'डर्टी बॉम्ब' काय आहे? युक्रेन हा बॉम्ब वापरेल असा रशियाने दावा का केला?

फोटो स्रोत, Getty Images
यूक्रेन 'डर्टी बॉम्ब'चा वापर करू शकतो, असा दावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी केलाय. 'डर्टी बॉम्ब'मध्ये किरणोत्सर्गी पदार्थांसोबत स्फोटकांचा वापर केला जातो.
आपला दावा सिद्ध करणारा कोणताही पुरावा रशियाच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेला नाही. युक्रेन, फ्रान्स, यूके आणि अमेरिकेने रशियाचा हा दावा फेटाळून लावला आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून लढाई सुरू आहे. रशियाकडून युक्रेनवर जोरदार हल्ले केले जात आहेत.
रशियाने काय दावा केलाय?
रशियाचे संरक्षणमंत्री सर्जी शोईगू यांनी युकेचे संरक्षण सचिव बेन वॉलॅस यांच्याशी चर्चा करताना सांगितलं की, "आम्हाला काळजी वाटतेय. युक्रेनकडून 'डर्टी बॉम्ब'चा वापर केला जाऊ शकतो."
त्यांनी अमेरिका, फ्रान्स आणि टर्कीच्या संरक्षणमंत्र्यांशी चर्चा करताना अशाच प्रकारची वक्तव्य केली आहेत.
रशियाच्या आरोपांबाबत अमेरिका, फ्रांस आणि यूके सरकारने संयुक्त पत्र जारी केलंय. "युक्रेन त्यांच्याच शहरांवर 'डर्टी बॉम्ब'चा वापर करेल. हे रशियाचे खोटे आरोप आम्ही फेटाळतो आहे."
दुसरीकडे, युक्रेनचे पंतप्रधान व्लादिमीर झेलेन्स्की यांनीदेखील रशियाचे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी रशियावर "या युद्धात सर्व वाईट गोष्टी" केल्याचा आरोप केला आहे.
'डर्टी बॉम्ब' काय असतो?
'डर्टी बॉम्ब'मध्ये युरेनियमसारखा अत्यंत घातक किरणोत्सर्गी पदार्थ असतो. स्फोटकांसोबत याचा वापर केल्यानंतर युरेनियम हवेत मिसळतं आणि पसरतं.
या बॉम्बमध्ये अणूबॉम्बमध्ये वापरले जाणारे अत्यंत उच्च दर्जाचे किरणोत्सर्गी पदार्थ वापरण्याची गरज नसते. रुग्णालयं, अणुउर्जा केंद्र किंवा संशोधन प्रयोगशाळांमध्ये वापरण्यात येणारे किरणोत्सर्गी पदार्थ यात वापरले जातात.

फोटो स्रोत, Getty Images
हा बॉम्ब अणूबॉम्बपेक्षा कमी वेळात आणि कमी पैशात बनवणं शक्य होतं. यांची ने-आण सहज शक्य असते. उदाहरणार्थ, गाडीच्या मागे ठेऊनही त्यांना नेता येऊ शकतं.
किरणोत्सर्गी पदार्थांमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे याचा वापर केल्यास लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होण्याची शक्यता असते.
याचा वापर केल्यास मोठ्या परिसराला धोका पोहोचण्याची शक्यता असते. किरणोत्सर्गावर नियंत्रण आणि लोकांच्या जीवाला धोको पोहोचू नये यासाठी नागरिकांचं स्थलांतर करावं लागतं किंवा किरणोत्सर्ग झालेला परिसर कायमचा निर्मनुष्य करावा लागतो.
अमेरिकन संशोधकांच्या फेडरेशनच्या अंदाजानुसार, या बॉम्बमध्ये 9 ग्रॅम कोबाल्ट-60 आणि 5 किलो TNT स्फोटकांचा वापर करण्यात आला असेल आणि बॉम्ब न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनवर टाकला तर, पुढच्या काही दशकांसाठी हा परिसर रहाण्यासाठी योग्य रहाणार नाही.
