You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
यंदा उन्हाळा खूप कडक राहील का, जाणून घ्या एल निनोचा प्रभाव..
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
मुंबई – 35.2, जळगाव 36.5, सोलापूर – 37, रत्नागिरी – 37.5, अकोला 38.3.
महाराष्ट्रातल्या काही शहरांमधली 26 फेब्रुवारीच्या कमाल तापमानाची ही आकडेवारी (सेल्सियस) . गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे.
त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय.
याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? यंदा फेब्रुवारीत तापमान का वाढलं आहे, जाणून घेऊयात.
फेब्रुवारीमध्ये तापमान एवढं का वाढलं?
तसं फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि मार्चच्या सुरुवातीला महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागते. या दिवसांत कोकणातल्या काही भागांत तापमान 37-38 अंशांवर जाणंही नवं नाही.
इतिहास पाहिला, तर 25 फेब्रुवारी 1966 रोजी मुंबईच्या सांताक्रुझ वेधशाळेनं 39.6 अंश तापमानाची नोंद केली होती.
पण यंदा फेब्रुवारीच्या अखेरीस नाही, तर अगदी दुसऱ्या आठवड्यापासूनच राज्यात असा उष्मा जाणवू लागला. 16 फेब्रुवारीला तर हवामान विभागानं तापमानाविषयी इशाराही जाहीर केला होता.
केवळ कच्छ आणि कोकणच नाही तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर भारतातील अनेक ठिकाणीही नेहमीपेक्षा जास्त तापमान नोंदवलं गेलं. काही ठिकाणी पारा 40 अंशांजवळ गेला.
फेब्रुवारीमध्ये एवढा उकाडा का जाणवू लागला? यामागचं कारण आहे उत्तर गोलार्धातली, विशेषतः भारतीय उपखंडातली हवामानाची स्थिती.
एरवी साधारणपणे या दिवसांत उत्तर भारतात वेस्टर्न डिस्टर्बन्स नावाच्या पश्चिमेकडून येणाऱ्या वादळांचा प्रभाव जाणवतो.
या वादळांमुळेच हिवाळ्यात उत्तर भारतामध्ये पाऊस आणि काश्मिरसारख्या ठिकाणी बर्फवृष्टीही होते, त्यामुळे तापमान जास्त वाढत नाही. मात्र तसं झालं नाही.
हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर सांगतात, “फेब्रुवारी महिन्यात उत्तर भारतात अपेक्षित प्रमाणात वेस्टर्न डिस्टर्बन्सेस आले नाहीत. त्यामुळे उत्तर भारतात ज्या प्रमाणात पाऊस आणि बर्फवृष्टी अपेक्षित होती ती झाली नाही.
"त्यामुळे उत्तर भारतात फेब्रुवारीत अपेक्षित थंडी म्हणजे तापमानात कुठली मोठी घट पाहायला मिळाली नाही.”
याच काळात गुजरातवर अँटी सायक्लोनही निर्माण झालं. म्हणजे असं वादळ ज्यात हवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेनं फिरते.
होसाळीकर सांगतात की, “अँटी सायक्लोन मुळे वातावरणाच्या वरच्या थरातली हवा खाली दाबली जाते. हवा जेव्हा अशी जमिनीच्या दिशेनं दाबली जाते तेव्हा दबावामुळे तिचं तापमान वाढतं.
"अँटी सायक्लोनमुळे अशा उष्ण आणि कोरड्या हवेचा परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्र आणि कोकणात जाणवला. त्यामुळेच फेब्रुवारी महिन्यात मध्य भारतातही तापमान नेहमीपेक्षा वाढलं.”
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवसांत तापमान वाढलेलं राहू शकतं.
‘एल निनो’ परतणार?
दरवर्षी उन्हाळा सुरू झाल्यावर आणि मग पावसाच्या तोंडावर एका गोष्टीची चर्चा नेहमी होते. ती म्हणजे एल निनो आणि ला निना. हे एल निनो आणि ला निना काय आहेत, याविषयी सविस्तर लेख तुम्ही इथे वाचू शकता.
पण थोडक्यात सांगायचं तर ही पॅसिफिक महासागरामधल्या सागरी प्रवाहांच्या विशिष्ठ स्थितींची नावं आहेत.
एल निनोदरम्यान विषुववृत्ताजवळ पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागावरील पाण्याचं तापमान वाढतं आणि ते गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं. तर ला निनादरम्यान याउलट स्थिती पाहायला मिळते.
एरवी ला निनाचा प्रभाव एखाद दोन वर्ष टिकतो. पण 2020 पासून सलग तीन वर्ष ला निना स्थिती पाहायला मिळाली. यालाच काहींनी ट्रिपल डिप ला निना असं नाव दिलंय.
पण यंदाचं वर्ष एल निनोचं वर्ष असेल, असं भाकित अमेरिकेच्या National Oceanic and Atmospheric Administration या संस्थेनं वर्तवलं आहे.
पॅसिफिक महासागर जगातला सर्वात मोठा महासागर असल्यामुळे एल निनोचा जगाच्या हवामानावरही परिणाम होऊ शकतो.
भारतात एल निनोच्या काळात याआधी पर्जन्यमानात घट आणि दुष्काळाची स्थितीही निर्माण झाली होती. साहजिकच एल निनोच्या भाकितानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
भारतात किती परिणाम जाणवेल?
एल निनोचा यंदा किती प्रभाव जाणवेल याविषयी आत्ताच भाकित करणं योग्य ठरणार नाही, असं कृष्णानंद होसाळीकर सांगतात.
ते स्पष्ट करतात, “फक्त एल निनो आहे म्हणून त्याचा पावसावर परिणाम होणार आहे का, तर तसं नाही. अशी अनेक वर्ष आहेत जेव्हा एल निनो होता पण भारतात उत्तम पाऊस झाला, तर अशी काही वर्षही आहेत जेव्हा एल निनोचा नकारात्मक परिणाम दिसून आला.
"एल निनोची तीव्रता आणि मान्सूनचा काळ यावरही बरंच अवलंबून असंत. म्हणजे चार महिन्यांनी एल निनो स्थिती येणार असेल, तर तोवर आपला बहुतांश मान्सून संपत आला असू शकतो. ”
एल निनोची निर्माण होण्याची वेळ त्याची पोझिशन आणि त्याची तीव्रता यावरून मान्सूनवर त्याचा काय प्रभाव असेल याचा अंदाज बांधता येतो.
पण एल निनोशिवाय हिंदी महासागरातलं तापमान, उष्णकटीबंधीय प्रदेशातलं स्थानिक हवामान यांचाही मान्सूनवर परिणाम होतो, याकडेही होसाळीकर लक्ष वेधून घेतात.
ते सांगतात, “वसंत ऋतूच्या काळात एल निनोचं भाकित तेवढं अचूक नसतं. त्यामुळे एल निनोविषयी अचूकता पाहायची असेल तर थोडं थांबायला हवं. हवामान विभाग दर आठवड्यालाच यासंदर्भातलं ‘एन्सो बुलेटिन’ जाहीर करत असतो.
ते पुढे सांगतात, "आताच घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण एल निनोच्या नेमक्या स्थितीविषयी अजून स्पष्टता नाही”
एप्रिलच्या सुरुवातीला किंवा मध्यावर हवामान विभाग दीर्घकालीन अंदाज म्हणजे लाँग रेंज फोरकास्ट जाहीर करेल आणि त्यातच भारतातील पाऊस आणि एल निनोविषयी आपला अंदाज व्यक्त करेल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)