'स्थलांतरित लोक पाळीव प्राण्यांना खातात', ट्रम्प यांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे?

स्थलांतरित लोक पाळीव प्राण्यांना खातात, हा ट्रम्प यांचा दावा कितपत योग्य?

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, मर्लिन थॉमस आणि माईक वेंडलिंग
    • Role, बीबीसी व्हेरिफाय आणि बीबीसी न्यूज

अमेरिकेच्या ओहायो शहरामध्ये हैतीमधून आलेल्या स्थलांतरितांनी पाळीव प्राणी खाल्ले असा तथ्यहीन दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे.

10 सप्टेंबर ( मंगळवार) रोजी झालेल्या प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ट्रम्प म्हणाले, "स्प्रिंगफिल्डमध्ये ते कुत्रे खात आहेत. जे लोक देशात आले आहेत ते मांजरही खात आहेत. तिथं आधीपासून राहाणाऱ्या लोकांनी पाळलेले प्राणी खात आहेत."

(असं ट्रम्प बाहेरील देशांमधून अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांना उद्देशून म्हणत होते.)

मात्र ट्रम्प यांच्या दाव्याप्रमाणे अशा घटना घडल्याचे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचं बीबीसी व्हेरिफायला स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्षपदाचे उमेदवार जेडी व्हेन्स यांनी एक्स या समाज माध्यमावर याबाबत केलेली पोस्ट 11 लाख लोकांनी पाहिलेली आहे.

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी व्हेन्स यांच्या वक्तव्याला 'धोकादायक' आणि 'वंशवादावर आधारित कट' असं संबोधलं आहे.

हा दावा आला कुठून?

हा दावा चुकीचा असला तरी ट्रम्प समर्थकांच्या सोशल मीडियामधून हा अनेकवेळा करण्यात आलेला आहे.

27 ऑगस्ट रोजी स्प्रिंगफिल्डच्या एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणवणाऱ्या व्यक्तीनं स्थानिक प्रशासनाच्या बैठकीत हैतीमधून आलेल्या स्थलांतरितांविरोधात भाष्य केलं आहे.

त्याने अनेक तक्रारींचा पाढा वाचला त्यात हैतीमधून आलेले लोक त्यांनी पाळलेली बदकं मारुन खात आहेत, हे स्थलांतरित येण्यासाठी स्थानिक अधिकारी पैसे घेत आहेत असा आरोपही केला. मात्र या दाव्यांची पुष्टी करणारा पुरावा दिला नाही.

प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये ट्रंप म्हणाले, "लोक टीव्हीवर येऊन सांगत आहेत की माझा कुत्रा खाण्यासाठी मारला गेला."

बीबीसीनं या दाव्याची पडताळणी करण्यासाठी अमेरिकेतील फॉक्स, सीएनएन, सीबीएससह मोठ्या प्रक्षेपण वाहिन्यांचे जुने व्हीडिओ पडताळले मात्र त्यात कुठेही अशाप्रकारच्या मुलाखतीचा व्हीडिओ आढळला नाही.

फेसबूकवर स्प्रिंगफिल्ड संदर्भातील एका पेजवर हैतीच्या स्थलांतरिताने मांजर मारल्याचा दावा केला आहे आणि त्याबरोबर पुरावा म्हणून शेजारच्या मुलीच्या मैत्रिणीचा फोटो प्रसिद्ध केला आहे.

तसेच रेडिटवर एक माणूस ओहायोमधील कोलंबस येथे हातातून मेलेलं बदक नेत असल्याचा फोटोही प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तसेच एका बातमीत पोलिसांच्या अंगावर असलेल्या कॅमेऱ्याने, एक महिला मांजर मारुन खात असल्याचं टिपलं आणि तो व्हीडिओ इंटरनेटवर प्रसारित झाल्याचं म्हटलं आहे.

उजव्या विचारसरणीचे अनेक लोक ही महिला हैतीची असल्याचं आणि हैतीचे लोक अशाप्रकारची कामं करत असल्याचा दावा केला आहे.