याच कारणासाठी 'डर्टी बॉम्ब' ला वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन किंवा सामूहिक हत्यांचं एक शस्त्र म्हणून मानलं जातं.
पण, 'डर्टी बॉम्ब' एक हुकमी हत्यार अजिबात नाहीय.
'डर्टी बॉम्ब'मधील किरणोत्सर्गी पदार्थ हवेत मिसळण्यासाठी याला पावडर स्वरूपात असणं आवश्यक आहे. पण, याचे कण खूप छोटे असतील किंवा वारा फार जास्त असेल तर दूरवर वाहत जाऊ शकतात. ज्यामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता असते.
रशियाने 'डर्टी बॉम्ब'चा दावा का केला?
युद्धांचा अभ्यास करणारी अमेरिकेतील संस्था स्टडी ऑफ वॉरच्या माहितीनुसार, रशियाचा संरक्षण मंत्र्यांनी हा दावा केलाय, कारण "त्यांना पाश्चिमात्य देशांकडून युक्रेनला मिळणारी मदत रोकायची आहे किंवा मदतीचा ओघ कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचसोबत नेटो फौजांना कमकुवत करण्याचा त्यांचा इरादा असू शकतो."
चर्चा अशीही आहे की, रशिया स्वत:च युक्रेनमध्ये 'डर्टी बॉम्ब'चा वापर करेल आणि याचा आरोप युक्रेनवर टाकेल.
पण काही संरक्षणतज्ज्ञांच्या मते, रशिया हा मूर्खपणा कधीच करणार नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे, 'डर्टी बॉम्ब'मुळे रशियन फौजांना आणि रशियाच्या नियंत्रणात असलेल्या शहरांचं अतोनात नुकसान होईल.
स्टडी ऑफ वॉरच्या सांगण्यानुसार, रशिया 'डर्टी बॉम्ब'चा हल्ला करण्याची तयारी करणार नाही.
'डर्टी बॉम्ब'चा वापर याआधी कुठे करण्यात आला होता?
'डर्टी बॉम्ब'चा यशस्वी हल्ला आजतागायत जगभरात कुठेही झालेला नाही. पण, याचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images
1996 मध्ये चेचन बंडखोरांनी डायनामाइट (स्फोटकं) आणि सिसियम- 137 चा वापर करून बनवण्यात आलेल्या बॉम्बचा वापर मॉस्को शहरातील इस्मालोवो पार्क परिसरात केला होता.
कॅन्सरवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणातून सिसियम काढण्यात आलं होतं. सुरक्षा यंत्रणांनी हा बॉम्ब शोधून काढला आणि तो निकामी केला.
तर 1998 साली चेचन्याच्या सुरक्षा यंत्रणेला एका रेल्वे स्टेशनबाहेर ठेवण्यात आलेला डर्टी बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं होतं.
साल 2002 मध्ये दहशतवादी संघटना अल-कायदाशी संबंधित अमेरिकन नागरीक जोस पाडिलाला शिकागो शहरातून अटक करण्यात आली होती. डर्टी बॉम्बचा वापर करून हल्ला करण्याच्या संशयावरून ही अटक करण्यात आली. त्याला कोर्टाने 21 वर्षांची शिक्षा ठोठावली.
दोन वर्षानंतर अल-कायदाचा दहशतवादी, ब्रिटीश नागरीक धीरेन बारोटला लंडनमध्ये अटक करण्यात आली. डर्टी बॉम्बचा वापर करून अमेरिका आणि यूकेत दहशतवादी हल्ला करण्याच्या आरोपावरून त्याला 30 वर्षांची शिक्षा करण्यात आली.
पण, बारोट आणि पाडिलाला अटक करण्यावेळी दोघांनीही डर्टी बॉम्ब बनवण्यास सुरूवात केली नव्हती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








