इलॉन मस्क यांना अमेरिका सरकारच्या 'कार्यक्षमता' विभागाची जबाबदारी - विश्लेषण

ट्रम्प आणि मस्क

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, लिली जमाली
    • Role, प्रतिनिधी, सॅन फ्रान्सिस्को

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत बहुमताने विजयी झालेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक इलॉन मस्क यांची अमेरिकन सरकार कार्यक्षमता विभागाच्या पदी नियुक्ती केली आहे. मस्क यांच्यासोबत भारतीय वंशाचे अमेरिकन विवेक रामस्वामी हे देखील या विभागाची जबाबदारी पाहणार आहेत.

इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारात सहभाग घेतला होता. तसेच ट्रम्प निवडून आल्यावर आपल्याला सरकारची कार्यक्षमता वाढवण्यासाठी जर सहकार्य करता आले तर आपण ते जरुर करू असे त्यांनी म्हटले होते. त्यानुसार ट्रम्प यांनी त्यांना ही जबाबदारी दिली आहे. याआधी कार्यक्षमता विभाग असं वेगळं खातं अमेरिकेत नव्हतं.

निवडणूक प्रचारात काम केल्याचा इलॉन मस्क यांना काय फायदा होऊ शकतो याबाबत ट्रम्प निवडून आल्यानंतर बीबीसीच्या प्रतिनिधी लिली जमाली यांनी हे विश्लेषण केलं होतं. ते पुन्हा प्रसिद्ध करत आहोत.

जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मस्क यांनी निवडणुकीची रात्र डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या मार-ए-लागो रिसॉर्टमध्ये घालवली.

डोनाल्ड ट्रम्प विजयी होणार हे दिसू लागताच इलॉन मस्क यांनी एक्सवर पोस्ट लिहून सांगितलं की, "अमेरिकेच्या मतदारांनी @realDonaldTrump (डोनाल्ड ट्रम्प) यांना सुस्पष्ट बहुमत दिलं आहे. अमेरिकन लोकांनी बदलासाठी मतदान केलं आहे."

विजयानंतर झालेल्या पहिल्याच भाषणात, अमेरिकेतील पाम बिच कन्व्हेंशन सेंटरमध्ये बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इलॉन मस्क यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. यासोबतच मस्क यांच्या स्पेसएक्स नावाच्या कंपनीने बनवलेलं रॉकेट कशा पद्धतीने यशस्वीरीत्या उतरलं याचाही ट्रम्प यांनी उल्लेख केला.

डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क

जुलै महिन्यात अमेरिकेतील पेन्सिल्व्हेनिया राज्यातल्या बटलर शहराजवळ डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या प्राणघातक गोळीबारानंतर लगेचच इलॉन मस्क ट्रम्प यांच्या समर्थनार्थ उतरले होते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रमुख समर्थकांपैकी एक असलेल्या या अब्जाधीश उद्योगपतीने ट्रम्प यांच्या प्रचारार्थ तब्बल 119 मिलियन डॉलर दान केले होते. ट्रम्प यांना पुन्हा एकदा विजयी करण्यासाठी राबवलेल्या सुपर पॅक (Super PAC) मोहिमेसाठी ही देणगी देण्यात आली होती.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मतदानापूर्वीचे काही आठवडे मस्क यांनी गेट-आउट-द-व्होट ही मोहीम राबवण्यासाठी घालविले. या मोहिमेत अधिकाधिक मतदान करून घेण्यासाठी रोज दहा लाख डॉलर्सचं वाटप मतदारांना करण्यात आलं.

ज्या राज्यांमध्ये अटीतटीची लढाई होती तिथेच ही मोहीम राबवली गेली. या मोहिमेला अमेरिकेच्या न्यायालयात आव्हानही देण्यात आलं होतं मात्र न्यायाधीशांनी ही मोहीम सुरू ठेवण्याची परवानगी दिली.

इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या पाठीमागे स्वतःचं नाव, पैसा आणि सोशल प्लॅटफॉर्म उभा केल्यामुळे आता ट्रम्प यांच्या विजयानंतर त्यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत की त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात, ते मस्क यांना प्रशासनात येण्याचं निमंत्रण देतील आणि 'सरकारी कचऱ्याची' विल्हेवाट लावण्यात त्यांची मदत घेतील.

इलॉन मस्क यांनी याचा दाखल देताना 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशिएन्शी' (Department Of Government Efficiency) किंवा DOGEची शिफारस केली आहे. याच नावाचे मिम्स आणि क्रिप्टोकरन्सी मस्क यांनी वापरली होती.

ट्रम्प यांच्या प्रचारसभेत काळी टोपी, टी-शर्ट आणि ब्लेझर घालून ओरडणारे इलॉन मस्क.

फोटो स्रोत, Getty Images

इलॉन मस्क यांच्या मालकीच्या स्पेस एक्स कंपनीला देखील ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाचा फायदा होऊ शकतो. सरकारी उपग्रह अंतराळात पाठवण्याच्या उद्योगात स्पेसएक्स या कंपनीने आधीच वर्चस्व मिळवलेलं आहे.

व्हाईट हाऊसमध्ये त्यांच्या एवढ्या जवळचा सहकारी एवढ्या मोठ्या पदावर गेल्याने हे संबंध अधिक दृढ होऊ शकतात. इलॉन मस्क यांनी त्यांची प्रतिस्पर्धी असलेल्या बोईंग कंपनीच्या सरकारी कंत्राटांवर आधीच टीका केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या कंत्राटांच्या रचनेमुळे बोईंग कंपनी ठरलेल्या खर्चात आणि मुदतीत दिलेली कामे करत नाही.

अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था आणि पेंटागॉन सारख्या संस्थांनी कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक करण्याची तयारी दाखवल्यानंतर स्पेसएक्स आता हेरगिरी करणारे उपग्रह देखील तयार करणार आहेत.

ट्रम्प यांनी उद्योगांबाबत भाष्य करताना म्हटलं होतं की ते कमीत कमी सरकारी हस्तक्षेप असणारं उद्योग धोरण आणणार आहेत आणि याचा देखील मस्क यांच्या इलेक्ट्रिक गाड्या बनवणाऱ्या टेस्ला कंपनीला फायदा होऊ शकतो.

इलॉन मस्क

फोटो स्रोत, Getty Images

मागच्याच महिन्यात रस्ता सुरक्षेसाठी काम करणाऱ्या अमेरिकेच्या सरकारी संस्थेने टेस्ला कंपनीच्या 'सेल्फ ड्राइव्ह सॉफ्टवेअर सिस्टीम'ची चौकशी करणार असल्याचं म्हटलं होतं.

टेस्लामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना संघटनात्मक पातळीवर एकत्र येण्यास पायबंद घातल्याबाबत इलॉन मस्क यांना टीकेला सामोरं जावं लागलं होतं.

अमेरिकेतील ऑटोउद्योगातील कर्मचारी संघटनेने इलॉन मस्क आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात बेकायदेशीर कामगार धोरण राबवल्याची तक्रार केली होती.

आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या कथित निर्णयाबाबत ट्रम्प आणि मस्क यांनी एक्सवरून केलेल्या चर्चेनंतर ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी देशातील मोठे उद्योग आणि अतिश्रीमंत वर्गावर असलेले कर कमी करण्याची घोषणा केली होती. इलॉन मस्क यांना अपेक्षा आहे की ट्रम्प त्यांनी दिलेलं हे आश्वासन पाळतील.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.