रशिया-युक्रेन युद्धात 'युक्रेनचे 13,000 सैनिक मृत्यूमुखी'

फोटो स्रोत, Getty Images
- Author, एल्सा मॅशमन आणि जारोस्लाव लुकिव्ह
- Role, बीबीसी प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून जवळपास 13,000 युक्रेनियन सैनिक मारले गेल्याचं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती देताना सांगितलंय.
युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांचे सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांच्या अंदाजाने आजअखेर 10 ते 13 हजार सैनिक या युद्धात मृत्यूमुखी पडले आहेत.
अशापद्धतीने मृतांची आकडेवारी जाहीर करणं युक्रेनच्या इतिहासात पहिल्यांदाच घडत असेल. दरम्यान पोडोल्याक यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीला युक्रेनच्या लष्कराने दुजोरा दिलेला नाही.
जूनमध्ये दिवसाला 100 ते 200 सैनिक मारले जात असल्याचं पोडोल्याक यांनी सांगितलं होतं.
मागच्या महिन्यात वरिष्ठ अमेरिकन जनरल मार्क मिली यांनी सांगितलं होतं की, युध्द सुरू झाल्यापासून सुमारे 100,000 रशियन आणि 100,000 युक्रेनियन सैनिक मारले गेलेत आणि जखमी झालेत.
बुधवारी इयू कमिशनच्या प्रमुख उर्सुला वॉन डर लेयन यांचा एक व्हीडिओ प्रकाशित झालाय. त्यात त्यांनी 100,000 युक्रेनियन सैन्य युद्धात मृत्यूमुखी पडले असल्याचं सांगितलं.
त्यानंतर इयु कमिशनच्या प्रवक्त्याने चुकीने ही आकडेवारी जाहीर केल्याचं स्पष्ट केलं. सोबतच मृत आणि जखमींची मिळून ही आकडेवारी असल्याचंही सांगितलं.
युक्रेनियन टीव्ही, आउटलेट चॅनल 24 शी बोलताना पोडोल्याक म्हणाले की, "युक्रेनने आता मृतांच्या संख्येबद्दल उघडपणे बोलायला सुरुवात केली आहे."
ते पुढे म्हणाले की, "आमच्याकडे जनरल स्टाफची अधिकृत आकडेवारी असून 10,000 ते 12,500-13,000 सैनिक युद्धात मारले गेलेत."
मृतांमध्ये नागरिकांची संख्या सुद्धा जास्त असू शकते असा अंदाज पोडोल्याक यांनी यावेळी लावला.
बीबीसीने जूनच्या मध्यापर्यंत सुमारे 3,600 मृत नागरिकांची ओळख पटवली होती. आता हा आकडा वाढला असण्याची शक्यता आहे.
यावर्षीच्या 24 फेब्रुवारीपासून युद्धाची सुरुवात झाली. यानंतर सुमारे 100,000 रशियन सैनिक मारले गेलेत. तर 100,000 ते 150,000 सैनिक जखमी झालेत किंवा हरवले आहेत. यातले बहुतांश सैनिक पुन्हा युद्धात परतू शकले नसल्याचं पोडोल्याक यांनी सांगितलं.
बीबीसीच्या रशियन सर्व्हिसने दिलेल्या माहितीप्रमाणे, 24 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या युद्धात किमान 9,311 रशियन सैनिक मारले गेलेत. तर वास्तविक मृतांची संख्या 18,600 पेक्षा जास्त असू शकते.
तर दुसरीकडे युक्रेनच्या लष्कराने म्हटलंय की, युक्रेनच्या एअर डिफेन्सला संपवण्यासाठी रशियाने डमी रॉकेटचा वापर सुरू केलाय.
युक्रेनियन लष्करी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाने सुरुवातीच्या काळात युक्रेनियन पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यासाठी त्यांच्याजवळील क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला होता. पण रशिया आता स्फोटकं आणि शस्त्रास्त्रांशिवाय डिझाइन करण्यात आलेलं रॉकेट वापरत आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








