कमला हॅरिस : नेमक्या कुठे कमी पडल्या, कुठे चुकल्या? पराभवामागची 5 कारणे

फोटो स्रोत, Getty Images
- Author, लुईस बारूचो
- Role, बीबीसी प्रतिनिधी
अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष निवडणूक डोनाल्ड ट्रम्प जिंकले आहेत. सध्याच्या उप राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना हरवत त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पुन्हा एकदा ऐतिहासिक प्रवेश मिळवला.
2020 प्रमाणे या वर्षीचे निकाल शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवणारा नव्हता.
मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हापासूनच ट्रम्प यांची आघाडी होती. अनेक महत्त्वाच्या राज्यांतल्या अमेरिकन नागरिकांनी ट्रम्प यांनाच मतदान केलं.
आधीचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांना मागे टाकत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या कमला हॅरिस ट्रम्प यांच्यासमोर पराभूत होणाऱ्या दुसऱ्या महिला उमेदवार ठरल्या. याआधी 2016 मध्ये हिलरी क्लिंटन ट्रम्पसमोर निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.
कमला हॅरिस यांच्या पराभवामागची पाच कारणं आपण इथं पाहणार आहोत.
1. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची स्थिती
अमेरिकेत बेरोजगारी कमी असताना आणि स्टॉक मार्केट व्यवस्थित सुरू असतानाही अनेक अमेरिकन नागरिक वाढत्या महागाईनं त्रस्त असल्याचं सांगतायत. अर्थव्यवस्था हा या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा होता.
1970 च्या दशकानंतर महागाई आत्ता साथरोग निवळल्यावर सगळ्यात जास्त वाढली. त्याने ट्रम्प यांना एक प्रश्न उपस्थित करण्याची संधी उपलब्ध झाली. “तुम्ही चार वर्षांपूर्वी होता त्यापेक्षा आता चांगल्या परिस्थितीत आहात का?” हा तो प्रश्न.
2024 मध्ये अनेक देशातल्या मतदारांनी सत्तेत असलेल्या पक्षाला खाली पाडलंय. कोविड नंतर महागलेल्या जीवनावश्यक वस्तुंमुळे त्यांना असं करावं लागतंय. अमेरिकेच्या मतदारांनाही तसाच बदल हवा होता असं दिसतंय.
देशाच्या वाटचालीबद्दल चार पैकी फक्त एक अमेरिकन समाधानी आहे. दोन तृतीयांश लोकांचे अर्थव्यवस्थेबद्दल फार नकारात्मक विचार आहेत.
“काही प्रमाणात बायडन यांच्या महागड्या धोरणांमुळेही महागाईला चालना मिळाली. बायडन यांच्या अजेंड्याबद्दलच्या मतदात्यांच्या नकारात्मक विचाराने हॅरिस यांचा मार्ग अधिकच खडतर झाला,” असं परराष्ट्र धोरणावर लिहिणारे मायकल हिर्श म्हणतात.
सीएनएनच्या एक्झिट पोल्समध्ये जवळपास निम्मे मतदाते ट्रम्प यांच्याकडं झुकलेले होते. ट्रम्प अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळू शकतात असं त्यांना वाटतं. जवळपास 31% मतदात्यांसाठी अर्थव्यवस्था हा महत्त्वाचा प्रश्न होता.


2. बायडन यांची लोकप्रियता कमी असणं
बदल घडवून आणण्यास समर्थ अशी स्वतःची प्रतिमा हॅरिस यांनी मांडली. पण जो बायडन यांच्या उप-राष्ट्राध्यक्ष या पदापासून स्वतःला दूर ठेवणं त्यांच्यासाठी फार अवघड होतं. जो बायडन यांचे रेटिंग्स त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात फक्त 40% राहिलेत.
बायडन यांनी महागाई आणि अमेरिका मॅक्सिको सीमा वाद व्यवस्थित हाताळला नाही असं अमेरिकन नागरिकांना वाटत असतानाही हॅरिस त्यांच्याशी प्रामाणिक राहिल्या.
राजकीय विश्लेषकांच्या मते त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे हॅरिस यांची एबीसीच्या द व्हू कार्यक्रमात झालेली मुलाखत. त्यांच्या पार्श्वभूमीची फारशी ओळख नसलेल्यांना ती करून देण्याची ही चांगली संधी होती. तरीही बायडन यांच्यापेक्षा त्या कशा वेगळ्या आहेत हे त्यांना समजावून सांगता आलं नाही.
