही वाद्य चांगली वाजवत. पण त्यांना सर्वाधिक आवडायचं शास्त्रीय गायन.

त्यांच्या या गायनामुळेच ते रामकृष्ण परमहंसांच्या निकट पोहोचले. विवेकानंदांच्या गायनाचे परमहंस एवढे चाहते होते की, एकदा त्यांचं गाणं ऐकता ऐकता परमहंस समाधीस्थितीत गेले.

परमहंसांकडे दीक्षा

प्रत्येक पित्याची इच्छा असते तशी विवेकानंदांचे वडील विश्वनाथ यांनाही मुलाचं लग्न वेळेत लावून द्यावं असं वाटत होतं. पण रामकृष्ण परमहंस यांचा त्याला विरोध होता.

विवेकानंदांनी ब्रह्मचर्य स्वीकारलं होतं आणि साधू म्हणूनच आयुष्य काढायचा त्यांचा निर्णय होता.

वडिलांच्या निधनानंतर घरातला थोरला मुलगा या नात्याने सात जणांच्या कुटुंबाची जबाबदारी विवेकानंदांवर आली. त्यांनी काही दिवस मेट्रोपॉलिन इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापनाचं काम केलं.

विवेकानंदांचे गुरू रामकृष्ण परमहंस हे साधेपणा आणि नैतिकता यांचं प्रतीक होते. आपला संदेश दुनियाभर पोहोचवण्याचं काम आपला हा शिष्यच करणार अशी त्यांची विवेकानंदांबद्दल खात्री होती.

रामकृष्ण परमहंस

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

सन1886 च्या जुलैमध्ये रामकृष्णांची तब्येत भराभर ढासळायला सुरुवात झाली. त्यांना घशाचा कॅन्सर होता.

अंतिम समयी त्यांनी सगळ्या शिष्यपरिवाराला जवळ बोलावलं आणि विवेकानंदांकडे आपले उत्तराधिकार सोपवले. त्यानंतर 16 ऑगस्ट 1886 रोजी रामकृष्ण परमहंस समाधीस्थ झाले.

त्यांच्यानंतर स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली.

1898 मध्ये तत्कालीन कलकत्त्यात प्लेगची साथ पसरली. हजारो लोक या आजाराच्या भीतीने कलकत्ता सोडून जाऊ लागले.

बचाव आणि मदतकार्यासाठी सेनेला पाचारण करण्यात आलं होतं. त्या वेळी विवेकानंद कलकत्त्यातच थांबून लोकांमध्ये मिसळून मदतकार्य करत होते.

उमदं व्यक्तिमत्त्व

स्वामी विवेकानंदांची अंगकाठी मजबूत आणि डौलदार होती. व्यक्तिमत्त्व उमदं होतं. ते तर्कशुद्ध बोलण्यात पटाईत होते आणि प्रत्येक सभा-संमेलनांमध्ये ते आपली छाप पाडत.

रोमा रोलाँ या जगप्रसिद्ध फ्रेंच लेखकाने लाइफ ऑफ विवेकानंद नावाने त्यांचं चरित्र लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात, 'स्वामीजींचं शरीर एखाद्या पहिलवानासारखं मजबूत होतं. ते 5 फूट साडेआठ इंच उंच होते. रुंद छाती होती आणि विलक्षण प्रभावी आवाज होता.'

'त्यांच्या व्यक्तिमत्त्वातला सर्वांत लक्षवेधी भाग होता रुंद कपाळ आणि मोठे टपोरे काळेभोर डोळे. ते अमेरिकेत आले होते तेव्हा एका पत्रकाराने त्यांचं वजन 102 किलो असावं असा अंदाज केला होता. कधीकधी ते स्वतःवरच विनोद करताना स्वतःचा उल्लेख मोटा स्वामी असा करत.'

त्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न होता झोपेचा. त्यांना शांत आणि गाढ झोप लागत नसे. अंथरुणावर पडून सतत कूस बदलत राहायचे पण झोप काही डोळ्यावर यायची नाही. खूप प्रयत्न करूनही एका वेळी सलग 15 मिनिटांपेक्षा अधिक काळ ते झोपू शकत नसत.

म्हैसूरच्या महाराजांनी अमेरिकेत धाडलं

विवेकानंदांनी संपूर्ण भारतभ्रमण करण्याचं ठरवलं होतं.

सर्वांत आधी ते वाराणसीत गेले आणि तिथे त्यांनी काही संन्यासी आणि अभ्यासकांबरोबर विचारांचं आदान-प्रदान केलं.