लाल रेष
लाल रेष

खरंतर हा प्रकार ओहायोमधील कँटन येथे म्हणजे स्प्रिंगफिल्डपासून 273 किमी दूर झाला आहे.

कँटम पोलीस याबद्दल बीबीसीला म्हणाले, "या घटनेतील व्यक्तीचा जन्म 1997 साली झाला असून ती व्यक्ती अमेरिकेचीच नागरिक आहे. हैतीच्या लोकांविरोधात कोणत्याही तक्रारी आमच्या समोर आलेल्या नाहीत."

व्हेन्स यांच्याबरोबर एलन मस्क यांनीही, या तथ्यहीन दाव्यासंदर्भातील मिम्स प्रसिद्ध केले आणि हे मिम्स लाखो लोकांनी पाहिले आहेत.

टर्निंग पॉइंट या उजव्या विचारसरणीच्या गटाचे सीईओ चार्ली किर्क यांनी, 'ओहायोमधील लोक हैतीमधून आलेले स्थलांतरित पाळीव प्राणी खात असल्याच्या तक्रारी करत असल्याचं', म्हटलं आहे.

रिपब्लिकन पार्टीच्या लोकांनी सोशल मीडियावर तसेच रिपब्लिकन हाऊस ज्युडिशियरी कमिटीच्या एक्स अकाऊंटवर या दाव्यांबद्दल लिहिलं आहे.

यात एआयने तयार केलेला एक फोटो आहे. या फोटोत डोनाल्ड ट्रम्प यांनी मांजर आणि बदकाला कवेत घेतलेले दिसते.

त्या पोस्टमध्ये 'ओहायोमधील आमच्या बदकांचे आणि मांजराचे रक्षण करा', असं म्हटलं आहे. ही पोस्ट 7 कोटी लोकांनी पाहिलेली आहे.

X/JudiciaryGOP

फोटो स्रोत, X/JudiciaryGOP

याबद्दल बीबीसी व्हेरिफायने स्प्रिंगफिल्डच्या सिटी कमिशनशी चर्चा केली. तेव्हा तिथले अधिकारी आम्हाला म्हणाले, याबद्दल कोणत्याही ठोस तक्रारी आलेल्या नाहीत तसेच स्थलांतरितांकडून पाळीव प्राण्यांना इजा पोहोचल्याचा स्पष्ट दावा करण्यात आलेला नाही.

मंगळवार 10 सप्टेंबर रोजी व्हेन्स यांनी आपल्या दाव्याबद्दल सारवासारव करताना, 'अर्थात या सर्व अफवा खोट्या असू शकतात', अशी कमेंट केली आहे.

बीबीसीनं ट्रम्प यांच्या प्रचारमोहीम विभागाकडे त्यांच्या प्रतिक्रियेसाठी संपर्क केला आहे.

स्प्रिंगफिल्डमधील हैती स्थलांतरित

ओहायो राज्यात नैऋत्येस स्प्रिंगफिल्ड शहर आहे. इथं 60,000 लोक राहतात आणि काही हजार स्थलांतरित लोक राहतात. यातील स्थलांतरित मुख्यत्वे हैतीमधून आलेले आहेत.

या काही वर्षांत सुमारे 20 हजार स्थलांतरित या शहरात स्थायिक झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. गेल्या 60 वर्षांत या शहराची लोकसंख्या 20हजारने कमी झाली होती ती पोकळी या स्थलांतरितांनी भरुन काढली.

या स्थलांतरितांनी स्थानिक कारखान्यांना मनुष्यबळ पुरवून मदत केली असली तरी सार्वजनिक सेवांवर त्यांचा ताणही आला आहे. ओहायोचं सिनेटमध्ये प्रतिनिधित्व व्हेन्स करतात. ते या स्प्रिंगफिल्डपासून एक तासावर असलेल्या शहरात वाढलेले आहेत. त्यामुळे व्हेन्स यांनी या शहराचा प्रचारात अनेवेळा उल्लेख केला आहे.

जोशुआ चिथम यांच्या अतिरिक्त वार्तांकनासह

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)