बायडन यांच्यापेक्षा तुम्ही काय वेगळं केलं असतं असं विचारलं तेव्हा “मनात एकही गोष्ट येत नाही” असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, Getty Images
बराक ओबामा यांचे सल्लागार डेव्हीड एक्सेलरॉड यांनी हे वाक्य हॅरिस यांच्यासाठी धोकादायक ठरल्याचं म्हटलंय. तेच वाक्य नंतर ट्रम्प यांच्याकडून हॅरिस विरोधी प्रचारात वापरलं गेलं. महागाईसारखे प्रश्न मतदात्यांच्या मनात असताना तर हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे.
डेमोक्रॅटिक पक्षात प्रतिमेचा प्रश्न उपस्थित झाल्याचंही सुत्रांकडून बीबीसीला समजलं.
“पक्षातल्या उच्चभ्रू समजणाऱ्या काढून टाकण्याची गरज आहे,” असं वॉशिंग्टन डीसी मधल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या एका सदस्याने बीबीसीच्या लोन वेल्स यांना सांगितलं.
पक्षाने प्रचारासाठी घेतलेल्या मेहनतीचं कौतुकही झालं.
यावरून ट्रम्प यांच्या रॅलीत एका रिपब्लिकन समर्थकाशी झालेलं बोलणं आठवतं असं वेल्स म्हणतात. ”त्यांच्या उमेदवारानं पक्षाची प्रतिमा पूर्णपणे बदलून टाकल्याचं समर्थक म्हणत होता. कष्टकरी कुटुंबांना आवडणारी प्रतिमा रिपब्लिकनने घेतली तर डेमोक्रॅटिक हा हॉलिवूडचा पक्ष झाला.”
3. सामाजिक प्रश्न
अर्थव्यवस्थेच्या पलिकडे भावनिक दृष्ट्या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून निवडणूक आकार घेत असते.
डेमोक्रॅटिक पक्ष हा गर्भपाताच्या मुद्द्यावरून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होता, तर ट्रम्प यांनी स्थलांतरीतांचा मुद्दा लावून धरला होता.
बायडन यांच्या काळात सगळ्यात जास्त सीमा वाद झाल्याने आणि स्थलांतराच्या तसंच मतदात्यांच्या रोजच्या जगण्यावर परिणाम झाल्याने ट्रम्प यांच्यावर जास्त विश्वास टाकला, असं प्यु रिसर्च सेंटर यांच्या संशोधनातून आलं.
गर्भपाताचे अधिकार परत देण्याचा प्रचार करून हॅरिस यांनी महिलांची घसघशीत 54% ते 44% टक्के मतं मिळवली असं एडिसन रिसर्च एक्झिट पोल्समधून समोर येतं.
पण तरीही बायडन यांना 2020 मध्ये मिळालेल्या 57% ते 42% या महिलांच्या मतांपेक्षा ती कमीच होती. ट्रम्प यांच्या समर्थकांपैकी 54% टक्के पुरूष होते तर 44% टक्के महिला.

फोटो स्रोत, Getty Images
शेवटी, 2022 मध्ये पाडला होता तितका प्रभाव गर्भपाताच्या मुद्द्याने पाडला नाही. त्यावेळी आपल्या कार्यकाळाच्या मध्यात डेमोक्रॅटिक पक्षाने चांगली कामगिरी केली होती.
अमेरिकन मतदारांनी गेल्या चार वर्षातल्या धोरणांना एकमताने नकार दिला आहे असं स्टँडफर्ड युनिवर्सिटीतल्या हुवर इन्सिट्यूटमधले जेष्ठ कर्मचारी आणि ब्रिटिश अमेरिकन इतिहासकार निएल फर्ग्युसन म्हणतात.
फसलेल्या आर्थिक धोरणांमुळे वाढलेली महागाई, परराष्ट्र धोरणाने मध्य पुर्वेत सुरू झालेली युद्ध आणि ‘जागे व्हा’ च्या नावाखाली चालवलेला सामाजिक अजेंडा याच्याविरोधात अमेरिकन लोकांनी उचलेलं हे पाऊल आहे, असं त्यांना वाटतं.
“कितीही उदारमतवादी वाटत असला तरी या अजेंड्यामुळे फक्त श्वेतवर्णीय आणि कष्टकरी वर्गातले अमेरिकनच नाही तर लॅटिन अमेरिकन, हिस्पॅनिक आणि देशभरातले लोक दूर झाले,” असं फर्ग्युसन बीबीसी रेडिओ 4 च्या टुडे कार्यक्रमात सांगत होते.