विवेकानंदांनी सारनाथचा दौराही केला. इथे गौतम बुद्धांनी आपला पहिला उपदेश दिला होता. त्यानंतर ते अयोध्या, लखनऊ करत आग्र्याला पोहोचले.

त्यांनंतर त्यांनी मुंबई दौरा केला. तिथून पुण्याला जायला निघाले त्यावेळी योगायोगाने त्यांनी आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी एकाच गाडीत बसून प्रवास केला.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

दोघांमध्ये विचारांची देवघेव आणि चर्चा झाली. त्यानंतर टिळकांनी विवेकानंदांना पुण्यातच राहायचं निमंत्रण दिलं. विवेकानंदांनी टिळकांबरोबर पुण्यात 10 दिवस घालवले. त्यानंतर ट्रेनने ते बंगलोरकडे रवाना झाले.

तिथून महाराजांचे पाहुणे म्हणून म्हैसूरला पोहोचले. एक दिवस म्हैसूरच्या राजाने त्यांना विचारलं की, तुमच्यासाठी मी काय करू शकतो? त्यावर स्वामीजींनी उत्तर दिलं की, अमेरिकेत जाऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्याची आपली इच्छा आहे.

राजाने तत्काळ स्मामीजींचा अमेरिकेचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली. स्वामी विवेकानंदांनी त्यावेळी राजांची ही भेट स्वीकार केली नाही पण नंतर मात्र राजांच्या आग्रहाखातर त्यांनी अमेरिका भेटीचा खर्च घेण्याचं कबूल केलं.

धर्म परिषदेतलं ते प्रभावी भाषण

31 मे 1893 रोजी विवेकानंदांनी मद्रासच्या किनाऱ्यावरून पेनिन्सुला नावाच्या जहाजातून अमेरिकेकडे प्रयाण केलं.

आपली मातृभूमी नजरेआड होईपर्यंत ते जहाजाच्या डेकवर थांबून राहिले. त्यांचं ते वाफेच्या इंजिनाचं जहाज कोलंबो, पेनांग, सिंगापूर आणि हाँगकाँग असं मजल दरमजल करत नागासाकीला पोहोचलं.

14 जुलै रोजी ते याकोहामा या जपानी बंदरावरून अमेरिकेकडे जाणाऱ्या इंप्रेस ऑफ इंडिया या जहाजात बसले आणि पुढचा प्रवास सुरू केला.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्यांच्या या प्रवासात विवेकानंदांबरोबर भारतीय उद्योगपती जमशेजदजी टाटा होते. या प्रवासादरम्यान त्या दोघांमध्ये मैत्रीचे धागे जुळले ते शेवटपर्यंत कायम राहिले.

अमेरिकेच्या बंदराला जहाज लागलं आणि व्हँकुव्हरपासून शिकागोला जाण्यासाठी विवेकानंद रेल्वेत बसले. शिकागोच्या धर्म परिषदेत सहभागी होण्यासाठी देशा-विदेशातून हजारो प्रतिनिधी आले होते. त्या सगळ्यांच्यात विवेकानंदांचं वय सगळ्यांत कमी होतं.

'द प्रोफेट ऑफ मॉडर्न इंडिया, स्वामी विवेकानंद' या पुस्तकात गौतम घोष लिहितात, 'धर्म परिषदेतल्या वक्त्यांच्या क्रमवारीत विवेकानंदांचा ३१ वा क्रमांक होता. पण त्यांनी आयोजकांना विनंती केली की मला शेवटी बोलू द्या. त्यांची वेळ आली त्या वेळी त्यांच्या छातीचे ठोके वाढले होते, जीभ सुकली होती.'

'त्यांच्याकडे तयार केलेलं भाषण नव्हतं. पण डॉक्टर बॅरोज यांनी त्यांच्या नावाचा उच्चार केला तेव्हा विवेकानंदांनी मनोमन सरस्वतीचं स्मरण केल आणि ते व्यासपीठावर बोलायला उभे राहिले. त्यांच्या भाषणाचे सुरुवातीचेच शब्द होते- सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका. ते ऐकताच सभागृहातले सगळे लोक कौतुकाने उभे पाहिले आणि विवेकानंदांच्या सन्मानार्थ दोन मिनिटं टाळ्या वाजवत राहिले.'

