गर्भपातापासून ते युक्रेन युद्धापर्यंत, सत्ता हाती आल्यानंतर 'या' कामांना असणार डोनाल्ड ट्रम्प यांचे प्राधान्य

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जेम्स फिट्जगेराल्ड
- Role, बीबीसी प्रतिनिधी
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. त्यांनी निवडणुकीच्या प्रचारात अर्थव्यवस्था, स्थलांतरितांचा मुद्दा आणि युक्रेनमध्ये सुरू असलेलं युद्ध अशा अनेक गोष्टींवर काम करण्याचं वचन दिलं होतं.
अमेरिकेच्या सिनेट सभागृहातही त्यांच्या रिपब्लिकन पक्षातले जास्त उमेदवार निवडून आलेत.
त्यामुळे राजकीय मुद्द्यांवर चर्चा करताना ट्रम्प यांनाच बहुमत मिळणार असल्याचं स्पष्ट झालंय.
जिंकल्यानंतर जनतेशी संवाद साधताना ट्रम्प यांनी शपथ घेतली. “मी एक साधी गोष्ट पूर्ण करेन; जे वचन दिलंय, ते पाळेन. दिलेला शब्द कसा पाळायचा हे मला समजतं,” असं ते यावेळी म्हणाले.
आता त्यांची ही वचनं ते नेमकी कशी पूर्ण करणार याबाबत त्यांनी जरा कमी माहिती दिलीय.
‘जिंकून आल्यावर आपल्या सत्तेचा गैरवापर करणार की आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधणार?’ असं 2023 मध्ये फॉक्स न्यूज या वृत्तसंस्थेने त्यांना विचारलं होतं.
पहिले काही दिवस सोडले, तर असं काही करणार नाही असं ते म्हणाले होते. सगळ्यात आधी अमेरिकेच्या सीमा बंद करून टाकणार आणि अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पेट्रोलियम आणि गॅसचं उत्पादन वाढवणार असंही ते म्हणाले होते.
1. बेकायदेशीर स्थलांतरितांना परत पाठवणार
ट्रम्प यांनी प्रचारादरम्यान बेकायदेशीर स्थलांतरितांना देशातून काढून टाकणार असल्याचं वचन दिलं होतं. अमेरिकेच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी सामुहिक हकालपट्टी असेल असंही ते म्हणाले होते.
ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीत अमेरिका - मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्याचं काम सुरू केलं होतं. त्यांनी हे काम पूर्ण करण्याचं वचनही दिलं आहे.
मागच्या वर्षीच्या अखेरिस जो बायडन - हॅरिस यांचं प्रशासन असताना अमेरिकेच्या दक्षिण सीमेवरून येणाऱ्या लोकांच्या संख्येत लक्षणीय वाढीची नोंद झाली. पण यावर्षी ही संख्या कमी झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्या पद्धतीनं लोकांना बाहेर काढून टाकण्याचं वचन ट्रम्प यांनी बीबीसीला दिलेलं आहे ते पूर्ण करताना अनेक कायदेशीर आणि इतर आव्हानांचा सामना करावा लागेल, असं तज्ज्ञ बीबीसीशी बोलताना म्हणतायत.
त्यात आर्थिक विकास मंदावण्याची भीतीही आहे.


2. अर्थव्यवस्था, कर आणि आयात कराबद्दलच्या उपाययोजना
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अमेरिकन मतदारांसाठी अर्थव्यवस्था हा एक महत्त्वाचा मुद्दा होता.
ट्रम्प यांनी महागाई संपवण्याचं वचन दिलं होतं. राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्या कारकिर्दीत ही महागाई खूप वाढली, पण नंतर महागाई कमी झाल्याचंही दिसलं. असं असलं तरी किमतींवर थेटपणे प्रभाव टाकणं राष्ट्राध्यक्षांना एका मर्यादेनंतर शक्य होत नाही.