“अमेरिकन लोकांना ही धोरणं नको आहेत हा संदेश आता डेमोक्रेटिक पक्षापर्यंत स्पष्टपणे पोहोचलाय. त्यांना ताकदीतून मिळणारी शांतता आणि महागाईशिवाय येणारी भरभराट हवी आहे. त्यांना सामाजिक धोरणात कामगार नको आहेत,” असं ते म्हणाले.
4. कृष्णवर्णीय आणि लॅटीन मतांची कमतरता
पेन्सिल्व्हेनियाचा गड आणि त्यातली 19 इलेक्टोरल मतं काबीज केल्यानंतर ट्रम्प जिंकल्याचं जवळपास नक्की झालं. 1988 पासून ते 2016 मध्ये ट्रम्प यांनी हिलरी क्लिंन्टन यांना हरवेपर्यंत डेमोक्रॅटिक पक्ष कधीही या राज्यात हरला नव्हता.
हॅरिस यांच्या प्रचारात ॲरिझोना, नेवेडा, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅलिफोर्निया अशा राज्यांवर भर दिला होता. रिपब्लिकन्स आणि ट्रम्प मुळे बाहेर पडलेले स्वतंत्र उमेदवार यांच्याविरोधात जिंकता येईल असं त्यांना वाटत होतं. पण ही गुंतवणूक फोल ठरली.
डेमोक्रॅट्सना नेहमी मिळणारं कृष्णवर्णीय, लॅटीन आणि तरुण मतदारांचं समर्थन यावेळी विखुरलं होतं. काही शिकलेल्या निमशहरी भागातल्या लोकांचं समर्थन मिळवण्यात हॅरिस यांना यश आलं असलं तरी ते ट्रम्पविरोधात पुरेसं नव्हतं.

फोटो स्रोत, Getty Images
एडिसन रिसर्च एक्झिट पोल्सनुसार हॅरिस यांना 86% कृष्णवर्णीयांची आणि 53% लॅटिन मतदारांची मतं मिळाली. तर 2020 मध्ये बायडन यांना कृष्णवर्णीय आणि लॅटिन मतदारांची अनुक्रमे 87% आणि 65% इतकी मतं मिळाली होती.
ट्रम्प यांना मिळालेली 54% लॅटिन पुरूषांची मतं हा या निवडणुकीतला महत्त्वाचा बदल होता. तुलनेत, बायडन यांना याच वर्षाकडून 2020 मध्ये 59% मतं मिळाली होती.
बायडन यांच्या तुलनेत हॅरिस यांना ग्रामीण भागातूनही खूप कमी मतं मिळाली. 2016 मध्ये क्लिंटन यांच्या लोकप्रियतेपेक्षाही त्या मागे पडल्या.
5. ट्रम्प यांच्यावर दिलेला अतिरिक्त भर
2016 ला हिलरी क्लिंटन यांच्याप्रमाणेच हॅरिस यांनीही ट्रम्प कसे अयोग्य आहेत यावरच भर दिला.
शेवटी शेवटी त्यांनी ट्रम्प यांच्या वक्तृत्वावर ताशेरे ओढत त्यांना हुकुमशाही, अस्थिर अशी लेबरलं लावली. व्हाईट हाऊसमधल्या कर्मचाऱ्यांचे माजी प्रमुख जॉन केली यांनी ट्रम्पवर केलेल्या हिटलरच्या समर्थनाच्या आरोपाचा त्यांनी उल्लेख केला.
निवडणूक म्हणजे लोकशाहीसाठीची लढाई असल्याचं चित्र त्यांनी उभारलं. निवडणुकीची शर्यत सोडण्यापूर्वी बायडन व्यक्त करत असलेले विचारच त्या सांगत होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
“डोनाल्ड ट्रम्प यांना लक्ष्य करणं हेच त्यांचं एकमेव ध्येय झालं तेव्हा कमला हॅरिस हरल्या,” असं निवडणूक विश्लेषक फ्रँक लुन्ट्झ यांनी एक्स (पुर्वीचं ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरच्या पोस्ट मध्ये म्हटलंय.
“ट्रम्प यांच्याबद्दल मतदात्यांना आधीपासूनच सगळं माहिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतरच्या पहिल्या एका दिवसात, आणि एका महिन्यात हॅरिस यांचं प्रशासन काय काम करेल हे मतदात्यांना माहीत करून घ्यायचं होतं,” असं ते पुढे म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