सर्वधर्म समभावाचा संदेश

टाळ्यांचा कडकडाट थांबल्यावर विवेकानंदांनी आपल्या छोटेखानी भाषणाला सुरुवात केली. भाषणात सुरुवातीलाच त्यांनी जगातल्या सर्वांत तरुण देशांपैकी एक असलेल्या अमेरिकेचे जगातल्या सर्वांत पुरातन संस्कृती असलेल्या देशांपैकी एक असलेल्या भारताच्या वतीने आभार मानले.

हिंदू धर्माने साऱ्या दुनियेला कशी सहिष्णुता शिकवली हे त्यांनी सांगितलं. जगातला कुठलाच धर्म दुसऱ्याहून अधिक चांगला किंवा वाईट असा नाही. सगळे धर्म एकसारखेच आहेत, जे ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता दाखवतात, असं मत विवेकानंदांनी मांडलं.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RKMDELHI.ORG

या गाजलेल्या भाषणानंतर विवेकानंदांनी अमेरिकेत अनेक शहरांमधून भाषणं केली आणि त्यांची प्रशंसाही झाली.

धर्म परिषदेतल्या त्यांच्या भाषणाने जगभरात स्वामी विवेकानंदांचं नाव झालं. ते पुढचं वर्षभर अमेरिकेच्या पूर्वेकडच्या शहरांमध्ये फिरत राहिले.

भारतात परतण्याच्या वेळी ते इंग्लंडंमध्ये थांबले. भारतात आणि भारतीय अभ्यासांत रुची असणाऱ्या प्रोफेसर मॅक्सम्युलर यांच्याशी विवेकानंदांची ऑक्सफर्डमध्ये भेट झाली.

लाल-बाल-पाल नावाने प्रसिद्ध असणाऱ्या तिघांतील बिपीनचंद्र पाल यांचीही भेट इंग्लंडंमध्येच झाली.

स्वामी विवेकानंद

विवेकानंद भारतात परतले त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी रस्त्यात जागोजागी लोक उभे होते. मद्रासहून त्यांनी कुंभकोणमची गाडी पकडली. रेल्वे प्रवासात रस्त्यातल्या प्रत्येक स्टेशनवर लोक त्यांच्या दर्शनासाठी गर्दी करत होते.

एका छोट्या स्टेशनवर गाडी थांबली नाही. त्या वेळी तिथल्या लोकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून जबरदस्तीने ट्रेन बंद केली.

लोकांच्या या प्रेमाने विवेकानंद भारावून गेले आणि डब्यातून बाहेर येत लोकांना अभिवादन केलं आणि लोकांना भेटले.

ढासळती तब्येत

सन 1901 च्या डिसेंबर महिन्यात कलकत्त्यात काँग्रेसचं अधिवेशन होणार होतं. या अधिवेशनासाठी आलेल्या बहुतेक नेत्यांनी बेलूरला येऊन स्वामींचं आधी दर्शन घेतलं. त्यातले बरेच जण दर दुपारी स्वामींना भेटायला यायला लागले.

स्वामी विवेकानंद त्यांच्याशी अनेक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक विषयांवर चर्चा करत असत. त्यांना नियमितपणे भेटणाऱ्या नेत्यांमध्ये एक होते लोकमान्य टिळक. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस हेसुद्धा स्वामी विवेकानंदांचे जवळचे मित्र होते.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

स्वामी विवेकानंदांना मुक्या जनावरांविषयी प्रेम होतं आणि प्राणी पाळायला त्यांना आवडायचं. त्यांच्याकडे बदकं, शेळ्या, मेंढ्या आणि गाय असे प्राणी होते. स्वामीजी आपल्या हाताने त्यांना खायला घालायचे आणि स्वतः या प्राण्यांचं संगोपन करायचे.

विवेकानंदांचा लाडका एक कुत्राही होता. या पाळीव कुत्र्याचं नाव बाघा होतं. स्वामीजींचा सर्वांत लाडका हा प्राणी जेव्हा मरण पावला तेव्हा गंगा नदीच्या किनाऱ्यावर मठाच्या आतमध्येच त्याचं दफन केलं गेलं.

स्वामी विवेकानंदांची तब्येत कायमच नरम-गरम असायची.

त्यांच्या पायांवर नेहमी सूज असायची. उजव्या डोळ्याची दृष्टी अधू झाली होती. त्यांना वारंवार ताप येत असे आणि श्वास घ्यायला त्रास होत असे.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, PENGUIN

छातीच्या डाव्या भागात वेदना होत राहायच्या. आपल्या वडिलांप्रमाणेच त्यांनाही मधुमेह(डायबेटीस) होता.