ट्रम्प यांनी 2017 मध्ये बदल घडवून आणण्यासाठी सुरू केलेल्या योजना पुढे नेण्याचं आणि व्यापक स्तरावर कर कमी करण्याचंही वचन दिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
'टीप इनकम’ वर, सामाजिक सुरक्षेसाठी होत असलेला खर्च कर मुक्त करण्यासाठी आणि कॉर्पोरेट कर कमी करण्याचा प्रस्ताव ट्रम्प यांनी सादर केला आहे. (अमेरिकेत काम करणाऱ्या माणसाला 30 डॉलरपेक्षा जास्त टीप मिळाली तर त्यावर कर भरावा लागतो.)
व्यापारातली तूट कमी करण्यासाठी ट्रम्प अनेक परदेशी सामानांवर कमीत कमी 10 टक्के आयात करही लावणार आहेत. पण चीनकडून येणाऱ्या सामानावर याशिवाय 60 टक्क्यांचा आयात कर लावला जाईल. यामुळे सामानांच्या किमती वाढून त्याचं ओझं सर्वसामान्यांवर येऊन पडू शकतं असा इशारा काही अर्थशास्त्रज्ञांनी दिला आहे.
3. सहा जानेवारीच्या दंगलीत पकडलेल्यांना माफी
2020 मध्ये बायडन निवडणूक जिंकले होते. त्यांचा विजय नाकारत ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकन संसद भवन कॅपिटल इमारतीवर हल्ला केला होता.
6 जानेवारी 2021 ला झालेल्या या दंगलीसाठी दोषी ठरवलेल्या काही लोकांना ते सोडणार असल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
या दंगलीत झालेल्या काही मृत्यूंसाठी या लोकांना जबाबदार ठरवण्यात आलं होतं. त्यांना भडकवण्याचे आरोप ट्रम्प यांच्यावर लावले गेले होते.
दंगलीचं महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न ट्रम्प करत होते. एवढंच नाही, तर कैद केलेल्या आणि दोषी ठरवलेल्या शेकडो समर्थकांना वाचवण्याचं कामही त्यांनी केलं.
यातल्या अनेकांना चुकीच्या पद्धतीने कैद झाली आहे असं ते अनेक ठिकाणी बोलले आहेत. पण यापैकी काही जण त्याक्षणी नियंत्रणाबाहेर गेले असतील असंही त्यांनी मान्य केलं आहे.
4. विशेष वकील जॅक स्मिथ यांना काढून टाकणे
ट्रम्प यांच्याविरोधातल्या दोन गुन्हेगारी खटल्यांवर जॅक स्मिथ काम करतायत. राष्ट्राध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतल्यानंतर दोन सेकंदात या विशेष वकीलांना काढून टाकणार असल्याचंही ट्रम्प म्हणालेत.
2020 च्या निवडणुकीचे निकाल पलटवण्याचा प्रयत्न करण्यासाठी आणि काही दस्ताऐवजांचा दुरूपयोग करण्यासाठी स्मिथ यांनी ट्रम्प यांना दोषी ठरवलं होतं.
आपण असं कोणतंही बेकायदेशीर काम केलेलं नाही असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इतकंच नाही, निवडणुकीआधी या खटल्यांवरची सुनावणी होऊ नये यासाठी ट्रम्प करत असलेले प्रयत्नही यशस्वी झालेत. स्मिथ यांनी आपल्याला राजकीय शत्रू बनवलं असल्याचं ट्रम्प म्हणाले होते.
एखाद्या गुन्हात दोषी सापडून व्हाइट हाऊसमध्ये परत निवडून येणारे ट्रम्प पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. न्यूयॉर्कमध्ये व्यावसायिक दस्तावेजांची हेराफेरी करण्याच्या आरोपात ते दोषी असल्याचं समोर आलं आहे.
5. युक्रेनमध्ये सुरू असणारं युद्ध संपवणार
रशिया-युक्रेनच्या युद्धात अमेरिका युक्रेनची पाठराखण करतोय.
