You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
Maharashtra Weather : महाराष्ट्रात थंडी कशामुळे आली आहे? ला - निना म्हणजे काय?
- Author, जान्हवी मुळे आणि अमृता दुर्वे
- Role, बीबीसी मराठी
राज्यात सगळीकडे थंडीची लाट आहे. 10 नोव्हेंबरला पुण्यात महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी होती. एकीकडे महाराष्ट्रात थंडीची लाट आहे आणि दुसरीकडे काही भागांमध्ये पावसाचाही अंदाज आहे.
हे असं का होतंय? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? ते आता समजून घेऊया.
यावर्षी भारतातून मान्सून उशीरा बाहेर पडला. साधारण 26 ऑक्टोबरला. तर 11 ऑक्टोबरच्या आसपास जम्मू-काश्मीर, लडाखमध्ये पहिला स्नोफॉल - बर्फवृष्टीही झाली.
उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातही गेल्या काही दिवसांत बर्फ पडलेलं आहे. म्हणूनच महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 दिवसांपासून थंडीची लाट आहे.
सध्या उत्तर भारतातलं आकाश निरभ्र आहे. हवा कोरडी आहे. त्यामुळे उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे थंड वारे येतायत. परिणामी राज्यातल्या तापमानात घट झालीय.
10 नोव्हेंबरला महाराष्ट्रातल्या काही शहरांमधलं किमान तापमान असं होतं...
- पुणे 10.9°C
- नांदेड 16.6°C
- सातारा 15.4°C
- नाशिक 12.2°C
- बारामती 11.4°C
- जळगाव 11.5°C
तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झालाय. ज्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडतोय. याच कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातही कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
याविषयी बोलताना हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर म्हणाले, "गेल्या काही दिवसांमध्ये उत्तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या उत्तर भागात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी आहे. पुण्याच्या भागात पहिल्यांदाच 10 डिग्रीपेक्षा कमी घसरलं होतं. हा प्रभाव 1-2 दिवस राहण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर मध्य भारतात तापमानात वाढ होताना दिसेल. सध्या राज्यात पूर्वेकडून वारे वाहेत. पण येत्या 2-3 दिवसांत वाऱ्यांची दिशा बदलेल आणि आपल्याला किमान तापमानात पुन्हा वाढ होताना दिसेल."
पण यंदा फक्त राज्यातच नाही तर एकूण देशभरातला हिवाळा एरवीपेक्षा जास्त थंड असेल असा अंदाज हवामान तज्ज्ञ वर्तवत आहेत. आणि याला कारण आहे पॅसिफिक म्हणजे प्रशांत महासागरातली ला-निना परिस्थिती.
ला-निना म्हणजे काय?
एल निनो म्हणजे स्पॅनिशमध्ये छोटा मुलगा आणि ला निना म्हणजे स्पॅनिशमध्ये छोटी मुलगी. एरवी साधारण दोन ते आठ वर्षांच्या अंतरानं एल निनो आणि ला निना परिस्थिती उद्भवताना दिसते.
पॅसिफिक महासागर हा पृथ्वीवरचा सर्वांत मोठा महासागर आहे त्यामुळे तिथल्या वारे आणि प्रवाहांचा जगावर थेट परिणाम होताना दिसतो. त्यातही दक्षिण गोलार्धात भूभाग कमी असल्यानं, प्रशांत महासागराच्या दक्षिण भागातलं तापमान जगाच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं. यालाच सदर्न ऑसिलेशन असं म्हणतात.
हे सगळं घडतं व्यापारी वाऱ्यांमुळे. हे वारे उत्तर गोलार्धात ईशान्येकडून तर दक्षिण गोलार्धात आग्नेयेकडून वाहतात.
या वाऱ्यांचा पॅसिफिक महासागरातल्या सागरप्रवाहावर परिणाम होतो. सामान्य स्थितीत या महासागराच्या वरच्या स्तरातलं पाणी गरम झाल्यावर आशियाच्या दिशेनं वाहू लागतं आणि खालच्या स्तरातलं थंड पाणी त्याची जागा घेतं.
व्यापारी वाऱ्यांचा वेग कमी झाला तर या वर आलेल्या पाण्याचं तापमानही वाढतं आणि मग गरम पाणी पूर्वेकडे म्हणजे दक्षिण अमेरिकेच्या दिशेनं सरकतं. या स्थितीला एल निनो म्हणून ओळखलं जातं.
पण हे व्यापारी वारे जेव्हा वेगानं वाहू लागतात तेव्हा गरम पाणी आणि त्यासोबत हवेतलं बाष्प आधी आशियाच्या दिशेनं सरकतं आणि मग हे थंड पाणीही पश्चिमेकडे वाहू लागतं. त्यालाच ला निना म्हणून ओळखलं जातं.
ला-निनाच्या प्रभावामुळे पॅसिफिक महासागराच्या पृष्ठभागाचं तापमान कमी होतं. त्याचा परिणाम फक्त इथेच नाही तर शेजारी असलेल्या हिंदी महासागरातल्या सागरी प्रवाहावर आणि वाऱ्यांवर म्हणजे मान्सूनवर होतो.
पर्यायानं ला-निनाच्या काळात भारतात नेहमीपेक्षा जास्त पाऊस पडतो. ला-निनाच्या प्रभावामुळे एकूणच उत्तर गोलार्धात तापमानही कमी होतं.
ला-निनाचा भारतातल्या हिवाळ्यावर परिणाम
जागतिक तापमानवाढ आणि आर्क्टिक प्रदेशात वितळणारं बर्फ यांच्या परिणामामुळे एल-निनो आणि ला-निनाचं गणितही बिघडताना दिसतंय. यंदा सलग दुसऱ्या वर्षी ला-निनाचा प्रभाव जाणवेल असं भाकित आहे. परिणामी उत्तर गोलार्धात आणि भारताचा विचार करता उत्तरेकडील राज्यांत यंदाचा हिवाळा कडक असेल, असा अंदाज काही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय.
याविषयी बोलताना भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ शास्त्रत्र के. एस. होसाळीकर यांनी सांगितलं, "परिस्थितीची मॉडेल्स असं दर्शवतात की यावेळी ला-निना डिसेंबर 2021 किंवा फेब्रुवारी 2022 पर्यंत त्याचा प्रभाव असेल. यासाठी भारतीय हवामान विभाग येत्या काही दिवसात हिवाळ्याविषयीचा अंदाज सांगताना ला-निनाविषयीही सांगेल."
इंग्लंडच्या रेडिंग विद्यापीठामध्ये हवामानाचा अभ्यास करणारे अक्षय देवरस म्हणतात, "हवामानाच्या दृष्टीने पाहायचं झालं तर समुद्र आणि हवामान यांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. असं पाहण्यात आलंय की ला-निना परिस्थिती असते त्या वर्षात भारतात आणि महाराष्ट्रात हिवाळ्याच्या महिन्यात तापमान सरासरीपेक्षा कमी असतं. अर्थात यापूर्वीच्या काही ला-निना वर्षात याच्या विपरीत परिस्थितीही पाहण्यात आलेली आहे.
"पण सध्याचा अंदाज असा आहे की यावर्षी ला-निनामुळे भारतात थंडीच्या महिन्यांत तापमान सरासरीपेक्षा कमी राहील. पण ही काही सगळ्यात महिन्यांतली परिस्थिती नसेल. वातावरणातल्या इतर गोष्टींचाही हवामानावर परिणाम होत असतो."
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)