वाराणसीत पुन्हा आले तेव्हा त्यांच्या आजारपणाने डोकं वर काढलं होतं. तिथले प्रसिद्ध वैद्य कविराज सहानंद सेनगुप्ता यांना त्यांची तब्येत दाखवली.

त्यांनी विवेकानंदांच्या पाणी पिण्यावर आणि मिठावर बंधनं घातली आणि त्यानंतर विवेकानंद पुढचे २१ दिवस थेंबभरही पाणी न पिता राहिले.

शेवटच्या दिवशीसुद्धा तीन तास ध्यान

आपल्या मृत्यूपूर्वी दोन दिवस त्यांनी त्यांची निकटवर्तीय सहकारी सिस्टर निवेदिता यांना आपल्या हाताने वाढण्याचा हट्ट धरला होता.

हात धुण्यासाठी निवेदितांच्या हातावर ते पाणी ओतत असताना निवेदिता म्हणाल्या देखील, 'हे सगळं मी करायला हवी, तुम्ही नाही.'

ब्रिटनमध्ये रामकृष्ण वेदांत सेंटरमार्फत ग्रेट टॉरिंग्टनमध्ये लावण्यात आलेला भगिनी निवेदिता यांचा पुतळा

फोटो स्रोत, BELURMATH.ORG

फोटो कॅप्शन, ब्रिटनमध्ये रामकृष्ण वेदांत सेंटरमार्फत ग्रेट टॉरिंग्टनमध्ये लावण्यात आलेला भगिनी निवेदिता यांचा पुतळा

त्यावर विवेकानंदांनी गंभीरपणे उत्तर दिलं, 'जीजस ख्राइस्टसुद्धा आपल्या शिष्यांचे पाय धूत असत.'

आपल्या महासमाधीच्या दिवशी स्वामी विवेकानंद भल्या पहाटेच उठून बसले. त्यांनी गर्भगृहात जाऊन सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेतल्या. तिथे एकट्याने तीन तास ते ध्यान लावून बसले. दुपारचं जेवण त्यांनी आपल्या सहयोगी साधूबरोबर घेतलं.

दुपारी चार वाजता त्यांनी एक कप गरम दूध घेतलं. मग बाबूराम महाराज यांच्याबरोबर हिंडण्यासाठी ते बाहेर पडले.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

संध्याकाळच्या प्रार्थनेची घंटा झाली तेव्हा विवेकानंद आपल्या खोलीत निघून गेले. तिथे गंगेच्या समोर ते ध्यान लावून बसले.

रात्री 8 च्या सुमारास मठातल्या एका संन्याशाला बोलावून त्यांनी डोक्यावर पंखा फिरवायला सांगितला. त्यावेळी ते बिछान्यावर निजलेले होते.

साधारण तासाभराने त्यांचं कपाळ घामाने डबडबलेलं. हाताला थोडं कापरं भरलं आणि त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला.

सगळं काही संपल्याचा हा संकेत होता. त्या वेळी रात्रीचे ९ वाजून १० मिनिटं झाली होती. त्या वेळी तिथे उपस्थित असणाऱ्या स्वामी प्रेमानंद आणि स्वामी निश्चयानंद यांनी स्वामी विवेकानंदांना जोरजोराने हाका मारून उठवायचा प्रयत्न केला. पण स्वामींकडून काहीच प्रतिसाद मिळाला नाही.

हृदयक्रिया बंद पडून झाला देहांत

विवेकानंदांची ती अवस्था पाहून डॉ. महेंद्रनाथ मजुमदार यांना बोलावण्यात आलं. त्यांनी कृत्रिम श्वासोच्छवासाच्या आधारे स्वामींना उठवायचा प्रयत्न केला पण शेवटी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

स्वामी विवेकानंद

फोटो स्रोत, RUPA & COMPANY

हृदयविकाराचा झटका असं त्यांच्या मृत्यूचं कारण देण्यात आलं. सकाळी सकाळी सिस्टर निवेदिता आल्या. स्वामींचा हात हातात धरून त्या दुपारी 2 पर्यंत बसून होत्या.

39 वर्षं, 5 महिने आणि 22 दिवस एवढा काळ स्वामी विवेकानंद यांनी या पृथ्वीतलावर घालवला आणि मग निरोप घेतला.

मी 40 वा वसंत बघू शकणार नाही, अशी भविष्यवाणी त्यांनी स्वतःबद्दल करून ठेवली होती. ती अखेर सत्य ठरली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)