यासाठी अमेरिकेने अब्जावधी डॉलर्स खर्च करण्यावर ट्रम्प यांनी टीका केली आहे. चर्चा आणि सामंजस्याच्या जोरावर २४ तासांच्या आत हे युद्ध संपवू असा संकल्प त्यांनी केलाय.
पण दोन्ही देशांपैकी कुणी काय सोडलं पाहिजे याबद्दल ते काहीही बोलले नाहीत. असं काही झालं तर त्याने रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचं धैर्य वाढेल असं डेमोक्रेटिक पक्षाला वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
अशा कोणत्याही युद्धापासून अमेरिकेनं लांब रहावं असं ट्रम्प यांना वाटतं.
गाझा संघर्षाबद्दल बोलताना मात्र ते स्वतःला कट्टर इस्राइल समर्थक म्हणवतात. पण अमेरिकेशी मित्रत्वाचे संबंध ठेवणाऱ्या इस्राइलला युद्ध संपवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय.
अशाच पद्धतीने लेबनॉनमध्ये सुरू असलेला संघर्षही संपवणार असल्याचं ट्रम्प म्हणालेत. पण त्याबद्दलचे कोणतेही तपशील दिलेले नाहीत.
6. गर्भपातावर बंदी नसेल
त्यांच्या समर्थकांची इच्छा नसतानाही गर्भपातावर बंधन घालणाऱ्या कोणत्याही कायद्यावर सही करणार नसल्याचं ट्रम्प यांनी हॅरिस यांच्यासोबत सुरू असलेल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या चर्चेवेळी सांगितलं होतं.
गर्भपात हा संविधानिक अधिकार नसल्याचं 2022 मध्ये अमेरिकन सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं.
तेव्हा सुप्रीम कोर्टात सनातनी न्यायाधीशांचं बहुमत होतं. ट्रम्प यांच्या पहिल्या कारकिर्दीपासून काम करणारे हे न्यायधीश होते.

फोटो स्रोत, Getty Images
प्रजननाचे अधिकार हा हॅरिस यांनी निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा बनवला. काही राज्यांनी तर मतदानाच्या दिवशीच गर्भपाताच्या अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं मंजूर केलं.
गर्भपातावर कायदे बनवण्याचं स्वातंत्र्य राज्यांना असलं पाहिजे असं ट्रम्प स्वतः अनेकदा म्हणाले आहेत. पण या मुद्द्यांवर त्यांनी स्पष्टपणे विचार मांडलेले नाहीत.
7. हवामान बदलासंदर्भातले नियम बदलणार
याआधी राष्ट्राध्यक्ष म्हणून काम करताना ट्रम्प यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या अनेक उपाययोजना कमी केल्या होत्या. त्यावेळी पॅरिस हवामान बदल सामंजस्य करारातून बाहेर पडणारा अमेरिका हा पहिला देश ठरला होता.
यावेळीही पुन्हा नियम कमी करणार असल्याचा संकल्प त्यांनी केला आहे. विशेषतः अमेरिकन कार उद्योगांना फायदा व्हावा यासाठी त्यांना हे करायचं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
इलेक्ट्रिक कारवर त्यांनी सातत्याने टीका केली आहे. लोकांनी इलेक्ट्रिक गाड्या वापराव्यात यासाठी बायडन यांनी अनेक धोरणं बनवली होती. पण ट्रम्प यांनी ती काढून टाकणार असल्याचं वचन दिलंय.
‘ड्रील, ड्रील, ड्रील’ अशी शपथ घेत अमेरिकेत गॅस, तेल, कोळसा अशा जीवाश्म इंधनांचं उत्पादन वाढवणार असल्याचं ट्रम्प म्हणालेत.
तेलाचं उत्पादन करण्यासाठी आर्टिक सारख्या जागा खुल्या करण्याची त्यांची इच्छा आहे. त्याने इंधनांवरचा खर्च कमी होईल. पण विश्लेषक याकडे संशयाने पहातायत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











